Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 43 (अंतिम)

Read Later
आत्मसन्मान 43 (अंतिम)


सुमनला जेव्हा ही गोष्ट समजली की, स्वरा च्या सासूबाईंना त्या बाईचे बोलणे खूप जिव्हारी लागले आहे, तेव्हा सुमन त्यांच्यापाशी गेली आणि म्हणाली, "तुम्ही इतके मनाला लावून घेऊ नका, शेवटी मुलाला जन्म देणे हे नवरा-बायको च्या मनावर अवलंबून असते, लोक काय बोलतील? याकडे लक्ष देऊ नका. लोक काय आता बोलतील नंतर सोडून देतील. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो या दोघांनाच घेऊ दे. स्वराचे शिक्षण झाले की आपण दोघांना समजावून सांगू. अजून लहान आहेत त्यामुळे याचा विचार त्यांच्या मनात आला नसेल. सध्या ते करिअरचा विचार करत आहेत. स्वराचे एकच वर्ष शिल्लक आहे ते पूर्ण झाले की ते नक्कीच याचा विचार करतील." सुमनच्या या बोलण्याने पृथ्वीच्या आईला थोडा धीर आला.

पार्टी खूप छान झाली. सगळेच खूप खूश होते. स्वरा तर हवेतच होती. आज सारं काही स्वराच्या मनाप्रमाणे सुरू होते. तिचे सासू-सासरे सुद्धा तिचे कौतुक करत होते. तिच्या सासर्‍यांनी सर्वांना एकत्रित करून म्हणाले, "खरंतर स्वरा ही आम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती, पण तिच्याकडे काहीतरी नक्कीच जादू आहे, तिने आमच्या दोघांना आपलंसं केलंय, शिवाय मी जेव्हा चक्कर येऊन पडलो होतो, घरात कोणीच नव्हते तेव्हा हिनेच तर मला वाचवले, खरंच आज स्वराचा आमची सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून खूप अभिमान वाटतो. आमचे आम्हालाच विश्वास बसेना की जी मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत नव्हती ती आत्ता आमची मुलगी बनली आहे. आमच्यात इतके परिवर्तन झालेले आहे म्हणूनच माझ्या मनातील हे भाव बोलण्यासाठीच खरंतर आज पार्टीचे आयोजन केले आहे. सर्वांना कळायला हवे की आमची सून किती चांगली आहे! तिचे कोडकौतुक व्हायला हवे म्हणूनच तर हे पार्टीचे नियोजन..

पृथ्वीच्या बाबांच्या तोंडून आपल्या लेकीचे कौतुक ऐकून सुमनला खूप आनंद झाला. आपण केलेल्या आत्तापर्यंतच्या कष्टाचे चीज झाले म्हणून तिला भरून आले. तिच्या डोळ्यावाटे आनंदाश्रू वाहू लागल्या. खरंच आपल्या मुलीने आज आपले नाव केले असे वाटून तिला गहिवरुन आले. सासर्‍यांनी स्वराचे कौतुक केले हे पाहून तिला देखील एक सुखद धक्काच बसला, कारण तिने कधी अपेक्षाच केली नव्हती. ती त्यांचे सगळे ऐकत होती पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल इतके चांगले भाव असतील असे तिला कधीच वाटले नव्हते.

अशाप्रकारे पार्टी खूप रंगतदार झाली होती. तो दिवस स्वरा चा असल्यामुळे तिचे सगळीकडे कौतुक होत होते. पार्टी संपली आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागले.

स्वराचे शेवटचे वर्ष शिल्लक होते. पृथ्वीने देखील त्याच्या कामामध्ये खूप प्रगती केली होती. त्याचे विचार आणि बाबांचे विचार याच्यामध्ये खूप तफावत असल्यामुळे बिजनेस मध्ये दोघांचे विचार घेऊन काही बदल करण्यात आले त्यामुळे त्यांच्या कंपनीला या सगळ्याचा फायदा झाला.

पार्टी झाल्यापासून पृथ्वीची आई मूल होण्या बद्दल त्या दोघांना सारखी बोलत होती. पण त्या दोघांनी हे मनावर घेतले नाही. कारण स्वराचे एकच वर्ष शिल्लक होते. तिचे शिक्षण झाले की मग याचा विचार करू असे त्यांनी ठरवले होते. पृथ्वीच्या बाबांनी सुद्धा एक वर्ष होऊ दे मगच बाळाचा विचार मनावर घ्या असे त्यांना सांगितले होते, त्यामुळे ते दोघे निश्चिंत होते.

बघता बघता वर्ष कधी निघून गेले हे कळलेच नाही. स्वरांने शेवटच्या वर्षात सुद्धा खूप छान प्रगती केली होती. तिचा त्यावेळी सुद्धा कॉलेजमध्ये पहिला नंबर आला होता. स्वरा एक डॉक्टर बनली होती. तिच्या बाबांचे स्वप्न आता पूर्ण झाले होते. सुमनला देखील तिचा अभिमान वाटत होता. इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या लेकीने शिक्षण घेऊन आता ती एक डॉक्टर बनली होती याचा तिला खूप अभिमान होता.

स्वरा करियरचा विचार करत होती, पण तिला सासुबाईंचे म्हणणे देखील पटले होते. एकदा का करियर मध्ये गुंतलो तर मग बाळाचा विचार राहून जाईल, त्यापेक्षा आता मूल जन्माला घातले की तीन वर्षाने करिअरचा विचार केला की योग्य होईल. तसेही आपली आई आपल्या जन्मानंतर तिच्या करिअरचा विचार करत होती. तिची परिस्थितीही तशीच होती म्हणा, पण करिअर पेक्षा मूल जन्माला घालणं तिला योग्य वाटले. तसे ती प्रॅक्टिसला सुद्धा एका खाजगी डॉक्टरांकडे जात होती पण मुलाचा विचार सुद्धा तिच्या मनामध्ये सुरु होता.

स्वराच्या सासूबाईंनी तिला सांगितले होते की मुलाला मी सांभाळते, पण तुझे करिअर तू कर. सासू सासरे देखील आता तिच्या पाठीशी असल्यामुळे तिला काहीच अवघड नव्हते.

थोड्याच दिवसात पाळणा हलला, स्वराला दिवस गेले. ती तिच्या संसारात रमून गेली. स्वराचे आणखी कौतुक होऊ लागले. तिला काय हवे काय नको? हे सगळे जण पाहू लागले. सुमन सुद्धा अधून-मधून येऊ लागली आणि बघता बघता नऊ महिने निघून गेले.

आज स्वराची डिलिवरी होती, डॉक्टरांनी आजची तारीख दिली होती. स्वराला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सकाळी नऊ वाजता ऑपरेशन करण्याचे ठरले. तिचे सिझर करावे लागेल असे डाॅक्टरांनी सांगितले होते. सगळे जण हॉस्पिटलमध्ये आले होते. काय होतंय काय नाही? याची प्रत्येकाच्या मनात धाकधूक होतीच. फायनली ऑपरेशन झाले आणि डॉक्टर बाहेर आले.

"अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली." हे ऐकून डाॅक्टरांचे वाक्य पृथ्वीला खूप आनंद झाला. त्याने एक मोठा पेढ्यांचा बॉक्स मागविला आणि संपूर्ण हॉस्पिटल भर पेढे वाटले. ते पाहून स्वराला आणि सुमनला आकाश ची आठवण झाली. पृथ्वीचे विचार सुद्धा किती चांगले आहेत हे पाहून त्या दोघींनाही समाधान वाटले. आता आपल्या मुलीला कशाचीही कमी पडणार नाही याचा त्या दोघींना विश्वास वाटला.

बाळ आणि बाळंतीण दोघेही घरी आल्यानंतर त्या मुलीचे मोठ्याने बारसे घातले गेले. त्या दोघांच्या आवडीचे नाव स्पृहा हे नाव त्या मुलीला ठेवले. स्पृहाचा अर्थ इच्छा, ध्येय. तिचे ध्येय तिने ठरवावे आणि त्याप्रमाणे सगळी घडावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून स्पृहा.

प्रत्येक जण आपापल्या संसारात रमून गेले होते. तिकडे परीच्या आई-बाबांचा काही शोध लागला नाही म्हणून पोलिसांनी परीला सुमन च्या जवळच तिचा योग्य सांभाळ होण्यासाठी ठेवले. सुमनने देखील तिचे पूर्ण संगोपन केले. जणू काही परी तिच्या सोबतीलाच आली होती की काय? असे वाटत होते. सुमनने स्वराला जे जे काही शिक्षण दिले ते ते सगळे परीसाठी ती करत होती. आता तिच्यासाठी झटत होती.

मुलगी म्हणून जन्माला येणे हा काही दोष नाही, गुन्हा नाही तर मुलगी म्हणून जन्माला येणे हे खरे तर पुण्याचे काम आहे. ती दोन्ही घरे उजळून टाकते. मूलं जन्माला घालणे ही स्त्री ला मिळालेली सुंदर देणगी आहे, मूल वाढवणे हे एका स्त्रीच्या हातात असते, मुलांना चांगले संस्कार देणे हे एका स्त्रीच्या हातात असते. वेळोवेळी परमेश्वराला येता येत नाही म्हणून त्याने आई, एक स्त्री निर्माण केली असावी.

आत्मसन्मान या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण वेगळा वापरतात. आत्मसन्मान म्हणजे आपल्या मनाचा सन्मान, आपला सन्मान. पण यामध्ये अहंभाव नसावा, मी जे काही म्हणेल ते माझेच खरे असे न करता जे सत्य असेल ते सत्यालाच खरे असे म्हटले पाहिजे. तरच ते खरे आत्मसन्मान. अहंकार, अहंभाव याचा आत्मसन्मान मध्ये काडीचाही संबंध नाही. एका स्त्रीचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान हा महत्त्वाचा असतो. म्हणून चुकीची साथ न देता, मी म्हणेन तेच खरे न म्हणता जे सत्य असेल त्याला जर पाठिंबा दिला त्या प्रत्येकाचा आत्मसन्मान जपला जातो.
समाप्त...

नमस्कार,
मी प्रियांका अभिनंदन पाटील. आत्मसन्मान या कथेला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
तुमचा अभिप्राय खूप मोलाचा आहे..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..