Login

आत्मसन्मान 29

Marathi story


स्वरा तिच्या आईला घेऊन तिच्याकडून हळद स्वतःच्या गालाला लावून घेतल्यानंतर सगळ्या बायका कुजबुजू लागल्या. "हिला शोभते का हे? तसे कुणी करतं का? आईला तरी अडवायला काय झालं होतं? आपल्या लेकीच्या लग्नातच विघ्न निर्माण करत आहे कसली आई आहे? तिथे जायचेच नाही कशाला जायचे पुढे पुढे करून?" असे एक ना अनेक बोल सुमनच्या कानावर ऐकू येत होते.. तिला खूप वाईट वाटले. ती काहीही न बोलता मान खाली घालून बाजूला येऊन उभी राहिली.

"स्वरा, अगं हे तू काय केलंस? ही असली प्रथा आमच्या इथे चालत नाही. आमच्याकडे सगळं काही रीती, परंपरेनुसार च होतं आणि ही काय नवीन प्रथा चालू केली आहेस? विधवा स्त्रीने कधी हळद लावली होती का? अगं त्यांना कोणताच मान दिला जात नाही. हे तू चुकीचे केलीस. आम्हाला या गोष्टी पटल्या नाहीत. हे आमच्यात चालत नाही. तू हे असे करायला नको होतीस. तू चुकलीस." सगळे स्वरालाच बोल लावत होते.

"मी काहीही चुकीचे केले नाही. माझ्या आईने मला लहानपणापासून कष्टाने मला वाढवले आहे. अगदी खडतर परिस्थितीत तिने मला योग्य संस्कार दिले आहेत, माझे बाबा माझ्या लहानपणीच गेले तरीही तिने माझ्यासाठी स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून माझ्या आवडी-निवडी जपल्या, मला चांगले शिक्षण दिले, मला घडवले आणि आत्ता सुद्धा माझ्या साठी माझ्या प्रेमासाठी माझे लग्न लावून देत आहे. इतकं सगळं तिने करायचं आणि आता तिच्या काळजाच्या तुकड्या च्या लग्नात तिने साधी हळद ही लावू नये हा तिच्यावर झालेला अन्याय आहे आणि हे मला मान्य नाही आणि हो कोणत्या जमान्यात राहता तुम्ही.. मान्य आहे पूर्वापारपासून काही रीतीरिवाज झालेल्या आहेत. पण ते आपणच कोठेतरी मोडायला हवे ना! माझे म्हणणे आहे की आजपर्यंत आईने माझा योग्य पद्धतीने सांभाळ केलेला आहे तर माझ्या लग्नात हळद सुद्धा तिनेच लावायला हवी शिवाय माझे कन्यादानही तीच करेल." स्वराने सर्वांना ठणकावून सांगितले.

"अग स्वरा, हे चुकीचे आहे. तुला असे काहीही करता येणार नाही. तुला या गोष्टीला मान्यता मिळणार नाही. आमचे देखील समाजात काही इज्जत आहे, तू त्याचे धिंडवडे उडवू नकोस.. समाजातील लोक आम्हाला मानतात आमची एक प्रकारची प्रतिष्ठा आहे विसरु नकोस. तू चांगलं वाग. आम्हाला हे पसंत नाही." पृथ्वी ची आई

"अहो आई, पण माझे म्हणणे तरी समजून घ्या.." असे स्वरा पुढे बोलणार होती पण सुमनने तिला लगेच अडवले. तिला खुणेनेच शांत बसायला सांगितले ते पाहून स्वरा शांत बसली.

सगळे वातावरण शांत शांत झाले होते. पृथ्वीने लगेच बोलायला सुरुवात केली. "अरे, चला चला कोण कोण डान्स करणार आहात चला." असे म्हणून म्युझिक सुरु झाले आणि सगळेजण डान्स करू लागले. अशाप्रकारे हळदीचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. सुमन ला तिच्या लेकीचा अभिमान वाटत होता. आपली लेक इतक्या लोकांसमोर धाडसाने बोलली. स्वतःचे मत तिने मांडले. याबद्दलची तिला लेकीचा गर्व वाटू लागला.

मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आता लग्न तेवढेच शिल्लक राहिले होते. लग्नाची तयारी दोन्हीकडच्या मंडळींची जोरदार सुरुवात होती. पृथ्वी आणि स्वराला एक होण्यासाठी फक्त अक्षता पडायच्या बाकी होत्या. तसे ते मनाने एकत्र आलेले होते. लग्नाची तयारी करण्यामध्ये सगळे गुंतले होते. त्यात पृथ्वी कडच्या लोकांनी सुमनला अट घातली होती, त्यामुळे ती काळजीत होती. प्रत्येक गोष्टीत ती काटकसर करत होती, पण तिने कोणापुढे हात पसरला नाही.

लग्नाची तयारी करताना सुमनला पावलो पावली पैशाची काळजी लागून राहिली होती. तरीही तिने हसत करत सारं काही केले. चेहऱ्यावर थोडी सुद्धा चिंता दाखवून दिली नाही. आज जर आकाश असता तर मला कसलीच चिंता नसती, पण तरीही मी सगळं काही करेन माझ्या लेकीसाठी मी तिचा आई बाबा दोन्ही बनून कशाचीही कसूर सोडणार नाही. असे तिने ठाम ठरवले.

त्या दिवशी रात्री सुमन अशीच बसली होती. ती लग्नाची तयारी करून खूप दमली होती. तिचे मन दाटून आले होते. आपली लाडकी लेक आता सासरी जाणार म्हणून मन भरून आले होते. पण ती व्यक्त कोणापुढे होणार.. लेकी समोर व्यक्त झाले तर तिलाही दुःख होईल, वाईट वाटेल त्यापेक्षा आपले दुःख आपल्यापाशीच असे म्हणून ती तशीच बसली. थोड्या वेळानंतर तिची डायरी तिने काढून लिहिण्यास सुरुवात केली. तिने आकाशलाच पत्र लिहायचे ठरवले आणि ती लिहू लागली. जणू ती आकाशलाच पत्र लिहत होती. मनातल्या भावना कागदावर टिपत होती. आसवांना मोकळी वाट देत होती.

प्रिय सख्या,
तू म्हणत असशील ना! की मी आज कसे काय तुला पञ लिहीत आहे? ते ही इतक्या वर्षांनी. तर ऐक ना सोन्या, अरे रागावू नकोस रे. मला तुझी आठवण येत होती रे, पण आपल्या पिलासाठी मी मन घट्ट केले आणि तिलाही तुझी आठवण येऊ दिली नाही. कारण रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करून लढायला तेच तर शिकवले होतेस ना! आणि तू दिलेली शिकवण जर मी पाळले नसते तर तूच रागावला असतास ना रे माझ्यावर.

तर आजच का मी तुला पञ लिहीत आहे? हे सांगायचे राहिलेच. अरे, उद्या आपल्या छकुलीचे लग्न आहे. अरे हो हो आपल्या छकुलीच. आता आपली छकुली मोठी झाली आहे. मी तिला डाॅक्टर बनवत आहे. आठवतंय ना तुला, ती लहान होती तेव्हा तुझ्याकडे येऊन म्हणायची, “बाबा आ करा. मी तुमचे दात तपासणार आहे.” आणि तू पण लगेच तिच्या एवढा होऊन तिच्याशी खेळायचास. तेव्हाच आपण ठरवलं होतं की छकुलीला डाॅक्टर करायचं. ते स्वप्न मी पूर्ण करत आहे.

आपली छकुली एक डाॅक्टर होणार आहे आणि हो तिचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशीच करून देत आहे बरं का. तुला आठवतंय आपल्या दोघांचेही लव्ह मॅरेज झाले होते. आपण तर अगदी काॅलेज मध्ये असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात होतो. आपलं ते भेटणं, चोरून तासन् तास बागेत बसणं, भेळपुरी खाणं काय काय करत होतो नाही आपण? अगदी फिल्मी.

तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून मग आपण पळून जाऊन लग्न केले आणि आपला संसार आपणच उभा केला.. कुणाच्याही मदतीशिवाय. तू जाॅब करायचास आणि मी शिलाई काम. तुझा पगार पण चांगला होता. त्यात आपलं सगळं भागायचं. असा आपला राजा राणीचा संसार चालू असतानाच अचानक मला उलट्या चालू झाल्या आणि माझी तब्येत बिघडली... तेव्हा तू किती घाबरला होतास? घाईगडबडीने तू मला दवाखान्यात घेऊन जाणार होतास. तेव्हा काकूच होत्या आपल्या सोबत त्या म्हणाल्या, “घाबरण्याचे काही कारण नाही तुम्ही आई बाबा होणार आहात." तेव्हा तू तर आनंदाने वेडाच झाला होतास.

त्यानंतर तू माझी खूप काळजी घेतली होतीस. मग छकुलीचा जन्म झाला. तिला बघून तू तर आनंदाने रडायलाच लागलास आणि हो संपूर्ण हाॅस्पिटलभर तू पेढे वाटला होतास हे विसरून कसे चालेल? किती भारी होतास रे तू. आपल्या छकुलीला जेव्हा हे सांगितले तेव्हा तिला किती आनंद झाला माहित आहे? ती म्हणाली, “मुलगा झाला की पेढे वाटतात पण मुलगी झाल्यावर पेढे वाटणारे माझे बाबा पहिलेच आहेत.” अरे खरंच आपल्या मुलीला तुझा खूप अभिमान वाटतो.

छकुलीचा जन्म झाल्यावर आपण ठरवलं होतं की ती ज्याला पसंत करेल त्याच्याशीच आपण तिचं लग्न करून द्यायच आणि मी तसंच केलं आहे. पृथ्वी नाव आहे त्याचं. खूप चांगला आहे. छकुलीनेच पसंत केलं आहे. तिची चाॅईस अगदी तुझ्यासारखीच आहे बघ. पृथ्वी इंजिनिअर आहे. त्याच कुटुंब मोठं आहे. त्याच्या घरच्यांना आपली छकुली खूप आवडली. तशी ती आवडण्यासारखीच आहे अगदी हुबेहुब तुझ्यासारखीच दिसते.

आपल्या छकुलीच्या लग्नाची खूप धावपळ सुरू आहे बघ. मी तिच्या लग्नात कशाचीही कमतरता भासू देणार नाही. तू असताना आपण जे जे केलं असत ते ते सगळं मी करणार अगदी सगळं........
अरे तिने तर मलाच कन्यादान करायला सांगितले आहे. मी म्हणाले, "मला चालत नाही" तर ती हट्टालाच पेटली आणि सासरच्यांची परवानगी घेऊन मलाच कन्यादान करायला सांगितले आहे. म्हणते कशी, “कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे करणार तू आणि ऐन मोक्याला कन्यादान दुसरे कुणी करायचं हे मला पटत नाही.” अगदी तुझ्या वळणावर गेली आहे.

पण खूप हळवी आहे रे. लग्न ठरल्यापासून खूप रडते आहे ते ही अगदी चोरून. का? तर मी रडू नये, मला वाईट वाटू नये म्हणून. तेही खरंच म्हण.. मी अगदी सगळं करेन रे, पण बाप हा बापच असतो ना रे. तुझी सर मला कशी येणार?

पण माझी एक विनंती आहे रे, आपली छकुली जेव्हा लग्न होऊन सासरी जाईल तेव्हा.... तिला आणि मला सावरायला तुम्ही हवे आहात....... आमच्या डोळ्यातील पाणी पुसायला तुम्ही हवे आहात....... येशील ना रे फक्त एक दिवसाकरिता ये. आपल्या पिलाला आशिर्वाद देऊन......कुशीत घे...... तिना बापाची माया काय असते? ते माहीत नाही रे....मी आई बाबा दोन्ही बनण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता बापाची सर मी कशी भरून काढू. म्हणून तू उद्याचा एक दिवस तेवढा ये..... येशील ना रे.....मी आणि आपली पिल्लू तुझी वाट पाहू.

फक्त आणि फक्त तुझीच,

अर्धांगिनी.

असे लिहून तिने भावनांना मोकळी वाट दिली. तिच्या डोळ्यांतून आपोआप आसवं ओघळू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all