Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 31

Read Later
आत्मसन्मान 31


स्वरा नेहमीप्रमाणे काॅलेजला गेली. ती स्वतःला सावरली होती. इकडे स्वरा लग्नातून गेल्यावर सगळी मंडळी नावे ठेवत घरी गेली. अवघ्या अर्ध्या तासात हाॅल रिकामा झाला. पृथ्वी ला काहीच समजेना. आईबाबांनी असे काही मागितले होते यावर त्याचा विश्वासच बसेना. तो विचारात गढून गेला. त्याच्या घरचे सगळे घरी आले. पृथ्वी त्याच्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन तो स्वस्थ बसला. त्याला काहीच करण्याची इच्छा नव्हती. त्याचे कशातच मन रमेना. मग तो तसाच पडून राहिला.

"खरंच आईबाबांनी स्वराच्या आईकडे या गोष्टी मागितल्या असतील? पण का? यांना काय कमी आहे? की स्वरा खोटे बोलत असेल? नाही नाही. स्वरा असे काही करणार नाही. तिचे माझ्यावर प्रेम आहे. ती का असे करेल? मग आईबाबा.... बापरे! सगळा विचार करून माझं डोकं दुखत आहे. यात नेमकी चूक कोणाची?" असा विचार पृथ्वी च्या मनात चालू होता.

पृथ्वी बराच वेळ विचार करत होता. जे काही घडले त्यात नेमके दोष कोणाला द्यायचे? एकीकडे आईबाबा तर दुसरीकडे प्रेयसी.. या सगळ्या कचाट्यात तो अडकला होता. यामध्ये कोणाची बाजू घ्यायची हे समजेना. तो शांत बसला. आता कोणाला विचारावे? हा प्रश्न त्याच्या मनात येत होता. तेव्हा त्याच्या एकदम लक्षात आले की त्या दिवशी त्याची आत्या देखील गेली होती. तर तिलाच विचारावे. ती सत्य काय आहे? ते नक्की सांगेल. म्हणून पृथ्वी त्याच्या आत्याकडे लगेच गेला.

"आत्तु, आत येऊ का? तू काय करत आहेस ग?" पृथ्वी दारातच उभा राहून म्हणाला.

"अरे पृथ्वी, ये ना.. तुला कधीपासून परवानगी लागायला लागली. ये बस." आत्याने असे म्हटल्यावर पृथ्वी आत गेला आणि आत्या जवळ बसला. बराच वेळ झाला तरी तो काहीच बोलला नाही. ते पाहून आता आत्याच बोलायला लागली.

"काय म्हणतोस? कसा आहेस? आज जे काही झालं ते खूप वाईट झालं बघ. ती मुलगी खूप आगाऊ होती, ती तुझ्यासाठी योग्य नव्हती. जाऊ दे सोड. आपण आता दुसरीकडे स्थळ पाहू. तुझ्यासाठी एक गोड मुलगी आणू. जी या घराण्याची सून बनण्यास योग्य असेल." आत्याने पृथ्वी ची समजूत घालण्यास सुरूवात केली.

"आत्तू, तू मला एक गोष्ट सांग. लग्न ठरवायला आई-बाबांसोबत तू सुद्धा गेली होतीस ना!" पृथ्वी

"हो. तुझे बाबाच मला घेऊन गेले होते." आत्या

"मग तिथे काय घडलं? तू खरं सांग मला.. बाबांनी खरंच स्वराच्या आईकडून हे सगळं मागितले होते का?" पृथ्वी

"अरे, तू तोच काय विचार करत बसला आहेस? ती मुलगी खूप फाजील आहे, आगाऊ आहे. तुझे बाबा तसे काही करतील असे वाटते का? तुला माहित आहे ना! तुझ्या बाबांचा स्वभाव.. त्यापेक्षा तुझ्यासाठी दुसरी मुलगी पाहिलेली योग्य असेल.. तू तिचा विचार सोडून दे." आत्या

"आत्तु, मी तुला काय विचारतोय त्याच प्रश्नाचं फक्त उत्तर दे.. तुला माझी शपत आहे बघ.." पृथ्वी.. आत्याचा पृथ्वी वर खूप जीव होता. त्यामुळे त्याने तिला शपथ घातल्यामुळे ती घाबरली.

"अरे शपथ वगैरे काय करतोस? तू तीच गोष्ट परत परत बरळत बसू नकोस. इथे तुझ्या बाबांचा अपमान झाला आहे, आमच्या सगळ्यांचा अपमान झाला आहे आणि तुला त्या मुलीचा का पुळका येतोय?" आत्या परत टोलवू लागली.

"आत्तू, पुळका यायचा काही प्रश्न नाही. मी कोणाचीही बाजू घेत नाही. जे सत्य आहे ते सत्याचाच मी विचार करतोय. खरं काय आहे ते मला समजायला हवं? हे फक्त आणि फक्त तुलाच माहीत आहे. तूच मला खरं काय ते सांगू शकतेस? सांगा तू प्लीज.. तुझ्या भाच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी तू सत्य काय आहे ते सांग? प्लीज आत्तु माझ्या साठी." पृथ्वी केविलवाणा चेहरा करून बोलू लागला.

"जे सत्य आहे ते तर प्रत्यक्षात घडलेलेच आहे. आणखी तुला काय सत्य हवं आहे? जे काही झाले आहे ते सर्व तुझ्या डोळ्यांसमोर झाले आहे. सर्व नातेवाईक आणि समाजामध्ये आमची इज्जत त्या पोरीने घालवली आहे आणि तुला काय ऐकायचे आहे?" आत्या थोडी स्पष्टच म्हणाली.

"आत्तु, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि खरं खरं काय ते सांग?" असे म्हणून पृथ्वीने आत्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतला. ते पाहून आत्या घाबरली..

"अरे हे काय करतोयस? तू शांत रहा पाहू.. अशी शपथ वगैरे का घालत आहेस? तू तर माझा लाडका भाचा आहेस ना! तुला माहित आहे ना तुझ्या साठी मी काहीही करू शकते.." आत्या

"मग एक गोष्ट कर.. काय खरं आहे ते मला सांग?" पृथ्वी

"ठीक आहे. मी सांगेन पण हे सगळं मी सांगितले आहे हे कोणाला सांगायचे नाही." असे म्हणून आत्याने पृथ्वीला सारं काही सत्य सांगितले. "यामध्ये स्वरा आणि तिच्या आईची काही चूक नसून तुझ्या आई-बाबांनी स्वराच्या आई कडून लग्नाचा सगळा खर्च आणि चांदीची भांडी मागितले होते. ती बिचारी गरीब.. पैसा कुठून आणणार? त्यामुळे हे सगळे घडले.. या गोष्टी बद्दल स्वराला सुद्धा काहीच माहीत नव्हते. म्हणूनच ती लग्नात चिडली आणि लग्न मोडून तिथून निघून गेली.." आत्याने एका दमात सारं काही सांगितले.

पृथ्वीला जेव्हा हे सारं काही समजले तेव्हा तो खूप चिडला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपले आई-बाबा असे काही करू शकतील? यावर त्याचा विश्वासच बसला नाही. इतकी सारी श्रीमंती पण यांना लग्नाचा खर्च स्वराच्या आई कडूनच का हवा होता? हा प्रश्न त्याच्यासमोर पडला. त्याला दोन मिनिटं काहीच सुचले नाही म्हणून तो तसाच शांत बसला. तेव्हा आत्या म्हणाली, "तिच्यावर तुझे प्रेम आहे तर तू जा तिच्याकडे.. मी तुझ्यासोबत आहे." असे म्हणत आत्याने त्याला पाठिंबा दिला.

पृथ्वी ताड्कन उठून उभा राहिला. आई-बाबांना जाब विचारावे तर ते काही ऐकून घेणार नाहीत. शिवाय ते काही तिच्याशी लग्न होऊ देणार नाही. त्यापेक्षा आपल्याला गोड बोलून काहीतरी करावे लागेल. अशा विचारात तो घराबाहेर पडला ते तडक कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमध्ये स्वरा आली होती तो कॉलेजच्या बाहेर राहून तिच्याकडे च पाहत उभा होता.

बराच वेळ झाला. पृथ्वी बाहेर राहून स्वराकडे एकटक पाहत होता. त्याला तिच्याशी बोलायला जावे असे खूप मनापासून वाटत होते पण तो जाऊ शकला नाही. कारण इतके सगळे घडले तर आता स्वराला काय तोंड दाखवायचे? हा प्रश्न त्याच्या मनात येत होता. तो तसाच बराच वेळ उभा होता. बर्‍याच वेळाने स्वराचे त्याच्याकडे लक्ष गेले. तिने त्याला पाहिले तेव्हा पृथ्वीने मान खाली घातली. स्वराने त्याच्याकडे पाहिले आणि ती आत निघून गेली. ते पाहून पृथ्वीला खूप वाईट वाटले.

स्वराच्या मनात आले की याला काही न कळता राहिले असेल का? एकदा अनघा बोलली होती की पृथ्वी कितीही काहीही झाले तरी आई-बाबांचे सगळे ऐकतो. मग ही गोष्ट सुद्धा त्याने नक्कीच ऐकली असेल आणि आता माझी समजूत घालायला आला असेल असे म्हणून ती बाहेरच गेली नाही.

बराच वेळ झाला तरी स्वरा काही वर्गाच्या बाहेर आली नाही. ते पाहून पृथ्वी तिच्या घरी जायला निघाला. निदान पृथ्वीच्या आईला तरी समजावून सांगू तिला यातील काही माहीत असेलच. या उद्देशाने तो घरी निघाला. झालेल्या गोष्टीबद्दल त्याला खूप पश्चाताप झाला होता, त्याला खूप वाईट वाटत होते. पैशासाठी आई-बाबा असे का वागत होते? की स्वरा त्यांना पसंत नव्हती हे त्याला समजलेच नाही.

पृथ्वी घरापाशी गेला तर घरासमोर त्याला थोडी गर्दी दिसली. काही झाले असेल का? या विचाराने तो पुढे पुढे गेला तर त्याच्या कानावर एक शब्द ऐकायला येऊ लागले.

"काय निर्लज्ज बाई आहे अशी असेल असे वाटले नाही." "किती गुणाची म्हणत होतो आम्ही हिला पण ही तर निर्लज्ज निघाली." "काय थोबाड आहे आणि काय वागणं?" "दिसायला किती सोज्वळ वाटते आणि गुण बघा हिचे." "असे संस्कार होते का हिचे? माहित असते तर आम्ही तिच्याशी बोललोच नसतो." "तिच्याकडे आता कपडे कोणी टाकायचे नाहीत.. बाई आहे की काय?"

पृथ्वीच्या कानावर असे शब्द ऐकायला येत होते. हे कोणाला बोलत आहेत? ते पाहण्यासाठी तो पुढे गेला.. तर समोर स्वराची आई होती आणि ती काही बोलणार होती.. पण या बायका तिला काहीच बोलू देत नव्हत्या. त्यांचेच आपले बडबड चालू होते. तिला कोणत्या तरी गोष्टी वरून इतकी नावे ठेवत होते.. ती गोष्ट कोणती होती हे पृथ्वीला जाणून घ्यायचे होते.. त्याने किती विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणीच बोलू दिले नाही.

त्या बायकांच्या गराड्यातून समोर पृथ्वीला जेव्हा सुमनने पाहिले तेव्हा तर ती आणखीनच गोंधळली. हा इथे कसा? आणि माझ्यावर झालेला आरोप ऐकून याने भलताच विचार केला तर, माझी परत बदनामी होईल. याने अर्थाचा अनर्थ करून घेतला तर, स्वराला तर यातील काहीच माहित नाही, तिला समजले तर, अशा अनेक प्रश्नांनी सुमन च्या मनामध्ये थैमान माजले होते.. तिला काय बोलावे? हे समजेना. त्या बायकांना थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती. त्यांना सत्य काय? ते सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचे कोणीच काहीच ऐकून घेतले नाही. उलट तिलाच सगळ्या बोल लावत होत्या. पृथ्वीने देखील कितीही प्रयत्न केला तरी त्याचे कोणीच ऐकून घेतले नाही. उलट त्यालाच त्या सांगू लागल्या की, तुम्ही या बाईच्या नादी लागू नका. ही दिसते तशी नाही.

ही सगळी परिस्थिती काय आहे हे पृथ्वीला देखील समजेना. तो गोंधळातच पडला आणि यावर काय बोलावे? हे सुद्धा त्याला समजेना. तो तसाच उभा राहिला.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..