Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 1

Read Later
आत्मसन्मान 1
सन्मान तिच्या अस्तित्वाचा
सन्मान तिच्या कर्तृत्वाचा
सन्मान तिच्या शौर्याचा
स्त्रीच्या आत्मसन्मानाला चुकून जरी धक्का लागला तरी ती चवताळून उठते. ती तिच्या आत्मसन्मानामुळेच ताठ मानेने जगत असते. रखरखत्या उन्हात, काळ्या काळोखात देखील ती धडपडत असते. पण तिच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू देत नाही. जणू आत्मसन्मान अर्थात स्वाभिमान हा तिचा एक अलंकारच असतो. इतर कोणत्याही दागिन्यांची तिला कमी असली तरी आत्मसन्मान हा सर्वात मोठा तिचा दागिना असतो. त्या दागिन्याच्या जोरावरच ती आयुष्य जगत असते. पण जर का त्याला ठेच लागली, तर ती कडाडून उठते. अशाच स्त्रीच्या आत्मसन्मानाची ही कथा...

स्वरा काही कामानिमित्त रूममधून बाहेर आली आणि तिला आपली आई काही लोकांना समोर मान खाली घालून उभी आहे असे दिसले. वर्गात एखाद्या दिवशी अभ्यास केला नाही किंवा काहीतरी आगाऊपणा केला, दंगामस्ती केला की शिक्षकांनी शिक्षा केल्यावर समोरचा विद्यार्थी जसा उभा राहतो, तशी तिला तिची आई दिसली. तिला वाटू लागले की आईने देखील काहीतरी चूक केली आहे का? की आई कुणाला काही बोलली आहे?

ते दृश्य पाहून आकाशातून वीज पडावी तसे तिच्या मनावर आघात झाले. आत्मसन्मानाने जगणारी आपली आई आज कुणासमोर तरी पदर पसरत आहे हे पाहून तिला खूप वाईट वाटले. आत्मसन्मान हाच खरा दागिना म्हणणारी आई आज असे का बरे वागत असेल? अशा प्रश्नांनी तिच्या मनात काहूर माजले होते. बी रूजून त्याचे रोप येऊन त्याला सुंदर सुंदर फुले फुलली आणि एका क्षणात तिकडून गाईने येऊन ते रोपटे खाल्ले, तर जसे वाईट वाटते तसे स्वराला वाटू लागले. ती आईजवळ गेली आणि आईला विचारले,

"अगं आई, हे काय चाललंय? तू अशी का यांच्यासमोर मान खाली घातली आहेस? काय चाललंय मला सांग ना. तुझं काही चुकलंय का?" स्वराच्या या बोलण्याने स्वराची आई सुमन दचकली आणि तिच्याकडे पाहून चलबिचल झाली. कुणीतरी तिच्या काळजात खंजीर खुपसले की काय? असे तिला वाटू लागले. \"आता लेकीला काय सांगावे?\" या उत्तराच्या शोधात ती होती.

"स्वरा तू शांत रहा. तू बाजूला हो आणि जा बघू रूममध्ये, इथे काय करत आहेस? आमचं आम्ही बघून घेतो." अशा प्रकारे तिची समजूत घालून तिला पाठवून देऊ लागली. पण ऐकणार ती स्वरा कसली. तिला देखील जाणून घ्यायचे होते की आज नेमके काय झाले आहे?

"पण आई हे काय चाललंय? मला स्पष्ट सांग ना, नक्कीच इथे काहीतरी गोंधळ झालेला आहे. तू मला सांगत का नाहीस?" स्वराने सुमनला परत प्रश्न केला. तिला जाणून घ्यायचे होते की असे काय झाले होते की, आई आत्मसन्मान सोडून त्यांच्या समोर मान खाली घालून उभी होती.

"स्वरा तू जा बघू, अजून साडी नेसणार आहेस, तुझा मेकअप पण अजून व्हायचा आहे. इथे काय करत आहेस? मी सगळं बघते ना, तू जा." असे म्हणून स्वराच्या आईने म्हणजे सुमनने स्वराला तिच्या रूम मध्ये पाठवले. अर्थातच लग्नाच्या हाॅलच्या रूममध्ये पाठवून दिले. स्वरा गेल्यानंतर कुठे तिच्या जीवात जीव आला. पण तिचे मन तिलाच खात होते. आपण जे काही करतोय ते चुकीचे तर करत नाही ना! आपल्या मुलीला फसवून आपण हा निर्णय घेतला आहे. पण जेव्हा तिला समजेल तेव्हा काय होईल? अशी अनामिक भीती तिला वाटत होती पण आपण जे काही करतोय ते फक्त आणि फक्त मुलीच्या सुखासाठी करतोय असे म्हणून सुमन स्वतःची समजूत काढत होती. डोंगर दुरून जरी साजिरे गोजिरे दिसत असले तरी जवळ गेल्यावर जसे खरखरीत दिसते, तसे संसाराची स्वप्ने सुंदर वाटत असली तरी प्रत्यक्ष संसार करणे सोपे नसते.

सुमनच्या बोलण्याने स्वराला खूप राग आला. आपली आई अशी कशी वागू शकते? याचे तिला नवल वाटले. स्वरा रागातच त्या रूममध्ये गेली आणि खुर्चीत बसली. \"काय झाले असेल आईला? आज मला ती काहीच सांगत नाही, नक्कीच तिथे काहीतरी चालू होते. मी गेल्यानंतर सगळेच शांत का बसले?\" असा विचार ती करत होती. तिची आतल्या आत तगमग सुरू होती. इतक्यात स्वराची मैत्रीण अनघा तिथे आली.

"अगं स्वरा, तू अजून तयार झाली नाहीस. लग्न मंडपामध्ये सगळे जण तुझी वाट पाहत आहेत." तिचा शालू हातात घेऊन अनघा (स्वराची मैत्रीण) म्हणाली.

मैत्रिणीला पाहून अंधार्‍या रात्री काजव्यांचा प्रकाश जसा मनाला दिलासा देऊन जातो तसे तिला वाटले. तिच्या मनाला थोडे समाधान वाटले. कारण तिला जे जाणून घ्यायचे आहे ते तिची मैत्रीण नक्कीच शोधून काढेल अशी तिला आशा होती.

"अनघा, बाहेर काय चालू आहे ग? माझी आई अशी का मान खाली घालून तिथे उभी होती? काय चाललंय? नक्की, मला सांग ना, प्लीज. हे बघ तू माझी मैत्रीण आहेस ना, मग मला कळायलाच हवं. तुला माहित असेल तर सांग, नाहीतर जाऊन तिथे शोध तरी घे." स्वरा अनघाला अगदी हक्काने सांगत होती. अनघा ही तिची बालमैत्रीण. लहानपणापासूनच तिला स्वराची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या दोघी मैत्रिणी कमी आणि बहिणी प्रमाणे जास्त राहत होत्या. अनघा स्वरासाठी काहीही करायला तयार होती. त्यामुळे हे काम तर तिला काहीच अवघड नव्हते.

"अगं स्वरा, मला त्याबद्दल काहीच माहित नाही ग. पण मी त्याचा शोध घेऊन नक्की येईन. तोपर्यंत तू थांब." असे म्हणून अनघा तिकडे गेली. अनघा सगळीकडे अगदी बारीक नजरेने न्याहाळत होती. कुठे काही दिसते का? कुठून काही माहिती मिळते का? याचा तपास करत होती. गरुड जसे आकाशात उंच भरारी घेत असताना त्याला अगदी लहानात लहान सावज जसे नजरेतून सुटत नाही तसे अनघाच्या नजरेतून काही सुटले नाही. स्वराच्या आईची परिस्थिती कशी आहे ते तिला स्पष्ट दिसत होते आणि काही क्षणातच तिला सत्य काय आहे ते समजले.

इकडे बराच वेळ झाला अनघा आली नाही म्हणून स्वराचा जीव वर-खाली होत होता. तिथे मेकअप करायला पार्लरमधून असिस्टंट आली होती. ती सुद्धा तिथेच बसून होती. स्वरा काही आवरायला तयार नव्हती. नक्की काहीतरी अलबेल आहे, ही गोष्ट तिच्या मनामध्ये वारंवार येत होती. ती फक्त अनघा येण्याची वाट पाहत होती, स्वरा अनघाच्या वाटेकडे आस लावून बसली होती इतक्यात अनघा आली.

"अनघा, केलीस का चौकशी? सांग ना, काय झाले? काय घडलंय? सांग ना लवकर." स्वरा काळजीने विचारू लागली. स्वराला खात्री होती की अनघा हा या सगळ्याची चौकशी नक्कीच करणार.

"हो, स्वरा सांगते थांब. अगं, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुझ्या सासरच्या लोकांनी तुझ्या आई कडून लग्नाचा सगळा खर्च आणि चांदीची भांडी मागितली होती. पण तुझ्या आईला चांदीची भांडी द्यायचं काही जमलं नाही. म्हणून ते लग्न मोडायला निघाले होते. तुझ्या आईने त्यांना समजावलं की, महिन्याच्या आत चांदीची भांडी करून देईन, तेव्हा ते लग्नासाठी तयार झाले." हे ऐकून स्वराच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिच्यामध्ये स्त्रीशक्ती जणू जागृत झाली. तिला या गोष्टीचा प्रचंड राग आला. आपली आई असे कसे करू शकते? यावर तिचा विश्वास बसला नाही. उंच कड्यावरून दरड कोसळली तशी तिची स्थिती झाली. आपला प्रियकर देखील असा असावा यावर तिचा विश्वास बसला नाही. ती अगदीच कोलमडून गेली. पण ही वेळ कोलमडून जाऊन रडत बसण्याची नाही हे तिने वेळेवर जाणले आणि ती कडाडून उठली आणि गेली ती तडक लग्न मंडपातच.

"बास करा. हे लग्न मला मान्य नाही." स्वराने लग्नमंडपात जाऊन सर्वांसमोर स्वतःचा निर्णय सांगितला. स्वराच्या या निर्णयाने सगळे लोक आपापसात कुजबुजू लागले. स्वराची आई आणि तिचा होणारा नवरा पृथ्वी यांच्या छातीत जणू कुणी खंजीर खुपसले की काय? असे वाटू लागले. ही अशी कशी निर्णय घेऊ शकते? याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले आणि आता काय बोलावे? हे त्यांना समजेना.

आज स्वरा आणि पृथ्वीचे लग्न होते. तसे त्यांचे लव मॅरेज. दोघेही कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात होते. पृथ्वीचं घराणं म्हणजे गावातील अगदी प्रशस्त श्रीमंत घराणं आणि स्वराचे घराणं म्हणजे ती अगदी सर्वसामान्य कुटुंबातली. तिचे वडील ती लहान असतानाच हे जग सोडून गेले. त्यामुळे ती आणि तिची आई दोघीच राहत असत. स्वरा आणि पृथ्वीचे एकमेकांवर प्रेम असल्याने स्वराची परिस्थिती अशी असूनही पृथ्वीच्या घरचे त्यांच्या प्रेमामुळे या लग्नासाठी तयार झाले.

लग्नाची सगळी तयारी झाली होती. पृथ्वी हा त्याच्या आई-बाबांचा एकुलता एक मुलगा होता आणि स्वरा ही देखील एकुलती एक मुलगी होती, म्हणून अगदी थाटामाटात लग्न करण्याचे ठरले होते. लग्न मंडप देखील फुलांनी छान सजवला होता. नातेवाईकांनी लग्न मंडप भरगच्च भरलेला होता. सारी तयारी झाली होती. आता फक्त अक्षता पडायच्या तेवढ्या बाकी होत्या. स्वरा आणि पृथ्वीचे मन तर आधीपासूनच जुळले होते. पण आता हे मोठे विघ्न.

"अग स्वरा, काय झाले तुला? अशी का करत आहेस? आणि हे काय बोलत आहेस तू?" पृथ्वी पृथ्वीच्या या बोलण्याने स्वरा त्याच्याकडे रागाने बघितले.

"स्वरा बाळ, अगं तुझं आज लग्न आहे आणि तू हे काय बोलत आहेस? तुमचे प्रेम आहे ना एकमेकांवर. म्हणून तर तुमचे लग्न करत आहोत आणि तू असा का निर्णय घेत आहेस? बाळा तू विचार कर. असा काही घाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे." स्वराची आई स्वराला समजावत होती. पण स्वरा काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिने फक्त एकदा आईकडे कटाक्ष टाकला आणि ती सर्व लोकांकडे पाहू लागली.

"तुम्ही या लग्नासाठी आलात, वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथपर्यंत आलात, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण आज हे लग्न होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता. हो पण जाताना जेवण मात्र करून जा. कारण बनवलेलं अन्न नास करू नये. त्यामुळे त्या अन्नाचा तुम्ही आदर करा आणि दोन घास खाऊन जा." असे स्वरा म्हणाली. ते ऐकून सगळी मंडळी एकमेकांकडे पाहून कुजबुजू लागली. पण त्याची पर्वा स्वराला अजिबात नव्हती.

स्वराच्या अशा बोलण्याने तिच्या सासरच्या लोकांना पृथ्वीच्या आई-वडीलांना खूप राग आला. काय फाजील मुलगी आहे? असे स्वतःच्या लग्नातच कोण म्हणतं का? आणि लग्न मोडण्याचे कारण तरी काय? इथे आमची सगळी इज्जत निघून गेली. लग्न करायचेच नव्हते तर असे प्रेमाचे नाटक तरी कशाला करायचे? आमच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आता. आम्ही लोकांना काय म्हणून तोंड दाखवणार? या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, इज्जत आहे आता आम्ही कसे तोंड दाखवायचे? असे म्हणू लागले. हे बोलणे ऐकून पृथ्वी समोर आला आणि तो स्वराला म्हणाला,

"नक्की कारण काय आहे ते सांग? लग्न का मोडत आहेस? काय आहे हा वेडेपणा?"

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..