"पण तरीही माझे म्हणणे असे आहे की एखादा मुद्दा पटत नसेल, चुकीचा असेल तर तो चुकीचाच म्हणावा. यामध्ये कोणताही स्वार्थ नसावा. लग्नानंतर सुद्धा तू चुकीला चूकच म्हण. एकाद्या वेळेस जर माझे चुकले असेल तर मला चूक म्हटलास तर मला काहीच वाटणार नाही पण अयोग्य गोष्टीला तू साथ दिली तर ते मला चालणार नाही. तू नेहमी योग्य आणि सत्याचीच बाजू घ्यायची." स्वरा ठामपणे म्हणाली.
"अगं माझा स्वभाव तुला अजूनही कळाला नाही का? मी चुकीच्या गोष्टीला चूकच म्हणतो पण मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला मी कधीच आवाज वाढवून किंवा एकेरी शब्दाने बोलत नाही. मग ते कोणीही असो." पृथ्वी
"आता यावेळी ठीक आहे पण पुढच्या वेळेस मी तुला माफ करणार नाही." स्वराने तिचे मत सांगितले
"बरं माझी आई, आता आपले लग्न ठरले आहे. थोडेसे रोमँटिक, प्रेमाने बोलूया का? की सुरुवातच भांडणाने करायची. थोडंसं गोड गोड बोललो तर काय डायबिटीस होणार आहे का?" पृथ्वीचे हे बोलणे ऐकून स्वराला हसू आले ती हसू लागली.
"अशीच नेहमी गोड हसत राहा. हसल्यावरच तू खूप छान दिसतेस. तुझ्या चेहर्यावर असेच हसू राहण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन. तुला कधीच दुःख होऊ देणार नाही. नेहमी तुझी साथ देईन." पृथ्वी
"मी सुद्धा नेहमी तुझ्या सोबत असेन. कितीही संकटे आली तरी तुझी साथ सोडणार नाही." पहिल्याच दिवशी त्या दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केले. दोघेही बराच वेळ बोलत बसले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागले होते. आता तर लग्न ठरले म्हटल्यावर त्यांना अडवणार तरी कोण?
त्या दोघांचे लग्न ठरल्यापासून सुमनला एकच प्रश्न पडला होता की इतके पैसे गोळा करायचे कसे? किती पैसे होतात याचा हिशोब करत ती बसली. सगळे करून झाल्यानंतर तिला असे लक्षात आले की फक्त लग्नाचा खर्च त्यातून निघतो. चांदीची भांडी घेण्यासाठी पैसे काहीच शिल्लक राहत नाही. आता मोठ्याने लग्न करायचे म्हटल्यावर पैसे देखील तितकेच लागणारच. मग तितके पैसे सुमन जवळ असायला हवे.
सुमने स्वरा साठी खूप काही त्याग केले होते. तिला वाढवण्यासाठी तिने खूप कष्ट केले होते. आकाशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वराला डॉक्टर बनवण्यासाठी तिने खूप हालअपेष्टा सोसल्या होत्या. पै पै गोळा करून तिचे शिक्षण पूर्ण करत होती. सारं काही ठरवल्याप्रमाणे घडत होते. पण आता लग्नाचा खर्च एवढा येईल असे तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मुळात तिने लग्नाचा विचारच केली नव्हता. शिक्षण पूर्ण होण्यासाठीच ती धडपडत होती. एकदा का शिक्षण पूर्ण झाले की मग लग्नासाठी पैसे जमा करण्याच्या प्रयत्नात ती होती. पण तिच्यासमोर हे वेगळेच वाढले होते. अचानक स्वराच्या लग्नाचा खर्च आला. आता यासाठी काय करावे? हा मोठा यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा होता. स्वराला वाढवताना तिने कसलीच अपेक्षा केली नाही की स्वतःसाठी ती जगली नाही. साधी एखादी सोन्याची चेन सुद्धा स्वतःला साठी तिने कधी घेतलीच नाही. स्वतःच्या भावनांना मारून ती मुलीसाठी जगत होती. कोमेजलेल्या फुलाप्रमाणे फक्त जगत होती.
या सगळ्याची कल्पना स्वराला मुळीच नव्हती. तिला वाटत होते की पृथ्वीच्या आई बाबांनी लग्नाला संमती दिली म्हणजे तेच लग्न करून देणार असतील. स्वराला यातील कोणतीच गोष्ट माहीत नव्हती. स्वराला काय पृथ्वीला देखील काहीच माहीत नव्हते. पृथ्वीच्या घरच्यांनी भटजीं कडून एक तारीख घेतली आणि त्या तारखेला या दोघांचे लग्न करूया असे त्यांनी सुमनला कळवले. ती तारीख ऐकून सुमनच्या पोटात गोळाच आला. आता पैशाबद्दल कोणाला सांगावे आणि काय करावे? हे तिला समजेना. जेवढे पैसे जमले आहेत तेवढेच घेऊन लग्न पार पाडावे. नंतर पुढचे पुढे पाहता येईल असे तिने मनातच निर्णय घेतला. या गोष्टींबद्दल तिने कोणा समोरही अवाक्षर काढले नाही.
प्रत्येक जण लग्नाच्या तयारीला लागले होते. सुमन देखील लग्नाच्या तयारीला लागली. स्वरा एकुलती एक मुलगी असल्यामुळे सुमनने तिच्या लग्नात कोणतीच कसूर सोडू नये यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत होती. लेकीसाठी सगळ्या गोष्टींची अगदी पूर्तता करत होती. कोठेही बोट ठेवायला जागा शिल्लक राहू नये म्हणून ती प्रयत्न करत होती. परिस्थिती जरी कमजोर असली तरी सुद्धा लेकीच्या लग्नासाठी जे जे काही करता येईल ते, जे काही शक्य होईल ते सगळे काही ती करत होती.
लग्न ठरल्यापासून असेल किंवा सगळ्या तयारीमुळे स्वराच्या चेहर्यावर एक प्रकारचे तेज आले होते. आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपले लग्न होत आहे याचा तिला खूप आनंद झाला होता. पृथ्वीची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. तो ही खूप आनंदात होता. त्याचा आनंद पाहून घरच्यांनाही खूप बरे वाटले. पण स्वराची आई सगळा खर्च करेल की नाही याची खात्री मात्र कोणालाच नव्हती. पृथ्वीच्या बाबांनाही थोडी शंका वाटत होती. जर का लग्नाचा खर्च तिने उचलला नाही तर काही करून लग्न मोडायचे असाच त्यांनी मनात ठाम निर्धार केला होता.
लग्न मोठ्याने करण्यासाठी मेहंदीचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम असे वेगवेगळ्या दिवशी करण्याचे ठरवले होते. स्वरा ही एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचे सारे काही हौस-मौज करण्याकडे सुमन कल होता.
बाबा असताना ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या असत्या त्या सगळ्या गोष्टी सुमन करत होती. आपल्या लेकीला तिच्या बाबांची आठवण कधीच येऊ नये यासाठी ती झटत होती.
त्या रात्री काही केल्या सुमनला झोपच येईना. ती फक्त आतबाहेर करत होती. तशीच बसून राहिली, पुस्तक वाचू लागली तरी मन रमेना. मोबाईल घेतला तरी मन रमेना, म्हणून ती बाहेर येऊन तशीच बसली. स्वराला देखील झोप येत नव्हते म्हणून ती सुद्धा उठून बाहेर आली आणि तिने पाहिले तर तिची आई अंधारात एकटीच बसून होती.
"आई, तू अंधारात अशी का बसली आहेस?" स्वरा
"काही नाही ग, मला झोपच येईना म्हणून बाहेर आले आहे. तू सुद्धा अजून झोपली नाहीस." सुमन
"मला पण झोप येत नव्हती म्हणून बाहेर आले तर तू दिसलीस." असे म्हणून स्वरा येऊन सुमनच्या मांडीवर डोके ठेवून तिथेच झोपली.
"माझं बाळ कधी इतकी मोठी झालीस कळलेच नाही ग.. इवल्याशा पावलांनी घरभर लुटुलुटु पळतानाची माझी स्वरा आता लग्नाच्या बोहल्यावर चढणार.. मुली किती लवकर मोठ्या होतात ना! त्या इथेच रहाव्यात असे वाटते पण परमेश्वराने निर्माण केलेले आहे तसेच जगावे लागणार.
"आई मी तुला सोडून कधीच जाणार नाही. मी तुझ्यापाशीच राहते. मी लग्न करत नाही. मला तूच हवी आहेस." स्वरा हळवी होऊन म्हणाली.
"वेडाबाई! कितीही काहीही झालं तरी लग्न हे करावंच लागतं. आयुष्याचा जोडीदार असावाच लागतो. आत्ता नाही तरी उतारवयात त्याची गरज ही भासतेच आणि तू प्रेम केले आहेस ना! मग आता लग्न का नको म्हणतेस?" सुमन
"आई तू एकटीच आहेस ना! मग.. बाबा तर कधीच सोडून गेले तुला. तू काय करणार? एकटीच आयुष्य काढणार ना!" स्वरा
"प्रत्येकासाठी देवाने काही ना काही वाढून ठेवलेले असते. माझ्यासाठीही काहीतरी असेलच ना! तू सगळा विचार सोड आणि भावी आयुष्याची स्वप्ने पहा." सुमन
"पण आई, मी म्हणत होते की..." सुमनने स्वराला मधेच अडवले.
"पण बिन काही नाही.. तू झोप जा आता.. खूप उशीर झालाय." सुमन
"बरं आई, तू पण झोप चल." असे म्हणून स्वराने सुमनचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन गेली. तिथे आईला झोपवून ती तिच्या उशाशी बसली. बऱ्याच वेळाने दोघींना झोप लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा