Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 26

Read Later
आत्मसन्मान 26


पृथ्वी आणि स्वरा आता एक होणार होते. दोघेही खूप आनंदात होते. पृथ्वीच्या घरचे स्वराला मागणी घालण्यासाठी येणार होते. स्वरा आणि सुमन ने मिळून घरची सगळी स्वच्छता केली होती. जेणेकरून त्या लोकांना घरात प्रसन्न वाटेल.

अखेर पृथ्वीच्या घरचे स्वराला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी आले. पृथ्वी, त्याचे आई बाबा आणि त्याची आत्या असे चौघे जण आले होते. जेव्हा ती मंडळी आली तेव्हा सुमन त्यांचे स्वागत करण्यासाठी गेली. त्यांना आत बोलावले. पृथ्वी चे आईबाबा जेव्हा आत आले तेव्हा त्यांचा चेहरा वेगळाच झाला होता. जेणेकरून त्यांना ते घर आवडले नसावे हे स्पष्ट दिसत होते. पण तरीही सुमनने हसतच त्यांचे स्वागत केले. सुमनवर तसे संस्कारच झाले होते की आपल्या घरी कोणताही पाहुणा आला तरी त्याचे स्वागत हसतच करायचे.

ती मंडळी आत येऊन बसली. सुमनने त्यांना पाणी दिले तर त्यांनी पाणी घेतलेच नाही. उलट पाणी पाहून बिसलरी वापरत नाही का तुम्ही? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा काय उत्तर द्यावे हे सुमनला समजलेच नाही. ती तशीच उभी राहिली.

पृथ्वी ची आई घरात इकडे तिकडे सगळे पाहत होती तर त्याचे बाबा मोबाईल मध्ये डोके घालून बसले होते. सुमनशी कोणीच बोलेना. ते पाहून सुमनला खूप वाईट वाटले. श्रीमंत घराण्यात आपल्याला किंमत मिळेल का? असा मोठा प्रश्न तिच्या मनात चालू होता. पृथ्वी तेवढाच अगदी फ्री होऊन बोलत होता. तो तेवढाच सुमनला बरा वाटला. काही नाही किमान मुलगा तरी चांगला आहे असे मनात म्हणाली आणि याचेच समाधान वाटले.

स्वरा साडी नेसून चहा पोहे घेऊन आली. तिला साडीत पाहून पृथ्वी ची विकेटच उडाली. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. "काय सुंदर दिसतेय ही. अगदी अप्सराच." असे तो मनात म्हणाला. स्वराने पाहिले की पृथ्वी तिच्याकडेच पाहत होता, ते पाहून ती लाजली. ते पाहून पृथ्वी आणखीनच घायाळ झाला. स्वराने प्रत्येकाला पोहे दिले आणि ती समोरच बसली. ती मंडळी कशीबशी नाईलाजास्तव पोहे खाऊ लागले. खरंतर पृथ्वी च्या प्रेमाखातर मनाविरुद्ध तिथे आले होते. त्यांनी स्वराला पाहिले. आता तिला प्रश्न विचारण्याची वेळ आली.

"तुझे नाव काय?"

"स्वरा"

"बाबा काय करतात?"

"ते मी लहान असतानाच वारले. माझ्या आईनेच मला लहानाचे मोठे केले आहे. चांगले शिक्षण दिले आहे. आज मी जे काही आहे ते आईमुळेच आहे." स्वरा

"तुला लग्नानंतर शिक्षण बंद करावे लागणार. तुझे शिक्षण जेवढे आहे ते इथेच बास करून तुला संसारात लक्ष घालावे लागेल. हे तुला मान्य आहे का?"

"अजिबात नाही. मी डाॅक्टर बनावे ही माझ्या बाबांची इच्छा होती आणि ती माझी आई कष्ट करून पूर्ण करत आहे. सो मी माझे शिक्षण बंद करणार नाही. हवे तर शिक्षण पूर्ण झाल्यावर मगच मी लग्न करेन. तोपर्यंत तुम्ही थांबायला तयार आहात का?" स्वराने असे उत्तर दिल्यावर सुमनचे उर भरून आले. तिचे डोळे भरून आले होते पण तिने स्वतःला सावरले.

स्वरा च्या या उत्तराने पृथ्वी च्या बाबांना खूप राग आला पण ते शांत झाले. खूपच आगाऊ मुलगी आहे असे ते मनातच म्हणाले. चहा पिल्यानंतर त्यांनी बरेच प्रश्न स्वराला विचारले तर तिनेही अगदी व्यवस्थित त्याची उत्तरे दिली.

पृथ्वीच्या बाबांनी त्या दोघांना बोलण्यासाठी पाठवून दिले.
"तुम्ही दोघे बोलणार असाल तर जा. आता इथून पुढे आम्ही मोठी माणसे चर्चा करू. जा पृथ्वी तुम्ही दोघे बाहेर जा." असे म्हणून पृथ्वीच्या बाबांनी त्या दोघांना पाठवले. हे ऐकून स्वराने सुमनकडे पाहिले तेव्हा सुमनने देखील होकरार्थी मान हलवली ते पाहून स्वरा आणि पृथ्वी बाहेर गेले. ते दोघे बाहेर गेले याची खात्री झाल्यावर पृथ्वीचे बाबा बोलू लागले.

"आम्हाला तुमची मुलगी पसंत नव्हती. पण मुलाच्या इच्छेखातर आम्ही तयार झालो. तसे पहायला गेलो तर तुमच्या आणि आमच्या स्टेटसमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. पण तरीही मुलासाठी आम्ही शांत बसलो."

"तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला हे सगळे माहित आहे की तुम्ही श्रीमंत घरची लोकं.. आम्ही सर्वसामान्य लोकं. मुलांसाठीच आपण हे सगळे मान्य करत आहोत ना. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला." सुमन थोडीशी स्पष्ट बोलली.

"आमचं असं म्हणणं आहे की लग्नाचा सगळा खर्च तुम्ही स्वखुशीने करायचा आणि त्याशिवाय लग्नामध्ये चांदीची भांडी द्यायची. अर्थात हे तुम्ही स्वखुशीने देणार आहात यातील एक अक्षरही त्या दोघांना कळता कामा नये. आम्ही श्रीमंत आहोत पण लग्न हे आमच्या बरोबरीच्या मुलीशी व्हायला हवं आमचं मत होतं. पण आमचा मुलगा तुमच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि आम्हाला काहीच करता येईना. त्यामुळे तो लग्नाचा सगळा खर्च तुम्ही उचलायचा." हे पृथ्वीच्या बाबांचे बोलणे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या कष्टाने मुलीला डॉक्टर बनवत आहे पण आता हा परत खर्च म्हटल्यावर तिला झेपेल की नाही असे वाटू लागले. पण मुलीच्या लग्नासाठी, मुलीच्या प्रेमासाठी एवढे तरी करायला हवे असा तिने मनात ठाम निर्णय घेतला.

"तुम्ही हे सगळे मागत आहात ह्याला हुंडा असे म्हणतात. जर माझ्या मनाने मी स्वखुशीने घातले तरच ते खरे समजायचे. तुम्ही मागून घेणे हे तुम्हाला अजिबात शोभत नाही. शिवाय हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. हे तुम्हाला माहीत असेलच." सुमन

"आम्हाला काय शोभत आणि काय नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही. हे सर्व तुम्ही स्वखुशीने देणार आहात असे मी म्हटले आहे. तुम्हाला द्यायचं शक्य असेल तर सांगा नाहीतर आम्ही आमच्या मुलाला घेऊन जातो. त्याला काय सांगायचे? ते आम्ही सांगू आणि हो तुम्ही मुलीसाठी इतकंही इतकं करू शकत नसाल तर काय उपयोग तुमचा? काय तुमची लायकी आहे? आमच्या घरात येण्याची.." पृथ्वी चे बाबा

"अहो पण तुम्हाला काय कमी आहे? माझी सोन्या सारखी मुलगी मी तुम्हाला देत आहे यातच खूप काही समजा. मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीसाठी काही थोडेफार घालेनच. पण इतकं सगळं करण्याची मला गरज वाटत नाही." सुमनने स्पष्टच सांगितले.

"ठीक आहे. मग आम्ही जातो.." असे म्हणून पृथ्वीचे आई-बाबा जाऊ लागले. तेव्हा सुमनने विचार केला की मुलीसाठी आपण इतकही करू शकणार नाही का? त्यापेक्षा मुलीच्या आनंदासाठी, प्रेमासाठी आपण हे करुया. शेवटी ती सुखी तर मी सुखी असे ठरवले.

"ठीक आहे. मी हे सगळे द्यायला तयार आहे." असे म्हणूनच सुमनने देखील परवानगी दिली आणि ती मनातल्या मनातच सगळा हिशोब घालू लागली. पैसे कुठे ठेवलेत या सगळ्याचा हिशोब ती लावू लागली.

"मग लग्नाची तारीख आम्ही तुम्हाला कळवतो. त्याच दिवशी लग्न करू. लग्न ही लवकरात लवकर आटपून टाकू तसेही आमच्या घराण्यात खूप दिवस झाले काही कार्य झाले नाही. तेव्हा आमची तशी इच्छा आहे." पृथ्वी चे बाबा

"अहो स्वराचे अजून शिक्षण होणे बाकी आहे. तिचे शिक्षण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे ठरले आहे ना! तिचे शिक्षण पूर्ण होऊ दे मग लग्न करूया." सुमन

"अहो तुम्ही पण काय तिच्यासारखे आढेवेढे घेत आहात. लग्नानंतर शिक्षण करू दे की पूर्ण आम्ही कुठे अडवलंय? आणि मुलगी कितीही शिकली तरी तिला चूल आणि मूल सांभाळावे लागते. तुम्ही चार गोष्टी चांगल्या समजावून सांगाल असे वाटले होते. पण तुम्ही देखील शिक्षण शिक्षण करत बसला आहात." पृथ्वी चे बाबा

इतक्यात स्वरा आणि पृथ्वी दोघेही आले.
"चला पृथ्वी निघूया का आता? लग्नाची तयारी तर करायला हवी ना!" पृथ्वी चे बाबा

"लगेच लग्नाची तारीख! माझं शिक्षण तरी पूर्ण होऊ दे." स्वरा

"लग्नानंतर शिक्षण पूर्ण करायचं. दोन वर्षे ठरवून आम्हाला चालणार नाही. तुम्ही मस्त भेटत रहाल पण इकडे आमच्या घरची इज्जत जाईल. त्यापेक्षां लग्न उरकून टाकू मग काय करायचं आहे ते करा." पृथ्वी चे बाबा

हे पृथ्वीच्या बाबांचे बोलणे ऐकून स्वराने पृथ्वीकडे पाहिले तो फक्त तिच्याकडे पाहून हसला यावर काहीच बोलला नाही. ते पाहून स्वराला खूप राग आला ती तावातावाने खोलीत गेली.

"लाजली वाटतं." असे म्हणून ते सगळे हसू लागले. पण सुमनला सगळे समजले होते की तिला या गोष्टीचा राग आला होता. म्हणून ती काहीच बोलली नाही. ती सगळी मंडळी निघून गेल्यानंतर सुमन स्वरा जवळ आली आणि म्हणाली, "स्वरा प्रेम करणं सोपं असतं. पण ते निभावणं खूप अवघड असतं. सगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं. संसार हा फक्त नवरा आणि बायको चा नसून दोन्ही घराण्याचा देखील असतो. या संसारांमध्ये दोन्हीकडचे नातेवाईक सुद्धा येतात. त्या सगळ्यांचे मन जपावे लागते. संसार हा तीनच शब्द असतो पण याचा अर्थ खूप मोठा असतो. ज्याला तो कळला तोच सुखी झाला. तेव्हा तू वाईट वाटून घेऊ नकोस. या सगळ्या परिस्थितीला अगदी धीटाने सामोरे जा." सुमनने स्वराला समजावून सांगितले.

स्वराला आईचे म्हणणे पटले आणि तिने देखील मनाची समजूत घातली.

संध्याकाळी जेव्हा पृथ्वी चा फोन आला तेव्हा स्वरा त्याच्यावर भडकली. "आई बाबांच्या समोर मी जेव्हा बोलले तेव्हा तू काहीच बोलला नाहीस. जर लग्नानंतर असे घडले तर मी काय करावे? तुम्ही श्रीमंत माणसं आहात तुम्हाला त्या श्रीमंतीचा माज आहे. आम्ही गरीब लोक मला त्या घरामध्ये तुम्ही सांभाळून घेणार की नाही असा मोठा प्रश्न मला पडला आहे. तुम्हाला तोलामोलाचे स्थळ हवे होते तर ते पहायचे ना! उगीच मला मागणी घालायला कशाला यायचे? बोल ना! आता का शांत आहेस? मुलगी पटवायची, प्रेम करायचे पण निभावताना अंग काढून घ्यायचे हा कुठला न्याय आला?" स्वरा खूपच चिडली होती. त्यामुळे रागाच्या भरात तिने जे तोंडाला येईल ते बोलले. पृथ्वी मात्र तिचे बोलणे फक्त ऐकतच होता.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..