Login

आत्मसन्मान 42

Marathi story


"स्वरा, तू असे तडकाफडकी निघून यायला नको होतीस, त्यांचा थोडा तरी विचार तू करायला हवी होतीस." सुमन

"आई, अगं मला ते काॅलेजला जाऊच देत नव्हते, मग मी काय करणार सांग? एकतर महत्वाचे प्रॅक्टिकल होते, तेव्हा मी जाऊ शकले नाही. नंतर काही काम नसताना सुद्धा त्यांनी मला काॅलेजला जाण्यापासून अडवले. मग मी काय करू सांग? तशीच शांत बसू का?" स्वरा

"शांत बसून मुळीच चालणार नाही. शेवटी अन्याय सहन करणे हा सुध्दा मोठा गुन्हा च आहे." सुमन

"मग मी काय करायला हवे होते?" स्वरा

"अगं बाळा, तू चार दिवस सुट्टीला आईकडे जाते म्हणून आली असतीस तर मनात इतकी कटुता आली नसती ग, तुझा संसार सुखाचा असेल तरच आम्ही सुखी असू, तूच अशी वाद घालून आलीस तर आमच्या जीवाला घोर असणार ना! यातूनच काहीतरी तोडगा काढायचा असतो, प्रत्येक वेळी वार करून चालत नाही बाळा. थोडं अदबीने घ्यावं लागतं. नात्याची वीण अलगद गुंफावी लागते. त्यावर प्रहार केला की ती वीण सैल पडते." सुमन स्वराला समजावून सांगत होती.

"हो ग आई, नाते हे महत्वाचे आहेच, पण आत्मसन्मान हा सुध्दा महत्त्वाचा आहेच ना! मग अशावेळी काय करायचे?" स्वरा

"अलगद गोड बोलून अडचण सोडवायची, जेणेकरून नातं सुध्दा तुटणार नाही आणि आत्मसन्मान सुध्दा जपला जाईल. तुझा आत्मसन्मान तुला महत्त्वाचा असतो मग समोरच्या व्यक्तीला त्याचा आत्मसन्मान महत्त्वाचा असतोच ना! तेच गोड बोलले तर दोघांचाही आत्मसन्मान जपला जाईल ना! आणखी एक जर एखाद्या व्यक्तीच्या मनातून उतरलीस तर कितीही प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीच्या मनात लवकर बसणार नाही. म्हणून नेहमी बोलताना समोरच्या व्यक्तीचा सुध्दा विचार करत जा." सुमनचे बोलणे स्वराला पटले.

"आई, मी नक्की याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन." असे म्हणून स्वराने तिची बॅग भरली आणि ती पृथ्वी सोबत घरी जायला निघाली. ते पाहून सुमनला खूप समाधान वाटले.

आईने समजावून सांगितल्यानंतर स्वराला ते सगळे बोलणे पटले आणि ती सामान घेऊन घरी जायला निघाली. पृथ्वी स्वराला घेऊन घरी आला, थोडे दिवस पृथ्वीच्या आई-बाबांनी तिच्याशी अबोल धरला. पण नंतर सगळे सुरळीत झाले. स्वरा नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागली. पृथ्वी ऑफिसला जाताना तिला सोडून जायचा, येताना मात्र स्वराला ड्रायव्हर घेण्यासाठी जात होता.

बघता बघता वर्ष कधी विसरून गेले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. स्वराच्या परीक्षा जवळ आल्या होत्या तेव्हा ती माहेरी आईकडे येऊन राहिली होती, जेणेकरून तिला अभ्यासाला वेळ देता यावा यासाठी तिने आईने सांगितलेली ट्रिक वापरली होती. थोडे दिवस आईकडे सुट्टी ला जाते असे म्हणून ती आली होती आणि त्या दिवसात तिने परीक्षेचा सगळा अभ्यास केला होता. तसे स्वरा खूप हुशार होती, एकदा सांगितलेली गोष्ट तिच्या पूर्ण लक्षात राहत होती, त्यामुळे परीक्षेचा तिला अजिबात त्रास झाला नाही. संसार आणि कॉलेज याचा ताळमेळ बरोबर तिने बसवला होता. आता तिच्या ते सवयीचे झाले होते. घरातील संसारातील सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित करत असल्यामुळे तिच्या सासरचे सुद्धा तिला काही बोलत नव्हते. पृथ्वी तिच्या बाजूने असल्यामुळे कोणीच काही बोलत नव्हते.

एक दिवस पृथ्वीची आई काही कामानिमित्त पाहुण्यांच्या कडे गेल्या होत्या. पृथ्वीसुद्धा ऑफिसला गेला होता. घरामध्ये नोकर-चाकर होतेच शिवाय स्वरा आणि पृथ्वीचे बाबा हे दोघेही होते. स्वरा कामांमध्ये गुंग होती, स्वयंपाक घरात जेवण बनवण्यात व्यस्त होती. तो दिवस रविवारचा असल्यामुळे तिला काॅलेजला सुट्टी होती. ती कामात गुंतली असतानाच एक मोठा आवाज झाला आणि ती बाहेर आली. बाहेर येऊन तिने पाहिले तर पृथ्वी चे बाबा अचानक खाली पडले होते. त्यांना काय झाले? हे पाहण्यासाठी स्वरा धावतच त्यांच्याजवळ गेली. त्यांना ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होता आणि त्या त्रासातच त्यांना थोडीशी चक्कर आली होती, ते खाली पडले होते. नोकरांच्या मदतीने ती त्यांना उचलून खोलीमध्ये घेऊन गेली. तो दिवस रविवारचा असल्यामुळे हॉस्पिटल सुद्धा बंद होते, म्हणून तिने मेडिकल मधून काही औषध आणि एक इंजेक्शन मागविले. स्वरा ने त्यांना इंजेक्शन दिले आणि थोड्या वेळाने त्यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा गोळ्या दिल्या. तेव्हा कुठे त्यांची तब्बेत पूर्ववत झाली. संध्याकाळी जेव्हा पृथ्वी ची आई आली तेव्हा त्यांना सगळी घडलेली हकीकत समजली.

"खरंच स्वरा घरी होती म्हणून सारे काही निभावले, नाहीतर काय झाले असते काय माहित?" असे उद्गार त्यांच्या तोंडून आले. पृथ्वी ला सुध्दा बरे वाटले.

पृथ्वीसुद्धा प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित करत होता, त्याने स्वराला पूर्णपणे साथ दिली होती त्यामुळेच तर स्वरा पुढील शिक्षण घेत होती. आता त्यांचा संसार सुखाचा चालला होता. सगळेजण त्यांच्या त्यांच्या आयुष्यात आनंदी होते.

अखेर स्वरा ची परीक्षा संपली. तिला सगळे पेपर खूप छान गेले होते, त्यामुळे ती आनंदी होती. आता सुट्टीचे दिवस असल्यामुळे ती पूर्णपणे संसारात रमली होती. घरामध्ये काय हवे काय नको? हे सगळे ती पाहत होती. सासूबाईंना थोडा आराम मिळावा यासाठी ती प्रयत्न करत होती. फक्त स्वयंपाकच तेवढा करायला लागत असल्यामुळे ती वेगवेगळे पदार्थ रोज बनवून सगळ्यांची मने जिंकत होती. आईने सांगितले होते की, जर एखाद्याचे मन जिंकायचे असेल तर ते पोटातून.. त्यांना चांगले चांगले खाऊ घातले की ती व्यक्ती आपोआप आनंदी राहते, हे तिने बरोबर अमलात आणले होते. ती रोज रोज नवीन नवीन पदार्थ बनवत असल्यामुळे सगळेजण तिच्यावर खूश होते.

फायनली स्वरा चा रिझल्ट लागला. ती कॉलेजमध्ये पहिला आली होती. तिने नेटवरून निकाल पाहिला होता, निकाल पाहून तिला खूप खूप आनंद झाला. तिने पहिला फोन आईला केला. सुमनला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा ती सुद्धा खूप आनंदित झाली. जिकडे तिकडे स्वराचे कौतुक होऊ लागले. पृथ्वीला देखील खूप आनंद झाला. स्वराने इतकी चांगली प्रगती केली याचा त्याला अभिमान वाटत होता. सुरुवातीला घरच्यांनी थोडे आढेवेढे घेतले होते नंतर त्यांनी सपोर्ट केला होता.

स्वरा चा पहिला नंबर आला आहे हे जेव्हा पृथ्वीच्या बाबांना समजले तेव्हा त्यांनी पेढ्याचा एक मोठा बॉक्स मागविला. सगळ्यांना पेढे वाटले आणि स्वराला सुद्धा एक पेढा दिला. "खरं तर मी तुझ्या शिक्षणाच्या विरोधात होतो. लग्नानंतर मुलींनी चूल आणि मूल करायचे या विचारांचा मी. पण तू माझे विचार बदललेस. त्यादिवशी मी चक्कर येऊन पडलो होतो तेव्हा तूच मला वाचवलेस. तू जर नसतीस तर काय झाले असते काय माहित?" हे पृथ्वीच्या बाबा चे बोलणे ऐकून स्वराला बरे वाटले.

या आनंदाच्या गोष्टीबद्दल पृथ्वीच्या बाबांनी एक छोटीशी पार्टी करण्याचे ठरवले. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना बोलावण्याचे ठरले होते. सगळेजण आपापल्या तयारीने आले होते. स्वराने देखील तिच्या आईला आणि काही मैत्रिणींना आमंत्रण दिले होते. आता तिची स्वतःची तयारी सुरू झाली. सुरुवात ड्रेस कोणता घालायचा? इथून झाली. तिने कपाट उघडले त्यातील कोणता ड्रेस घालायचा पार्टीसाठी? याचा विचार करत ती कपाटा समोर उभा राहिली. इतक्यात पाठीमागून खूप पृथ्वी आला.

"काय ग, कसला विचार चाललाय?" पृथ्वी

"पार्टी मध्ये कोणता ड्रेस घालू? याचा विचार करत आहे. तू सांग ना! मी कोणता ड्रेस घालू पार्टीमध्ये?" असे स्वराने विचारताच पृथ्वीने एक बॉक्स स्वराच्या पुढे केला. स्वराने तो उघडून पाहिला तर त्यामध्ये लाल रंगाचा खूप सुंदर ड्रेस होता. तो पाहून स्वरा खूप खूश झाली.

"माझ्या मनातील गोष्ट न सांगताच तुला कसे कळते रे? इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर." स्वरा

"हो मग! तू न सांगताच मला सारं काही कळतं. मी अगदी माझ्या स्वतः पेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो." पृथ्वी नकळत बोलून गेला.

त्या दोघांचे बराच वेळ बोलणे झाले. नंतर स्वरा तिचे आवरू लागली. पृथ्वी ने दिलेला लाल रंगाचा ड्रेस तिने घातला, त्यामध्ये केसांना मॅचिंग चे क्लिप लावली, कानामध्ये अगदी छोटे इयरिंग घातले, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातामध्ये एक बागडी घातली, गळ्यामध्ये छोटेसे मंगळसूत्र आणि कपाळावर लहानशी टिकली लावली असा तिने सिम्पल बट स्वीट मेकअप केला होता. स्वरा खूप सुंदर दिसत होती. पार्टीसाठी सगळे पाहुणे जमले होते. स्वरा तिचे आवरून पार्टीमध्ये गेली. ती उत्सवमूर्ती होती ना! म्हणून सगळे जण तिची वाट पाहत बसले होते. पृथ्वीसुद्धा त्याचे आवरून स्वरा ची वाट थांबला होता. जेव्हा स्वरा ची एन्ट्री झाली तेव्हा तो तर घायाळ झालाच शिवाय इतरही लोक फक्त तिच्याकडे पाहत होते.

पृथ्वीच्या बाबांनी स्वराला बोलावले आणि तिच्याकडून केक कापून घेतला. सेलिब्रेशनला सुरुवात झाली. जिकडे तिकडे सगळे आनंदी झाले होते. जो तो स्वराचे कौतुक करत होता. पण त्यातूनच एक बाई म्हणाली, "तुमच्या लग्नाला वर्ष होऊन गेले तरी अजून पाळणा हलला नाही. आत्ताच विचार करा नाहीतर नंतर अवघड होईल." हे तिचे बोलणे ऐकून पृथ्वीच्या आईला वाईट वाटले. तिला थोडे टेन्शन आले. तिचा पार्टीचा मूडच गेला. ती शांतच बसली.

पृथ्वीच्या आईला असे बसलेले पाहून सुमनला काहीच समजेना. स्वराने आणखीन काही चूक केली का? असे तिला वाटू लागले. आता कोणाला विचारावे? असे ती मनातच म्हणत होती. स्वराला विचारावे तर ती बायकांच्या गराड्यात होती. तिथे जाऊन तिला विचारायचे कसे? पृथ्वीला तर कसे विचारायचे? या विचारातच ती होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all