आत्मसन्मान 30

Marathi story


सुमन ला खूप वाईट वाटत होते. लेकीसाठी तिच्या सासरच्यांना लग्नाचा खर्च आणि चांदीचे भांडी देण्याचे कबूल केले होते पण सध्या फक्त लग्नाचा खर्च होण्याइतकी रक्कम जमा झाली होती. चांदीची भांडी घेण्यासाठी तिच्याजवळ इतके पैसे नव्हते. फक्त लग्नाचा खर्च द्यावा आणि चांदीची भांडी लग्न झाल्यानंतर पुढे करता येईल असा तिने विचार केला. पण तिच्या सासरचे काय म्हणतील? हा प्रश्न तिच्या मनात सतावत होता. इतक्यात स्वरा आली. स्वराला पाहून सुमनने तिची डायरी लगेच बंद केली आणि डोळ्यातील पाणी पुसून हसत तिच्याशी बोलू लागली.

"आई काय झाले ग? तू रडत होतीस का? काही टेन्शन आहे का? बोल ना.." स्वरा

"काही नाही ग, माझ्या काळजाचा तुकडा उद्या सासरी जाणार ना! म्हणून थोडसं वाईट वाटत होतं.. बाकी काही नाही. टेन्शन काय असणार आहे? तू खूश आहेस ना! मग मी पण खूश." सुमनने टोलवा टोलवी केली.

"मला सुद्धा खूप वाईट वाटत आहे ग आई. तुला सोडून मी पहिल्यांदा कुठे तरी जात आहे. ते सुद्धा कायमची." स्वरा

"ते तर प्रत्येक मुलीला जावेच लागते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस, हे वळण ये येतंच. जे येईल ते आनंदाने स्विकारून पुढे चालायचे." सुमन स्वराला जवळ घेत म्हणाली.

स्वरा लग्न करून जाणार त्यामुळे माय लेक दोघीही एकत्र झोपल्या. सुमन स्वराच्या केसांवरून हात फिरवत उशाशी बसली होती. तिला थोपटून झोपवत होती. तिच्या मनात विचार चालू होते की, लग्नाचा दिवस तेवढा व्यवस्थित पार पडू दे. अशी देवाला प्रार्थना करत होती.

अखेर लग्नाचा दिवस उजाडला. स्वरा आणि सुमन दोघी लवकर उठल्या, उठून त्यांचे सगळे आवरले. स्वराने तिची बॅग आधीच भरून ठेवली होती. त्यामुळे काही गडबड गोंधळ झालेच नाही. त्यांनी लग्नासाठी ची लागणारी सगळी तयारी आधीच केली होती. लग्नासाठी लागणारा हॉल, त्याचे डेकोरेशन सुमनने एकटीनेच पाहिले होते. जेवणाची व्यवस्था सुद्धा तिने एकटीनेच केली होती. सारे पदार्थ पृथ्वीच्या बाबांच्या पसंतीनुसार ठरवले होते. त्यामुळे जेवणाचा खर्च हा भरपूर झाला होता.

स्वरा आणि पृथ्वीने वायफळ खर्च करायचा नाही असे ठरवले होते. त्यामुळे लग्नामध्ये अक्षता कोणीच टाकणार नव्हते. फक्त स्टेजवरील पाच व्यक्ती अक्षता टाकायच्या असे ठरले होते. कारण अक्षता जर जास्त वाटल्या गेल्या तर तेवढ्या तांदळाची नासाडी होणार. त्यापेक्षा ते तांदूळ आपण अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम ला द्यायचे असे त्यांचे ठरले होते.

लग्नामध्ये आहेर माहेरची अजिबात करायचे नाही असेही त्यांनी ठरवले होते. जेणेकरून साड्या हलक्या किंवा भारीतल्या अशी तुलना होणार नाही. गरीब, श्रीमंती अशी तुलना होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती. स्त्रियांच्या मनात लगेच येते की, तुला कसली साडी नेसवली आहे मला कसली साडी नेसवली आहे. अशाप्रकारे दुजाभाव निर्माण होतो ते न होण्यासाठी त्यांनी आहेर माहेर कोणालाच करायचे नाही असे ठरवले होते. अगदी सुटसुटीत पद्धतीने लग्न करण्याचा विचार त्यांनी केला होता.

लग्नासाठी जेवणातील पदार्थ जरी पृथ्वीच्या बाबांनी सिलेक्ट केले असले तरी अवास्तव खर्च करायचे नाही असे ठरले होते. अन्नाची नासाडी अजिबात करायची नाही. ज्या व्यक्तीला जितके हवे आहे तितकेच वाढायचे असे वाढणार्या लोकांना बजावून सांगितले होते. अन्नाची नासाडी करण्यापेक्षा शिल्लक राहिलेले अन्न अनाथ आश्रम ला द्यायचे असे त्यांनी ठरवले होते.

लग्न अगदी सुटसुटीत पार पाडायचे ठरवल्यामुळे स्वरा खूप खूश होती. तिच्या मनाचा पृथ्वी विचार करत होता. तिला जे हवे तसे तो करत होता. कार्यालयात सगळी मंडळी उपस्थित झाली होती. मुलाकडच्या मंडळींचे अगदी वाजत गाजत स्वागत केले. त्यांचे मानपान अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले. सगळी मंडळी आत बसली होती. इतक्यात स्वराची एंट्री झाली. तिने मस्त अशी नऊवारी साडी नेसली होती, कानामध्ये मोठी सोन्याची फुलं घातली होती, केसांचा अंबाडा आणि त्यात मागर्याचा गजरा माळला होता, नाकामध्ये मोत्याची नथ घातली होती, गळ्यात कोल्हापूरी साज घातली होती, हातभर हिरवा चुडा भरला होता, पायात कोल्हापुरी चपला घातल्या होत्या तसेच डोक्यावर फेटा घातला होता. ती अस्सल कोल्हापुरी दिसत होती. ती आत येताना सगळे तिच्याकडे एकटक पाहतच राहिले. स्वरा खूप सुंदर दिसत होती.

स्वराला पाहून पृथ्वी ची तर विकेटच उडाली. तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. ते पाहून स्वरा लाजली. तेव्हा तर पृथ्वी आणखीनच घायाळ झाला. थोडा वेळ स्टेजवर बसून दोघांचे फोटो काढले. नंतर स्वरा लग्नातला शालू नेसण्यासाठी रूममध्ये गेली, तर पृथ्वी शेरवाणी घालण्यासाठी गेला.

इकडे हाॅलमध्ये पृथ्वी चे बाबा सगळी व्यवस्था पाहून शांत होते. सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणेच चालले होते. पण त्यांना काहीतरी दोष काढायचा होता. सुमनला कमीपणा दाखवायचा होता. शिवाय स्वराचा अपमान करायचा होता. त्यासाठी ते काहीतरी चूक सापडते का? ते पाहत होते. पृथ्वी च्या बाबांना स्वरा पसंत नव्हती, ते पृथ्वी साठी या लग्नाला तयार झाले. त्यांना काही करून हे लग्न होऊ द्यायचे नव्हते. त्यासाठी तर ते नेहमी सुमनला आणि स्वराला कमीपणा दाखवत. त्यांनी ठरवलेल्या मुलीशीच पृथ्वी चे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा होती. सगळीकडे त्यांचे बारीक लक्ष होते.

थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की लग्नाची सगळी तयारी व्यवस्थित झाली होती पण चांदीची भांडी कुठेच दिसत नव्हती. हीच ती संधी साधून त्यांनी सुमनला बोल लावले. तिला कमी लेखू लागले. सर्वांसमोर तिचा अपमान केला. ही गोष्ट स्वराच्या पर्यंत जाऊ नये यासाठी सुमन त्यांना समजावून सांगत होती. त्यांना हळू बोलण्यासाठी सांगत होती.

सुमन फक्त आणि फक्त स्वराच्या प्रेमासाठी स्वतःचा आत्मसन्मान सोडून त्यांच्यापुढे हात जोडत होती. ती कमीपणा घेत होती. कारण चूक तिच्याकडूनही झाली होती. तिनेच मुलीच्या प्रेमासाठी हे सगळे देण्याचे कबूल केले होते. पण आता या टप्प्यावर ती काय करणार होती? तरीही ती त्यांना शांत होण्यासाठी सांगत होती. पण पृथ्वी चे बाबा मुद्दाम तिथे कांगावा करत होते. तिला कमीपणा दाखवत होते.

बाहेर खूप गोंधळ, गडबड चालू होता. हे सगळे स्वराला ऐकू गेले. ती बाहेर काय गोंधळ चालू आहे ते पाहण्यासाठी आली. पण सुमनने तिला काहीतरी सांगून परत आत पाठवले. स्वरा शांत बसणाऱ्यातली नव्हती. शेवटी सगळ्या गोष्टी तिला समजल्या आणि ती स्वतःचे लग्न मोडून स्वाभिमानाने आईला घेऊन घरी आली.

पहाटे चार पर्यंत सुमन याच विचारात होती. तिला काही केल्या झोप येत नव्हती. मागचे सगळे तिला आठवत होते. पहाटे चार वाजता कुठे तिचा डोळा लागला आणि ती शांत झोपली.

सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा बरेच उजाडले होते. खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. तिने घड्याळात पाहिले तर नऊ वाजले होते. "अरे बापरे, आज उठायला खूपच उशीर झाला." असे म्हणून ती डोळे चोळतच उठून बसली. तिने समोर पाहिले तर स्वरा हसतच चहाचा कप घेऊन उभी होती.

"आई तुला मी आत्ताच उठवायला येत होते. तोपर्यंत तू उठून बसलीस. चल ऊठ ब्रश करून ये बघू. मी तुझ्यासाठी चहा केला आहे तो घे." स्वराचे हे बोलणे ऐकून सुमनला बरे वाटले. आपली लेक सावरली आहे हे पाहून लगेच ती फ्रेश होण्यासाठी गेली.

सुमन आल्यानंतर तिने स्वरा कडे पाहिले आणि तिने हसण्याचे अवसान चेहऱ्यावर आणत थोडीशी हसली. "तू घेतलास का चहा? आणि हो मी केला असता ना! तू कशाला करत बसलीस? मला उठायचं तरी." सुमन

"मला माहित आहे आई, तुला रात्री लवकर झोप लागली नसेल. म्हणूनच म्हटले, थोडा वेळ झोपू दे. तुला उठवले नाही आणि हो स्वयंपाक तयार आहे. मी डबा घेऊन कॉलेजला जाणार आहे म्हणून मीच सगळे बनवले. तू आता निवांत रहा." स्वरा

सुमनने स्वराला बसायला सांगितले आणि ती म्हणाली, "गुणाची माझी पोरं. किती सहनशीलता आहे तुझ्या मध्ये.. स्वरा तुला कसं काय जमत ग हे सगळं. इतका धीटपणा तुझ्या मध्ये कुठून येतो ग? जणू दुर्गामाता संचारल्या सारखीच संचारली होतीस. एवढ्या सर्व लोकांच्यात बोलण्यासाठी तुला धैर्य कुठून येते ग? तुला भीती वाटली नाही का?" असे अनेक प्रश्न सुमनने स्वराला विचारले

"अगं आई, तुझीच तर शिकवण आहे ती.. चुकीला चूकच म्हणायचे, मग ते कोणीही असो! कितीही जवळची व्यक्ती असली तरी चुकीचे बरोबर म्हणून कोणाची फसवणूक अजिबात करायची नाही. शिवाय आत्मसन्मान हा जास्त महत्त्वाचा.. तू मला इतकं चांगलं शिकवण देतेस आणि स्वतः च का त्याचे पालन करत नाहीस? त्यांना त्यावेळेस तू नकार द्यायला हवे होतीस. काय गरज होती त्यांच्या पाया पडायची? आपली मुलीकडची बाजू हे मान्य.. पण आपली परिस्थिती पण पाहायला हवे होते ना!" स्वरा आईला समजावत होती.

"हो ग बाळा, मी खूप पैशांची जुळवाजुळव केली पण चांदीची भांडी घेण्याची मला जमले नाही. तुझे प्रेम तुला मिळावे अशी खूप इच्छा होती पण ते काही मला शक्य झाले नाही. या आईला तू माफ कर. तुझे बाबा आत्ता असते तर त्यांनी तुझे सगळे हट्ट पुरवले असते. तुझ्यासाठी कुठूनही पैसा गोळा केला असता. पण तुझी आई तुझ्यासाठी इतकंही करू शकली नाही." सुमन असे म्हणून रडू लागली.

"हे काय आई, इतक्या कष्टाने तू मला शिकवण दिलेस, मला सांभाळलेस हेच खूप आहे.. बाकी मला कशाचीच अपेक्षा नाही.. चांगले संस्कार देणे जास्त महत्त्वाचे आहे.." स्वरा

"हो ग बाळा, इतक्या लहान वयात तुला खूप समज आहे. तू खरंच माझी मुलगी आहेस म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो." असे म्हणून सुमनने स्वराला कुशीत घेतले.

क्रमशः

🎭 Series Post

View all