आत्मसन्मान 33

Marathi story


पृथ्वी गेल्यानंतर स्वरा रूममधून बाहेर आली आणि आईला म्हणाली, "आई, त्याला कशाला आत मध्ये घ्यायचे? त्याच्यामुळे तर इतकं रामायण घडलं आणि तू त्याला साथ देत आहेस. हे मला काही आवडले नाही. तुझे वागणे मला अजिबात पटले नाही. नेमकं तुला म्हणायचं तरी काय आहे? त्याला आत घेण्याचा तुझा उद्देश तरी काय?" स्वरा सुमनला म्हणाली.

"हे बघ स्वरा, यामध्ये पृथ्वीची काही चूक नाही. त्याला तर अजिबात काहीच माहीत नव्हते. त्याच्या बाबांनी हे सगळे केले होते. त्यामध्ये तू उगीचच त्याला ओढत आहेस. तू उगीचच त्याला बोल लावू नकोस, असे मला वाटते. त्याचे तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि तो योग्य आणि सत्य गोष्टीला साथ देणारा मुलगा आहे. त्यामुळे तू त्याच्याबद्दल तिरस्कार करू नकोस आणि त्याच्याशी व्यवस्थित बोल." सुमन स्वराला समजावून सांगत होती.

"अजिबात नाही.. मी का त्याच्याशी व्यवस्थित बोलू? त्याने काय व्यवस्थित केलेले आहे? जे काही घडले ते त्याच्यासमोर घडले. लग्नाच्या वेळी तो बोलायचा होता. तेव्हा तो काहीच बोलला नाही, तोंड बंद करून तसाच बसला आणि आता इथे आमच्याशी बोलायला आला आहे होय.. त्यापेक्षा स्वतःच्या आईबाबांना समजावून सांगायचं. इतकच वाटत असेल तर त्यांना चार गोष्टी चांगल्या सांगायच्या." स्वरा रागातच म्हणाली.

"स्वरा बाळ, तुझं चिडणं अगदी स्वाभाविक आहे. कारण हे सगळे मी तुझ्यावर केलेले संस्कार आहेत आणि ते योग्यच आहेत. प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मानाने जगणे हे गरजेचे आहे आणि ते तू तंतोतंत पाळली आहेस. त्यामुळे मी तुला अजिबात काही म्हणणार नाही. जे मला शक्य झाले नाही ते तू करून दाखवत आहेस. याचा मला खूप अभिमान आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव समोरच्या व्यक्ती च्या मनातील विचार घेऊन त्या व्यक्तीला समजून घेऊन मगच त्याला बोल लावायचे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसेल तर उगीचच त्या व्यक्तीला बोल लावायचे नाही. त्याने त्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो. प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान हा महत्त्वाचा असतो. जसा तुझा स्वाभिमान तुला महत्त्वाचा आहे तसाच पृथ्वीचा स्वाभिमान सुद्धा त्याला महत्त्वाचा आहे. इतकं सगळं घडूनही तो आपल्या घरी आला, आपल्याशी बोलला, आपल्याला त्याने समजून घेतले हे खरंच खूप मोठे आहे. हे कोणालाही जमण्यासारखे नाही म्हणून मी म्हणते की पृथ्वी हा खूप चांगला मुलगा आहे. तू त्याला समजून घे." सुमन स्वराला समजावून सांगत होती.

"पण आई, त्या दिवशी तो काहीच बोलला नाही. लग्नाच्या दिवशी आपण दोघे लग्नमंडप सोडून येत होतो तेव्हा त्याने आपल्याला अडवायला हवे होते. आपली समजूत घालायला हवी होती पण त्याने तसे काहीच केले नाही." स्वरा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"मॅडम तुम्ही कुठे काय बोलू दिलात त्याला? तो बिचारा बोलण्याचा खूप प्रयत्न करत होता पण तू काहीच बोलू दिले नाहीस. मला ही नाही आणि त्याला ही नाही. पण आता तो काय करतोय ते पाहू या? आपण त्याला अडवायचे नाही." सुमन

"बघू किती काय काय करतोय? पण यात काही गैर वाटले तर मी बोलायला मागे पुढे बघणार नाही." असे म्हणून स्वरा स्वतःच्याच विचारात गुंग झाली.

"तसेही तू काहीच ऐकणार नाहीस." असे म्हणून सुमन तिच्या कामाला निघून गेली.

दुसऱ्या दिवशी पृथ्वी परत स्वरा च्या घरी आला आणि त्याने सुमन ला बाहेर बोलावले. तो सुमन ला घेऊन शरयूच्या घरी गेला. शरयूच्या घरी जाताना सुमनच्या पोटात गोळाच आला. हा काय करणार आहे? इकडे कुठे घेऊन चाललाय? कालचं परत तिला आठवू लागले..

सुमन आणि पृथ्वी शरयूच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. बाहेरुनच पृथ्वीने हाक मारली.

"काकू थोडं बाहेर येता का?" असे म्हणून त्याने बेल वाजवली. बेल वाजवल्यावर काकू आतून बाहेर आल्या.

"तुम्ही आता आणखीन काय चोरायला आला आहात? काल जेवढा तमाशा झाला तेवढा बास झाला नाही का? आज आणखी अपमान करून घेण्यासाठी आला आहात! काय काम काढले आज?" शरयू जोरजोरात बोलू लागली.

"सत्य काय आहे ते तुमच्या तोंडून ऐकायचे आहे म्हणून मी इथे आलो आहे. सत्य काय आहे? ते गपगुमान सांगा आणि सुमन काकूंची माफी मागा." पृथ्वी सुध्दा ओरडून बोलला.

"मी का माफी मागू? हिनेच तर माझ्या बांगड्या चोरल्या आहेत. चोर तो चोर आणि वर शिरजोर.. उलट तुम्हीच माझी नुकसान भरपाई करून द्यायला हवी.. माझ्या बांगड्या मला परत द्यायला हव्यात.. मी काही माफी मागणार नाही." शरयू

"तुमच्या मुलाला बाहेर बनवा. आहे ना तो घरी! सुधीर सुधीर.." म्हणून पृथ्वी त्याला बोलावू लागला.

"त्याचा काय संबंध आहे यामध्ये? तुम्ही त्याला का बोलत आहात? त्याला बोलावण्याची काहीच गरज नाही. माझ्या समोर जे काही घडले ते सत्य आहे माझ्या बांगड्या हिनेच माझ्या घरातून नेल्या आहेत. त्या बांगड्या टेबलावर होत्या. तेव्हा ही आणि मी असे आम्ही दोघेच घरामध्ये होतो. याचा अर्थ हिनेच त्या बांगड्या घेतल्या आहेत." शरयू

"तुम्ही त्यालाच बोलवा तो काय सत्य आहे? ते सांगेल. त्याला या सगळ्याची कल्पना आहे आणि त्या बांगड्या कुठे आहेत? हे त्यालाच माहित आहे." पृथ्वी

"त्याला कसे माहीत असतील? तो तर त्या वेळी घरी नव्हताच. बऱ्याच वेळानंतर तो आला होता आणि तो देखील म्हणत होता की बांगड्या तूच कुठेतरी ठेवली असशील. हिचीच बाजू तो घेत होता." शरयू

"हो. कारण त्याला सत्य काय आहे? ते माहित होतं. म्हणूनच तो काकूंची बाजू घेत होता. तुम्ही त्याला बोलावता की मी आत जाऊ." असे पृथ्वी म्हणत आत जाणार इतक्यात सुधीर बाहेर आला आणि तो पृथ्वीला पाहून तो चपापला.

"सुधीर सत्य काय आहे? ते तूच सांग. आईच्या बांगड्या कुठे आहेत? ते खरं खरं सांग. सत्य काय आहे? ते मला माहित आहे. तू सांगतोस की मी सांगू." पृथ्वी

"तुम्ही त्याच्या मागे का लागला आहात? तुमची आणि त्यांची ओळख कशी? सुधीर तू याला ओळखतोस." शरयू

"हो आई, हा पृथ्वी. माझ्या कॉलेजमध्ये माझा सीनियर होता. त्याची आणि माझी ओळख कॉलेजमधली." सुधीर

"अच्छा, मग माझ्या बांगड्या तुझ्याकडे आहेत हे ठोसपणे हा कसे काय सांगत आहे?" शरयू

"तो खोटे बोलत आहे आई. मी तसे काहीच केले नाही." सुधीर मान खाली घालून म्हणाला.

"माझ्याकडे पुरावा आहे सुधीर. सोहमने मला सारं काही सांगितलं आहे आणि तुला देखील माहित आहे की मी मनात आणलं तर काहीही करू शकतो. इथे पोलिसांना देखील बोलावू शकतो." पृथ्वीच्या या बोलण्याने सुधीर घाबरला.

"आई, अगं तुझ्या बांगड्या घरातच तर आहेत आणि तू उगीच काकूं वर आळ घालत आहेस. थांब मी घेऊन येतो." असे म्हणून सुधीर आत गेला आणि लगेचच बांगड्या घेऊन आला.

"हे बघ आई, स्वयंपाकघरात तर आहेत बांगड्या. मी मघाशीच बघितले होते आणि तू मात्र लगेच विसरलीस. तू जेव्हा मला विचारलीस तेव्हा माझ्या नक्की लक्षात आले नाही की मी कोठे पाहिले आहेत ते? पण आता सगळे लक्षात आले ग. काकू आल्या तेव्हा तूच तर बांगड्या आत घेऊन गेली होतीस आणि आता तूच विसरलीस! तरी मी तुला म्हणालो होतो की काकूंनी काही केलेले नाही तू उगीच त्यांच्यावर आळ घालत आहेस. पण तू काही ऐकतच नाहीस." असे म्हणून सुधीरने पृथ्वीला खुणेनेच माफी मागून शांत बसायला सांगितले.

सुधीरचे हे वागणे पृथ्वीला आवडले नव्हते. पण त्याने अखेर बांगड्या दिल्या आणि सुमनला त्यातून वाचवले म्हणून तो शांत बसला. हा सगळा गोंधळ चालू होता तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक तिथे जमले होते. ते आपापसात म्हणत होते की सुमनला उगीचच बोल लावले, ती खरं तर या सगळ्यातून वाट काढत तिच्या मार्गाने जात होती आणि एका चुकीमुळे तिला इतके बोल लावले गेले. शरयू सुद्धा तिला असे बोलायला नको होती. शरयूची ती खूप चांगली मैत्रीण होती. पण तिने असे का केले असेल? हा प्रश्न आजूबाजूच्या लोकांच्या मनात आला.

"सुमन सॉरी ग, माझं चुकलं मी असे करायला नको होते. पण माझ्या बांगड्या खरंच मिळत नव्हत्या आणि तेव्हा तूच फक्त आली होतीस. दिवसभरात कोणीच बाहेरचे घरी आले नव्हते. मी घरभर सगळे शोधले तरीसुद्धा मला बांगड्या सापडल्या नाहीत, म्हणून मी तुझ्यावर आळ घेतला. माझंच चुकलं, मला माफ कर, खरं तर माफी मागायच्या लायकीची सुद्धा मी राहिले नाही पण तरीही तुझी मैत्रीण म्हणून मला माफ कर." असे म्हणून शरयू तिच्या पाया पडू लागली.

शरयू ने कितीही माफी मागितली तरीही सुमन आणि शरयू मध्ये आता एक प्रकारची दरी निर्माण झाली होती. इतक्या सगळ्या लोकांसमोर शरयू ने सुमन ला बोलावले होते. ती नाही नाही ते बोलली होती. ते ऐकून सुमनच्या मनातून ती पूर्णपणे उतरली होती. त्यांच्या मैत्रीमध्ये आता दरी निर्माण झाली होती. सुमनने जरी तिला माफ केले तरी तिच्या मनातील ते शब्द पुसले गेले नव्हते. आपली इतकी चांगली मैत्रीण आपल्यावर असा आळ घेईल असे तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण आज पृथ्वीच्या रूपाने तिच्या मदतीला देवच आला होता. हे सगळे पृथ्वीनेच सोडवले होते. हा गुंता खरंतर कसा सोडवायचा? हे तिलाही समजत नव्हते. पण पृथ्वी अगदी देवासारखा येऊन त्याने हा गुंता सोडवला. खरंच पृथ्वी हा जावई म्हणून अगदी योग्य आहे. स्वराच्या पाठीशी सुद्धा तो असाच ठामपणे उभा राहील यात काही शंका नाही. त्यावेळी सुमनला पृथ्वी बद्दल खात्री पटली.

हा सगळा गोंधळ सुरू होता तेव्हा तिथे स्वरा आली. तिचे कॉलेज लवकर सुटल्यामुळे ती घरी लवकर आलेली होती. इतकी गर्दी आणि ते सारं काही पाहून ती गोंधळली. तिला काहीच समजले नाही. ती विचारात मग्न होऊन तशीच उभी होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all