मामीचा स्वभाव

Aunt's nature

मामीचा स्वभाव

दोन वर्षाचा वेद मामाच्या खोलीच्या दरवाजावर त्याच्या इवल्याइवल्या हातांनी थापा मारत होता. वेदला मामाच्या खोलीत जायचं होतं,मामाशी खेळायचं होतं. मामा त्याचा जीवलग मित्र होता. 

खरंतर वेद, मामा कामावरून आला की मामासोबत त्या खोलीतच असायचा. मामाच्या कंम्प्युटरमधली चित्र,गाड्या पहायला खूप आवडायचं त्याला. तोही आता माऊस हातात धरुन गाडी चालवायला शिकला होता. मामाच्या लग्नाची तयारी करायला तो व त्याची आई छाया महिनाभर आधी इथे रहायला आले होते.

 नुकतच मामाचं लग्न झाल्यामुळे आता मामाच्या खोलीत मामीचा प्रवेश झाला होता व मामीला मामा फार थोडा वेळ मिळत असल्याने ती त्याला दार उघडू देत नव्हती. मामीचा बालिश हट्ट पाहून मामा जाम वैतागला. त्याच्या डोळ्यासमोर इवलासा वेद दिसू लागला. 

वेदच्या आईने,छायाने वेदला काहीबाही सांगून त्याचं ध्यान तिथून हलवलं व ती त्याला टेरेसमधे चांदोमामा बघायला घेऊन गेली. आभाळातला चांदोमामा,लुकलुकत्या चांदण्या बघताना वेदच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. आजीच्या गोधडीत लाकुडतोड्याची गोष्ट ऐकत वेद झोपी गेला.

इकडे मामा मात्र नाराज झाला. त्याच्या मनात आलं,"अशी कशी ही घुमी. हिला माझ्या भाच्याची अजिबात आवड नाही पण नवीनच लग्न झालेलं त्यामुळे तो तिला याबाबत काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी रात्री छाया तिच्या घरी जायला निघणार होती. दुपारी तिचं बँगा पेक करणं चालू होतं. आई तिला लोणची,मेथकुट,कुरडया बांधून देत होती. 

वेदचा मामा, दुपारीच आला. दार छायानेच उघडलं. हातपाय धुवून पाणी पिऊन तो छायाजवळ बसला. 

छाया म्हणाली,"काय मग बंधुराज. जोडीने या आमच्याकडे. रहायलाच या चार दिवस."

"छायाताई सॉरी."

"अग्गो बाई,मला कधीपासून सॉरी म्हणायला लागलास. थांब हं सुर्य कुठे उगवलाय ते बघून येते."

"ते ताई काल मी यश रडत होता तरी दार उघडलं नाही म्हणून. खरंतर.मी दार उघडणार होतो पण प्रियाने अडवलं. मला काल खूप राग आलेला तिचा. सारखा वेद डोळ्यासमोर दिसत होता. प्रियाला लहान बाळं आवडत नाही वाटतं."

"हो का! यश, अरे आता कुठे लग्न झालंय तुमचं. एकमेकांचे स्वभाव जाणून घ्या. त्यासाठी परस्परांना पुरेसा वेळ द्या. एखाददुसऱ्या प्रसंगातून तू प्रियाच्या स्वभावाचे ठोकताळे मांडू नकोस. आयुष्यभराचं नातं आहे हे. ट्रेनमधला दोनचार स्टेशनांचा प्रवास नव्हे. तिचं चुकत असलं तर तिला सौम्य शब्दात समजावून सांग."

"बरं ताई",असं म्हणत वेद त्याच्या रुमकडे गेला. दार उघडून बघतो तर काय त्यांच्या बेडवर वेदच्या गाड्या आराम करत होत्या व खेळून दमलेला वेद मामीच्या कुशीत गाढ झोपी गेला होता. त्याला झोपवताझोपवता मामीही त्याच्या अंगावर हात ठेवून गाढ निजली होती. तिच्या गालांवर सोम्य हसू पसरलं होतं. 

यशने दोघांच्याही गालांवर प्रेमाने हात फिरवला व मनात म्हणाला,"छायाताई,खरंय तुझं म्हणणं. प्रियाच्या स्वभावाचे मी किती चुकीचे निष्कर्ष काढत होतो!

-----सौ.गीता गजानन गरूड.