"बाळा, तू हा प्रश्न का विचारत आहेस? काही झालं आहे का? तू स्पष्ट बोल. काही झाले असेल तर मी त्याच्यातून तोडगा काढतो. पण तू अशी आढेवेढे घेऊन प्रश्न विचारू नकोस. मला याचा त्रास होतोय." पृथ्वी चे बाबा
"बाबा, काही झाले नाही. पण मी तुम्हाला स्पष्टच विचारत आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. उगीच काहीतरी मला प्रश्न विचारत बसू नका आणि जे काही उत्तर द्याल ते अगदी खरं खरं द्या." शुभदा परखडपणे म्हणाली
"पण बाळा, आता हा प्रश्न तुला का पडावा?" पृथ्वी चे बाबा
"बाबा प्लीज, मला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या." शुभदा
"अगं, शेखरचे घराणं आपल्या तोलामोलाचा आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांची खूप इस्टेट आहे. शिवाय आई-बाबांचा एकुलता एक मुलगा, शिक्षणही खूप छान झाले आहे. त्याचा स्वभाव हे सारं काही मी बघून मगच तुझे त्याच्याशी लग्न केले आहे. तो तुला फुलासारखे जपेल, तुला जे जे काही हवे आहे ते तो लगेच आणून देईल, त्यासाठी त्याला पैशाची तरतूद करायची अजिबात गरज नाही. तू आत्ता डायमंड नेकलेस म्हणालीस तर तो लगेच आणून देईल, आत्ता कार मागितलीस तर तो लगेच आणून देईल. कोणत्याही गोष्टीसाठी तो नकार देणार नाही, याची मला खात्री होती म्हणून मी तुझे लग्न त्याच्याशी करून दिले." पृथ्वीच्या बाबांनी सत्य कथन केले.
"ह्या गोष्टी तुम्ही पाहिलात! पैसा.. सर्वात प्रथम तुम्ही त्याच्याकडची इस्टेट पाहिली.. हो ना बाबा.." शुभदा
"सगळेच पालक ते पाहतात. पहिल्यांदा त्याची इस्टेट पाहून मग मुलगा कसा आहे ते पाहतात!" पृथ्वी चे बाबा
"मग सगळेच पालक इस्टेट बघतात. भले त्यांची मने जुळली नाही तरीही तसाच संसार करायचा का? पालकांनी मुलगा आपल्या मुलीला सांभाळून घेईल का? हे सुद्धा पाहायचं नाही का? फक्त इस्टेट असले की झालं. बाकी काहीच गरजेचे नाही का? शेती, नोकरी, बंगला, गाडी यानेच संसार होतो का? जर त्या व्यक्तीची सुरूवात असेल तर तो पुढे मिळवून आणेलच ना!" शुभदा
"काय झालं बाळा? जावईबापू तुला काही बोलले का? तू इतकी का चिडली आहेस?" पृथ्वी च्या बाबांनी काळजीने विचारले.
"मला सांगा बाबा, सर एखाद्याची मने जुळली असतील, तर त्यांचे इस्टेटीकडे पाहत बसायचं का? त्यांची इस्टेट कमी असली तरी तो आयुष्यभर मुलीला सुखातच ठेवेल ना! कारण त्यांचे मन एक झालेले असते. मग तो मुलीचे मन कसे दुखावेल? तिला पोटभर खायला घालेलच ना!" शुभदा
"बाळ, मनाने कधी पोट भरत नाही. मन वेगळे आणि शरीर वेगळे. पोट भरण्यासाठी पैशाची गरज असते आणि प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी तेच पाहतात. इस्टेट असेल तर मुलगी किमान दोन वेळा निवांत जेवेल याची खात्री असते." पृथ्वी चे बाबा
"मन एक झाले असेल तर पोट भरण्यासाठी सुद्धा दोघेही प्रयत्न करतात बाबा. एकमेकांची काळजी घेतात, भले एक वेळ जेवायला मिळेल पण सुखी, समाधानी राहतात. शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख कधीही चांगले." शुभदा सुध्दा मागे हटणार नव्हती. ती बोलतच होती.
"एकदा का लग्न झाले की मनं ही आपोआपच जुळतात ना! आमच्या वेळी असे नव्हते, बाबांनी ज्या मुलीशी लग्न करून दिले तिच्याशी अगदी सुखी समाधानाने आमचा संसार झाला. आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही, की कधी वाटले नाही.. जोडीदार कसाही असला तरी मन मोठं करून त्याला आपलंस करावं लागतं. तुमच्या नात्यामध्ये विश्वास असायला हवा. पैसा आणि इस्टेट असेल तर मने ही आपोआपच जुळतात.. तेच कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू लागली की जुळलेली मनं वेगळी होतात.. आपसूकच त्याच त्याच गोष्टीचा कंटाळा येऊ लागतो. परिस्थितीचे चटके बसू लागतात, तेव्हाच प्रेमाची खरी किंमत कळते.." बाबा स्पष्टच बोलत होते.
"पण बाबा, पैशाने प्रेम विकत घेता येत नाही ना! प्रेम हे आपोआप होते. ती एक नैसर्गिक भावना आहे. त्यामध्ये रंग-रूप, जात, पैसा अडका हे आलेच कुठून? प्रेम हे प्रेमच असते आणि ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते ती व्यक्ती जर आयुष्यात मिळाली तर आयुष्य खूप सुंदर बनते. ती व्यक्ती कधीच दुःखी होत नाही. तिचे जीवन म्हणजे जणू स्वर्गच.." शुभदा
"शुभदा, मला एक सांग, तुझे कोणावर प्रेम होते का? तू तेव्हा का बोलली नाहीस? आता तुला कोणता त्रास आहे का? शेखर तुझ्याशी चांगलं वागतो ना! तू सुखी आहेस ना! जे काही असेल ते खरं खरं बोल.. माझ्या पासून काहीच लपवून ठेवू नकोस.." बाबा
"हो बाबा, मी खरंच खूप खूप सुखी आहे.. पण त्यावेळी जर बोलले असते तर आज याच्यापेक्षा जास्त सुखी असते. बाबा माझे एका मुलावर खूप प्रेम होते. त्याचं ही माझ्यावर तितकेच प्रेम होते. पण त्याची परिस्थिती आपल्या इतकी नव्हती. जरी तो गरीब असला तरी स्वाभिमानी होता. कोणाकडून काही अपेक्षा न करता स्वतःला जिद्दीने सारं काही करायचा. अगदी धडाडीचा होता. म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडले. पण तुम्हाला घाबरून मी काही बोलले नाही. तो बोलतो म्हणत होता तर मी त्याला सुध्दा बोलू दिले नाही. त्यावेळी मी जर धाडस केले असते तर आज परिस्थिती वेगळी असती." शुभदा
"मी त्यावेळी तुझे लग्न त्याच्याशी लावून दिलेच नसते, आता सुद्धा मी त्याच विरोधात आहे. मी माझ्या मुलीचे सुख पाहणार.. प्रेमाने कधीच पोट भरत नाही, तिला हक्काने हवे ते आणून देणारा, तिचे सगळे हट्ट पुरवणारा, तिला कशाची कमतरता भासू न देणारा असाच मुलगा मी तुझ्यासाठी पाहिला असता त्यामुळे तो विचार तू आता सोड आणि शेखर सोबत आनंदाने सुखाचा संसार कर.. आता तेच तेच बरळत बसण्यात काहीच अर्थ नाही.." बाबा शुभदाला समजावून सांगत होते.
"बरं ठीक आहे, झालं ते झालं पण आता इथून पुढे तरी तुम्ही ती चूक सुधारू शकता ना!" शुभदा
"इथून पुढे म्हणजे? जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल." बाबा
"म्हणजे मुलीला गरीब घरात तुम्ही देणार नाही म्हणता मग जर गरीब घरातली मुलगी आणली तर तुम्हाला नक्कीच चालेल.. हो ना बाबा! कारण मुलगी काही मिळवून आणावी अशी अपेक्षा नसते.. तिलाच द्यावे लागते, तिचेच हट्ट पूर्ण करावे लागतात, जर अशी मुलगी सून म्हणून येणार असेल तर तुम्हाला काही अडचण नसेल.. हो ना बाबा!" शुभदाच्या या बोलण्याचा रोखठोक पृथ्वीच्या बाबांना समजला. ते काहीच बोलले नाहीत. तसेच शांत बसले.
"तुझ्या बोलण्याचा उद्देश मला कळतोय! तू कोणाच्या बाजूने बोलत आहेस ते मला समजत आहे." बाबा
"बाबा, स्वरा खूप चांगली मुलगी आहे. ती स्वतः आत्मसन्मानाने जगत आहे तर त्यात तिचे काय चुकले? तिची परिस्थिती फक्त आपल्यासारखी नाही इतकाच काय तो फरक! ती मुलगी अशी आहे आपल्या या घराण्याची सून होण्यास लायक आहे तरीही तुम्ही इतके आढेवेढे का घेत आहात? तुम्ही हे लग्न करून द्या." शुभदाचे हे बोलणे ऐकून पृथ्वी अवाक् होऊन पाहू लागला.
"लग्नामध्ये तिने केलेला अपमान हा काय कमी होता काय?" बाबा
"पण बाबा तेव्हाही तुम्ही चुकलात ना! त्यांच्याकडून हुंडा मागणे हे तुम्हाला शोभते का? तुमच्या मुलीशी कोणी जोरात बोलले तर तुम्हाला चालत नाही.. आत्ताच मी सकाळी आले तर जावईबापू काही म्हणाले का? असे तुम्ही सहज बोलून गेलात.. का? तर तुमच्या मुलीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता.. मग तुमची मुलगी ही तुम्हाला प्रिय आहे.. तसेच त्या मुलीला देखील आत्मसन्मान, स्वाभिमान हा असणारच ना! तिने तिच्या आईच्या बाजूने बोलले तर तिचे काय चुकले? तुम्हाला तुमची मुलगी जशी आहे तशीच त्या काकूंना देखील त्यांची मुलगी असेल ना! मग स्वराच्या ठिकाणी तुमची मुलगी आहे असे समजून तुम्ही निर्णय का घेत नाही?" शुभदा बाबांना समजावत होती.
स्वराच्या या बोलण्याने बाबा विचारात पडले, खरंच मी चुकतोय काय? दोन प्रेम करणारे त्यांच्यामध्ये मी आलो आहे का? पण मी माझ्या मुलांचा विचार केला आहे, इतर कुणाचा विचार केला नाही. मुलीच्या बाबतीत मी एक निर्णय घेतला पण मुलाच्या बाबतीत... स्वरा खरंच चांगली मुलगी आहे. मी माझ्या स्वार्थासाठी मुलांचे आयुष्य उध्वस्त तर करत नाही ना! मुलांचा विचार न करता माझ्या स्टेटस चा विचार करत आहे, खरंच हे बरोबर आहे का?" असा विचार बाबा मनात करू लागले.
शुभदा पृथ्वीची बाजू मांडायला आली असेल का? तिचे तिथे येण्याचे कारण काय? बाबा जर विचार करत आहेत तर त्यांचा विचार बदलेल का? ते सून म्हणून स्वराचा विचार करतील का? जर त्यांनी सून म्हणून स्वीकार केला तर स्वरा लगेच तयार होईल का?
हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा