Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 37

Read Later
आत्मसन्मान 37


बाबा तुम्ही स्वरा आणि पृथ्वी चे लग्न लावून द्या. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. स्वरा सुद्धा खूप चांगली मुलगी आहे. एकदा असा विचार करून बघा की ही मुलगी या घरामध्ये सून म्हणून येणार आहे.. तुम्ही इतर मुलींचे स्थळ पाहत बसलात तर यामध्ये कोणीच सुखी राहणार नाही.. पृथ्वीचे मन स्वरामध्ये गुंतले आहे त्यामुळे या संसारामध्ये त्याचे मन लागणार नाही. सगळे यामध्ये भरडले जाणार त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. ही माझी विनंती आहे." शुभदा कळवळून सांगत होती.

"ठीक आहे. मी या लग्नाला मान्यता देतो. ती मुलगी पृथ्वी ची बायको बनून या घरात येईल. त्यांचे लग्न मी लावून देईन." असे बाबा म्हणताच पृथ्वी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.. त्याला यावर काय रिएक्ट व्हावे तेच समजेना.

बाबांनी या लग्नाला संमती दिली म्हणून शुभदा आनंदित झाली. तिला आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम पूर्ण झाले त्याचे समाधान वाटले. आता हे प्रेम यशस्वी होणार म्हणून तिला आनंद झाला. तिने भावाकडे एकदा पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

"पण बाबा, तुम्ही त्यांच्याकडून पैसे मागायचे नाही शिवाय तुम्ही लग्नाचा खर्च स्वतः करायचा. सोने-चांदी असे काहीच मागायचे नाही हे कबूल असेल तरच पुढे वाटचाल करा." शुभदा

"आता मला मान्य आहे म्हटल्यावर मी पुढे कशाला त्या गोष्टींची अपेक्षा करू? मी काहीच मागत नाही, आता तुम्ही मला शिकवणार आहात का? प्रत्येक व्यक्तीशी कसे बोलायचे? याचे मला भान आहे." बाबा थोडेसे रागातच म्हणाले.

"सॉरी बाबा, तुम्ही परत अपेक्षा धरू नये, या उद्देशाने म्हणाले." शुभदा

"आजच मी स्वरा च्या घरी जाऊन लग्नासाठी बोलणी करून येतो. माझ्यासोबत तुम्ही देखील देता का? की मी एकटा जाऊ." बाबा

"आम्ही पण येतो की तसेच स्वराला भेटायचे होईल." शुभदा

"ठीक आहे. मग आपण आज दुपारी जाऊ." असे म्हणून बाबा तिथून निघून गेले. बाबा गेल्यानंतर पृथ्वी ने ताईचे आभार मानले.

"थँक्स ताई, अगदी देवासारखे धावून आलीस बघ. पण तू आता कशी काय आलीस? अगदी वेळेवर आलीस बघ. तू आलीस म्हणून मला स्वरा परत मिळाली." पृथ्वी

"अरे आभार कसले मानतोस? मी तुझी ताई आहे तुझ्यासाठी तर करणारच ना!" शुभदा

दुपारी स्वरा च्या घरी पृथ्वी च्या घरचे मागणी घालण्यासाठी जातात. आधी पृथ्वीने स्वराला माहिती दिली असल्यामुळे त्या दोघी मायलेकी घरातच होत्या. स्वराचे कॉलेज सुट्टी असल्यामुळे ती घरातच होती. पृथ्वीच्या घरचे आल्यानंतर कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. चहा घेऊन झाल्या नंतर सगळेजण एकत्र बोलत बसले.

"स्वराच्या आई, मला माफ करा. मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करायला नको होतो. माझ्याकडून चूक झाली. त्याला तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. या दोन्ही लेकरांची आपण लग्न लावून देऊ. त्यांचा संसार सुखाने होऊ द्या. त्या शिवाय आपल्याला हवे तरी काय आहे? आपली मुले सुखी तर आपण सुखी. आम्ही आमच्या मुलाचे सुख पाहत आहोत! तेव्हा मोठ्या मनाने तुम्ही माफ करून या लग्नाला मान्यता द्या. सगळ्या लग्नाचा खर्च मी स्वतः करेन. मला कसलीच अपेक्षा नाही." असे पृथ्वीच्या बाबांनी सांगितल्यावर सुमनला थोडा धक्काच बसला.

"एखाद्या व्यक्तीमध्ये इतका परिवर्तन कसा काय होऊ शकतो? हे खरंच सुधारले आहेत की मुलांसाठी जबरदस्तीने हे मान्य केले आहे काय माहित?" असा विचार तिच्या मनामध्ये सतावत होता. स्वरासाठी तिने जे घडत आहे ते घडू दे असे ती म्हणून शांत राहिली. कारण स्वरा या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खंबीर होती हे तिला माहीत होते. प्रेमामध्ये लढण्यासाठी बळ हे मिळतेच शिवाय पृथ्वी तिच्या बाजूने होता हे एक प्रकारचे समाधान तिला होते.

अखेर स्वरा आणि पृथ्वीचे लग्न करण्याचे फायनल झाले, तारीख ठरली.. लग्न अगदी साधेपणाने करण्याचे ठरले आणि दोन्ही घरचे सगळे खूप आनंदित झाले..

आठ दिवसावर लग्न आल्यामुळे सगळी गडबड गोंधळ मध्ये तयारी सुरू झाली आणि बघता बघता लग्नाची तारीख घेऊन ठेपली. तेवढेच दोन तीनशे लोकांमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरले होते.

लग्न मंडप खूप छान सजवला होता. सगळी मंडळी येऊन बसली होती. नातेवाईकांची रेलचेल सुरू होती. स्टेज देखील खूप सुंदर पद्धतीने सजवला होता. पृथ्वी केव्हाचा तयार होऊन बसला होता. आता वाजत गाजत स्वरा ची एन्ट्री झाली. स्वरा ने लाल रंगाचा शालू नेसला होता, त्या शालू मध्ये ती खूप सुंदर दिसत होती, हात भरून चुडा, केसांची हेअर स्टाईल, कानामध्ये मोठे झुमके, नाकामध्ये नथ अशी सुंदर नटून थटून लग्न मंडपामध्ये आली. पृथ्वी तिच्याकडे एकटक पाहू लागला. पृथ्वी आपल्याकडे पाहतोय हे पाहून स्वरा गालातच लाजली. ते पाहून पृथ्वी आणखीनच घायाळ झाला.

स्वरा आल्यानंतर भटजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मंगलाष्टका सुरू होताच सुमनच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. आता आपली लेक आपल्यापासून दूर जाणार या भावनेने तिला भरून आले होते. यालाच तर जीवन म्हणायचे असे ती मनाची समजूत घालत होती. पण तरीही तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते.

मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर कन्यादानाची वेळ आली. आता कन्यादान कोण करणार? हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. तेवढ्यात स्वराने सुमनला स्टेजवर बोलावले.

"आई, तूच माझे कन्यादान करायचे!" स्वरा

"अगं स्वरा, मला चालत नाही ग. तू उगाच काहीतरी वेड्यासारखे करू नकोस. मी तुझे कन्यादान करू शकत नाही. ऐक माझे." सुमन

"स्वरा, तू हे काय करत आहेस? तुला आधीच सांगितले होते ना की आईला चालत नाही म्हणून, कन्यादान दुसरे कोणी करू दे. पण तू काही ऐकायलाच तयार नाहीस. तुझ्या आईला कन्यादान करता येणार नाही." पृथ्वी ची आई

"मी सुद्धा त्याच वेळी तुम्हाला सांगितले होते की माझे कन्यादान करेल तर माझी आई.. तो हक्क मी इतर कोणाला देणार नाही. माझे सारं काही आईने केले आहे मग कन्यादान का नको? आईने कन्यादान केले तरच मी तयार आहे." स्वरा ठामपणे म्हणाली

"माझं पण तेच मत आहे कि कन्यादान सुमन काकू करू देत. त्यांनी स्वराला एकट्याने वाढवल आहे. मग आता कन्यादानही त्याच करू देत." पृथ्वी देखील स्वराच्या बाजूने बोलू लागला ते पाहून सगळेच शांत बसले.

कोणीच काहीच बोलले नाही हे पाहून सुमनला देखील आपल्या लेकीचा अभिमान वाटू लागला. ती कन्यादान करायला बसली. भटजी एक एक मंत्र म्हणू लागले. कन्यादान करताना स्वरा आणि सुमन दोघींच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले. कारण हा क्षण त्या दोघांच्याही आयुष्यात येईल असे वाटले नव्हते.

अखेर कन्यादान झाले आणि लग्न व्यवस्थित पार पडले. पृथ्वी ची पत्नी म्हणून स्वराने घरात प्रवेश केला. लग्न व्यवस्थित पार पडल्यामुळे सगळेजणच खूप आनंदात होते. पण तो कन्यादानाचा क्षण मात्र पृथ्वीच्या आई-वडिलांच्या मनात रुतून बसला होता. जे काही घडले ते त्यांना मुळीच पसंत नव्हते. तरीही मुलासाठी ते शांत राहिले.

लग्नामध्ये जेवण देखील खूप छान ठेवले होते. पुरी बासुंदी, मसालेभात, वरण-भात अशा वेगवेगळ्या पदार्थांनी जेवणाची लज्जत वाढवली होती, सगळे पाहुणे मंडळी खूप खूश झाले.

घरी आल्यानंतर संध्याकाळी थोडेसे गेम ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सगळ्या मुलांनी मजा मस्ती केली. दिवस खूप छान पद्धतीने गेला. सगळेच दमले असल्यामुळे लगेच झोपी गेले.

तिकडे लग्न झाल्यानंतर सुमन मात्र घरी आली. तिला एकटीला घर खायला उठले होते. लेकीची ती बडबड, घरातून आत बाहेर करणे, इकडे तिकडे करणे हे जणू तिच्या सवयीचे झाले होते. पण आता आपली लेक आपल्या सोबत नाही हे पाहून तिला खूप वाईट वाटत होते. आता ती एकटी पडली होती. आतापर्यंत ती जे काही जगत होती ते लेकीसाठी. आता तिचा संसार सुरू झाला या स्टेजला सुमन एकटीच पडली होती.

खरंच या स्टेजला अर्थातच उतारवयात एकट्याने जीवन जगणे खूपच कठीण असते. त्यात स्त्री माणूस काहीही करू शकते पण पुरुषाला ते जीवन जगणे म्हणजे खूप कठीण होते. सुमन ला आता इथून पुढे काय करायचे? असा प्रश्न तिच्या मनामध्ये घोळू लागला. आता उतार वयातील प्रत्येक क्षण कसे जगायचे? कोणासोबत जगायचे? हा प्रश्न तिला सतावत होता.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..