"अहो मिस्टर, तुम्ही या बाईच्या नादी लागू नका. ही बाई वश करून घेते. ज्याला त्याला हिचा पुळका येतो. ही काही चांगली बाई नाही." एक बाई
"एक मिनिटं. एखाद्या स्त्रीच्या विषयी तुम्ही पुरावा असल्याशिवाय बोलू शकत नाही. नेमके काय कारण आहे? तुम्ही सांगाल का? आणि त्यांचे म्हणणे देखील तुम्ही ऐकून घ्या ना!" पृथ्वी
"अहो, या बाईने माझ्या चार तोळ्याच्या बांगड्या चोरल्या आहेत आणि आत्ता नाही म्हणतेय. तिच्याशिवाय तिथे कोणीच नव्हते. हिनेच त्या घेतल्या आहेत." ती बाई
"तुम्ही असे बिनबुडाचे आरोप का लावत आहात? यांनीच घेतले आहे, याचा काही ठोस पुरावा आहे का तुमच्याकडे?" पृथ्वी
"अहो, बांगड्या मी वरती टेबलावरच ठेवले होते. त्यावेळी ही बाई आमच्या घरी आली होती. हिला पैशाची गरज होती. आमच्या दोघींचे बोलणे झाले आणि मी आत मध्ये चहा करण्यासाठी गेले. चहा करून हिला दिला आणि मी पण घेतले. ही बाई गेल्यावर मी पाहिले तर तिथे बांगड्या नव्हत्या. मग गेल्या कुठे?" तीच बाई
"शरयू, अगं मी काही पहिल्यांदा तुझ्या घरी आले नव्हते ग, आपण खूप चांगल्या मैत्रिणी आहोत ना! मग बऱ्याच वेळा मी तुझ्याकडे आले आहे आणि तुझ्या कोणत्याही वस्तूला मी कधीच हात लावला नाही. हे तुला सुध्दा माहित आहे. माझा स्वभाव तर तुला माहीतच आहे. तरीही तू असा संशय माझ्यावर का घेत आहेस? अगं माझा स्वभाव तुला माहीतच आहे ना! किती खडतर प्रवासातून मी इथपर्यंत आले आहे? मग तू असे का वागत आहेस? तू तर माझी खूप चांगली मैत्रीण आहेस ना! माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मी तुला सांगितले आहे. माझ्या प्रत्येक सुख दुःखात तुला सहभागी करून घेतले आहे. मग आता काय झाले ग? तू अशी माझ्यावर आरोप करत आहेस." सुमन काकुळतीला येऊन म्हणत होती.
"तरीही माझा तुझ्यावरच आरोप आहे. तूच ते घेतले आहेस. कारण तुला पैशाची गरज होती. तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तुला पैसे गोळा करायचे होते. मग मला सांग इतके पैसे तुझ्याकडे आलेच कुठून? तुला तर मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे होते. हे तू आधीच बोलली होतीस. तर मग इतक्या कमी वेळात लग्नासाठी इतका पैसा जमा कसा झाला? तो पैसा कुठून आला? तूच त्या बांगड्या घेतल्या असशील आणि ते विकून पैसे गोळा केले असशील." ती बाई म्हणजेच शरयू म्हणाली.
"अहो बाई, काय वाट्टेल ते आरोप करू नका. मी खूप चांगलं ओळखतो सुमन काकूंना. त्या असे काहीच करणार नाहीत. शिवाय पैसा गोळा करण्याचा प्रश्न आलाच तर त्या किती कष्ट करतात? हे तुम्ही पाहिलेच असेल. त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेली त्यांची तटपूंजी होती ती. शिवाय लग्नासाठी थोडे पैसे कमी पडलेच होते ना! तसे असते तर त्यांनी प्रत्येकाच्या घरातून काही ना काही चोरले असते ना! तुमच्या बांगड्या तेवढ्या गेल्या पण त्याच्या शेजारी असलेले आणखी काही सामान होते का? ते ही गेलेच असते ना! ते का बरे गेले नाही. मला एक गोष्ट सांगा टेबलावर फक्त बांगड्या होत्या की आणखी काही होते." पृथ्वी थोडासा आवाज वाढवून बोलला.
"काय बाई आहे? ही प्रत्येकाला आपल्यात वश करून घेते. माझा नवरा सुद्धा हिचीच बाजू घेतो आणि आता हा मुलगा सुद्धा.. अरे, तुझ्यावर काही जादू केली आहे का बघ? माझ्या बांगड्या हिनेच चोरला आहेत असे मी म्हणत असताना तू उलट मलाच विचारतोयस की त्याच्या जवळचे सामान काही गेले आहे का? अरे मी स्वतः तिथे होते आमच्या दोघीं व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते. मग बांगड्या गेल्या कशा?" ती बाई कांगावा करत बोलत होती.
"अहो, काकू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही घरातच कोठेतरी त्या बांगड्या ठेवल्या असतील ते शोधा. सगळीकडे शोधा. शोधलात की सापडेल. असे कोणावरही आरोप करू नका." पृथ्वी तिला समजावत होता.
"मी शोधल्याशिवाय येथे येते का? मला नक्कीच माहित आहे हीनेच त्या बांगड्या घेतल्या आहेत. आता मागायला आल्यावर हात वर करते. कोण चोर सांगेल का? की स्वतः त्या बांगड्या घेतले आहे म्हणून.. उगीच काहीतरी तुम्ही उठवू नका या बाईनेच माझे बांगड्या घेतल्या आहेत." ती बाई
"ही शरयू आधी पासूनची माझी मैत्रीण.. प्रत्येक सुखदुःखात ही माझ्यासोबत होती. मग आता हिला असे काय झाले आहे? की माझ्यावर असा आरोप घातला आहे. खरंच काहीच कळत नाही.. ही मुद्दामून करत आहे का मला काहीच समजेना.." सुमन स्वगत म्हणाली..
पृथ्वीने बराच प्रयत्न केला तरी ती बाई काही मानायला तयार नव्हती. सुमनचे तर ती काहीच ऐकून घेत नव्हती. बराच वेळ वादावादी झाल्यानंतर पृथ्वी देखील खूप वैतागला.
"एक मिनिटं, तुम्ही असे करणार असाल तर मी पोलीस स्टेशनला कळवतो. पोलीस येतील आणि योग्य काय ते होईल? पोलीस येऊन सगळी तुमच्या घराची आणि यांच्या घराची झडती घेतील. ज्या ठिकाणी सापडेल ते कळेल. या सगळ्याचा सोक्ष मोक्ष आता तेच लावू देत. पृथ्वी ने खिशातील मोबाईल बाहेर काढला इतक्यात त्या बाईचा नवरा घाईघाईने आला.
"अगं तुला किती वेळा सांगितलं आहे की आणखी आपण शोधू. यांची काही चूक नाही. यांनी त्या बांगड्या घेतल्या नाहीत. तू चल घरी, शांत विचार कर. आपण घरामध्ये शोधू. उगीच इतके वायफळ बडबड नकोस. असे म्हणून तिला घरी घेऊन गेला. ती बाई काही केल्या जायला तयार होईना. तिच्या नवऱ्याने तिला हाताला धरून ओढत नेले. ती बाई गेल्यानंतर आजूबाजूच्या बायका ही ज्या जमल्या होत्या त्या सुद्धा आपापल्या घरी गेल्या. त्या ठिकाणी पृथ्वी आणि सुमन दोघेच होते.
"तुम्ही इथे कसे काय आलात? काही काम होतं का? स्वरा कॉलेजला गेली आहे तिला भेटायचं असेल तर नंतर या." सुमन
"स्वराला नाही काकू मला तुम्हाला भेटायचं आहे. मी आत येऊ का?" पृथ्वीने परवानगी मागितली.
"हो आत या ना!" असे म्हणून सुमनने पृथ्वीला आत बोलावून नेले.
दोघेही आत गेले. सुमनने पृथ्वीला पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यानंतर पृथ्वी बोलू लागला.
"काकू माझ्या आई बाबांचे चुकलेच.. त्यांनी अशी अट तुम्हाला घालायला नको होती. पण हे तुम्ही आधी मला का नाही सांगितलं? लग्नाच्या आधी जर मला हे कळाले असते तर हे सगळे घडलेच नसते त्यांचे चुकलेच.." असे म्हणून पृथ्वीने मान खाली घातली.
त्या दोघांची बराच वेळ चर्चा सुरू होती. पृथ्वी आणि सुमन बराच वेळ बोलत बसले होते. सुमन ने देखील पृथ्वीला लगेच माफ केले. कारण याबद्दल पृथ्वीला काहीच माहीत नव्हते हे तिला देखील माहीत होते. तिने पृथ्वीला चहा बनवून दिला. बघता बघता वेळ कसा निघून गेला? त्यांचे त्यांना समजले नाही. संध्याकाळ झाली. स्वरा कॉलेजमधून घरी आली होती. ती आत येताच तिला समोर पृथ्वी दिसला. त्याला पाहून तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिला खूप राग आला. ती चिडचिड करू लागली आणि तडक रूम मध्ये जाऊन बसली.
\"आता हा कशासाठी आला आहे? घरा मध्ये यायची याची हिंमतच कशी झाली? याला आणखी काय हवे आहे? तेव्हा जो तमाशा झाला तो बास झाला नाही का? याला आधी नक्कीच सगळं माहित होतं. आई-बाबाच्या शब्दाबाहेर हा जात नाही मग आता देखील आई-बाबांनी याला इकडे पाठवले असेल! याला काय गरज होती इथे यायची? लग्नाच्या आधी जर काही बोलला असता तर ही वेळ आली नसती.\" स्वरा खोलीतच बसून बडबडत होती.
स्वराला पाहून पृथ्वीला देखील थोडेसे अवघडल्यासारखे झाले. या आधी ते दोघे खूप चांगले मित्र होते आणि एकमेकांच्या प्रेमात देखील होते पण आता परिस्थिती थोडीशी वेगळी होती. त्यामुळे एकदम काय रिएक्ट व्हावे हे पृथ्वीला कळले नाही. तो तसाच बसून होता. स्वरा आल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला पण सुमनने त्याला थांबवून घेतले.
"स्वरा आवरून ये ना पटकन! बाहेर बघ पृथ्वी आला आहे." सुमनने स्वराला हाक मारली.
"मग मी काय त्याची आरती ओवाळू? आता काय काम काढले आहे? मी काही येणार नाही. आता काय हवं आहे त्याला? तूच बोलत बस. मला बोलायची गरज नाही." स्वरा रागाने म्हणाली.
"काकू ती थोडी चिडली आहे. राहू द्या. मी जातो आता. परत येईन तिच्याशी बोलायला. पण तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. जे काही सत्य आहे ते समजलं. आता मी सत्याची बाजू घेणार आणि लग्न करेल ते स्वराशीच." पृथ्वी
"पण तुम्ही जास्त काही आढेवेढे घेऊ नका. मी माझ्या मुलीसाठी ते सारं काही करत होते. पण चांदीची भांडी वगैरे करणे मला शक्य झाले नाही. माझ्याकडे तितका पैसा शिल्लक राहिला नाही. पण स्वराला हे बोलणार कोण? ती खूपच चिडली." सुमन
"नाही काकू. तुम्ही योग्य होतात. आई-बाबांनी असे हट्टाने मागून घेणे हे चुकीचेच आहे. याला हुंडा म्हणतात. स्वराचे अगदी बरोबर आहे. तिने जे काही केले ते योग्यच केले आहे. आता मात्र स्वरा अगदी मानाने त्या घरात येईल. मी तिला तो मान देईन. तुम्ही काही काळजी करू नका." असा विश्वास पृथ्वीने सुमनला दिला. ते पाहून सुमनला खूप भरून आले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा