Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 6

Read Later
आत्मसन्मान 6


आकाशने समजावल्यावर शेवटी सुमन तयार झाली. त्या दोघांनी घरी सांगायचे ठरवले. पण पहिला आकाश त्याच्या घरी सांगणार होता. आकाशच्या घरी त्याचे आईबाबा, भाऊ आणि तो असे चौघेजण राहत होते. आकाश मोठा होता आणि त्याचा भाऊ लहान होता. आकाशने त्याच्या आईबाबांना सांगितले की, त्याचे सुमनवर खूप प्रेम आहे आणि तो तिच्याशीच लग्न करणार आहे. पण त्याच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला. त्यांना सुमन पसंत नव्हती. त्यांना त्यांच्या तोलामोलाची सून हवी होती.

सुमनला तर तिच्या घरी सांगायचे धाडस झालेच नाही. तिने काही तिच्या घरी सांगितले नाही. आकाशच्या आई-बाबांनी नकार दिला तर त्या दोघांनी पळून जाऊन एका मंदिरामध्ये लग्न करायचे किंवा कोर्ट मॅरेज करायचे असे ठरवले होते. त्या दिवशी सुमन काॅलेजला जाते म्हणून नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडली. बॅगेत चार ड्रेस घेतले. बाहेर कोणी नाही ते पाहून गुपचूप लगबगीने ती घरापासून बरेच अंतर चालत गेली. तिथे आकाश तिला घेऊन जायला आला होता. ती आकाशला म्हणाली, "मला खूप भीती वाटत आहे."

"वेडाबाई, आपण कोणताही गुन्हा करत नाही फक्त आपले प्रेम मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत." आकाशचे हे बोलणे ऐकून सुमनला थोडा धीर आला. ती आकाशच्या गाडीवर बसली आणि दोघेही तडक कोर्टात गेले.

सुमनच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोर्ट मॅरेज केले आणि ते दोघे रितसर पती-पत्नी झाले. कोर्टात आकाशचे मित्र आणि सुमनची एक मैत्रीण एवढेच आले होते. आकाशच्या मित्रांनी खूप छान तयारी केली होती. हार आणले होते. सही केल्यावर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्या. आकाशने अगदी छोटेसे मंगळसुत्र आणले होते ते सुमनच्या गळ्यात घातले. आता कायद्याने ते पती पत्नी झाले. त्यांच्या सहजीवनाला सुरूवात झाली.

लग्न झाल्यावर मित्र मैत्रिणी आपापल्या घरी गेले तरी बराच वेळ ते दोघेही तिथेच बसून होते. कोर्टासमोरील बाकड्यावर बराच वेळ बसल्यावर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले.

आता लग्न झाले. अगदी आवडत्या व्यक्तीशी लग्न झाले. दोघेही खूश होते. पण आता राहायचे कोठे? हा मोठा यक्ष प्रश्न त्या दोघांना पडला. डोक्यावर छप्पर हवंच आणि खायला भाकरी हवी, प्रेम करून काही पोट भरत नाही. आता प्रश्न आला पोटापाण्याचा. पुढे काय करायचे? आकाश नोकरीच्या शोधात होताच, पण त्याला अजून नोकरी मिळायची होती. घरातून निघताना दोघांनी म्हणण्यापेक्षा आकाशनेच काही पैसे आणले होते. त्याच्यातून त्यांनी हाॅटेलमध्ये जेवण केले. किती वेळ उपाशी बसणार? पोटाची आग तर विझवावी लागणारच ना. प्रेमाने पोट थोडीच भरणार होतं.

आता पुढचा प्रश्न निर्माण झाला की राहायचे कोठे? असा विचार चालू झाला. आकाशने एका हॉटेल मध्ये रूम बुक केली. तात्पुरती एक दोन दिवसाची सोय होईल तितके पैसे आकाश जवळ होते. सुमनला घेऊन तो हाॅटेलच्या रूम मध्ये गेला. रूम मध्ये गेल्यावर सुमनने पाहिले तर काय? समोर मोठा बेड होता. त्याच्या वरती अगदी व्यवस्थित बेडशीट घातली होती. बाजूलाच एक मोठा टेबल होता, त्याच्यावरती शो च्या वस्तू होत्या. अॅटॅच बाथरुम आणि आत मध्ये ते सारे दृश्य पाहून तिचे मन मोहरून गेले. असे बेडरूम ती पहिल्यांदाच पहात होती. सुमन सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झाली, एका खोलीत तिघी बहिणी मिळून राहत होत्या. बेडवर झोपून तर काही माहीतच नव्हते. मुली असल्यामुळे घरच्यांनी काही लाड पुरवले नाहीत, त्यावर हे सारे पाहून ती सुखावून गेली. पण शेवटी प्रश्न होताच इथे आपण किती दिवस राहणार?

"सुमन आज आपल्या लग्नाचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे तू आता कोणताही विचार करायचा नाहीस. आपले प्रेम यशस्वी झाले हे महत्त्वाचे. कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहायचे. पुढच्या पुढे बघू. मी आहे ना. तू माझ्यावर विश्वास ठेव." असे म्हणून आकाशने सुमनचा हात धरून तिला खोलीत नेले. खोलीत प्रवेश केल्यावर तिचे अंग शहारून गेले. मग आकाशने सुमनला बेडवर बसवले आणि तोही तिच्या समोर बसला.

"आपला राजा राणीचा संसार आजपासून सुरू होतोय. आपण दोघांनी मिळून हे संसाराचे रोपटे लावलेले आहोत. याचा मोठा वटवृक्ष तयार करायचाय. मी आता जॉब साठी घरातून बाहेर पडतो. कोठे तरी नक्कीच मला नोकरी मिळेल आणि तू देखील घरात छोटी मोठी कामे कर. आपण आपला संसार फुलवू." आकाशच्या अशा बोलण्याने सुमन देखील सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागली. एकदा संसाराला सुरुवात झाली म्हटल्यावर आपल्यालाच काय ते पहावे लागणार आहे? आणि ते करून दाखवायचे असे म्हणून बराच वेळ दोघेही संसाराची आखणी मांडत होते. संसाराची स्वप्ने बघता बघता कधी झोप लागली ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी लवकर उठून आकाश इंटरव्ह्यू साठी घरातून निघाला होता. तो दिवसभर उन्हात वणवण फिरत राहिला. पाच सहा ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर संध्याकाळी परत हॉटेलमध्ये गेला. नोकरी बद्दल काय? ते दुसऱ्या दिवशी त्याला समजणार होते. हे सगळे इंटरव्ह्यू तर चांगले गेले होते. आता काय होईल? याची त्याच्या मनात हुरहूर लागून राहिली होती.

रखरखत्या उन्हातून चालत जाताना समोर एक झाड दिसावे, त्या झाडाखाली सावली मिळेल या आशेने बसले असता ते झाड देखील या उन्हाच्या आगीत होरपळून जावे. त्याची पाने देखील सगळीच गळून जावेत. थोडा विसावा मिळेल म्हटलं तरी काही केल्या मिळत नव्हता. अशी स्थिती सुमनची झाली होती. आधी देखील संसाराचे चटके आणि आता देखील संसाराचे चटकेच. संसार आत्ताच सुरू झाला तरी इतके तिव्र चटके बसू लागले होते.

पण त्या रखरखत्या उन्हात काळे ढग दाटून यावे आणि ओलसर पाऊस पडावा. काय तो पाऊस? मातीत पडल्यावर मातीचा सुगंध दरवळावा तशी आकाशाच्या प्रेमाने तिची स्थिती झाली होती. आयुष्यभर प्रेम मिळाले नाही ते तिला प्रेम मिळाले होते. हे एकच काय तिला जगण्याचे बळ देत होते.

आकाश आल्यावर तो फ्रेश होऊन आला. दिवसभर त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. याआधी कधीच त्याला उपाशी रहावे लागले नव्हते पण आज.. असो. सुमन सुध्दा उपाशीच होती. ते दोघेही बाहेर जेवायला गेले. खरंतर अशी उधळपट्टी करणे त्यांना परवडणारे नव्हते. पण दुसरा कोणताच पर्याय नव्हता. भाड्याने घर मिळू पर्यंत असे रहावे लागणारच होते. पण ती सोयही लवकरात लवकर करावी लागणार होती. दोघे हाॅटेलमध्ये जेवायला गेले खरे पण मेनूकार्ड हातात आल्यावर कमीत कमी किंमतीचे काय मिळेल? ते पाहू लागले. कडाडून भूक लागली होती. ती शमवायची पण होती. त्यासाठी जास्त खर्च न करता कमी किंमतीचे अन्न मागवले तरी ती शमणारच होती.

दोघांनी जेवण करून घेतले. दोघेही आता दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागले. आकाश त्याच्या विचारात असतानाच सुमन त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याचा हात हातात घेऊन "काय विचार करताय?" असे म्हणाली

"आपण असे हॉटेलमध्ये किती दिवस राहणार? आपल्या जवळचे पैसे संपले तर आपण कोठे जाणार? या विचारात मी होतो. मला नोकरी मिळाली तर कुठेतरी भाड्याचे घर करून राहता येईल. आपल्याला भाडे देखील न परवडणारे असणार आहे. संसार तर चालू केला आपण, पण या संसाराचे चटके आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून जाणवत आहेत. मी तुला सुखी ठेवीन की नाही याचे दुःख होत आहे." आकाश नाराजीच्या सुरात म्हणाला. खरंतर आकाशला वाटत होते की नोकरी मिळाली की मग लग्न करू पण सुमनला एक स्थळ पाहून गेले होते आणि त्यांची पसंती आली होती. तिच्या घरचे ते लग्न करण्याच्या तयारीत होते. म्हणून यांना लवकर लग्न करावे लागले. आकाशच्या अशा बोलण्याने सुमन कोमेजून गेली. तिलाही थोडा वेळ वाईटच वाटले. पण परत तिने आकाशचीच समजून काढली.

"मला कधीही न मिळालेले प्रेम आता मिळत आहे. बाकी कोणत्याच गोष्टीची मी अपेक्षा केली नाही. शिवाय तुम्हाला नोकरी मिळाली की आपण भाड्याच्या घरात जाणारच आहोत. मग आपला संसार आपण हळूहळू वाढवू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका. आता आपण सगळ्या परिस्थितीला सामोरे जायचे आणि सारं काही करून दाखवायचे. जर तुमचे प्रेम माझ्या सोबत असेल तर मला काही अवघड नाही. मला देखील काहीतरी करायचं आहे. एक छोटा-मोठा व्यवसाय घरातच चालू करायचा आहे. आज पर्यंत दुसऱ्या समोर हात पसरण्यातच माझं आयुष्य गेलं. पण इथून पुढे मला ताठ मानेने स्वाभिमानाने जगायचं आहे आणि तुमचं प्रेमच मला ते करू देणार. तुम्ही आहात ना माझ्या या निर्णया सोबत." सुमन आकाशला समजावत म्हणाली.

"हो मी नक्कीच आहे तुझ्यासोबत. तू काहीच काळजी करू नको आणि तू जे स्वाभिमानाने जगायचा निर्णय घेतलेला आहेस तो अगदी योग्य आहे. काहीही झालं, कितीही परिस्थितीसमोर आपण हतबल झालो तरी कुणापुढे हात पसरायचे नाही. मोडेन पण वाकणार नाही अशी आपली स्थिती असायला हवी आणि ते आपण पूर्ण करायचे." आकाश जिद्दीने म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिला खूप छान वाटले.

"तुझे प्रेम माझ्या सोबत असेल तर मला कशाचीही कमी पडणार नाही. मला कसलीच अपेक्षा नाही. फक्त तू सोबत रहा." सुमन

"वेडाबाई, मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे. आता तू मला आणि मी तुलाच आहोत. अगदी आयुष्यभरासाठी." आकाश सुमनला म्हणाला. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर दोघेही झोपी गेले.

दुसरा दिवस उजाडल्यावर आकाश परत इंटरव्ह्यूसाठी गेला. आज त्याला दोन-तीन ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जायचे होते. इंटरव्ह्यू देतानाच कालच्या इंटरव्ह्यूचा काय निकाल लागेल? याची ही तो वाट पाहत होता. दुपार निघून गेली तरी सुद्धा त्यांचा काही फोन आला नाही, म्हणून आकाश नाराज होऊन परत रूमवर आला. त्याचा तो उदास चेहरा पाहून सुमनला जे समजायचे ते समजले. तरीही तिने त्याचे हसतमुखाने स्वागत केले.

"आजही नोकरी मिळाली नाही." एवढेच बोलून आकाश बेडवर बसला. "आता आपल्याकडे फक्त थोडेच पैसे शिल्लक आहेत." परत तो बोलला.

या परिस्थितीमुळे त्यांचा प्रेमविवाह होऊनही ते जवळ येत नव्हते. प्रेम तर होतेच पण अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे होते. ते दोघेही तेच करत होते.

आकाश खूप प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. तो मेरिटमध्ये असायचा शिवाय तो खूप हुशार आणि समजूतदार ही होता.

आकाशला नोकरी मिळेल का? त्यांच्याजवळचे पैसे संपल्यावर ते काय करतील? आईबाबा त्यांना घरात घेतील की नाही? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..