Login

आत्मसन्मान 38

Marathi story


स्वरा लग्न होऊन सासरी गेली. घरात थोडी पाहुणेमंडळी राहिली होती. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पृथ्वी आणि स्वराला "बाहेर कुठेतरी फिरायला जा." असे सगळे सांगत होते. पण स्वराचे कॉलेज सुरू झाल्यामुळे आणि पृथ्वीला सुद्धा ऑफिसचे महत्त्वाचे काम असल्याने "आता नको परत सुट्टी असेल तेव्हा जाऊ." असे त्या दोघांनीही सांगितले.

स्वराचे कॉलेज सुरू झाले होते पण आत्ताच लग्न झाल्यामुळे लगेच कॉलेजला कसे जायचे? म्हणून ती दोन दिवस घरात थांबली. पृथ्वी मात्र ऑफिसच्या कामात गुंतला. स्वराला वेळ द्यायला सुध्दा जमत नव्हते. नवीनच ऑफिस जाॅईन झाल्यामुळे एक नवा कोरा प्रोजेक्ट त्याला मिळाला. त्याच्यावर पृथ्वी आधीपासून काम करत असल्यामुळे तो प्रोजेक्ट आता शेवटच्या टप्प्यात आला होता.

पृथ्वीला त्या नवीन प्रोजेक्ट साठी दुसऱ्या गावी अर्थातच दिल्लीला जावे लागणार होते. ते महत्त्वाचे प्रोजेक्ट असल्यामुळे पृथ्वी स्वतः जाणार होता. जर हे प्रोजेक्ट सक्सेस झाले तर यांच्या कंपनी ला खूप मोठा फायदा होणार होता आणि त्याचबरोबर पृथ्वीचे नावही गाजणार होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. खूप जीव ओतून त्यांने या प्रोजेक्टवर काम केले होते म्हणूनच तर त्याच्या प्रेझेंटेशनसाठी तो स्वतः जाणार होता. पृथ्वी खूप आनंदात होता तसेच त्याला टेंशनही आले होते. हा प्रोजेक्ट समोरच्या पार्टीला आवडला पाहिजे हा एकच त्याचा ध्यास होता.

पृथ्वी ऑफिस मधून घाईगडबडीने लवकर आला होता. घरी येऊन त्याने आनंदाने ही बातमी आई आणि स्वराला दिली.

"एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मला दिल्लीला जावे लागणार आहे. खूप महत्वाचा प्रोजेक्ट असल्यामुळे मला स्वतःलाच त्याचे प्रेझेंटेशन द्यावे लागणार आहे. जर या प्रोजेक्टची निवड झाली तर आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे, त्यासाठीच मला तिकडे जावे लागणार आहे. किती दिवस लागतील याचा काही अंदाज नाही? आज रात्रीच्या फ्लाइटने मला निघावे लागणार आहे." पृथ्वीचे हे बोलणे ऐकून स्वरा थोडीशी नाराज झाली.

"अरे वा! किती छान बातमी दिलीस तू! मग एक काम कर ना! तुझ्या सोबत स्वराला सुद्धा घेऊन जा. तसेही तुम्ही लग्न झाल्यापासून कुठे फिरायला गेला नाहीत? तेवढेच तुला सुद्धा सोबत होईल आणि याच्या निमित्ताने फिरणे सुद्धा होईल. एका दगडात दोन पक्षी होऊन जातील." पृथ्वीच्या आईचे हे बोलणे ऐकून स्वराला आनंद झाला.

"आई, घेऊन गेलो असतो ग, पण ही बिझनेस मीटिंग आहे. तेथे कपल्स अलाऊड नाहीत आणि मी पूर्ण वेळ कामातच असेन मग फिरणार कधी? उलट हिलाच रूम मध्ये बसून कंटाळा येईल. त्यापेक्षा आता मी हा प्रोजेक्ट करून येतो. एकदा का हा प्रोजेक्ट झाला की मग आम्ही निवांत जाऊ कुठेतरी फिरायला." हे पृथ्वीचे बोलणे ऐकून स्वरा ला खूप वाईट वाटले आणि ती रूममध्ये निघून गेली. तिच्या पाठोपाठ पृथ्वी देखील रूम मध्ये गेला.

स्वरा थोडीशी चिडून रागातच बेडवर बसली. पृथ्वी देखील तिच्या पाठीमागून तिच्या शेजारी जाऊन बसला. स्वराला तोंड फुगवून बसलेले पाहून पृथ्वीने तिचा हात हातात घेतला.
"राग आला का तुला, अगं पण हे मी आपल्यासाठीच करतोय ना! खूप महत्वाची मिटींग आहे ग, त्यामुळे मला जावेच लागणार आहे. मान्य आहे की आपले आत्ताच लग्न झाले आहे आणि मला तर तुला वेळ सुद्धा देता येत नाही. पण काय करू? हेच तर वय असतं ना काहीतरी सिद्ध करून दाखवण्यासाठी, आता हा प्रोजेक्ट झाला की फायनल.. फक्त आपण दोघेच असू, कुठेतरी लांब एकांतात जाऊ, मस्त एन्जॉय करू." पृथ्वीने स्वराला आश्वासन दिले.

"मी आत्ता आले तर चालणार नाही का? मला इथे एकटीला करमत नाही." स्वरा नाराजीच्या सुरात म्हणाली.

"नाही ना राणी! ती बिझनेस मिटींग आहे. तुला कसे घेऊन जाऊ? तुला घेऊन जाता आले असते तर लगेच मी गेलो असतो. सॉरी ना.." पृथ्वीला सुध्दा वाईट वाटत होते.

"लग्न झाल्यानंतरही तू मला वेळ दिला नाहीस. लग्नानंतर पेक्षा लग्नाआधी खूप छान होतं, किमान दिवसभरातला अर्धा तास तरी तू माझ्यासोबत प्रेमाने बोलायचास. लग्नानंतर एक शब्दही बोलायला तुझ्याकडे वेळ नाही. मग लग्न करून काय उपयोग?" स्वरा चिडून म्हणाली.

"सॉरी ना यार! मला माहित आहे मी तुला वेळ देऊ शकत नाही, पण आता काय करणार? मला या प्रोजेक्टसाठी वेळ अपुरा पडत होता. प्रोजेक्ट झाला की फक्त आपण दोघेच असू प्रॉमिस.." पृथ्वी

"ठीक आहे हे शेवटचं.. याच्यानंतर तुझ्याकडे जर माझ्यासाठी वेळ नसेल तर मी निघून जाईन, कायमची. मग तू आहेस आणि तुझं काम आहे." स्वरा हट्टाने म्हणाली.

"हे शेवटचच. यानंतर मी तुला वेळ देईन, नक्की. आता थोडं हस बघू." पृथ्वी

तरीही स्वरा गाल फुगवूनच बसली. स्वरा काही हसेना म्हणून पृथ्वीने तिला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. तेव्हा कुठे स्वरा हसायला लागली. ती हसताना पाहून "तू अशीच गोड हसत रहा, तू आनंदी आहेस तर मी आनंदी. तुझे सुख हे माझे सुख आणि तुझे दुःख हे माझे दुःख आहे. फक्त वेळोवेळी मला साथ दे." असे पृथ्वी म्हणाला.

"मी तुझ्या सोबतच आहे रे, पण तू माझ्या सोबत रहा. जर तू माझ्यासोबत नसशील तर मग काय उपयोग?" स्वरा परत नाराज झाली.

"मी नेहमीच तुझ्या सोबत असेन, हे महत्त्वाचे काम आहे म्हणून, नाहीतर आता आपण दोघेच असतो. शिवाय तुझे कॉलेज आहे असे तू म्हणालीस नाही तर लग्न झाल्याबरोबर आपण दोघे नक्कीच कुठेतरी फिरायला गेलो असतो." पृथ्वी

"हो रे, कॉलेज तर आहेच. शिवाय प्रॅक्टिकल सुद्धा आहेत आणि यावेळी परीक्षा सुद्धा लवकर होणार आहेत. प्रॅक्टिकल ला गेलं की बरं वाटतं नंतर थेरी समजून घेऊन सुद्धा काही कळत नाही म्हणून मी म्हणाले होते. ठीक आहे केलं तुला माफ. यामध्ये चूक माझी सुद्धा होती. आता कॉलेज आहे असे सुरुवातीला म्हणाले, पण बघ ना! आता इतक्या दिवसात मी कॉलेजला गेलेच नाही. उद्यापासून जायचं म्हणत होते तर तू नसणार. मी कशी जाऊ?" स्वरा

"अगं त्यात काय एवढं? आपल्याकडे ड्रायव्हर आहे तो सोडेल तुला, शिवाय एक्टिवा आहे ती घेऊन तू जाऊ शकतेस, बाबांना सांग बाबा सोडतील. इतक्या सोई असताना तुला कसे जायचे? हा प्रश्न कसा पडला?" पृथ्वी

"तसे नाही रे, लग्नानंतर मी पहिल्यांदाच कॉलेजला जात आहे, तेव्हा तू माझ्या सोबत असावा असे मला वाटत होते. पण ठीक आहे मी जाईन." असे म्हणून स्वरा पृथ्वीची बॅग भरायला घेते.

"रागावलीस." पृथ्वी असे म्हणताच स्वराने मानेने नकारार्थी मान हलवली. "वेडाबाई" असे म्हणून पृथ्वी स्वराला मिठीत घेतो. स्वरा त्याच्या मिठीत जाते तोच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. पृथ्वी तिची हनुवटी वर करून तिच्या कपाळा वर किस करतो.

स्वराने पृथ्वीचे बॅग भरली आणि तो रात्रीच्या फ्लाइटने दिल्लीला गेला. पृथ्वी गेल्यावर स्वराला रात्रभर झोप लागली नाही. पहाटे तिचा थोडा डोळा लागला आणि लगेच तिला जाग आली. ती स्वतःचे आवरून खाली गेली. सगळे लवकर आवरून कॉलेजला जायचे ह्या विचारात सकाळपासून तिची गडबड चालू होती.

पृथ्वीच्या घरामध्ये सगळ्या कामासाठी नोकर चाकर होते, पण घरचा स्वयंपाक तेवढा त्या घरातील स्त्रीने करावा हा त्याच्या बाबांचा अट्टाहास होता, त्यामुळे पृथ्वी ची आई ही सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक स्वतः बनवत होती. आता लग्न झाल्यानंतर स्वरा सुद्धा त्यांना स्वयंपाक करण्यासाठी मदत करत होती. रोजच्या सवयी प्रमाणे नेहमीप्रमाणे स्वरा स्वयंपाक घरात जाऊन पृथ्वीच्या आईला मदत करू लागली.

"अगं स्वरा, तू इतकी काय गडबड करत आहेस? स्वयंपाक करण्याला अजून वेळ आहे. इतक्या लवकर करून कसा ठेवायचा? थोड्यावेळाने करूया थांब." पृथ्वी ची आई

"आई, मला आज कॉलेजला जायचा आहे. कॉलेजमध्ये महत्त्वाचे प्रॅक्टिकल होणार आहे. म्हणून मी लवकर स्वयंपाक करून जायचा विचार करत होते." स्वरा

"काय? कॉलेजला.. अग आज तुला जाता येणार नाही." पृथ्वी ची आई

"का? आज काही आहे का?" स्वरा प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.

"अगं, आज आपल्या गावाकडील मंडळी येणार आहेत. चांगले वीस-पंचवीस जण येणार आहेत. तेव्हा तुला घरातच थांबावं लागणार आहे. त्या सगळ्यांचा स्वयंपाक आपल्याला घरातच बनवायचा आहे. ती मंडळी बाहेरचे काही खात नाहीत, त्यामुळे त्यांचे सगळे जेवण्याची व्यवस्था आपल्याला करायला लागणार आहे. तेव्हा तू आज कॉलेजला जाऊ नकोस." पृथ्वी ची आई

"पण आई, आज खूप महत्त्वाचं प्रॅक्टिकल आहे. मला काहीही करून कॉलेजला जावं लागणार." स्वरा

"स्वरा, हे बघ. ती गावाकडची मंडळी आहेत. त्यांचा मान पान तुलाच करावा लागणार आहे. शिवाय ते सगळे तुला भेटण्यासाठी येणार आहेत. लग्नाच्या गडबडीत त्यांना बराच वेळ थांबता आले नाही त्यामुळे ते खास तुला भेटण्यासाठी आज येत आहेत. तेव्हा तुला कॉलेजला जाता येणार नाही." पृथ्वी च्या आईचे हे बोलणे ऐकून स्वरा थोडीशी नाराज झाली.

मी आज पासून रेग्युलर कॉलेजला जायचे म्हणून ठरवले होते. पण आता ही मोठी अडचण आली आहे. सुरुवातच अशी तर पुढे काय होईल? हा मोठा प्रश्न स्वराला पडला. लग्न तर झाले पण संसारातील अडचणी सोडवता सोडवता शिक्षण कसे घ्यायचे? संसार म्हटला की अनंत अडचणी ह्या येणारच तो गुंता सोडवावा तर लागणारच.. त्याचबरोबर शिक्षण हे देखील महत्वाचे आहे. एकदा का संसार पाठीमागे लागला की शिक्षणाकडे दुर्लक्ष होते हे आईचे म्हणणे मला आज पटत आहे. तरी आई म्हणत होती की शिक्षण झाल्यानंतर लग्न करू. तिचे ऐकायला हवे होते. अशा परिस्थितीत पृथ्वीसुद्धा घरामध्ये नाही. आता काय करावे? हा प्रश्न स्वराला पडला.

शिक्षण आणि संसार याचा ताळमेळ स्वरा कशी करेल? तिच्या घरचे तिला शिक्षण घेऊ देतील का? की प्रत्येक गोष्टीत अडथळे निर्माण करतील?

क्रमशः

🎭 Series Post

View all