Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 25

Read Later
आत्मसन्मान 25


"आई, सांग ना. तू माझ्या सोबत आहेस ना! मला साथ देशील ना! आमच्या लग्नाला तुझी संमती आहे ना! तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीच करणार नाही. तू नेहमी माझ्या सोबत हवी आहेस." स्वरा काकुळतीला येऊन म्हणत होती.

"तसे काही नाही ग स्वरा. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे आणि असणार देखील आहे. पृथ्वी चांगला मुलगा आहे. पण त्याच्या घरचे... तो श्रीमंत घरातील मुलगा आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे. त्याच्या घरच्यांची तुमच्या लग्नाला संमती आहे का? पृथ्वी च्या घरचे काय म्हणाले? त्यांना तुम्ही सांगणार आहात ना!" सुमनने स्वराला सगळे सविस्तर विचारले.

"हो आई, तो सुध्दा त्याच्या घरी सगळे सांगितल्यावरच आम्ही लग्न करणार आहोत. तू म्हणतेस तसे दोन्ही घरचे संमती दिल्यावरच त्यांच्या आशिर्वादाने आमचे लग्न होईल. तू चिंता करू नकोस. फक्त तुझा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहू दे." स्वरा

"माझे आशिर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेतच ग.. पण लग्न म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ते लोक श्रीमंत आहेत. तेव्हा तुला तिथे राहताना तुझा आत्मसन्मान गळून पडणार नाही याची तुला काळजी घ्यावी लागेल. आयुष्यात आत्मसन्मान हाच खरा दागिणा आहे. तोच जपता आला पाहिजे." सुमनने स्वराला तिची काळजी बोलून दाखवले. सुमनला आपली मुलगी योग्य घरात जावी असे वाटत असे. गर्विष्ठ, घमेंडी घरात मुलगी गेली तर तिला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडे कष्ट पडतील असे वाटत होते.

"आई, तुझे संस्कार माझ्यासोबत आहेत ग. तू काहीच काळजी करू नकोस. कोणत्याही परिस्थितीत मी माझा आत्मसन्मान गळू देणार नाही. मी नेहमीच ताठ मानेने जगेन." स्वरा

"मग माझी तुमच्या लग्नाला संमती आहे. पृथ्वीच्या आईबाबांची संमती असेल तर ते रितसर मागणी घालायला येऊ देत. मग तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न उरकून टाकू." सुमनने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे स्वराला खूपच आनंद झाला.

"तू जगातील बेस्ट आई आहेस. प्रत्येक जन्मी मला तूच आई म्हणून हवी आहेस. मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे." स्वरा थोडीशी हळवी होऊन म्हणाली. तेव्हा सुमनने तिला जवळ घेतले. तिचेही डोळे भरून आले.

"चल, मला उगीच झाडावर चढवू नकोस." सुमन थोडीशी हसतच म्हणाली. त्यामुळे वातावरण बदलले.

"नाही ग आई, मी खरंच बोलते. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. अगदी माझे काळीज आहेस तू." स्वरा

"आणि पृथ्वी." सुमन स्वराची मस्करी करत म्हणाली.

"तो तुझ्यानंतर. माझ्यासाठी सर्वात आधी तूच आहेस. नंतर पृथ्वी." स्वराचे हे शब्द ऐकून सुमनला भरून आले.

आईने स्वराला परमिशन दिल्यापासून स्वरा खूप खूश होती. तिला आपण हवेतच असल्याचे भास होत होते. तिने पृथ्वीला या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. आईने संमती दिल्याचेही सांगितले.

इकडे पृथ्वीच्या घरी जेव्हा त्याच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्याने स्वरा बद्दल त्याच्या घरच्यांना सांगितले. ते ऐकून त्याचे बाबा खूप चिडले.
"कोण आहे ती मुलगी? स्थळ आपल्या तोलामोलाचे आहे की नाही. तू असे काही करणार नाहीस. मी ठरवलेल्या मुलीशीच तुला लग्न करावे लागेल. अरे, लोक काय म्हणतील याचा तरी तू विचार करायचा! ते काही खर्च करणार आहेत का? त्यांच्याकडे काय आहे? मिडल क्लास लोक आहेत ते. तू अशा मुलीवर प्रेम कसा करू शकतोस?" असे अनेक प्रश्न बाबांनी पृथ्वीला विचारून भंडावून सोडले.

"बाबा, प्रेम करण्यासाठी श्रीमंती पाहिली जात नाही. मी त्या मुलीकडे पाहून प्रेम केलो आहे. जी मला आयुष्यभर साथ देईल माझ्या सुख दुःखा मध्ये माझ्या सोबत असेल हे पाहून मी तिच्यावर प्रेम केलेलो आहे. बाकी तुमचं खानदानी तोलामोलाचे वगैरे मला काही माहीत नाही. मी फक्त मुलीला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडलो. प्रेमात जात, पात, भाषा, श्रीमंती काहीच पाहिले जात नाही. प्रेम हे आपोआप होते. ते ठरवून कधीच केले जात नाही." पृथ्वी बाबांना समजावून सांगत होता.

"माझी या लग्नाला संमती नाही. तुला मी ठरवलेल्या मुलीशीच लग्न करावे लागेल. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तरी विचार कर, नातेवाईकांचा तरी विचार कर, ते काय म्हणतील कोणती दरिद्री मुलगी घरात सून म्हणून घेऊन आले आहेत, असे ते चिडवतील ना! मग प्रत्येकाला उत्तर देता देता नाकीनऊ येईल. तेव्हा माझीच पंचाईत होईल. अरे, घराण्याला शोभण्यासारखी मुलगी नको का?" पृथ्वीचे बाबा.

"कोणी काही म्हणणार नाही आणि बाबा लोक काय म्हणतील? हे तर सर्वात मोठं पाप आहे. त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं? आपल्याला काय पसंत आहे? याचा आपण विचार करू या ना! लोकांची काळजी आपण कशाला करायचे? आपण फक्त आपलं पाहायचं. दुसरीकडे ढुंकूनही पहायचं नाही. मग त्रास कसला होईल आपल्याला?" पृथ्वी स्पष्टच बोलला. तो त्याचे म्हणणे पटवून देत होता.

"तू मला तत्वज्ञान शिकवणार आहेस का आता? तुला अजून जगाची काहीच ओळख नाही. या मुली श्रीमंती बघून श्रीमंत मुलावर प्रेम करतात आणि नंतर त्यांच्या इस्टेटीवर! मी अशा मुलींना चांगलाच ओळखून आहे, त्यामुळे तू या मुलीचा विचार सोडून दे. अरे, कितीतरी मुली आहेत ज्या आपल्या घराण्याला शोभतील. तुला त्या सोडून हिच हवी आहे का?" पृथ्वीचे बाबा

"हो. मला स्वराशीच लग्न करायचे आहे. तुम्ही परवानगी दिला नाही तरी सुद्धा मी तिच्याशीच लग्न करणार. बाकी इतर मुलींचा मी विचारही करू शकणार नाही. माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त स्वराच आहे." पृथ्वीने आपले मत स्पष्टच सांगितले.

बाबांकडून लग्नासाठी परवानगी मिळावी म्हणून पृथ्वी अडूनच बसला होता. त्याला स्वराशीच लग्न करायचे होते. ते पाहून पृथ्वीची आई म्हणाली, "अहो त्याच्या मनाप्रमाणे लग्न करू दे. संसार हा त्या दोघांना करायचा आहे. आपण उगीच कशाला त्यांच्यामध्ये पडायचं? करू दे लग्न... इथे आल्यानंतर ती आपल्या घराची रितीरिवाज समजून घेईल आणि त्याप्रमाणे वागेल." पृथ्वीच्या आईचे हे बोलणे ऐकून पृथ्वीचे बाबा शांत बसले. बराच वेळ विचार करून त्यांनी होकार दिला.

आई बाबांकडून परवानगी मिळाल्यानंतर पृथ्वीला खूप आनंद झाला. त्याने लगेच स्वराला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा त्या दोघांना खूपच आनंद झाला.

स्वराने आईला सुद्धा ही गोष्ट सांगितली. त्या दिवशी संध्याकाळी अनघा स्वरा कडे आली. बराच वेळ बोलून झाल्यानंतर स्वराने अनघाला पृथ्वीबद्दल सांगितले.

"अनु, अगं माझे आणि पृथ्वीचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत." हे ऐकून अनघाला आनंद झाला तसेच आश्चर्यही वाटले. तिला दोन मिनिटं काहीच समजेना ती तशीच बसली.

"काय? आणि हे सगळे कधी ठरले? मला तर यातील काहीच माहित नाही. तुम्ही सगळं गुपचूप केलंत की" अनघा

"अग, त्याने मला प्रपोज केले. मी कॉलेजमधून बाहेर गेले होते ना! ते त्यासाठीच. त्याने बोलावले होते म्हणून. त्यानंतर मी आईला सांगितले आणि त्याने त्याच्या घरात सांगितले. दोघांच्याही घरातून परवानगी मिळाली. आता आम्ही लग्न करायला मोकळे झालो." हे स्वरा सांगताना तिच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता.

"अरे वा! ग्रेट! किती छान बातमी दिलीस तू? तरी मला कुठे तरी वाटतच होतं की तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे. पृथ्वी तसा चांगला आहे पण.." अनघा बोलता बोलताच थांबली.

"पण काय अनु, बोल ना!" स्वरा उत्सुकतेने विचारू लागली.

"अगं सोहम म्हणत होता. मला काही यातील माहित नाही." अनघा बोलण्याचे टाळत होती.

"काय म्हणत होता सोहम? थोडासं स्पष्ट सांग, मला काही राग येणार नाही." स्वरा

"अगं म्हणजे पृथ्वीची घरची परिस्थिती खूप श्रीमंत आहे. त्याचे बाबा खूप मोठे बिजनेसमन आहेत, त्यामुळे घरामध्ये फक्त त्यांचाच हुकूम चालतो. त्यांच्या शब्दाबाहेर कोणीच जात नाही. अगदी पृथ्वी सुद्धा... ते जे म्हणतील ते सर्वांना ऐकावे लागते, म्हणून म्हणाले ग! तुझे संस्कार वेगळे आहेत मग तिथे गेल्यानंतर कसे करणार?" अनघा

"काही होणार नाही अनु, मी समर्थ आहे या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी." स्वरा आत्मविश्वासाने म्हणाली.

"तरीही स्वरा तुला थोडे जपूनच राहावे लागणार आहे. त्याचे बाबा खूप कडक आहेत आणि त्यांचे रितीरिवाज वेगळे आहे. लग्न करणे सोपे वाटते पण ते निभावणे खूपच अवघड... तू ते सगळे काही निभावून नेशील.. पण या सगळ्यात भरडली जाऊ नकोस इतकेच माझे म्हणणे आहे.. बाकी तू काही जाणतेसच." अनघाला वाटणारी काळजी समजू शकते. ती काळजीनेच म्हणाली.

अनघा आणि स्वराचे हे सर्व बोलणे सुमनने ऐकले होते. तिच्या मनात आता काळजीचे थैमान माजले होते. आपली मुलगी तिथे कसा संसार करेल? तिला या सगळ्याची जाणीव होईल का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालले होते.

इकडे पृथ्वीने आई-बाबांकडून सगळी माहिती घेऊन बोलणी करण्यासाठी आपण घराच्या घरी जाऊया का? अशी संमती मागून घेतली होती. त्याच्या आई-बाबांच संमती मिळाल्यावर तो आनंदित होऊन त्याने तसा निरोप दिला. हे ऐकून स्वराला ही खूप आनंद झाला. सुमन आणि स्वरा मिळून घराची स्वच्छता करू लागले. त्यांचे आदरातिथ्य योग्य प्रकारे व्हावे यासाठी काळजी घेत होते. प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

स्वरा आणि पृथ्वी त्यांच्या संसाराची स्वप्ने पाहत होते. ते दोघे एक होण्याचा विचार करत होते. लग्नामध्ये काय काय करायचे? याचे प्लॅनिंग करत होते. सारे काही त्यांच्या मनासारखे होईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. हे सारे काही स्वप्नवतच आहे की काय? असे वाटू लागले. पण मनासारखा जोडीदार मिळाला याचे खरोखरच त्यांचे भाग्य... प्रत्येकाच्या आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळेलच याची काही शक्यता नाही. प्रेम करणारा जोडीदार मिळत आहे म्हणून ते दोघेही खूप खूश होते. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

रात राणीने भरलेली वेली जशी ओथंबून वाहत होती, त्याचा सुगंध जसा दरवळून वाहत होता आणि आजूबाजूचे लोक प्रफुल्लित होते, तसा त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..