Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 2

Read Later
आत्मसन्मान 2


पृथ्वीने विचारलेल्या प्रश्नावर स्वरा उत्तर देऊ लागली. "मी योग्य तेच बोलत आहे. मला हे लग्न मान्य नाही. लग्नाचा खर्च मुलीकडून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, याला हुंडा असे म्हणतात. तुम्ही तर इतकी शिकलेली लोकं, इतके सुशिक्षित, तुम्हाला पैशाची काय कमी? आणि तुम्ही माझ्या आईकडून चांदीची भांडी मागत आहात! हे मला अजिबात मान्य नाही, हे लग्न मोडले. अशा मुलाशी मला अजिबात लग्न करायचं नाही. आई तू देखील यांच्या बोलण्याला बळी पडलीस! अगं यांच्या समोर मान खाली घालून उभी होतीस. तुझी काय चूक आहे यामध्ये? हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे हे सुद्धा तुला माहित आहे ना. मग अशा लोकांच्या समोर मान खाली घालण्यापेक्षा ताठ मानेने लग्न मोडून जाणे कधीही मला पसंत पडेल." स्वरा सर्वांना ठासून सांगत होती. स्वरा थोडी स्पष्टवक्ती होती. जे मनात आले ते बोलून दाखवायची. मनात एक बाहेर एक हे तिला कधीच जमले नाही. कामासाठी गोड गोड बोलणे तर तिला कधीच जमले नाही. जे असेल ते स्पष्ट बोलायचं. तिचा हाच स्वभाव पृथ्वीला आवडला होता. म्हणून तो तिच्या प्रेमात पडला होता.

"अगं स्वरा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. असे अजिबात काही नाही. आम्ही तर तुझ्या आई कडून एक रुपयाही घेतला नाही. आपलं प्रेम आहे ना! आपलं प्रेम आहे म्हणूनच तर आपण लग्न करतोय ना! आणि आई-बाबांनी सुध्दा याला संमती दिली आहे. मग हा पैशाचा व्यवहार मधेच आला कुठून?" पृथ्वीने आश्चर्याने स्वराला विचारले. खरंतर पृथ्वीला यातील एक अक्षरही माहित नव्हते. त्याच्या पाठीमागे त्याच्या घरच्यांनी इतकी मोठी डील केली होती. हे असे काही होईल याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती.

"हे तुझ्या आई-बाबांना विचार. ते तुला जास्त चांगलं सांगू शकतील. हा पैशाचा व्यवहार मधूनच आला कुठून? अरे त्यांना तर मी सून म्हणून कधीच पसंत नव्हते. तुझ्या समोर लग्न मान्य आहे, असे म्हणून माझ्या आई कडून लग्नाचा खर्च आणि चांदीची भांडी देण्याचे कबूल केले आणि माझी आई सुद्धा याला तयार झाली. आई तू जे वागलीस ते मला अजिबात आवडले नाही." स्वरा नाराजीच्या सुरात म्हणाली. तेव्हा पृथ्वी काहीतरी बोलणार इतक्यात,

"स्वरा बाळ, तू शांत हो. ऐक जरा, असे काही नाहीये. मी माझ्या खुशीने तुला देत आहे, मी साठवलेले पैसे ठेवून तरी काय करणार? माझी तू एकुलती एक मुलगी. मी तुझ्यासाठीच खर्च करणार ना बाळा. मग तू तसे काहीच समजू नकोस. यांनी काहीच मागितले नाही ग." सुमन स्वराला समजावू लागली. आपली चूक लपवण्यासाठी सुमन काहीबाही सांगून वेळ मारून नेत होती. एक गोष्ट लपवायला हजार वेळा खोटे बोलावे लागते ते खरेच आहे. पण सुमनने कितीही समजावून सांगितले तरी स्वरा तिचे ऐकणार नव्हती.

"आई, किती खोटं बोलणार आहेस अजून? तू सगळं माझ्या प्रेमासाठी करत आहेस, मला मान्य आहे गं. पण तू दिलेली शिकवण आज तूच पाळत नाहीस. माणसाने आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानी असावे हे तूच सांगत आलीस ना ग आणि तूच आज या लोकांसमोर मान खाली घालून उभी होतीस! तेव्हा मला कसे वाटले असेल? याचा एकदा तरी विचार करायचा." स्वरा आईवर चिडून बोलत होती. खरंतर तिला खूप वाईट वाटले होते. जे चूक आहे ते चूकच असे आई का म्हणाली नाही? याचे तिला वाईट वाटले. आई परिस्थिती समोर हतबल झाली, ती परिस्थितीला समोरे गेली नाही, का? तर फक्त मुलीच्या प्रेमासाठी तिने आत्मसन्मान बाजूला ठेवला होता, याचे तिला वाईट वाटले.

"स्वरा बाळ, मी फक्त तुझ्यासाठीच केले ग. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. तुझ्या आनंदासाठी पैसेच काय? मी माझं काळीज देखील काढून देईन. अगं, तू प्रेम केलेस आणि तुला ते मिळवण्याचा अधिकार आहे. मी तुझ्यासाठी इतकेही करू शकणार नाही का?" सुमन अगदी कळवळून सांगू लागली. तिची ममता यातून दिसून येत होती. आईचं ती. आपल्या लेकरासाठी आत्मसन्मानही गहाण ठेवायला पुढे मागे पाहणार नाही. आईची माया ही अशीच असते. आपल्या लेकराला आनंदी बघून ती देखील आनंदी होते.

"आई, मी प्रेम केले पण असला विचार करणाऱ्या घरात सून म्हणून जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. यांचे विचारच इतक्या खालच्या पातळीचे असतील तर लग्नानंतर कशी वागणूक देतील ते मला? इतका तरी विचार करायचास तू. इतक्या खालच्या पातळीचा विचार करणाऱ्या लोकांची सून म्हणून घेण्यात मला काहीही रस नाही. मग माझे प्रेम गेले खड्ड्यात. माझ्या आईचा आत्मसन्मान, स्वाभिमान हा जास्त मला प्रिय आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आई, तू फक्त एकदा बोलून दाखवायचं ग, तुझ्या शिवाय मला काहीच प्रिय नाही." स्वरा प्रॅक्टिकली बोलू लागली. भावनीक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये हे अगदी सत्य आहे. स्वरा सुध्दा प्रॅक्टिकल विचार करत होती.

स्वराचे हे बोलणे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले.

स्वराच्या आईने मुलीच्या प्रेमाखातर हुंडा देण्याचे मान्य केले. कष्टातून कमावलेला पैसा तिने लग्नाचा खर्च म्हणून दिला आणि आता चांदीची भांडी घेण्यासाठी ती पैसे कोठून आणणार होती? त्याची जुळवाजुळव करता करता कितीही प्रयत्न केले तरी पण ते शक्य झाले नाही. त्यासाठीच तर ती त्यांची माफी मागत होती, पण हे स्वराला अजिबात पटले नाही. खरे तर त्या दोघी मायलेकी या स्वाभिमानी होत्या, कुणासमोर वाकायचे नाही, मोडेल पण वाकणार नाही हा त्यांचा अट्टाहास. आपली काहीही चूक नसताना आपण कधीही माफी मागायची नाही हा त्यांचा ठरलेला नियम. त्यामुळेच त्या आज पर्यंत ताठ मानेने जगत होत्या. अगदी आत्मसन्मानाने. पण आता मुली खातर तिच्या सासरच्या समोर मान खाली घालावी लागली होती. त्यातही त्यांची काही चूक नसताना. अर्थातच हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा होता, असे ती सांगू शकत होती. पण मुलीच्या प्रेमाखातर शांत बसली होती.

सुमन आणि स्वरा अख्खा लग्न मंडप सोडून घरी आले. खरंतर स्वरा च सुमनला घेऊन आली. स्वराचे लग्न होते, पण लग्नमंडपात झालेला तो गोंधळ आणि आपल्या आईचा झालेला अपमान हे सारं काही स्वरा सहन करू शकली नाही. ती आईचा हात धरून लग्न मंडपाबाहेर पडली, अगदी सन्मानाने. त्यात तिची काही चूक नव्हती. पण राहून राहून सुमनच्या मनात सारखा विचार येत होता की, \"आपण आपल्या मुलीला जे काही शिकवले, संस्कार दिले ते चुकीचे आहेत का? आजच्या या महत्त्वाच्या क्षणात ती जे वागली ते फक्त आणि फक्त माझ्या संस्कारामुळेच वागली. आत्मसन्मानाने वागणे हे काही चुकीचे आहे का? जे मी करू शकले नाही ते माझी मुलगी करत आहे. ही आनंदाचे गोष्ट असली तरी मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे.\" अशा एक ना अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजले होते.

जीवनाच्या अथांग महासागरातून प्रवास करताना वादळवारा पचवून सावरत जीवन जगावे लागते. ते जगताना आजूबाजूला ढकलणारे बरेच भेटतात. पण तिथेच न थांबता त्यातून वाट काढत जीवन जगावेच लागते. कधी ठेच लागून पाय रक्तबंबाळ झाले तरी लंगडत का होईना पण पुढे जावेच लागते. सुमनही मनाची काहीतरी समजूत घालत होती.

\"लग्नमंडपात जे काही झाले त्यात सर्वस्वी चूक ही माझीच होती. मी हुंडा अर्थातच पैसे द्यायला नकार द्यायला हवा होता. जे चूक आहे ते चूक म्हणायला हवे होते. पण मुलीच्या प्रेमासाठी मी काही बोलले नाही. जे संस्कार मी मुलीला दिले ते मुलीने आत्मसात केले, पण माझे मला ते करता आले नाही. खरंतर चूक माझीच आहे.\" असे सुमन मनात सारखा विचार करत होती. जे तिला जमले नाही ते मुलीने करून दाखवले.

सुमनचा जन्म झाला आणि तिसरा मुलगा व्हावा या त्यांच्या आई-वडिलांच्या इच्छेला जणू धक्काच बसला होता. त्यामुळे तिचे लाड अजिबात झाले नाहीत. तिसरी मुलगी जन्माला आली म्हणून ते तिच्याशी तिरस्काराने वागत होते. तिचा मुलीचा जन्म म्हणून तिचे कोणी कौतुक तर केलेच नाही, पण प्रत्येक वेळी तिरस्कार मात्र मिळत गेला. आई लाड करायची पण वडिलांच्या भीतीने ती सुद्धा लाड करण्यासाठी धजत होती. साधे प्रेमाने दोन शब्दही तिच्याशी कोणीच बोलत नव्हते. जन्माला येतानाच ती कमनशिबी म्हणून जन्माला आली होती. यात तिची काय चूक? एक मुलगी म्हणून जन्म घेतला हाच एक मात्र दोष काय तिचा?

दोष काय आहे माझा कोणता केला गुन्हा
मुलगीचा जन्म माझा हाच का माझा गुन्हा..

कौतुक कोणा नाही माझे हिरमुसले मी पुन्हा
मुलगीचा देह माझा यात माझा काय गुन्हा..

तुझ्याच काळजाचा आहे मी तुझाच तुकडा
तुझेच प्रतिरूप माझे हाच का माझा गुन्हा..

ऐसे कैसे हाल माझे केलेत ग आज कोणी
तुझाच ग मी जीव आहे हाच का माझा गुन्हा..

मायेची एक हाक पुरेशी इतकीच ग आशा
सावलीही न मिळावी असा कोणता केला गुन्हा..

आयुष्य मजला रिते वाटे कोणी मजला नसे
मुलगीचा जन्म झाला हाच का माझा गुन्हा..

सुमनचे जीवन अगदी त्रासून गेले होते. घरात तिला काडीचीही किंमत नव्हती. काही करावे? तर साथ कुणाची नव्हती. सुमनच्या जन्मानंतर तिला एक भाऊ झाला. त्याचे मात्र सगळेजण लाड करू लागले. ते पाहून सुमनला भावाचा हेवा वाटे. त्याला चांगलं चुंगलं खाऊ घालणार आणि सुमनच्या पुढ्यात मात्र शिळं अन्न. ते पाहून तिला खूप वाईट वाटे. देवाने असा जन्म देण्यापेक्षा एखादा पशू किंवा पक्षी बनले असते तर बरे झाले असते, असे तिला सारखे वाटत असे.

काट्याकुट्यातून जीवन जगताना तिचे पाय रक्तबंबाळ होई, आपलीच माणसे आपली वैरी असल्याचे भासे. इथे कोणीच आपल्या जीवाभावाचे नाहीत असे म्हणत ती मनात कुढत बसे.

सुमनचे बालपण अगदी रडत कुडत गेले. जणू दुःख भोगण्यासाठीच तिचा जन्म झाला होता. ती सारे भोग निमूटपणे भोगत होती.

कधीतरी दिवस चांगला येईल या आशेने ती जगत होती. जे वाट्याला येईल ते काम करून दोन वेळेला जेवून राहत होती.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..