Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 8

Read Later
आत्मसन्मान 8

 आकाश गेल्यानंतर सुमन एकटीच घरात होती. तिने घरातील सगळं पटापट आवरून घेतले. सगळं काही आवरून झाल्यावर तिला आकाश ची आठवण येऊ लागली. इतके दिवस ती आकाश सोबत होती. आज पहिल्यांदा आकाश गेल्यानंतर ती एकटी राहिली होती. आता काय बरे करावे? असा विचार तिच्या मनात सुरू होतो. इतक्यात रोहनची आई तिथे आली."काय बाळ, काय चाललंय तुझं?" रोहनच्या आईने आत येत विचारले."काही नाही काकू. निवांत बसली आहे. या की." म्हणूनच मी त्यांना आत घेतले."मग तुझा काय विचार आहे? पुढे काय करणार आहेस तू?" रोहनची आई म्हणाली."म्हणजे काय काकू? तुम्ही काय बोलत आहात मला समजेना?" सुमन प्रश्नार्थक नजरेने म्हणाली."म्हणजे आकाशच्या एकट्याने घर काही चालयचं होणार नाही. त्याचा पगार महिन्यांनी मिळणार. तू पण काहीतरी छोटी-मोठी काम करत जा. तुला जे योग्य वाटतं ते करत जा. तुझ्या हातात चार पैसे आले की तुझं तुला सामान घेता येईल. तुझा तेवढाच संसाराला हातभार लागेल. या दृष्टीने मी तुला विचारत आहे." रोहनच्या आईने सुमनला समजावून सांगितले. रोहनच्या आईच्या रूपात जणू तिची आईचं तिला समजावून सांगत आहे असे तिला भासत होते. तिला प्रेमाचे, हक्काने कुणीतरी सांगणारे, समजावणारे असे मायेचे माणूस भेटल्यामुळे सुमनला खूप बरे वाटले. ती थोडी भारावून गेली."हो काकू, माझ्याही मनात आहेच. पण आता काय करावे? हेच कळेना. माझे शिक्षण खूप कमी झाले आहे. मला कुठे नोकरी मिळेल? कसे आणि काय करावे तेच कळेना. घरामध्ये बसूनच छोटी-मोठी कामे करावी म्हणत आहे." सुमनने तिचे मन काकूंपुढे मोकळं केलं. तिला काहीतरी नक्कीच करायचे आहे, पण काय करावे हेच कळेना. यात मदत तरी कुणाची मागणार."अगं मग कर ना काही तरी. मी तुला मदत करेन." काकूंनी अगदी आपुलकीने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली. ते पाहून सुमनला खूप उत्साह आला."हो काकू, पण काय करावे? तेच समजेना. मला शिलाई काम येते, पण त्यासाठी मशीन नाही आणि मशीन आणायला गेले तर त्याची खूप किंमत आहे. म्हणून थोडे दिवस थांबावे म्हटले. पैसे जमले की घेता येईल." सुमन उत्साहाने बोलली."अरे वा! खूप चांगली कला आहे मग तुझ्याकडे. मशीनच हवा आहे ना! माझ्याकडे आहे की मशीन. त्याचा तू वापर कर. माझ्याकडे तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तसेच पडून आहे ते. किमान तू तरी उपयोग करशील." काकूंनी स्वतःची मशीन देण्याचे कबूल केल्यावर सुमनचा आनंद गगनात मावेना. अंधार्या रात्री चांदणे पडावे आणि मन आनंदी व्हावे, असे काहीसे झाले होते."काय सांगताय काकू! मी नक्कीच त्याचा उपयोग करेन. माझी खूप इच्छा आहे. ब्लाऊज वगैरे शिवून, कपडे वगैरे शिवून देईन. रेटही बरोबर लावूया. तसेच बाहेर बोर्ड लावू आणि तुम्ही तुमच्या ओळखीच्या काही जणींना सांगून ठेवा. आतापासूनच कामाला सुरुवात करेन." सुमन उत्साहाने म्हणाली. सुमनला खूपच आनंद झाला होता. तिला आता काय करू नि काय नको असे झाले होते."हो ग कर. आज मी तुला माझे काही कपडे आणून देते. आज पासून तू सुरुवात कर." काकू"हो काकू." असे म्हणून सुमनने रोहनच्या घरातील शिलाई मशीन आणले. मशीन आणल्या बरोबर त्याला स्वच्छ कापडाने पुसून नमस्कार करून तिने लगेचच कामाला सुरुवात केली. पहिलं काम मिळालं ते रोहनच्या आईचं. सुमन आनंदाने मशीन चेक करते. आता आपल्यालाही थोडे पैसे मिळतील आणि आपणही संसाराला हातभार लावणार असे वाटून तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती जोमाने कामाला लागली.तिकडे आकाश चा दिवसही खूप छान गेला. ऑफिसचा पहिलाच दिवस असल्यामुळे सगळे त्याच्याशी अगदी प्रेमाने वागत होते. आकाशचा स्वभाव तसा बोलका. त्यामुळे सगळ्यांशी स्वतःहून बोलणार. त्याच्या या स्वभावामुळे सगळे त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले. त्याचाही दिवस चांगला गेला होता. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी येताना तो आनंदात होता. इकडे घरी आल्यावर पाहतो तर काय त्याला सुमन मशीन वर काम करताना दिसली. त्याला काही समजेना. जाताना तर काहीच नव्हते आणि येई पर्यंत हे मशीन आले कुठून? घरात एक पैसाही नव्हता. मग मशीन आणायला सुमन कडे पैसा आला कुठून? मनातील असंख्य प्रश्नांनी त्याचे डोके सुन्न झाले. तो तिथेच उभा राहिला. त्याला पाहून सुमनने अगदी हसत त्याचे स्वागत गेले. त्याला आत बोलावले आणि मशीन दाखवले.मशीन पाहून आकाशला आनंद होण्याऐवजी मनात शंकांनी प्रश्न निर्माण केले होते. "हे मशीन आले कुठून? घरात पैसा नव्हता. तुला हे मशीन कुणी दिले?" आकाशच्या शंकेने वाट मोकळी केली."अहो सांगते मी. इतकं का ओरडत आहात? रोहन भाऊजी आहेत ना त्यांच्या आईने हे मशीन दिले आहे. त्यांच्याकडे पडूनच होतं. मग त्या म्हणाल्या की तू वापर कर आणि मी आता त्यांचेच कपडे शिवत आहे. माझी आज पासून सुरुवात झाली. मी देखील छोटी-मोठी कामे करायला तयार झाले. आता आपल्या संसाराला माझा देखील थोडा हातभार लागणार. तसेच मी आत्मसन्मानाने हळूहळू वागायला चालू करणार. याचाच मला खूप आनंद झाला." सुमन उत्साहाने म्हणाली."अरे वा! माझ्या मनात तर वाटत होते की हे मशीन आले कुठून? पण खरंच हे एक छान झालं तू काहीतरी करायला लागलीस. मला तर असे वाटत होते की मी गेल्यावर तू एकटी घरात बसून काय करणार? तुझी करमणूक कशी होणार? पण आता तुझ्या करमणुकीचे साधन तुला मिळाले. आता मी निवांत झालो." असे म्हणून आकाश फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन आल्यानंतर सुमनने दोघांनाही चहा करायला ठेवला.सुमनने दोघांना चहा ठेवला होता. पण तिच्या विचारांच्या तंद्रीत तो एकच कप झाला. आता काय करायचे? म्हणत तिने एकाच कपात चहा ओतला आणि तो आकाशला दिला."तू घेणार नाहीस का चहा?" आकाश सुमनला म्हणाला. कारण लग्न झाल्यापासून दोघांनी एकत्रच चहा घेतला होता. पण आज मला एकट्यालाच चहा दिला. सामान तर संपले नसेल ना? असा प्रश्न त्याच्या मनात येऊन गेला."माझा चहा झालाय. मी मघाशीच घेतले." असे सुमनने बोलल्यावर ती खोटे बोलत आहे हे आकाशला जाणवले आणि त्याने तिचा हात धरला. त्याने तिला जवळ बसवून घेतले. चहा कपामध्ये ओतून "चल आपण दोघे मिळून एकाच कपातून चहा पिऊ." असे तो म्हणाला. आकाश असे म्हणताच सुमन लाजली. मग आकाशने बशी सुमनच्या ओठाजवळ नेले. सुमनने लाजतच बशीतील एक घोट चहा पिला. नंतर आकाशने त्यातील चहा पिला.

"अहाहा! किती गोड चहा झाला आहे." म्हणाला. तेव्हा सुमन आणखीनच लाजू लागली.हळूहळू सहवासाने त्यांचे प्रेम अधिकच खुलत गेले. ते मनाने आणखीनच जवळ आले. एकमेकांची सुख दुःख न सांगताच कळू लागले. आता या झोपडीतल्या संसारात ते आनंदाने राहू लागले. ते दोघेही मोठे होण्याची स्वप्ने पाहू लागले. एकमेकांसाठीच बनलेले ते दोघेही फक्त एकमेकांचाच विचार करत होते.सुमन आणि आकाशचे रूटीन व्यवस्थित चालू झाले होते. दोघेही आपापल्या कामात मग्न होते. सुमनचे कपडे शिवण्याचे काम जोमाने चालू होते. तिला त्या त्या दिवशी पैसे मिळत होते. त्यामुळे त्यांचे घर व्यवस्थित चालले होते. किराणा सामान उधारी वर दुकानातून घेत होते. म्हणून त्याचे काही टेन्शन नव्हते. आकाशचा पगार झाल्यावर दुकानदाराचे पैसे देणार होते.बघता बघता महिना संपत आला होता. आता आकाशचा पगार होणार म्हणून दोघेही खूप खूश होते. आकाश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. आज पगाराचा दिवस असल्याने ऑफिस मध्ये सगळेच खूप खूश होते. आकाशचा पगार झाला. पहिला पगार झाल्यावर खरंतर एक क्षण त्याला आईवडीलांची आठवण आली. त्यांच्यामुळेच त्याला हे साध्य झाले होते. त्याने मनापासून त्यांचे आभार मानले.ऑफिस सुटल्यावर आकाश घरी जायला निघाला. खरंतर सुमनच्या हातात कधी एकदा पगार देतो असे त्याला झाले होते. पण परत त्याच्या मनात आले की लग्न झाल्यापासून सुमनसाठी काहीच घेतले नाही. बिचारी आहे त्या परिस्थितीत माझ्यासोबत संसार करत आहे. मग तिच्यासाठी काही तरी घेऊया. असे म्हणून तो मार्केटमध्ये गेला. तिथे गेल्यावर अँटिक मध्ये कानातले झुमके त्याला बघता क्षणी खूपच आवडले. हे सुमनला खूप आवडतील असे मनात म्हणत त्याने ते झुमके घेतले आणि त्यासोबत एक मोगर्याचा गजरा पण घेतला आणि तो घरी जायला निघाला.घरी गेल्यावर सुमन दारातच त्याची वाट बघत उभी होती. आकाशला समोर पाहिल्यावर ती खूप खूश झाली. आकाशचा पगार होणार म्हणून तिने काकूंना विचारून बर्फी बनवली होती. आकाश हसतच घरात आला. त्याने आल्याबरोबर झालेला पगार सुमनच्या हातात ठेवतो. सुमनला खूप आनंद होतो. ती तो तसाच घेऊन तिने लक्ष्मीच्या फोटोसमोर नेऊन ठेवला. तेव्हा आकाश तिला म्हणाला,"तूच माझी लक्ष्मी आहेस म्हणून पहिला पगार मी तुझ्या हातात दिला." तेव्हा सुमनला खूप बरे वाटले. लहानपणापासून आईला आणि त्या तिघी बहिणींना काडीचीही किंमत कधी मिळाली नाही. आता तर डायरेक्ट लक्ष्मीची उपमा मिळत आहे म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले."हे काय? तुझ्या डोळ्यात पाणी." आकाश सुमनचा हात हातात घेऊन म्हणाला. आजच्या या आनंदाच्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला आवडणार नाही हं." आकाश सुमनला फुलासारखं जपत होता. तिला काही झालं की वेदना याला होत होत्या."काही नाही. हे आनंदाश्रू आहेत. खरंच आता आपला संसार व्यवस्थित चालू झाला. थॅन्क्यू सो मच. मला तुमच्या आयुष्यात स्थान दिल्याबद्दल." सुमन डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली."बरं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तू आधी डोळे बंद कर बघू." असे आकाशने म्हटल्यावर सुमनने लगेच डोळे बंद करून घेतले. आकाशने लगेच त्याने जे कानातले आणले होते त्याचा बाॅक्स बाहेर काढून तिच्या समोर धरला."आता उघड डोळे." असे आकाशने म्हटल्यावर सुमनने डोळे उघडले आणि पाहिले तर काय? समोर कानातले झुमके. ते पाहून तिला खूपच आनंद झाला. तिने क्षणाचाही विलंब न करता ते लगेच घातले आणि ती आरशात पाहू लागली."खूप सुंदर आहे. मला खूप आवडले." सुमन"त्याच्या पेक्षा तू सुंदर आहेस. तू घातल्यावर त्याला शोभा आली." आकाश असे म्हणताच सुमन लाजली. ती लाजल्यावर आकाश हळूच तिच्या जवळ गेला आणि त्याने आणलेला गजरा तिच्या केसात माळू लागला. तो माळत असतानाच सुमनला अचानक चक्कर आली.

क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..