तिने सासू-सासर्यांना नाष्टा दिला आणि स्वतः खायला बसली. नाष्टा करून झाल्यानंतर आता पाहुण्यांच्या तसेच त्यांच्या जेवणाची तयारी करायची होती. तसेच प्रॅक्टिकल चुकवून चालणार नाही आणि इथे तर सगळा स्वयंपाक करावा लागणार असे म्हणत म्हणत तिने स्वयंपाकाची पूर्वतयारी केली. भाज्या चिरून ठेवल्या, तांदूळ पाकडून ठेवले, कणीक मळून ठेवले आणि ती स्वस्त बसून राहिली. कारण इतक्या लवकर स्वयंपाक बनवला तर जेवण करेपर्यंत ते थंड होईल, म्हणून पाहुणे हात पाय धुवून बसले की भाजी फोडणी टाकून गरम गरम पोळ्या करायला घ्यायच्या अशीच सासूबाईंची ऑर्डर होती.
स्वयंपाकाला अजून बराच वेळ होता तोपर्यंत स्वराने मॅडमना फोन केला. मॅडमना सगळी सत्य परिस्थिती सांगितली. इथे देखील महत्वाचे काम आहेच शिवाय प्रॅक्टिकल सुद्धा खूप महत्त्वाचे आहे मग कसे करायचे? असे स्वराने विचारले असता मॅडम नी तिला एक उपाय सुचवला. अर्थातच स्वरा स्कॉलर मुलगी असल्यामुळे सर्व शिक्षकांची ती आवडती बनली होती. त्यामुळे तिला कोणतीही अडचण आली की प्रत्येक शिक्षक तिच्या मदतीला लगेच धावून जात होते, त्यामुळे या मॅडमनी देखील तिला लगेच मदत केली.
"स्वरा, एक काम कर. तू सध्या व्हिडीओ कॉलिंग करून त्या प्रॅक्टिकलची माहिती समजावून घे. मी त्याचा डेमो दाखवणार आहे तो पाहून घे. त्यानंतर तुझ्या मैत्रिणी ते प्रॅक्टिकल स्वतः करतील ते सुद्धा तू पाहून घे आणि मग उद्या कॉलेजला आलीस तर मला एकदा डेमो दाखव म्हणजे झालं. उद्या तुला ते प्रॅक्टिकल करताना काहीच अडचण येणार नाही. थेरीमध्ये वाचून काही समजत नाही पण डेमो पाहून तुला नक्कीच समजेल. तशी तू हुशार आहेस. बघ तुला काय वाटते?" स्वराच्या मॅडम
"अरे वा! खूप सुंदर आयडिया दिलीत मॅडम. थँक्यू सो मच." असे म्हणून स्वरा परत येऊन बसली.
बारा वाजले तरी पाहुणे अजून आले नव्हते आणि स्वराच्या प्रॅक्टिकल ची सुध्दा वेळ झाली होती म्हणून स्वराने सासूबाईंना सांगितले की "आई पाहुण्यांचा फोन आला की एक हाक द्या. मी माझ्या रूम मध्ये आहे. माझे डोकं खूप दुखत आहे, तुम्ही हाक दिल्यावर मी खाली येईन." असे म्हणून स्वरा तिच्या रूम मध्ये गेली.
रूम मध्ये गेल्यानंतर तिने अनघाला फोन करून व्हिडीओ कॉलिंग करायला सांगितले. व्हिडीओ कॉलिंग मध्ये तिने मॅडम जो डेमो देतील तो पाहिला. त्यानंतर अनघा जे काही प्रॅक्टिकल करेल त्याचे ही निरीक्षण केले आणि तिला ते सगळे समजून आले. त्याची मेन संकल्पना तिला कळाली त्यामुळे आता काहीच अवघड वाटले नाही. तिला त्या प्रॅक्टिकल ची संकल्पना कळाल्यामुळे स्वरा खूपच आनंदात होती. अखेर प्रॅक्टिकल संपले. तिने लगेच मोबाईल बंद केला इतक्यात सासूबाईंची हाक ऐकू आली आणि तिला मनातून हायसे वाटले. कारण अजून पाहुणे आलेच नव्हते.
सासुबाईंची हाक ऐकू आल्याबरोबर स्वरा लगेच खाली येऊन तिने कुकर लावला आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पाहुणे आले. त्यांच्या स्वागतासाठी स्वरा तयार झाली. तिने हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत केले, ते पाहून पाहुणे मंडळी खूप खूश झाली. त्यांना हात पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि बसण्यास सांगितले. त्यांना चहा पाणी देऊन झाल्यावर स्वराने भाजीला फोडणी टाकली आणि पाहुणे जेवायला बसल्या नंतर लगेच पोळ्या लाटायला घेतल्या. गरम गरम पोळ्या झाल्यानंतर तिने भराभर पाहुण्यांना जेवायला वाढले.
इतकी शिकलेली मुलगी आज आमचा योग्य प्रकारे पाहुणचार करत आहे हे पाहून पाहुणे मंडळींना खूप आनंद झाला. आम्ही गावाकडची लोकं पण हिने तोंड वाकडे न करता हसतमुखाने आमचे स्वागत केले म्हणून ते सगळे स्वराचे कौतुक करत होते.
सुरुवातीला लग्न मोडल्यानंतर जो काही तमाशा स्वराने केला होता त्यावरून ही मुलगी थोडीशी तर्कट स्वभावाची आहे की काय? असे सर्वांना वाटत होते. शिवाय शिकलेली असल्यामुळे इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक तिला जमेल की नाही असा प्रश्न सर्वांना होताच, पण आता प्रत्यक्षात स्वराने सारं काही केलेले पाहून ते सगळे तिचे कौतुक करत होते.
आलेल्या मंडळींपैकी जो तो स्वराचे कौतुकच करत होता. ते पाहून घरातील सगळ्यांना आनंद झाला. स्वरा सुद्धा सगळ्यांचे अगदी मनापासून करत होती. कोणत्याच गोष्टीत कसलीच कसूर सोडली नव्हती. तसे तिच्या सासूबाईंनी तिला सुरुवातीलाच ताकीद दिली होती की एकदा का गावाकडच्या मंडळींच्या मनामध्ये तू बसलीस तर प्रत्येक वेळी तुझे कौतुकच होईल, पण एकदा का त्याच्या मनातून उतरलीस तर प्रत्येक वेळी ते तुला नावे ठेवणार, असे त्यांनी बजावले होते म्हणून स्वरा प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करत होती. यावेळी तिला सासूबाईंचा सल्ला मोलाचा ठरला.
तिकडे सुमन काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ते काम करून येताना रस्त्यात एका बाजूला तिला एक लहान बाळ रडत असताना दिसले, ती त्या बाळाच्या जवळ गेली. ते बाळ अगदीच बारा दिवसाचे होते. इतक्या लहान बाळाला इथे आणून सोडले असेल, असा विचार तिने केला. आजूबाजूला थोडी चौकशी केली पण कोणालाच काही माहीत नव्हते. तिने त्या बाळाला घेतले आणि ती पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनमध्ये तिच्या ओळखीचे एक पोलीस होते. मिस्टर सावंत असे त्यांचे नाव. सुमन डायरेक्ट त्यांच्याकडेच गेली आणि तिने हे बाळ आपल्याला रस्त्यात दिसले होते, म्हणून मी त्या बाळाला इथेच घेऊन आले आहे. असे तिने फिर्याद नोंदवली.
सावंतांनी एका लेडीज पोलिसांच्या मदतीने त्या बाळाची चौकशी केली, तर ती बारा दिवसांची एक गोंडस मुलगी होती. त्या मुलीला पाहून त्या पोलीस मॅडम म्हणाल्या की, "मुलगी झाली म्हणून कुणीतरी तिला येथे आणून टाकले असेल, एक तर गरोदर राहतात आणि मुलगी झाली की असे रस्त्यावर फेकतात. या लहान जीवांना काय समजतं? या निष्पाप जीवाची त्यामध्ये काय चूक? असे रस्त्यावर टाकायचे असेल मूलं जन्माला कशाला घालायचे? आजच्या जमान्यात अजूनही मुलगा मुलगी असा भेदभाव केला जातो आणि पोटच्या गोळ्याला असे रस्त्यावर टाकले जाते." हे मॅडमचे उद्गार ऐकून सुमनला खूप वाईट वाटले.
तिला स्वराची आठवण झाली. जेव्हा स्वरा चा जन्म झाला तेव्हा आकाशने संपूर्ण हॉस्पिटल मध्ये पेढे वाटले होते. कुठे आकाश चे विचार आणि कुठे या लोकांचे विचार? खरंच आकाश सारखाच बाप प्रत्येक मुलीला मिळायला हवा. अजूनही या जगात मुलगी झाली की तिला तुच्छ वागणूक दिली जाते. आजच्या जमान्यात स्त्री ही चंद्रावर जाऊ लागली आहे, तर दुसरीकडे स्त्रियांची अशी अवहेलना केली जात आहे इतकी तफावत का असावी? असा विचार त्यांच्या मनामध्ये घोळू लागला होता.
"सुमन मॅडम आम्ही तुमची फिर्याद नोंदवून घेतली आहे. आता या बाळाचे करायचे काय?" असे सावंतांनी सुमनला विचारले, तेव्हा सुमन भांबावून गेली. इतक्या गोड मुलीचे करायचे काय? तिचे आई वडील सापडू पर्यंत तरी तिला आसरा मिळायलाच हवा, असा विचार सुमनच्या मनामध्ये आला.
"अहो सावंत, करायचे काय म्हणजे? अनाथाश्रम मध्ये ठेवूया, जेव्हा कधी तिचे आई-वडील भेटतील तेव्हा घेऊन जातील, नाही तर तिथेच लहानाची मोठी होऊ द्या." असे त्या लेडीज पोलीस यांचे वाक्य ऐकताच सुमन ला गलबलून आले आणि तिच्या तोंडावाटे पटकन शब्द गेले की "ती मुलगी माझ्याजवळ राहू दे." हे ऐकताच ते दोघे पोलीसही सुमन कडे आश्चर्याने पाहू लागले.
"पण तुम्ही कसे घेऊन जाऊ शकता?" पोलीस मॅडम
"म्हणजे मी एकटीच राहते. अनाथ आश्रम मध्ये हिची देखभाल व्यवस्थित होईलच, पण मी सुद्धा अगदी व्यवस्थित करेन. सध्या मी एकटीच असल्यामुळे माझाही थोडासा विरंगुळा होईल, शिवाय हिचे आई-वडील सापडलेल कि मी मुलीला त्यांच्याकडे नक्कीच सुपूर्त करीन." सुमनचे हे बोलणे ऐकून त्या दोघांना बरे वाटले. माणुसकी थोडीफार अजूनही आहे असे वाटले.
"ठीक आहे. पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथे येऊन नोंद घ्यावी लागेल." सावंत म्हणाले
"हो नक्कीच. मी प्रत्येक महिन्याला येऊन नोंद करेन, शिवाय तिचे आई वडील सापडले की मुलीला घेऊन येईन. मला काहीच अडचण नाही." असे सुमन म्हणताच ते दोघेही खूप खूश झाले. मुलीला योग्य प्रकारे सांभाळणारी एखादी व्यक्ती मिळाली याचे त्यांना समाधान वाटले आणि त्यांनी त्या मुलीला सुमन कडे सोपवले.
सुमन त्या मुलीला घेऊन घरी आली. त्या मुलीला पाहून सोसायटीतल्या बायका नाही नाही ते बोलू लागल्या. आता ही मुलगी कोण? कोणाचे पाप घेऊन आली? ही बाई उगीचच डोक्याला ताप करत आहे, ही बाई प्रत्येक वेळी काही ना काही संकट घेऊनच येते, हिला थंड बसवत नाही का? असे एक ना अनेक बोल त्या बायका सुमनला बोलत होत्या. पण सुमनने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ती मुलीला घेऊन घरी आली. सुमन त्या मुलीला जेव्हा घरी घेऊन आली तेव्हा तिला एकप्रकारचे समाधान वाटले. त्या मुलीला पाहून तिचे मन प्रसन्न झाले. जणू स्वराच घरी आली आहे असे भासले. मग सुमनने लगेच स्वराला फोन केला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा