Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 9

Read Later
आत्मसन्मान 9


सुमनला चक्कर आल्यावर आकाशला काहीच समजेना. तो एकदम घाबरला. असे अचानक घडल्यामुळे त्याला काय करावे? तेच समजेना. सुमनला दवाखान्यात घेऊन जावे या तयारीत तो चालला होता. इतक्यात रोहनची आई तिथे आली.

"सुमन झालं का जेवण? काय करत आहेस?" करत रोहनची आई घरात येत होती. आकाशला जणू देवच आपल्या मदतीला आला की काय असे वाटले आणि तो पळत पळत जाऊन काकूंना आत बोलावून घेऊन आला.

"काकू पहा ना सुमनला काय झाले आहे? अशी अचानक कशी बेशुद्ध पडली. मी हिला डॉक्टरांकडे घेऊन जातच होतो इतक्यात तुम्ही आलात. थोडं घराकडे लक्ष ठेवता का? मी रिक्षा घेऊन येतो." असे म्हणत आकाश रिक्षा घेऊन येण्यासाठी बाहेर जाऊ लागला. त्याची ती गडबड धांदल उडालेली पाहून काकू हसू लागल्या. इतकी बिकट परिस्थिती असतानाही या असे का हसत आहेत? म्हणून आकाशने नाराजीने त्यांच्याकडे पाहिले.

"अरे तू रिक्षा घेऊन येऊ नकोस. थांब जरा मला पाहू दे काय झालंय ते." असे म्हणून काकूंनी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले. तेव्हा झोपेतून जागे झाल्या प्रमाणे सुमन उठून बसली. तिलाही दोन मिनिटं काहीच कळेना काय झाले आहे ते? तीदेखील त्या दोघांकडे टकामका पाहू लागली.

"सुमन काय झालं होतं? तू काही टेन्शन घेतली आहेस का?" काकूंनी अगदी प्रेमाने तिला विचारले. त्यांचा तो प्रेमाचा शब्द ऐकून सुमनच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिचे तिला समजेना की तिला काय होत आहे? चक्कर आली ती अशी कशी आली? अचानक असे काय झाले आहे नेमकं? असे प्रश्न त्या दोघांच्याही मनात येऊन गेले.

"घाबरू नकोस पोरी, आता तू दोन जीवाची आहेस. तुला दगदग करून चालणार नाही. तुला जपावं लागणार आहे. तुमच्या संसाराला आता कळी सुटणार आहे. आनंदात राहायचं काही खाऊ वाटलं तर मला सांगत जा. मी तुला बनवून आणून देईन." काकू असे सुमनशी बोलत असताना आकाशला काहीच समजेना. तो तसाच त्यांच्यासमोर उभा राहिला.

"काकू, नक्की काय झालं हिला? मी दवाखान्याला घेऊन जातो. चल सुमन पटकन जाऊन येऊ." असे म्हणून आकाश सुमन चा हात धरून तिला उठवू लागला. पण काही केल्या सुमन उठायला तयार नव्हती. ती फक्त लाजत तशीच बसली होती. ती गालातल्या गालात हसत देखील होती. पण या सगळ्याचा आकाशला काही संबंध लागेना.

"आता काय झालंय मला सांगाल का कोणीतरी? तुमच्या दोघींच्यात काय बोलणं झालंय? काय होतय हिला?" आकाश दोघींच्या वरही ओरडला.

"अरे, तू बाप होणार आहेस." काकूंनी आकाशला सांगितल्यावर "अच्छा" म्हणून आकाश दोन मिनिटे तसाच उभा राहिला. त्याला लवकर काही समजलेच नाही आणि जेव्हा समजले तेव्हा तो आनंदाने उड्या मारू लागला.

"काय... मी बाप होणार. किती आनंदाची बातमी आहे? आज पहिला पगार आणि ही गूड न्यूज मन अगदी आनंदून गेले आहे." असे आकाश स्वगत म्हणाला.

लगेच काकू तेथून निघून गेल्या. कारण त्या दोघा नवरा बायकोला एकांत मिळायला हवा होता हे त्यांनी जाणले होते.

"बरं सुमन, उद्या येते ग मी. काळजी घे." असे म्हणून त्या बाहेर गेल्या. काकू गेल्या बरोबर आकाशने सुमनला एकदा मिठीत घेतले.

"खरंच आज खऱ्या अर्थाने आपल्या घरात लक्ष्मी आली आणि आपल्या या वृक्षवेलीला छान बहर येऊन त्याला कळी देखील येऊ लागली. पण मी आत्ताच तुला सांगून ठेवतो मला मुलगीच हवी आहे. अगदी तुझ्यासारखी चुणचुणीत आणि सुंदर."

"खरंच तुमचे विचार बघून मला आज खूप प्राऊड फील होतंय कि मी तुमची पत्नी आहे. तुमच्या सारखाच विचार जर प्रत्येक व्यक्तीचा असता तर किती बरे झाले असते. मुलगा मुलगी असा भेद न करता पहिली मुलगी पाहिजे आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी हे तुम्ही जाणले आणि तसाच तुमचा अट्टाहास. मलासुद्धा पहिली मुलगीच हवी आहे. आपण तिला खूप प्रेम देऊ, खूप शिक्षण देऊ, तिचे खूप लाड करु. मुलगा मुलगी असा अजिबात भेदभाव करायचा नाही. मुलगा हा घराण्याचा दिवा असला तरी मुलगी ही पणतीच आहे. असे लोक का विचार करत नसतील? जे मी भोगले ते माझ्या मुलीला अजिबात भोगू देणार नाही. तिचे मुलाप्रमाणेच मी लाड करणार . तिला खूप खूप शिकवणार.

"अगं हो. सगळे स्वप्न तूच सांगतेस का? माझी पण काही स्वप्न आहेत ना. तिला जे शिकायचं आहे तेच आपण शिकवू. आपण तिला कोणतेही बंधन घालायला नको. आपण दोघांनी मिळून तिला चांगले संस्कार देऊ, तिला घडवू हे सगळ्यात महत्त्वाचे आहे." आकाश बोलताना सुमन फक्त त्याच्याकडेच बघत होती. खरंच आपण योग्य तीच निवड केली आहे. आपली निवड अजिबात चुकली नाही हे तिला जाणवले. जर असा नवरा असेल तर एक जन्म काय अनेक जन्म त्याच्या सोबत राहायला मी तयार आहे. सुमन मनात विचार करत होती. चाफ्याच्या वासाने जसे मन सुगंधित होते तसे आकाशच्या सहवासाने सुमनचे आयुष्य सुंदर झाले होते.

दोघांनाही खूप खूप आनंद झाला होता. पण या त्यांच्या आनंदात त्या दोघांच्याही घरचे सहभागी होणार नव्हते. दोघांनाही कितीही वाटले तरी ते त्यांच्या घरी येणार नव्हते. आता आकाश सुमनची खूप काळजी घेऊ लागला. तिला कोणतेही काम करू देत नव्हता. तिला काही खावेसे वाटते का? हे अधून मधून तो सारखे विचारत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना त्याने चिंच आणि आंबे आणले, ते पाहून सुमनला खूप आनंद झाला. आपला नवरा आपल्यावर मनापासून प्रेम करतो हे पाहून तिला समाधान वाटले. पण तिच्या मनाला एकच काळजी लागून राहिली होती ती म्हणजे डिलीवरीची. डिलीवरी करताना मुलीच्या जवळ आई किंवा सासू यांपैकी कोणीतरी असायला हवे. पण माझ्यासोबत कोण असणार? यांना तर यातील काहीच माहित नाहीये आणि हे माझं पहिलंच बाळंतपण, त्यामुळे मला तर खूप भीती वाटत आहे. आत्ता काय करावे? असा सारखा मनात विचार येई. पण जाऊ दे अजून बराच वेळ आहे असे म्हणून परत ती स्वतःची समजूत काढून शांत राही.

सुमन घरातच बसून बाळासाठी दुपटी, लहान लहान कपडे, डोक्याला बांधायला टोपडे शिवायला लागली. तसेच थोडीशी लोकर आणून तिने लहानसे स्वेटर देखील विनले. तिच्या अंगात खूप छान छान कला होत्या. त्यामुळे घरामध्येच ती बसून सगळं काही करत होती. शिवाय तिच्या जोडीला काकू होत्या. त्या दिवसभर सुमन कडे येऊन बसत आणि गप्पा गोष्टींमध्ये त्यांचा दिवस कसा जात होता हे त्यांनाच समजत नसे.

सुमन आणि आकाश आता भविष्याचा विचार करू लागले. आकाश देखील त्याच्या पगारातील थोडासा हिस्सा बाजूला काढून ठेवू लागला. जेणेकरून सुमनच्या डिलिवरीसाठी तसेच बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या साठी काही गोष्टी घेता याव्यात, एखाद्या वेळी अचानक काही खर्च निघाला तर तो करता यावा या उद्देशाने तो बँकेत काही रक्कम ठेवू लागला. आकाश खूप विचार करत होता. कोणतीही गोष्ट अगदी विचारपूर्वक करत होता.

सुमन देखील अगदी काटकसरीने संसार करत होती. हळूहळू दिवस सरत होते आणि बघता बघता सातवा महिना येऊन ठेपला. आता सातव्या महिन्यात डोहाळे जेवण करायचे असते हे सुमनला काकूंकडून समजले. पण ती एक अवाक्षरही आकाश पुढे बोलली नाही. कारण आधीच त्याची धावपळ चालू होती त्यात डिलीवरी चा खर्च होता आणि आता मधेच डोहाळे जेवण म्हटलं तर त्याच्या एकट्यावर खूप ताण येईल असा तिने मनात विचार केला आणि डोहाळे जेवण न करण्याचा परस्पर निर्णय घेतला.

बरेच दिवस झाले सांगूनही सुमन काही मनावर घेत नव्हती म्हणून काकूंनी आकाशला येऊन सांगितले. सुमनचे डोहाळे जेवण करायला हवे. सातवा महिना आता संपत आला आहे. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण करायचं असतं. काकूंनी सांगितल्यावर आकाश डोहाळे जेवण करायला तयार झाला. पण त्याच्या मनात एकच विचार घोळत होता.

पण आता आमचे काही पाहुणे येणार नाहीत. आई-बाबा तर अजिबातच येणार नाहीत तर मग हे डोहाळे जेवण करायचे कसे? हा मोठा प्रश्न आकाश समोर पडला.

शेवटी आकाशने निर्णय घेतला की घरामध्येच आपण हा कार्यक्रम करायचा. रोहन आणि त्याच्या मित्रांना बोलवायचे सोबतीला काकूही आहेत त्या मदत करतील असे म्हणून तो काकूंच्या कडे गेला आणि डोहाळे जेवणासाठी काय काय लागते त्याची यादी करू लागला. काकूंनी त्याला सांगितले की, हे सगळे सामान माहेरच्या लोकांनी आणायचे असते. आता तिचे माहेरचे कोणी नाही येत, तर मी काही गोडाचे सगळे पदार्थ माझ्या लेकीसाठी साडी बांगड्या तिला काही लागेल ते सगळं मी आणेन. तू फक्त एक झोपाळा आणि हार एवढ्याच गोष्टी आण. बाकी सगळी तयारी मी करेन.

काकू तुम्ही आमच्यासाठी किती काय करत आहात. एवढे तर आपले रक्ताचे नातलग सुद्धा करत नाहीत. खरंच तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात असे आकाश म्हणाला. खरंतर रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खूप उपयोगी पडतात. कोणत्याही कठीण प्रसंगी एखादा मित्रच मदतीला धावून येतो. तेव्हा जीवाभावाचे भाऊ असले तरीही मदतीला धावून येण्यास कचवचत असतील पण एखादा खरा मित्र कोणतेही संकट आले तरी ती वेळेवर धावून येतो.

शेवटी डोहाळे जेवण रविवारी करण्याचे ठरले. आकाशला त्या दिवशी सुट्टी असते म्हणून तोच दिवस ठरवला. काकूंनी वेगवेगळे गोडाचे पदार्थ केले. बर्फी, गुलाब जामून, पेढे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असे बरेच पदार्थ बनवले आणि सुमन साठी एक साडी घेतली. आकाश देखील सुमनला घालण्यासाठी वेगवेगळे अँटिक मधील दागिने, मोत्याचे दागिने आणि फुलांच्या माळा घेऊन आला. सगळेजण आज खूप आनंदात होते. सुमन ला तर वाटलेही नव्हते की तिचे असे काही कौतुक होईल, असा आनंद सोहळा होईल, इतकं भरभरून प्रेम करणारी माणसे तिच्या आयुष्यात येतील. तिचे आयुष्य तर एकदम ओसाड पडलेल्या जमिनीसारखे झाले होते. पण त्या जमिनीमध्ये पाणी मुरवून मशागत करून सुंदर सुंदर फुलझाडे लावल्याप्रमाणे तिचे आयुष्य बहरून गेले होते.

आदल्या दिवशी सुमन आकाशला म्हणाली, "आपल्या आयुष्यातील इतका महत्वाचा क्षण आहे आपल्या आई-वडिलांना एकदा सांगूया का? माझ्या राहू दे, निदान तुमच्या तरी आई-बाबांना सांगूया का? त्यांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. कदाचित आपल्याला ते माफ करतील असे माझे मनापासून वाटते. तुमचे काय मत आहे? निदान आपल्या लेकराला आजी आजोबांचे प्रेम तरी मिळेल." सुमनच्या या बोलण्यावर थोडा वेळ विचार करत आकाश बसला.

"तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मी एकदा त्यांच्याशी बोलून बघतो. कितीही झाले तरी शेवटी ते आई-वडील आहेत. आपल्या लेकराला माफ करतील." आकाशला सुमनचे म्हणणे पटले. तो आई बाबांकडे जायला तयार झाला.
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..