आत्मसन्मान 4

Marathi katha


"अगं सुमन, म्हणजे ते अजून डाॅक्टर शिकत आहेत. शिकून डाॅक्टर होतील की आणि त्याच्या बाबांची तब्येत बरी नसते, म्हणून लवकर लग्न करत आहेत ग. त्यांना आई बाबांना सांभाळून घेणारी मुलगी हवी आहे. म्हणून हे बघायला आले ग. बघू आता मी आवडते की नाही ते." सुमनची ताई म्हणाली. ताईने असे सांगितल्यावर कुठे त्यांच्या जीवात जीव आला. खरंच या जगात चांगली माणसं आहेत. जे समोरच्या व्यक्तीला समजावून घेतात आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात.

"आवडणार का नाहीस? तू तर आमची गोड ताई आहेस. तुला कोण नकार देणार?" सुमनने ताईची समजून घातली. सुमनची ताई होतीच तशी अतिशय गुणी आणि लाघवी. समोरचा माणूस कितीही उग्र असला तरी तिचे डोके नेहमी शांतच होते. ती कधीच रागवायची नाही की रूसायची नाही, हट्ट करायचे तर लांबचीच गोष्ट. अशा ताईला कोण नकार देईल? मुळात परिस्थितीने तिला इतक्या कमी वयात जबाबदारीची जाणीव करून दिली होती.

या जीवनात स्त्री किती कमजोर आहे? ती हसत खेळत सगळ्या परिस्थितीला सामोरं जाते, शिवाय जास्त करून तिचीच परिक्षा घेतली जाते. आज माझ्या लेकीने जे केलं ते योग्यच केलं. परिस्थिती पुढे ती कमजोर बनली नाही तर कणखर बनली. सासरचे लोकं अपेक्षा करणारच म्हणून काय त्या अपेक्षांची पूर्ती करण्याकरिता लग्न नव्हे. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का यांना? अशा विचारात सुमन होती.

"आई, हे घे चहा." म्हणून स्वराने चहा पुढे केला. स्वराचा आवाज ऐकून सुमन भानावर आली.

"स्वरा, तुला एक विचारू." सुमन मनातल्या विचारांना मोकळं करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात एक अनामिक भीती वाटत होती.

"हो. विचार ना आई." स्वरा म्हणाली.

"तुला भर मांडवात असे बोलताना भीती नाही वाटली." सुमनने थोडीसे दबकतच विचारले.

"आई, तूच तर शिकवलेस ना की, चुकीच्या गोष्टीला वेळीच आळा बसला पाहिजे. नाहीतर ती गोष्ट हाताबाहेर गेली तर वाईट परिणाम भोगावे लागतील. तेच मी आमलात आणले ग." स्वराने सुमनला तिचेच बोल सांगितले. सुमनने लेकीला अगदी बालपणातच हे संस्कार दिले होते. स्त्री ला तिचा स्वाभिमान महत्त्वाचा असतो. पशूसारखे हात पसरून जगण्यापेक्षा गरूडासम आत्मसन्मानाने उंच भरारी घ्या. खरंच हे किती महत्त्वाचे आणि गरजेचे आहे ना!

"धीटाची आहेस बघ. मी त्यावेळी जर असे धाडस दाखवले असते तर." सुमन नकळत बोलून गेली. सुमनला तिचा भूतकाळ स्पष्ट नजरेसमोरून जात होता.

"कधी ग आई? सांग ना." स्वरा कुतुहलाने विचारू लागली.

"हो सांगते." सुमन परत भूतकाळात गेली.

तिच्या मोठ्या ताईचे लग्न ठरले आणि बघता बघता लग्न झालेही. त्या मुलाकडील मंडळींनी फक्त मुलगी नारळ मागितले आणि ताईसोबत लग्न केले. त्यांनी तर कशाची सुध्दा अपेक्षा केली नाही. हे पाहून घरातील सर्वजण खूश झाले. आजूबाजूचे लोक तर पोरीने नशीब काढलं असे म्हणू लागले. मुळात काही देणे घेणे महत्वाचे नसून मुलीला सन्मानाने वागवणे हेच महत्त्वाचे आहे. सुमनची ताई सासरला जाताना सुमनच्या डोळ्यात जणू महापूर लोटला होता.

ताई त्या घरी सुखाने नांदू लागली. ताईची जास्त उणीव सुमनला भासू लागली. तिला प्रत्येक वेळी समजून घेणारी, चांगले सल्ले देणारी तिची ताई आज सुखी संसाराची वाटचाल करण्यासाठी गेली. तिचे सुख बघून सुमनला आणि तिच्या ताईला लग्न करावेसे वाटू लागले. इथे रडत कुडत बसण्यापेक्षा सासरी दोन क्षण आनंदाने रहावेसे वाटू लागले. पण म्हणतात ना, प्रत्येकजण येताना वेगवेगळे नशीब घेऊन येतो, अगदी तसंच झालं.

सुमनची लहान ताई लग्नासाठी उत्सुक होती. कारण तिच्या ताईचे सुख पाहून आपणही सुखी होऊ अशी भोळी आशा तिच्या मनात होती. ताईला जसे प्रेम मिळाले तसेच मलाही मिळावे असे तिला मनापासून वाटत होते. तिला स्थळ येऊ लागले. तिचे लग्नाचे वय नव्हते पण आईबाबा तिच्यासाठी स्थळ बघू लागले. मुली कधी खपतील असे त्यांना वाटत होते. हिला पण शिकलेले स्थळ आले तर काहीही खर्च न करता लग्न उरकेल म्हणून तिचे आईबाबा स्थळ पाहत होते. ताईला एक स्थळ सांगून आले. मुलगा ओळखीतलाच होता. दिसायला एकदम स्मार्ट. त्याची नोकरी होती. स्थळ चांगले म्हणून बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. मुलाची पसंती आली आणि लग्न घाईगडबडीत उरकून टाकले. मोठ्या ताईला एक मुलगा झाला. लहान ताईला दोन मुली झाल्या. परत तिच्या वाट्याला तेच दुःख आले. मुलगा हवा म्हणून उपास तपास, दवाखान्याच्या वार्या सुरू झाल्या.

मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरूषांवर अवलंबून असते, यामध्ये स्त्री चा काहीच दोष नसतो असे तेव्हा ताईला आणि तिच्या सासरच्यांना समजावून सांगावे असे खूप वाटत होते. पण ते काही समजून घेतील असे वाटले नाही. ताईची ती अवस्था सुमनला पाहवत नव्हती. किती ताईला समजावले तरी तिच्या सासरच्या इच्छे विरुद्ध ती काही जाणार नव्हती. मुलगी असली तरी चेक करून अॅबाॅर्शन करून घेतले असे तीन-चार वेळा झाले. ताई खूपच अशक्त झाली होती पण मुलगा व्हावा या एकाच आशेने तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तसेच ती सुद्धा स्वतःकडे लक्ष देत नव्हती. आईबाबा पण मुलगा होऊ दे म्हणून नवस वगैरे करत होते.

मुलगी देखील घराची पणतीच असते ना. मग मुली झाल्या काय? आणि मुलगा झाला काय? जर तो मुलगा घरात सुख शांती आणला नाही. जे आहे ते उधळपट्टी करून आई-वडिलांना देखील सांभाळला नाही तर त्या मुलाचा काय उपयोग? त्या पेक्षा मुलगी असलेल्या आई वडीलांचा सांभाळ चांगला होतो.

मुली सुद्धा आता मुलांच्या बरोबरीने अगदी खांद्याला खांदा लावून कामं करतात. तरीही मुलींना कमी का लेखतात? ताईने काही ऐकलं नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ताई अशक्तपणामुळे खूपच कमजोर झाली होती. त्यातच तिला दिवस गेले. चेक केल्यावर मुलगा आहे असे समजले, पण डाॅक्टरांनी मूल जन्माला घालण्यामध्ये रिस्क आहे असे सांगितले. आईची तब्बेत खूपच नाजूक झाली आहे त्यामुळे बाळाला जन्म देता येणार नाही, डाॅक्टर असे बोलल्यामुळे ताईची कुणीच जबाबदारी घेईना. तिच्या सासरच्यांना मुलगा हवा होता तर माहेरची सगळी हात झटकून होती. सुमनला खूप काही करावेसे वाटत होते पण ती काहीच करू शकत नव्हती. तिच्या हातात काहीच नव्हते. याचा राहून राहून सुमनला खूप राग येत होता.

ताईचे दिवस भरत आले होते. ताई बाळासाठी स्वतःला जपत होती. मुलगा आहे म्हटल्यावर घरी थोडेफार तिच्याशी गोड बोलत होते. डाॅक्टरांनी कितीही समजावले तरी कुणीच मनावर घेतले नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ताईला मुलगा झाला पण तिच्या अंगात काहीच त्राण नव्हता त्यामुळे मूलाला जन्म दिल्यावर अगदी दहा बारा दिवसातच ती हे जग सोडून गेली आणि तिची लेकरं अनाथ झाली.

तेव्हापासून सुमनच्या मनात लग्नाविषयी नकारात्मक गोष्टी सुरू झाल्या. तिने लग्नाचा सारासार विचार सोडून दिला होता. लग्न झाल्यानंतर हे असंच असतं, त्यापेक्षा आपण शिकून मोठं काहीतरी व्हायचं असे तिने मनोमन ठरवले होते. त्याप्रमाणे तिचे प्रयत्नही चालू होते. ती शाळेतून हायस्कूलमध्ये गेली, हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाले. दहावी मध्ये चांगल्या मार्काने पास झाली. पण तिचे साधे कौतुकही कुणी केले नाही. नंतर तिने काॅलेजला अॅडमिशन केले. कॉलेजला जाणारी ती त्यांच्या घराण्यातील पहिलीच मुलगी होती. कारण मुली म्हणजे परक्याचे धन असे म्हणून नववी दहावी झाले की लगेच त्यांचे लग्न लावून दिले जात होते. तिच्या ताईंचे तर खूप लवकरच लग्न झाले होते. पण सुमन तिच्या जिद्दीने कॉलेजला जाऊ लागली. तिचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पण ते तिच्या आई-बाबांना आणि आजीला काही पचले नाही. त्यांनी तिच्या मागोमाग स्थळे बघायला सुरुवात केली होती.

तिकडे कॉलेजमध्ये जाताना सुमनचे बऱ्याच मैत्रिणींशी ओळख झाली. त्यांच्यासोबत ती अभ्यास करू लागली. घरातून वह्या-पुस्तके काहीच मिळेनासे झाले म्हणून ती ग्रंथालयातून पुस्तके घेऊ लागली आणि वह्या, काही पुस्तके मिळवण्यासाठी ती कॉलेजच्या एक स्टोअर मध्ये पार्टटाइम काम करू लागली. तिथे काम करता करता तिला चार पैसे मिळू लागले आणि त्यातून ती काॅलेजसाठी काही सामान घेऊ लागली. ती पुढे कॉलेजची स्काॅलर बनली. तिथेच तिची ओळख आकाश सोबत झाली. आकाश तिचा सीनियर होता. तो तिच्या पेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. तिला काही हवे नको ते पुस्तकं आणून द्यायचे वगैरे तो करत होता. आकाश कॉलेजमधील टॉपर असल्यामुळे त्याच्याकडून काही नोट्स देखील मिळत गेले आणि त्यानुसार ती अभ्यास करू लागली. आकाश तिला शिकवत होता. क्लासला जाऊन शिकणे तिला परवडणारे नव्हते, त्याची फी तिला भरणे शक्य नव्हते. म्हणून आकाश तिला अशाप्रकारे मदत करत होता. हळूहळू त्यांची खूप चांगली मैत्री झाली आणि ती मैत्री फुलत गेली.

आकाश खूप चांगला मुलगा होता. त्याची घरची परिस्थिती देखील खूप चांगली होती. अगदी पहिल्या दिवसापासूनच सुमन त्याला खूप आवडायची. पण त्याने ते कधी बोलून दाखवले नाही. मात्र सुमन त्याच्याकडे एक खूप चांगला मित्र अशा भावनेने पाहत होती. तिच्या मनात हे प्रेम वगैरे कधीच आलेच नाही. त्यात तिची घरची परिस्थिती तशी होती. पण आकाश तिच्याशी मायेने, प्रेमाने बोलत होता ते तिला खूप आवडायचे. जखमेवर हळुवार फुंकर मारणारा कोणीतरी तिला भेटला होता. इतके दिवस घरच्यांकडून रूढली बोलणे ऐकले होते. पण आकाशच्या येण्याने तिच्या त्या मनाला सुगंधी फवारे मारावेत असे झाले होते. तिला आकाश सोबत राहायला, बोलायला खूप आवडत होते.

रखरखत्या उन्हात जेव्हा माळरानात वर एखादं झाड दिसतं आणि त्या झाडाच्या सावलीत आपण बसतो तेव्हा त्याची शीतल छाया मिळते आणि मन कसे अगदी गार थंड होऊन जाते त्याप्रमाणे आकाशच्या सहवासात सुमनला झाले होते. आकाश सोबत असताना ती अगदी आनंदित आणि प्रसन्न होऊन त्याच्याशी बोलत होती.

हळूहळू सुमनच्या मनात देखील आकाश विषयी प्रेम उत्पन्न होऊ लागले. \"हा एक मित्र असून माझी इतकी काळजी घेतो, तर प्रियकर आणि नवरा बनून किती काळजी घेईल? असाच माझ्यावर प्रेम करणारा आयुष्याचा जोडीदार हवा आहे मला. जर आकाशने मला प्रपोज केलं तर नक्कीच मी त्याच्यासोबत कुठेही जायला तयार आहे.\" असे विचार तिच्या मनात येऊ लागले. आता ती आकाशकडे आयुष्याचा जोडीदार या दृष्टीने पाहू लागली. तो सुद्धा तिच्याकडे त्याच नजरेने पाहत होता.

आकाश सोबतच्या मैत्रीतून प्रेमात रूपांतर होईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः

🎭 Series Post

View all