आत्मसन्मान 3

Marathi story


सुमनला मोठ्या दोन बहिणी होत्या. त्या दोघी बहिणींना देखील या साऱ्यातून जावे लागत होते. सुमन जे भोगत होती ते सारं काही त्या बहिणी सुध्दा भोगत होत्या. सुमनचे घराणे म्हणजे पुरुषप्रधान. मुलांना चांगली वागणूक होती, स्त्रियांना मात्र कोणतीच वागणूक मिळत नसेल, अशा घरात राहून सुमननेही तिचे सारे बालपण घालवले, घालवले कसले ढकलले. दुष्काळ पडून बेहाल झालेल्या जमीनीसारखी अवस्था झाली होती.

ती शाळेला जाऊ लागली की, तिला घरातली सगळी कामे करून जावे लागत असे, अभ्यासाला बसली की कोणी अभ्यास करू देत नव्हते, मित्र-मैत्रिणींसोबत खेळण्यास तर सोडाच साधे बोलणे देखील कोणाला आवडत नसे. तिच्याच घरात ती जणू एखाद्या मोलकरणी सारखी राहत होती. तिच्या प्रमाणे तिच्या बहिणींचीही तीच अवस्था होती. त्यांच्या घरांमध्ये मुलींना कधीच चांगली वागणूक मिळाली नाही. मुलगा व्हावा या अपेक्षेने त्या तिघींनाही विशेष करून सुमनला तुच्छ वागणूक मिळत होती.

जणू मुलगी म्हणून जन्म घेऊन कोणता गुन्हा केला आहे की काय? अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये सारखी येत होती. ती अगदी रडत कुडत जीवन जगत होती. तिचे आई-बाबा देखील तिच्याशी चांगले वागत नव्हते, त्यामुळे या जगात तिला कोणाचाच आधार नव्हता. दोघी बहिणींना देखील तशीच वागणूक मिळत असल्यामुळे किंबहुना हीच्या पेक्षा थोडंसं कमीच म्हणून त्या बहिणी तिच्यावर प्रेम करत होत्या. किमान बहिणी तरी आपल्या सोबत असल्यामुळे तिला जगण्याला थोडा धीर मिळाला. त्या तिच्या आधार होत्या आणि मीरा नावाची तिची एक मैत्रीण जी प्रत्येक गोष्टीत तिच्या सोबत होती अगदी सावलीसारखी. रखरखत्या उन्हात पावसाचे थेंब देहावर ओघळून जीव शांत होतो तसे सुमन बहिण आणि मैत्रीणींच्या सहवासात मनमोकळे करून मन शांत करायची.

एकदा सुमन शाळेतून घरी आली तर तिला घरात काही पाहुणे आल्याचे दिसले. ती तशीच खोलीत गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिले की तिची मोठी ताई साडी नेसून खूप छान आवरली होती. ते पाहून तिने विचारले.

"ताई, तू आज इतकी आवरली का आहेस? आणि बाहेर ती मंडळी कोण आहेत?" सुमनच्या या प्रश्नावर तिची ताई काहीच बोलली नव्हती. ती मान खाली घालून शांत उभी होती. ताईला असे आवरलेले पाहून तिला नवलच वाटले. आज ताई खूप सुंदर दिसत होती. अगदी राजकुमारीसारखी. सुमन ताईकडून उत्तराची अपेक्षा करत तिथेच उभी होती.

तेवढ्यात तिची आजी तिथे आली आणि ती म्हणाली,
"छान वागायचं बघ. तू त्या मंडळींना पसंत पडली पाहिजेस."

"पसंत पडली पाहिजेस म्हणजे? ती मंडळी का आली आहेत?" सुमनने आश्चर्याने विचारले. तिला आजीच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. तिच्या मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातले होते.

"तुझ्या ताईला बघायला. आता तिचं लग्न होणार आहे." आजीने सुमनला शांतपणे उत्तर दिले. आजीच्या या उत्तराने सुमनला थोडा राग आला आणि ती नाराज देखील झाली. तिला हे अजिबात आवडले नाही. ती याला विरोध करत म्हणाली,
"पण ताईचं लग्नाचं वय झालं नाही. ती अजूनही लहानच आहे. मग इतक्या लवकर तिचे लग्न?" सुमनचे हे बोलणे ऐकून तिच्या आजीला खूप राग आला.

"तीन तीन जणी अशा रांगेने आलाय. कुठं खपवायचं तुम्हाला? तुम्हाला खपवू पर्यंत नाकेनऊ येतील. काय म्हणून पदरात तीन पोरी देवानं दिलंय काय माहित? एक जाईपर्यंत दुसरी उरावर येऊन बसत्या." आजी रागाने म्हणाली. जणू तीन मुली जन्माला आल्या म्हणजे त्यांना जड होऊ लागल्या. त्या काही कामाच्या नव्हत्या. त्यांना खपवले की मग डोक्यावरचं जणू ओझंच गेलं अशी त्यांची धारणा झाली होती.

"अगं आजी, पण तिला अजून शिकायचं आहे. तरी का तिचं लग्न करत आहात? अगं अजून ताई लहान आहे." सुमन आजीला समजावत होती. मुली म्हणजे जड नाहीत तर त्या कधीकधी ढाल बनून येतात आपलं जीवन सुखकर करण्यासाठी. हे आजीला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. शिक्षण हे खूप महत्वाचे आहे हे समजावत होती. पण ऐकेल ती आजी कसली?

"पोरगी कितीही शिकली तरी तिला चूल आणि मूल सांभाळावेच लागते, किती शिकली तरी तिला चुलीपाशी जावेच लागते. त्यावर शिकून काय उपयोग? तर काहीच नाही. आता लग्न झाले नाही तर कधीच होणार नाही. बसू दे मग इथेच धुणी भांडी करत. एकदा का स्थळे यायची बंद झाली की मग कोण तिच्या बरोबर लग्न? कुणीच करणार नाही." असे म्हणून आजी बाहेर गेली तेव्हा सुमन तिला समजवायला जात असताना ताईने तिचा हात धरला आणि तिने फक्त नकारार्थी मान हलवली. हे पाहून सुमनला परिस्थिती पुढे आपण किती हतबल झालो आहोत याची जाणीव झाली आणि ती शांत जाऊन एका बाजूला उभी राहिली. पण तिचे मन तिला शांत बसू देत नव्हते.

"अगं ताई, मला का थांबवलेस? लग्न म्हणजेच सगळं आलं का? तुला शिकून स्वावलंबी बनवायला नको का? आपण शाळेत शिकतोच की, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी स्त्रिया कशा धडाडीने पुढे गेल्या? आजकाल कितीतरी स्त्रिया नोकरी करत आहेत. मग आपल्यालाही तसे स्वप्न बघायला नकोत का? की आपलं दुसऱ्याच्या मनासारख जगायचं? स्वतःसाठी जगायचे नाही का?" असे सुमन म्हणताच तिच्या ताईने तिला जवळ बसवून घेतले आणि ती म्हणाली,

"हे बघ सुमन, तू आता जे म्हणत आहेस ते सगळं फक्त सांगायच्या आणि बोलायच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असे काहीच नाही. मला असे वाटते की किमान लग्न झाल्यानंतर तरी नवऱ्याचे थोडेफार प्रेम मिळेल आणि मी त्या प्रेमात भिजून निघेन. इथे रडत जीवन जगण्यापेक्षा तिथे जाऊन मनासारखे जीवन थोडेतरी जगता येईल. आपल्यावर जन्मापासून कोणी प्रेम केले नाही, नवरा तरी प्रेम करणारा मिळेल, या आशेने मी लग्नासाठी तयार झाले आहे ग." ताईने तिला तिच्या मनातले बोलून दाखवले. ताईने इतक्या गोड शब्दात समजावून सांगितले म्हटल्यावर सुमनला ताईचे बोलणे पटले.

"हो ताई, तू बोलतेस ते अगदी बरोबर वाटतंय मला. आज पर्यंत कुणाकडूनही प्रेम मिळाले नाही. लग्नानंतर नवऱ्याकडून तरी मिळेल ही भोळी वेडी आशा ग. पण जर तो नवरा देखील आपल्यावर प्रेम केला नाही तर. मुलगा व्हावा या आशेने आपल्याशी तिरस्काराने वागू लागला किंवा दमदाटी वगैरे करू लागला तर.. आपण काय करायचं? आणि तिथेही तेच भोग.. म्हणून मी म्हणते आहे ग. माझ्या मनामध्ये अशी एक भीती आहेच ग." सुमन बोलता बोलता शांत झाली. परत तिच्या मनात संवाद सुरू झाला की लग्नानंतर सुध्दा हीच परिस्थिती असेल तर? आपल्याला आयुष्यभर असेच कुढत जगावे लागणार. हे जगणे म्हणजे पशूसम ना कोणत्या भावना ना कधी प्रेम. फक्त जीवंत रहायचे म्हणून जगायचे. मग काय उपयोग? या काट्याकुट्यात राहण्यापेक्षा लग्न करून तरी सुख मिळत का ते पहावं?

"तू बोलतेस ते बरोबर आहे बघ. पण या घरात ते शक्य आहे का? माझं लग्न झाल्यानंतर तुझ्या लहान ताईच्या लग्नाची बोलणी होईल आणि त्यानंतर तुझा नंबर. आपल्याला न विचारताच मुलगा पसंत करून त्याच्याबरोबर लग्न लावून देतील ते. आपल्याला साधं कळणारही नाही. त्यामुळे आलिया भोगासी असावे सादर याप्रमाणे जे काही येते आपण भोगत राहायचे. त्यातून एखाद्या वेळेस जर मायेचा, प्रेमाचा स्पर्श आपल्याला मिळाला, सहवास आपल्याला मिळाला तर तो घ्यायचा. नाही तर जीवन कसं जगायचं? तर वाट्याला आलेले भोग भोगायचे." ताईने सुमनला समजावून सांगितले तशी सुमन शांत बसली. खरंच या घरात मनाप्रमाणे कधी जगता आले नाही तर लग्न करणे ही गोष्ट लांबच. जे घरचे ठरवतील तेच करावे लागणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेषाच आहे जणू. त्यामुळे कितीही मनात आले किंवा समजावून सांगितले तरी त्यांना जे वाटणार तेच करणार.

सुमनला ताईचे बोलणे पटले. ती मनोमन विचार करू लागली. लग्नानंतर जर नवरा प्रेम करणारा भेटला तर ठिक पण जर त्याचं प्रेम नसेल तर... प्रत्येक स्त्रीला असे भोग भोगावे लागतातच का? जर स्त्री ही आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू लागली तर हे भोग कमी होतील की वाढतील. कदाचित वाढतीलही, कारण घराबरोबरच बाहेरच्या माणसांशी तिचा संघर्ष चालू होतो. त्या विचारातच ती बसली होती, इतक्यात तिची ताई पाहुण्यांना चहा पोहे देऊन आली. ती आत आल्यावर सुमनने तिला विचारले,

"ताई, अगं मुलगा कसा आहे? आणि काय करतो ग." सुमनला काय झाले ते जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. ताईला तो पसंत आहे का? हे तिला जाणून घ्यायचे होते.

ताई एकदम लाजली आणि म्हणाली, "छान आहेत ते आणि डाॅक्टर आहेत." ताईच्या नजरेतूनच सगळं समजलं होतं. ताईला हे स्थळ पसंत होते आणि विशेष म्हणजे मुलगा डाॅक्टर होता. घरचे सुध्दा सगळे शिकलेले होते. म्हणजेच सुशिक्षित कुटुंब होतं. म्हणून या तिघी खूप खूश होत्या.

"अरे वा! मग काय ताईसाहेब एकदम खूश? आता डाॅक्टरांची राणी होणार." सुमन आणि तिची बहिण ताईला चिडवू लागल्या. ताई आता तिच्या संसारात आनंदी राहिल म्हणून समाधान वाटत होते. शिवाय ताईवर कुणीतरी प्रेम करणारं हक्काच माणूस मिळणार म्हणून त्या आनंदी होत्या.

"पण ताई, तुझं शिक्षण इतकं कमी आणि ते डाॅक्टर. ते तुझ्याशी कसं काय लग्न करायला तयार झाले? शिवाय तुमच्या वयात खूपच अंतर होईल ना. मग ग." सुमनच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मुलगा इतका शिकलेला पण ताई कमी शिकलेली होती. मग त्यांनी तिला पसंत कसे केले? यामागे त्यांचा काही हेतू तर नाही ना! नाहीतर लग्न होईपर्यंत गोड गोड बोलायचे आणि एकदा का लग्न झाले की मग खरे रूप समोर येणार. काय अर्थ आहे याला?

नक्की काय कारण असेल? इतका शिकलेला मुलगा कमी शिकलेल्या मुलीशी खरंच लग्न का करत असेल?
क्रमशः

🎭 Series Post

View all