Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 24

Read Later
आत्मसन्मान 24


स्वराने अनघाला मेसेज केला होता. मी काही कामासाठी बाहेर जात आहे. तू माझी वाट पाहू नकोस मी दुपारनंतर तुला जॉईन होईन असा स्वराचा मेसेज पाहून अनघाने कपाळाला हात लावला. कारण त्याआधीच थोडा वेळ झाला असेल अनघाने स्वराच्या आईला फोन केला होता. स्वरा बद्दल विचारले होते. आता स्वरा ओरडणार काय गरज होती तुला आईला फोन करायची? असे मनातच अनघा म्हणाली.

नंतर ती लेक्चरला जाऊन बसली. तिकडे स्वरा पृथ्वी सोबत बागेत गेली. तिथे जाऊन ते दोघे बसले. आजूबाजूला शांतता होती. त्या बागेमध्ये त्या दोघां व्यतिरिक्त तिसरे कोणीच नव्हते. त्यामुळे एक भयाण शांतता पसरली होती. दोघेही शांत बसले होते. एकमेकांशी एक अक्षरही बोलले नाहीत. कुठून सुरुवात करावी? हेच त्या दोघांना समजेना त्यामुळे ते तसेच शांत बसले.

"स्वरा खूप दिवसांपासून मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज तू राग मानू नकोस. जे मनात आहे ते तुझ्या समोर मोकळे केले की मी एकदाचा निवांत झालो. बाकी तुझा काही निर्णय असेल तो मला स्पष्ट सांग. पण आपली मैत्री तोडू नकोस आणि माझ्यावर अजिबात रागवू नकोस." पृथ्वी

"नक्की काय बोलायचे आहे? तुला जे काही बोलायचे असेल ते स्पष्ट बोल. मी काही रागावणार नाही. तुझे बोलणे अगदी व्यवस्थित ऐकून घेईन." स्वराने स्पष्टच सांगितले

"तू या सगळ्याचा वेगळा अर्थ घेऊ नकोस. मला हे बोलणं गरजेचं आहे. तुला किती वेळ हवा तेवढा तू घे. विचार कर आणि मग निर्णय दे." पृथ्वी

"तू आधी काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल तरी." स्वरा

"स्वरा, कॉलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासून तू मला खूप आवडतेस.. तेव्हापासून मी तुझ्याकडे बघतोय.. मी तुझ्या प्रेमात पडलोय.. जेव्हा फ्रेशर्स पार्टी होती तेव्हा आणि त्यानंतर तर मी आणखीनच प्रेमात पडत गेलो.. आता तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही.. तू माझी होशील का? माझ्याशी लग्न करशील का? प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस.. जर तुझा नकार असेल तर तसे सांग.. पण आपली मैत्री तोडू नकोस.. मला तुझ्या घरची सगळी परिस्थिती माहित आहे. आपण आपल्या आई बाबांना सांगूनच लग्न करणार आहोत. त्यांची संमती असेल तरच पुढे जाणार आहोत. या सगळ्या मध्ये मला तुझी साथ हवी आहे.. मला साथ देशील ना!" हे पृथ्वी चे बोलणे ऐकून स्वराला गहिवरून आले. तिच्या डोळ्यातून पाणी आले. तिच्या तोंडावाटे एक शब्दही फुटेना. ती शांतच बसली. ते पाहून पृथ्वी ला काय बोलावे ते कळेना? तो सुध्दा शांतच बसला.

"साॅरी, तुझ्या मनात काही नसेल तर.. मी उगीचच तुला विचारलो." पृथ्वी

"नाही नाही. तसे काही नाही." स्वरा

"मग कसे?" पृथ्वी

"म्हणजे तू विचारलास ते ठिक आहे." स्वरा

"मग त्याचे उत्तर अजून मिळाले नाही." पृथ्वी

"माझ्या सुध्दा मनात तूच आहेस. मलाही तू खूप आवडतोस. मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल." स्वराचे हे बोलणे ऐकून पृथ्वी ला खूप आनंद झाला. तो आनंदाने उड्या मारायला लागला.

दोघेही बराचवेळ तिथे बोलत बसले. बोलता बोलता स्वराचे लक्ष घड्याळाकडे गेल्यावर ती म्हणाली, "अरे, खूप उशीर झाला आहे. मला आता जायला हवं. नाहीतर अनघा मला इकडे तिकडे शोधत असेल! चल लवकर जाऊया. थोड्या वेळाने कॉलेज सुद्धा सुटेल व घरी जाताना तर ती नक्कीच शोधणार आणि वेळेत जर घरी गेले नाही तर आई आकांड-तांडव करेल." स्वरा थोडी घाबरतच म्हणाली.

"थांब ना थोडा वेळ, आपण काही सारखं सारखं भेटतो का? खूप दिवसांनी भेटलोय. आता याच्या नंतर कधी वेळ मिळेल काही सांगता येणार नाही. आत्ताच प्रेमाची कबुली दिली आहे. थोडं प्रेमाचे चार शब्द तरी बोल ना. मी सोडून तुला घरी पण तू थोडा वेळ थांब प्लीज." पृथ्वी स्वराला विनवत होता.

"नको पृथ्वी, मी अनघासोबत जाते. मी आत्ता थांबत नाही. आपण पुन्हा भेटू ना! नक्की. पण आता नको. तसेही आपले चॅटिंग आणि फोन कॉल्स असतातच ना! आता मला वेळेत जायला हवं." स्वरा असे म्हणताना पृथ्वीने देखील जास्त अडवले नाही.

"ठीक आहे. चल मी तुला कॉलेज जवळ सोडतो आणि मी घरी जातो." असे म्हणून पृथ्वीने स्वराला कॉलेजमधे सोडले. स्वरा लगेच वर्गात जाऊन बसली. तेव्हा अनघा तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.

"स्वरा तू कुठे गेली होतीस? मी तुझी किती वाट पाहिली? तू काही सांगितले नाहीस, किती शोधले मी तुला? फोनही केला पण तुझा फोन काही लागलाच नाही. मला वाटलं तू घरी गेली असशील, म्हणून..." अनघा बोलता-बोलता थांबली.

"मग तू आईला फोन केला होतास की काय?" स्वरा ने घाबरून विचारले.

"हो म्हणजे तसे नाही, तू कुठे दिसत नव्हतीस म्हणून?" अनघा अडखळत म्हणाली

"अग, वेड लागले का तुला? आता घरी गेल्यानंतर आई प्रचंड ओरडणार आणि खूप प्रश्न विचारणार! मी तिच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ? तुला थोडा तरी डोक्याचा भाग आहे की नाही." स्वरा अनघावर ओरडते

"अगं पण तू कुठे गेली होतीस? मला सांगून तरी जायचं! काही महत्त्वाचं काम होतं तर तसं सांगायचं तरी. मी काय समजणार!" अनघा

"मी तुला मेसेज केला होता, तो पाहायचा. एवढे सुद्धा तुला कळाले नाही." स्वरा

"सॉरी मी मेसेज नंतर पाहिला, त्याआधी मी काकूंना फोन केला होता." अनघा

स्वराला अनघाचा खूप राग आला होता. ती अनघाशी एक अक्षरही बोलली नाही. कॉलेज सुटल्यावर दोघी जणी घरी आल्या. स्वरा घरी येउन हात-पाय धुऊन कपडे बदलून बाहेर आली. तरी तिची आई तिला काहीच बोलली नाही, हे पाहून स्वराला खूप आश्चर्य वाटले. ती सुद्धा शांतच बसली.

बराच वेळ झाला तरी आई काही बोलली नाही म्हणून स्वराला वेगळे जाणवले. ती आईच्या जवळ गेली आणि आईशी बोलू लागली. पण आई काही लवकर बोलली नाही. तेव्हा स्वराला जाणवले की मी फोन केला होता त्यामुळेच आई रुसली आहे. आता आपल्यालाच बोलावे लागणार म्हणून ती आईजवळ जाऊन बोलू लागली.

"आई तू अशी शांत का आहेस? काही झालं आहे का? तुझी तब्येत बरी आहे ना?" स्वरा ने बोलण्यास सुरूवात केली.

"हो.." सुमन इतकेच बोलली.

"आई तू आज काही बोलत नाहीस! अशी शांत शांत का आहेस?" स्वरा

"तू तर कुठे काय बोलत आहेस? सकाळपासून घडलेल्या गोष्टी नेहमी सांगतेस ते आज काही सांगितले नाहीस! रोज तर माझ्याशी स्वतःहून बोलतीस.. आज कॉलेजमध्ये तसे काही झाले आहे का? तसे झाले असेल तर सांग. रोज सगळं सांगतेस आज काहीच सांगत नाहीस काही झालं आहे का?" सुमन

"तसे काही नाही आई, मी सांगत होते पण तू काहीच बोलली नाहीस म्हणून मी माझे आवरून येऊन सांगायचे म्हणून आवरायला गेले." स्वरा

"अच्छा" असे म्हणून सुमन शांतच बसली

"आई, तू असं तुटक बोलू नकोस गं, काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल ना! नाहीतर तू रागाव मला. पण असे तुटक बोलू नकोस." स्वरा

"तू बोल ना काय झालं ते?" सुमन

स्वरा दिवसभरात घडलेल्या एकेक गोष्टी सांगू लागली. पण पृथ्वीला भेटल्याचे तिने सांगितले नाही. ते पाहून सुमन ला खूप राग आला.

तेवढ्यात स्वरा म्हणाली, "आई पृथ्वी ला तू तर ओळखतेस, तो मला खूप आवडतो आणि त्यालाही मी खूप आवडते. आज त्याने मला प्रपोज केलं आणि मी त्याला होकार दिला आहे. खरं तर हे सर्व तुमच्या संमतीने होणार आहे. पृथ्वी देखील त्याच्या आई-बाबांना सांगणार आहे. आई, तू आज पर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. आता यापुढे सुद्धा तशीच रहावेस असे मला वाटते. तू आई म्हणून कुठे चुकली नाहीस आणि चुकणार नाहीस. आई, तुझे खुप उपकार आहेत ग माझ्यावर! आता हे शेवटचं.. यासाठी तू प्लीज माझ्या पाठीशी उभी राहशील ना! डॉक्टर होण्याचे बाबांचे स्वप्न तर मी पूर्ण करणारच आहे. त्यात काहीच शंका नाही. पण लग्न ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट तुझ्या संमतीने व्हावी असे मला वाटते. खरंतर माझ्या आयुष्यावर आणि माझ्यावर सर्वात पहिला अधिकार हा तुझाच आहे, कारण तू माझ्यासाठी खूप काही सहन केले आहेस. मला घडवण्यासाठी तुला खूप मोठ्या संघर्षातून जावे लागले आहे. हे मी अगदी जवळून पाहिले आहे. पण या टप्प्यावर मला काय करावे? हेच सुचले नाही. पृथ्वी तर आधीपासून आवडत होता पण हे नक्की प्रेम आहे कि आकर्षण हेच मला समजत नव्हते. त्यामुळे तुला कसे सांगावे? हा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा होता. शिवाय त्याच्या मनात देखील तेच आहे की नाही हे मला जाणून घ्यावे लागले. या सगळ्याची पडताळणी झाल्यावरच मी तुला हे सगळे सांगायचे असे ठरवले होते. त्यामुळे तुझ्यापासून ही गोष्ट लपून राहिली याबद्दल खूप सॉरी..." हे सगळं आईशी बोलताना स्वराच्या डोळ्यातून महापूर लोटला होता.

लग्नासारखा मोठा निर्णय स्वराने एकटीने घेतला. तिच्या मनात जर पृथ्वी होता तर ती ही गोष्ट आईपासून लपून ठेवली आणि आता जेव्हा आईला समजेल असे तिला वाटले तेव्हा तिने मनातली गोष्ट लगेच बोलून दाखवली. शिवाय या सगळ्यासाठी आईची परवानगी देखील तिने मागितली. पण सुमनच्या मनात घालमेल सुरू होती.

मी माझ्या मुलीला खूप चांगले संस्कार दिले, तिला घडवले आहे, तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही, तिला आत्मसन्मानाने वागण्याचे धडे दिले. पृथ्वी हा मोठ्या घराण्यातील मुलगा लग्नानंतरही तिचा आत्मसन्मान टिकून राहील का?

याबद्दल आता आई काय बोलते याकडे स्वराचे लक्ष लागले होते, पण सुमन तिच्या तंद्रीत च होती. हो म्हणावे की नको हा प्रश्न तिच्या मनात चालू होता.

स्वराचे हे बोलणे ऐकून सुमनला काय वाटले असेल?

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..