"स्वरा मला सगळं माहित आहे आणि मी हे मागून हट्टाने घेण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. माझ्या सुद्धा मनाला हे पटले नाही, म्हणून तर मी इकडे तुमच्याकडे आलो ना! नाही तर बाबांच्या सोबतच त्यांना साथ देत राहिलो असतो. जे चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर असे माझे मत आहे. त्यामुळे मी सत्याला साथ देणार. तू काहीच काळजी करू नकोस. आपले लग्न हे होणारच.. त्यासाठी मी काहीही करेन.." पृथ्वी
"हो. पण चांगलाच मार्ग निवड. उगीचच लग्न करायचे आहे म्हणून भांडणं वगैरे करत बसू नकोस. समजूतीने चांगल्या मनाने जर काही झाले तर चांगलेच." स्वरा थोडीशी गंमतीने म्हणाली.
"हो माझी आई, मी चांगलाच मार्ग अवलंबणार आहे. वाईट मार्गाने अजिबात जाणार नाही. शेवटी ते माझे आई-बाबा आहेत. त्यांच्याशी वाकडे धरून मला काय मिळणार?" पृथ्वी
"मी काही तुझी आई नाही." असे म्हणून स्वर हसू लागली.
"हसल्यावर खूप गोड दिसतेस. अशीच हसत रहा." पृथ्वीने असे म्हटल्यावर स्वरा लाजली.
"अहाहा! लाजल्यावर तर एकदम सुंदर दिसतेस. काय यार? आपण कधी एक होणार? अजून किती दिवस वाट पहायची." पृथ्वी थोडासा वैतागून म्हणाला.
"सब्र करो बालक, सब्र का फल मीठा होता है।" असे म्हणून स्वरा हसू लागली.
"अच्छा! सब्र काय ठिक आहे. बघून घेईन." असे म्हणून पृथ्वी गालातच हसला.
पृथ्वी तेथून घरी आला. घरी आल्यावर जेवण वगैरे आवरून तो आई-बाबांच्या सोबत बोलत बसला. बोलता बोलता त्याने विषय काढला. तसे पृथ्वीच्या बाबांनीच विषयाला सुरुवात केली होती.
"पृथ्वी, मी तुला मागे म्हणालो होतो माझ्या मित्राची मुलगी.. तिच्याबद्दल तुझे काय मत आहे? त्यांना बोलवू का घरी? त्यांना पसंत पडले आणि ती मुलगी तुला पसंत पडली की मग लग्न करायला आम्ही मोकळे. लगेच तुझे लग्न लावून देतो." पृथ्वी चे बाबा
"बाबा, मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की माझे प्रेम फक्त स्वरा वरच आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. दुसऱ्या कुणाचा मी विचारही करू शकत नाही. मग तुम्ही सारखे का मागे लागला आहात?" पृथ्वी वैतागून म्हणाला.
"त्या उर्मठ मुलीशी तू लग्न करणार! अजिबात नाही. ते मला मान्य नाही. तू त्या मुलीशी लग्न करू शकत नाहीस. त्या लग्नाला माझी मान्यता नाही. ती मुलगी सोडून इतर कुठलीही मुलगी तू मला दाखव, तिच्याशी मी लग्न करून देईन. पण त्या मुलीशी तू लग्न करायचे नाहीस." पृथ्वी चे बाबा चिडून म्हणाले.
"नाही बाबा, मला स्वराशीत लग्न करायचे आहे. तिला सोडून मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही आणि तुम्हाला तिचा काय प्रॉब्लेम आहे? ती थोडी स्पष्ट बोलते, पण तिच्या मनात काहीच नसते. बाबा तुम्ही मनातला राग सोडा आणि स्वरा चा स्वीकार करा. प्लीज माझ्यासाठी तिला सून म्हणून या घरात घेऊन या. आमच्या लग्नाला संमती द्या." पृथ्वी काकुळतीला येऊन म्हणाला.
"अजिबात नाही. त्या मुलीने आमचा सगळ्या लोकांसमोर अपमान केला आहे. आमची इज्जत मातीत मिसळली आहे आणि त्या मुलीचा मी स्वीकार करु! हे कदापि शक्य नाही. ती मुलगी या घरची सुन होणार नाही. हा माझा शेवटचा शब्द आहे." पृथ्वी चे बाबा त्यांच्या मतावर ठाम होते.
"पण बाबा.." असे पृथ्वी म्हणतच होता तोपर्यंत त्याचे बाबा तिथून उठून गेले. ते पाहून पृथ्वी नाराज झाला. त्याला काय करावे? ते सुचेना. मग त्याचा मोर्चा आईकडे वळला.
"आई, तू तरी बाबांना समजावून सांग ना ग! माझे खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर आणि मी तिच्या शिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. तू एकदा बाबांशी बोलून बघ ना! तुझे तरी ते ऐकतील." पृथ्वी खूप कनवाळून आईला म्हणत होता.
"हो रे बाळा, मी बोलून बघेन. पण तुझे बाबा माझे काही ऐकणार नाहीत. ते स्वतःचेच खरे करतील. त्यांचा स्वभाव तुला माहित आहे ना! ते खूप हट्टी आहेत. जे मनात ठरवलंय तेच करणार. बाकी कुणाचेच काहीच ऐकणार नाहीत." पृथ्वी ची आई
"ठिक आहे. त्यांना जे करायचे ते करु दे. मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे. मी सुद्धा खूप हट्टी आहे. मी लग्न करेन तर स्वराशीच." पृथ्वीचे मत ठाम होते.
दुसऱ्या दिवशी सगळेजण उठून आपापले आवरून नाष्टा करण्यासाठी टेबलवर बसले होते. पृथ्वी आणि त्याचे बाबा एक अक्षरही बोलले नाहीत. एकाच ठिकाणी बसूनही बापलेक बोलत नाहीत हे पाहून पृथ्वीच्या आईला खूप वाईट वाटले. म्हणून तिने पृथ्वीच्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला.
"अहो, लेकरासाठी तुमचा हट्ट सोडा. लग्न त्याला करायचे आहे. त्याला आयुष्य काढायचे आहे. तुम्ही का निर्णय घेत आहात? मुलासाठी काहीतरी ऍडजेस्ट करूया ना!" पृथ्वी ची आई
"अजिबात नाही. मला ती मुलगी सून म्हणून या घरात नको आहे. तिने त्या दिवशी किती तमाशा केला? कोणाचे काही ऐकून न घेता लग्नमंडप सोडून तशीच गेली. अशी उर्मठ मुलगी मला अजिबात सून म्हणून नको आहे." पृथ्वी चे बाबा स्पष्ट बोलले.
"बाबा, पण यामध्ये चूक तुमची आहे. तुम्हीच स्वराच्या आईला लग्नाचा खर्च आणि चांदीची भांडी मागितला होतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तिने पोलीस कम्प्लेंट केली नाही, नाही तर तुमच्यावर गुन्हा झाला असता. ती तर फक्त लग्नमंडप सोडून गेली. त्यात तिची काय चूक आहे?" पृथ्वी मूळ मुद्यावर आला.
"घे घे, तू फक्त तिचीच बाजू घे. लोकांसमोर आपले स्टेटस दिसायला नको का? नाही तर लोक म्हणतील कुठल्या गरीबाची मुलगी सून म्हणून आणली आहे. कितीही काहीही झाले तरी आपल्या लेवलची मुलगीच आपल्याला सून म्हणून हवी. हा माझा अट्टाहास होता, आहे आणि असणार.. यात कोणताच बदल होणार नाही.." पृथ्वी चे बाबा
असे बापलेकाचे बोलणे होत असतानाच पृथ्वीची बहीण शुभदा तेथे आली. तिला असे अचानक समोर पाहून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. कोणालाच काही कळेना. आधी फोन करून येणारी शुभदा अशी अचानक आलेली आहे हे पाहून सर्वांना थोडा धक्काच बसला.
शुभदा पृथ्वी ची मोठी बहीण. लग्न होऊन पाच वर्षे झाली होती. स्टेटस स्टेटस करत बाबांनी तिला एका मोठ्या उच्चभ्रू घराण्यात तिचे लग्न लावून दिले होते. त्यांचे दोन इंडस्ट्रीज होते. मुलगा सुद्धा चांगला शिकलेला होता. आपली मुलगी सुखात आहे म्हणून तिचे बाबा निवांत होते. पण तिला आज अचानक पाहून ते सुध्दा सकाळी सकाळीच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
"अगं शुभदा, तू अशी अचानक कशी? फोन नाही की मेसेज नाही.. अचानक आलीस ते सुध्दा सकाळी सकाळीच.." पृथ्वी ची आई
"का? मला इथे येण्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागणार आहे का? मी माझ्या मनाने आणि हक्काने इथे येऊ शकत नाही का?" शुभदा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.
"तसे काही नाही ग राणी, आजपर्यंत तू फोन करूनच आलीस ना! ते सुध्दा दुपारीच.. म्हणून ग.. तुझी थोडी काळजी वाटली ग.." पृथ्वी ची आई
"शुभदा, कशी आहेस बेटा? काही अडचण आहे का? तसे असेल तर मला सांग. जावईबापू काही बोलले का? ते रागावले का तुझ्यावर? की सासू-सासरे काही म्हणाले? काही असेल तर मला मन मोकळे करून सांग. मी तुझ्यासोबत आहे." पृथ्वी चे बाबा
"काय हे बाबा? आल्या-आल्या प्रश्नांचा भडिमार सुरू केला. मला थोडा मोकळा श्वास तरी घेऊ द्या ना! दोन मिनिटं बस किंवा माझ्या तब्येतीची विचारपूस करा. मला घोटभर पाणी द्या, चहा द्या, नाश्ता वगैरे करायला बोलवा की, आल्या आल्या आपले प्रश्नच विचारायला सुरूवात करताय!" शुभदा रागाने म्हणाली.
"अगं ताई, ये ना! नाष्टा करायला. आईने बघ मस्त कांदे पोहे बनवले आहेत. आई दे ग ताईला पोहे." असे म्हणून पृथ्वीने शुभदाला खुर्चीत बसवले आणि प्लेट मध्ये पोहे घालून खायला दिले. शुभदा पोहे खायला बसली, पण तिचे कशातच लक्ष नव्हते. समोर पोहे होते पण त्याला ती ढवळत बसली होती. ते पाहून नक्की काहीतरी बिनसले आहे असे सर्वांना समजून आले. पण कोणीच काहीच बोलले नाही. थोडा वेळ ती शांत बसू दे. तिचे मन मोकळे करू दे आणि मग स्वतःच सांगेल म्हणून कोणी काही बोलले नाही. सगळ्यांचे पोहे खाऊन झाले तरीसुद्धा शुभदा तशीच बसली होती. तिच्या प्लेटमध्ये पोहे होते तसेच होते.
"बाबा माझे शेखरशी काय बघून लग्न लावून दिलेत?" शुभदा च्या अशा प्रश्नाने पृथ्वीचे बाबा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. खरंच सगळ्यांनाच या गोष्टीचे आश्चर्य वाटले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा