Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 28

Read Later
आत्मसन्मान 28


स्वरा आणि पृथ्वीच्या लग्नाची तारीख ठरली. दोघेही खूप खूश होते. आता लग्न ठरले म्हटल्यावर सगळी तयारी ही आलीच. अखेर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्नासाठी साड्या, दागिने खरेदी करायचे होते. लग्न लवकरात लवकर व्हावे अशी पृथ्वीच्या बाबांची इच्छा होती. त्यामुळे खरेदी ही लवकरच करावी लागणार होती. सगळे दागिणे, साड्या वगैरे पृथ्वीचे बाबाच खरेदी करणार होते. त्यासाठी पसंतीला स्वरा आणि तिची आई येणार होत्या. पृथ्वी त्याचे आई बाबा आणि आत्या काकू वगैरे साडीच्या मोठ्या दुकानांमध्ये गेले होते. प्रत्येक वेळी त्यांच्या घरातील सगळ्या स्त्रिया त्या दुकानातूनच खरेदी करत असल्यामुळे लग्नाच्या साड्या सुद्धा त्या दुकानातून खरेदी करण्याचे ठरले.

स्वस्तिक या दुकानांमध्ये येण्यासाठी पृथ्वी ने स्वराला सांगितले होते. पृथ्वी कडची सगळी मंडळी दुकानात येऊन बसली तरी स्वरा अजून आली नव्हती. पृथ्वी सारखा तिला फोन करत होता पण ती काही फोन उचलत नव्हती.

"ही फोन का उचलत नाही? येणार तर आहे ना! की यांचा काही दुसरा प्लॅन आहे." असे मनातच पृथ्वी म्हणत असतानाच एक रिक्षा दुकाना समोर येऊन थांबली. रिक्षातून दोघीही मायलेकी उतरल्या. ते पाहून पृथ्वी चे बाबा आणि त्या मंडळींनी नाक मुरडले. "किमान कॅबने तरी यायचं ना! रिक्षाने येऊन आमची सगळी इज्जत घालवत आहेत. आम्ही कोणत्या घराण्यातले आमच्या घराण्याला शोभेल असे वागायला यांना कळत कसे नाही?" असे ते मनातच म्हणाले. त्यांना खूप राग आला होता तरीही मुलासाठी ते शांत बसले.

"सॉरी खूप उशीर झाला का? रिक्षाच मिळाली नाही." स्वरा आत येतच म्हणाली. ते पाहून पृथ्वीचे बाबा आणखीनच चिडले.

"किमान कॅबने तरी यायचं ना!" त्यातील एक बाई टोचून बोलल्यासारखे बोलली. ते ऐकून सुमनला थोडेसे वाईट वाटले. पण तिने तिकडे लक्ष दिले नाही. सुमला नेहमी वाटायचे आपली परिस्थिती आहे ते पाहूनच आपण श्रीमंती दाखवायची. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीप्रमाणे तिला वागायला आवडायचे. ती कधीच आवाक्याबाहेर खर्च करत नव्हती. आता तर लग्नासाठी तिला खर्च करावे लागणार होते त्यामुळे वायफळ खर्च न करता ती पैसे जपूनच वापरत होती.

ते सगळे जण साड्या पाहू लागले. स्वराला कोणती साडी आवडेल किंवा कोणती साडी सूट होईल? याप्रमाणे साड्या ड्रेस पाहू लागले. स्वरा नेहमीप्रमाणे साड्यांची किंमत पाहू लागली. तिने इतके महाग कपडे आजपर्यंत कधी घेतले नव्हते. पण लग्नासाठी पृथ्वीच्या घरच्यांनी त्यांच्या पद्धतीने कपडे काढले. पृथ्वीच्या घरच्यांनी स्वरासाठी एक साडी पसंत केली. ती खूपच सुंदर होती. त्याची किंमत पाहून स्वरा हादरली. "बापरे इतके महाग कपडे.." असे ती मनातच म्हणाली.

साड्यांची वगैरे खरेदी करून झाल्यानंतर बाकी पृथ्वीच्या घरातल्या स्त्रिया साड्या खरेदी करू लागल्या. सगळे जण आपापल्या कामात व्यस्त असताना पृथ्वीने हळूच स्वराचा हात पकडला आणि तिला बाजूला घेऊन गेला.

"हे तुला खूप सुंदर दिसेल. हे घे ना." असे म्हणून पृथ्वीने शॉर्ट वन पीस तिच्या हातामध्ये ठेवला. ते पाहून स्वरा लाजली. "तुझं आपलं काहीतरीच असतंय हं.." असे ती म्हणाली.

"काहीतरीच काय? आता आपलं लग्न होणार आहे आणि हो तू यामध्ये खूप सुंदर दिसशील." असे म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहिला. स्वराचे मात्र लाजने सुरूच होते. ती जमिनीकडे पाहत बोटाने जमिनीवर फिरवत होती. पृथ्वीने हळूच तिच्या हनुवटीला धरुन चेहरा वर केला आणि तिला कमरेमध्ये पकडून तिच्या अगदी जवळ गेला. हे सगळे घडताना स्वराच्या छातीत धडधड वाजू लागले. तिच्या अंगावर शहारे आले. ती मोहरुन गेली. आता पृथ्वी तिच्या ओठांवर ओठ टेकवणार होता. स्वराची धडधड वाढत होती. पृथ्वी जसा तिच्या जवळ येत होता तस-तशी तिच्या मनाची चलबिचल वाढत होती. आता पृथ्वी ओठ टेकवणारच.. इतक्यात स्वरा तेथून निसटली आणि "हे सगळं लग्नानंतर.." असे म्हणून ती पळत त्या आईजवळ जाऊन बसली.

"कुठे गेली होतीस?" सुमन

"इथेच तर होते आई.. त्या बाजूला कपडे पाहत होते.." असे म्हणून स्वरा गालात हसली.

सगळी कपड्यांची आणि सोन्याची खरेदी करून झाल्यानंतर दोघी घरी आल्या.. आता मेहंदी च्या कार्यक्रमाच्या तयारीला लागल्या. मेहंदी काढण्यासाठी पृथ्वीने दोन आर्टिस्टना पाठवले होते. दोन हात आणि दोन्ही पाय भरून मेहंदी अगदी रेखीव काढण्याचे काम करत होते. अनघा आणि तिच्या काही मैत्रिणी त्या दिवशी डान्स करण्यासाठी आल्या होत्या. सुमनने जेवढे शक्य होईल तेवढे हॉल सजवले होते. फुलांच्या माळा आणि प्लास्टिक चे बॉल्स, फुगे यांनी हॉल सुंदर सजला होता. हलकेसे म्युझिक सुरु झाले आणि स्वराच्या मेहंदी च्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हे सगळे पाहून स्वराला खूप छान वाटत होते. सुमनलाही खूप आनंद झाला होता. आपल्या मुलीचे हौस-मौज होत आहे हे पाहून ती सुखावली होती. फक्त हे सगळे अनुभवण्यासाठी तिचे बाबा तेवढे असायला हवे होते.

बर्‍याच वेळाने मेहंदीचा कार्यक्रम संपला. रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. सुमन आणि स्वरा दोघीही खूप आनंदात होत्या. मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर दोघीही झोपल्या. दुसऱ्या दिवशी स्वराने पाहिले तर मेहंदी ला खूप सुंदर असा रंग आला होता. ती फक्त मेहंदी न्याहाळतच बसली होती. तेव्हा तिकडून सुमन आली. "अरे वा! मेहंदी ला खूप सुंदर रंग चढला आहे म्हणजे नवऱ्याचे प्रेम खूप आहे असे दिसते." ते ऐकून स्वरा लाजली आणि "आई तुझं आपलं काहीतरीच असतंय हं.." असे म्हणाली

"अगं हो, आमच्या लहानपणी म्हणायचे मेहंदी खूप रंगली की नवऱ्याचे प्रेम खूप असते म्हणून म्हणाले.. बाकी त्याचं लॉजिक वगैरे खूप वेगळं आहे.." असे म्हणून सुमन गालातच हसली. तिची सारखी धावपळ चालू होती. एकुलत्या एक लेकीचं लग्न त्यात कोणताच कसूर होता कामा नये यासाठी ती प्रयत्न करत होती. प्रत्येक क्षण ती जगत होती. जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या लेकीला मिळावे यासाठी ती झटत होती.

हळदीचा कार्यक्रम मात्र मोठ्या हॉल मध्ये ठेवण्यात आला होता. पृथ्वीला आणि स्वराला दोघांनाही एकाच ठिकाणी हळद लावण्यात येणार होती. हळदीचा कार्यक्रम पृथ्वीच्यांनी ठेवला होता त्यामुळे सुमन ला थोडातरी वेळ येणार होता. हळदी च्या कार्यक्रमासाठी स्वराने पिवळी साडी नेसली होती. शिवाय तिने हळदीचे मोत्याचे दागिने सुद्धा घातले होते. स्वरा खूप सुंदर दिसत होती. जेव्हा ती हॉलमध्ये गेली तेव्हा पृथ्वी फक्त तिच्याकडे पाहत होता. पिवळ्या साडी मध्ये तिचा गुलाबी गुलाबी चेहरा खूपच खुलून दिसत होता. पृथ्वीला तर तिला पाहून काहीच समजेनासे झाले.

स्वरा येऊन पृथ्वीच्या शेजारी बसली आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक व्यक्ती येऊन त्या दोघांना हळद लावू लागली. स्वराला ही मनात खूप वाटत होते की माझ्या आईने सुद्धा मला हळद लावावी. तिने तसे दोन तीन वेळा सुमनला खुणावले पण सुमन काही केल्या गेली नाही.. तिचे धाडस झाले नाही. ती एक विधवा होती आणि विधवा स्त्रियांना कोणत्याही कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही त्यात पृथ्वीकडचे इतके श्रीमंत त्यामुळे सुमन ला अजिबात धाडस झालेच नाही.. स्वराने बोलावून देखील सुमन काही गेली नाही. लोक काय म्हणतील? आपल्या मुलीच्या लग्नात आपणच विघ्न आणतोय असे तिला सारखे वाटत होते. त्यामुळे ती तशीच जास्त बसून राहिली. पृथ्वीकडच्या मंडळींनी सगळ्यांनी एक एक करत त्या दोघांना हळद लावली. हळदीमध्ये ती आणखीनच खुलून दिसत होती. पृथ्वीने सुद्धा पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता त्यामध्ये तो आणखीनच हँडसम दिसत होता. कुर्ता आणि धोती त्याने घातली होती. सर्वांनीच या दोघांना हळद लावून झाल्यानंतर एकमेकांना लावू लागले.

बऱ्याच वेळा बोलून देखील आई काही केल्या येईना म्हणून स्वराने सर्वांच्या समोर तिला जोरात हाक मारली.. "आई ग, ये ना! तू सुद्धा हळद लाव.. मुलीला हळद लावायला इतका घाबरतेस." स्वराचे हे वाक्य ऐकून हॉलमध्ये एक प्रकारची शांतता पसरली. सगळेजण आहे त्या जागी तसेच उभारले आणि एकमेकांकडे पाहू लागले. सुमन ला देखील क्षणभर काहीच सुचले नाही.

"स्वरा बाळा मला चालत नाही ग. मी एक विधवा आहे. विधवा स्त्रीयांनी कोणत्या कार्यक्रमात पुढाकार घ्यायचा नसतो. तुझे जे चालू आहे ते असू दे. मी काही येत नाही.. बाकीचे सगळे हळद लावत आहेत ते लावून घे बाळा.. मी लावू शकत नाही." असे सुमनने तिचे म्हणणे स्पष्टच स्वराला सांगितले. ते ऐकून स्वराला खूप वाईट वाटले तिला क्षणभर काहीच कळले नाही.

मुलीला जन्म आईनेच द्यायचा.. सार काही पालन-पोषण अगदी खडतर परिस्थितीमध्ये तिनेच करायचे, तिला चांगले शिक्षण द्यायचे, तिला चांगले संस्कार द्यायचे, तिला घडवायचे.. सार काही आईने करायचे आणि लग्नामध्ये त्याच मुलीला हळद लावायचा अधिकार सुद्धा तिला नाही.. हा कसला न्याय.. लोक काय म्हणतील? या भीतीने स्वतःच्या लेकीला हळद लावायची सुद्धा तिला सक्ती नाही.. इच्छा असूनही तिला काहीच करता येऊ नये.. अशा प्रश्नांनी स्वराच्या मनाची चलबिचलता चालू होती..

स्वरा तशीच उठली आणि आई जवळ गेली. आई चा हात तिने दोन्ही हाताने पकडला आणि तिचे हात धरून तिला आपल्या जवळ आणले. स्वतःच्या हातानेच तिचे हात धरून हळदीच्या वाटीमध्ये सुमनचे हात बुडवले आणि स्वतःच्या गालाला हळद लावून घेतले. तसेच पृथ्वीला देखील तिने आईचा हात धरुन पृथ्वीच्या गालाला हळद लावली. ते पाहून सगळे लोक त्या दोघींकडे पाहत उभे राहिले.
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..