आत्मसन्मान 7

Marathi story


आकाशला नोकरी मिळाली नाही म्हणून सुमन त्याची समजून घालत होती. "आपण काहीतरी करू, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं मन मला सांगतंय की कोणत्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये तुमचे सिलेक्शन होईलच. बरं चला फ्रेश होऊन या. आपण चहा घेऊ." असे म्हटल्यावर आकाश फ्रेश होऊन आला आणि दोघेही चहा घेण्यासाठी गेले. चहा घेत असताना ही दोघांच्या मनात आता पुढे काय करायचे? हाच प्रश्न येत होता. चहा घेऊन झाल्यानंतर समोरच्या बागेत जाऊन दोघेही बसले आणि तिथे आकाश विचारात मग्न असतानाच त्याचा मित्र रोहन तेथे आला.

"अरे आकाश, इथे काय करतोस? नवीन नवीन लग्न झालंय तुमचं, म्हणून बागेत फिरायला आलात काय? सॉरी सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना." रोहन असे म्हणताच आकाश दचकलाच आणि रोहनला काय उत्तर द्यायचे? हे समजेना. रोहनला अचानक समोर बघून तहानेने व्याकूळ झालेल्या व्यक्तीला जसे पाणी मिळाल्यावर आनंद होतो तसा आनंद आकाशला झाला.

"नाही रे रोहन, आम्ही इथेच हॉटेलमध्ये राहतोय. आता माझ्या जवळचे पैसेही संपत आले आहेत भाड्याच्या घरी जावं म्हटलं तरी भाडे भरण्यासाठी पैसे नाहीत आमच्याजवळ. नोकरीसाठी मी इंटरव्ह्यू देऊन आलोय पण त्यांचा काही कॉल आला नाही. आता काय करायचे? हा विचार करतोय. आम्ही प्रेमविवाह तर केला. पोरगी पटवली सगळं झालं. पण आता संसाराचे चटके बसू लागलेत. तोच गुंता कसा सोडवायचा? याचा आम्ही विचार करत आहोत." आकाशने रोहन पुढे त्याचे मन मोकळे केले. त्याच्या भावना व्यक्त केल्या. जेणेकरून मित्र काहीतरी मदत करेल अशी त्याला आशा होती. जरी त्याला शक्य नसेल तरी इतर मित्रांना सांगून काहीतरी सोय नक्कीच करेल असा विश्वास होता.

"अरे, मग आधी बोलायचं नाही का? आम्ही तुझे लग्न लावले, तेव्हा पण तू काही बोलला नाहीस. बरं राहू दे, चल आमच्याकडे एक खोली आहे. तिथे तुम्ही भाड्याने राहू शकता. तुझ्याकडे कधी पैसे जमतील तेव्हा मला भाडं दे. आता इतक्यात काही गडबड नाही." रोहनच्या अशा बोलण्याने आकाशला दिलासा मिळाला. त्याचे मन भरून आले. मित्राचे आभार किती आणि कसे मानावे तेच समजेना.

रोहनच्या या बोलण्याने त्यांचे मन अगदी प्रफुल्लित झाले. कोमेजलेल्या वृक्षाला जसे पाणी घातले असता ते टवटवीत होते त्याप्रमाणे त्यांचे चेहरे अगदी टवटवीत झाले. आनंदही झाला. त्या दोघांनी लगेच आपापले सामान घेतले आणि रोहनच्या रूमवर भाड्याने राहायला गेले. ती एकच खोली होती पण थोडी मोठी होती. कुठे का असेना? आसरा मिळाला हे महत्त्वाचं असे म्हणून ते दोघे त्या खोलीत सामान लावायला गेले. पण त्यांच्या जवळ ना भांडी होती, नाही इतर कोणतेही सामान होते. होते फक्त कपडेच. आता त्यांना अगदी सुरुवातीपासून संसार करायचा होता.

अगदीच काही नाही म्हणण्यापेक्षा घर तरी भाड्याने मिळाले यातच ते दोघे समाधानी होते. थोडे पैसे शिल्लक होते त्यात त्याने थोडी भांडी आणली, रोहन कडून तात्पुरता गॅस मागून घेतला आणि त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. आणलेली भांडी व्यवस्थित ठेवून दोघेही बसले होते. त्यांच्या डोक्यावरील खूप मोठे ओझे हलके झाले होते. एक तरी गोष्ट चांगली घडली याचा त्यांना आनंद झाला. ते दोघेही गप्पा मारू लागले इतक्यात,

आकाशचा फोन वाजला."आता कोणाचा फोन आला?" म्हणून आकाशने फोन उचलला. अननोन नंबर होता. हा नंबर कुणाचा असेल? आई किंवा बाबांनी तर केला नसेल ना! असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले.

"तुम्हाला कंपनीने सिलेक्ट केले आहे आणि उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता." हे फोन मधून बोलणे ऐकून आकाशला खूप आनंद झाला आणि तो आनंदाच्या भरात उड्या मारू लागला. सुमनला काही समजेना, हे का उड्या मारत आहेत?

"अहो, काय झालं तुम्हाला? असे का नाचत आहात? मला पण सांगा ना!" सुमनने उत्सुकतेने त्याला विचारले.

"अगं सुमन, फायनली मला नोकरी मिळाली." आकाशने तिला सांगितल्यावर तिलाही खूप आनंद झाला.

"खरंच! आज आपल्याला घर मिळालं आणि तुम्हाला नोकरी सुद्धा मिळाली. आजचा दिवस किती छान आहे ना! आपले आयुष्य अंधारमय होत असताना एक सोनेरी किरण घेऊन आजचा दिवस आला. चला तर मग तुम्ही रवा साखर घेऊन या, शिरा बनवते. आपले तोंड गोड करूया." सुमन आनंदाने म्हणाली. तिला तर काय करू आणि काय नको असे झाले होते. अखेर एकेक स्वप्ने साकार होत आहेत असे वाटले. आता आपले ध्येय साध्य करणे काही अवघड नाही हे जाणवले. एक प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्याला बळ देत आहे असे भासू लागले.

"शिर्‍याने काही माझं तोंड गोड होणार नाही." आकाश तिला चिडवत म्हणाला. पण सुमनला काही लवकर लक्षात आले नाही. ती आपल्याच नादात होती. तिला खूपच आनंद झाला होता. त्या भरात आकाश काय बोलतोय? याकडेही तिचे लक्ष नव्हते.

"अच्छा, मग तुम्हाला काय गोड हवं आहे ते आणा. मी पण तेच खाईन." सुमन अगदी निरागसपणे म्हणाली. आपण काय बोलतोय? हे सुध्दा तिला समजत नव्हते.

"मी काय आणून होणार आहे? ते तर तुझ्या हातात आहे माझं तोंड गोड करायचं." आकाश खोडकर पणे म्हणाला. तो तिची गंमत करत होता. दोन तीन दिवस खूपच वाईट गेले होते. लग्न झाल्यापासून त्याने तिला साधे प्रेमाने जवळ सुध्दा घेतले नाही. पण आता थोडे मनावरील ताण हलका झाल्यामुळे तो चिडवण्याच्या मूडमध्ये होता.

"अच्छा, मग सामान आणून द्या. मी आत्ताच बनवते. पटकन बोला काय हवंय तुम्हाला." सुमनला अजूनही काही समजत नव्हते. तिला वाटले की आकाशला काहीतरी चटपटीत खायला हवे असेल. या विचाराने ती म्हणाली.

"अशी कशी ग तू भोळी." असे म्हणून आकाश सुमनच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. दोघेही अगदी प्रेमात न्हाले. ज्या क्षणाची ते वाट पाहत होते अखेर तो क्षण आला. आधीचा आनंद द्विगुणित झाला.

"चला कोणी तरी येईल." असे म्हणून सुमन आकाश पासून दूर झाली आणि लाजेने अगदी चूर झाली. तिच्या गालावरची लाली अगदी खुलून दिसत होती. ती गालातल्या गालात हसत होती.

"आता झालं माझं तोंड गोड." असे आकाश म्हणाला. ते ऐकून सुमन आणखीनच लाजू लागली. याला काय प्रतिक्रिया द्यायची तिला समजेना.

या अफाट महासागरातून तरुन जात असताना कुणीतरी आपला हात धरावा आणि यातून बाहेर पडावे असे त्या दोघांना नोकरी मिळाल्यावर झाले होते. आता त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने उभारी मिळणार होती. थोडेसे सुख पदरात पडेल अशी त्यांना आशा लागून राहिली होती.

आकाशने सामान आणल्यावर सुमनने शिरा बनवला. मग तो प्लेटमध्ये घालून आकाशला दिला. एक घास शिरा खाऊन आकाश म्हणाला, "अहाहा! काय चव आहे. तुझ्या हाताचा सगळा गोडवा यामध्ये उतरला आहे." आकाशने सुमनवर कौतुकाचा वर्षाव केला. दोन तीन दिवसांनी तो घरचं खात होता. त्यामुळे तो आणखीनच खूश होता.

"काय पण हं तुम्ही बोलता. तुम्हीच गोड आहात म्हणून तुम्हाला शिरा गोड लागत आहे." सुमन लाजतच म्हणाली.

"अच्छा, मग तूच बघ खाऊन." असे म्हणून आकाशने चमच्याने शिरा तिलाही भरवला. तेव्हा सुमन लाजली. दोघेही एकाच प्लेटमध्ये शिरा खाऊ लागले. जणू ते भरभरून प्रेमाने खात होते. अगदी तेव्हाच रोहन तेथे आला.

"अरे, साॅरी साॅरी. मी चुकीच्या वेळी आलो." असे म्हणून रोहन जात होता. त्याला पाहून सुमन ओशाळली आणि लाजेने बाजूला झाली. खरंतर आकाश आणि सुमन कोणी येणार नाही म्हणून दार बंद न करताच बसले होते. प्रेमाच्या प्रवाहात भिजून चिंब होताना ते जगाचे भान हरपले होते. आता अचानक रोहनला पाहून शरमेने ओशाळले.

"रोहन, अरे ये रे. तसे काही नाही." आकाश असे म्हटल्यावर रोहन आत आला. त्यालाही अवघडल्यासारखे वाटू लागले. तो बराच वेळ शांत होता.

"बोल की, काय काम काढलास?" आकाशनेच बोलायला सुरुवात केली.

"काही नाही रे, तुला आणखी काही हवं आहे का? हे विचारण्यासाठी मी आलो. पण नेमका चुकीच्या वेळी." रोहन

"अरे इतकी मदत केलीस आम्हाला ती काय कमी आहे का? सध्या तरी काही नको. जेव्हा काही लागेल तेव्हा तुला नक्की सांगेन आणि एक आनंदाची बातमी आहे. अरे मला नवीन जॉब मिळाला आहे. आता थोडं टेन्शन कमी झालंय." आकाश रोहन सोबत गप्पा मारत बसला होता.

"अरे वा! ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आता तुमचा संसार रुळावरुन व्यवस्थित चालू होणार. वा वा! अभिनंदन. किती चांगली बातमी दिलास. अशीच तुझी प्रगती होऊ दे. तुमचा संसार सुखाचा होऊ दे." रोहन

"धन्यवाद भावा, आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता उद्यापासून मी जॉब ला जायला तयार. हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झाले. तू आम्हाला आसरा दिलास. तुझे उपकार कसे फेडायचे?" आकाश

"अरे, मित्र आहेस तू माझा. दोस्ती में नो साॅरी नो थॅन्क्यू असे असते आणि तू सरळ उपकाराच्या भाषा बोलतोस. असे असेल तर मी तुझ्याशी बोलणारच नाही." रोहन थोडसं नाराजीच्या सुरात म्हणाला.

"बरं साॅरी. मी परत म्हणणार नाही. झालं." आकाश म्हणाला.

रोहन आणि आकाश बराच वेळ गप्पा मारत बसले होते. रोहन गेल्यावर आकाश त्याच्याच विचारांच्या तंद्रीत गेला. खरंतर त्याला ऑफिसला गेल्यानंतर तिथे काय होईल? याची हुरहुर लागली होती. मनात अफाट जिद्द तर होतीच, काहीतरी करून दाखवायचे या जिद्दीने त्याला रात्रभर झोप येत नव्हती. त्या विचारातच त्याला कधी झोप लागली कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी आकाश सकाळी लवकर उठला कारण आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता. त्याला वेळेत हजर राहावे लागणार होते म्हणून तर लवकर आवरून तयार होऊन बसला होता. बरोबर वेळेत घरातून निघायचे म्हणून बसला. वेळ झाल्यावर तो जाऊ लागला. इतक्यात सुमनने त्याच्या हातात दही साखर दिले.

"आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस. यातून तुमची खूप मोठी प्रगती होऊ दे, तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळू दे, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू दे, म्हणून हे दही साखर." असे म्हणून तिने चमचाने त्याच्या तोंडात दही साखर भरवले. ते खाऊन आकाश ऑफिस मध्ये निघून गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all