Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 22

Read Later
आत्मसन्मान 22


पृथ्वी स्टेजवर गेला, पण त्याच्या तोंडावाटे काहीच शब्द फुटेना. तो तसाच उभा राहिला. बऱ्याच वेळाने त्याने बोलायला सुरुवात केली. "कॉलेजमध्ये आल्यापासून चे दिवस माझ्या डोळ्यासमोरून पटकन निघून गेले. आम्ही प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही हिरीरीने भाग घ्यायचो. आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. शिक्षकांचीही मोलाची साथ मिळाली आणि आम्ही घडत गेलो. आमच्यामुळे जर काही शिक्षकांना त्रास झाला असेल तर त्यांची माफी मागतो." असे म्हणून त्याचा कंठ दाटून आला आणि तो स्टेजवरून खाली उतरला. त्याचे हे रूप पाहून स्वराला गलबलून आले. तिला सुद्धा खूप वाईट वाटत होते.

निरोप समारंभा नंतर परीक्षेसाठी कॉलेजला सुट्ट्या होत्या. प्रत्येक जण अभ्यासात मग्न होते. अगदी मनापासून अभ्यास करत होते. वार्षिक परीक्षा असल्याने प्रत्येकाला अभ्यास हा करावाच लागणार होता आणि त्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे एकमेकांना भेटणे सुद्धा होत नव्हते.

अखेर परीक्षा संपल्या आणि सुट्ट्या लागल्या. सुट्ट्यांचे दिवस मजेत सुरू झाले. तसे काही एक मित्र भेटू लागले, फोन कॉल्स होऊ लागले.

स्वराला पृथ्वीची खूप आठवण येत होती. त्याला फोन करावे असे तिला सारखे वाटत होते, पण तिचे धाडस झाले नाही. आता कोणत्या कारणाने त्याला फोन करावे? असे तिला वाटू लागले. हातात मोबाईल असूनही तिने पृथ्वीला फोन केला नाही. स्वराला अजिबात करमत नव्हते. आता कॉलेज सुरू व्हावे असे तिला वाटत होते. पण कॉलेज सुरू झाले तरी पृथ्वी काही भेटणार नाही याने ती उदास होत होती.

"स्वरा काय झाले ग? तू अशी उदास का असतेस? नेहमी सुट्ट्या पडल्या की तू वेगवेगळे कोर्सेस करण्यात मग्न असायचीस, पण आता तुझ्या चेहऱ्यावर तो उजाळा दिसेना. तू इतकी उदास का आहेस?" सुमनने अगदी प्रेमाने स्वराला विचारले.

"काही नाही ग आई, आत्ताच नवीन मित्र मैत्रीणी झाले आहेत आणि लगेच सुट्ट्या... कधी एकदा परत कॉलेज सुरू होते असं झालं आहे." स्वरा

"इतकंच ना! की आणखी काही आहे. बघ तसे काही असेल तर नक्की सांग. तुझ्या प्रश्नाचे उत्तर कदाचित माझ्याकडेही असेल." सुमन

"नाही ग आई, तसे काही नाही. तुझ्या पासून काही लपून राहिले आहे का? प्रत्येक गोष्ट तुला माहित आहे आणि तू अशी बोलतेस." स्वरा केविलवाण्या आवाजात म्हणाली.

"हो. तू प्रत्येक गोष्ट सांगतेसच खरं.. पण मनाच्या कोपऱ्यात काही तरी असेलच की जे कोणालाही सांगायचं नसतं.. तर तसे काही असेल तर आवर्जून सांग. मी तुझी आई कमी मैत्रीण जास्त आहे ना!" सुमन स्वराला विश्वासात घेऊन म्हणाली.

"नाही ग आई, तसे काही असेल तर मी नक्की सांगेन तुला." स्वरा

"बरं, ठीक आहे मग आता गोड हसून दाखव बघू." सुमन

स्वरा गालातच हसली आणि ती परत विचार करू लागली. पृथ्वी आता कुठे असेल? काय करत असेल? मला आयुष्यात परत कधी भेटेल की नाही?

तिकडे पृथ्वीच्या घरी त्याने फायनल एक्झाम दिल्यानंतर त्याच्या बाबांनी त्याला ऑफिस जॉईन करायला सांगितले.
"पृथ्वी तू ऑफिस जाॅईन कर. कॉलेजमध्ये जात होतास तोपर्यंत ठीक, आता तुला आपल्या बिजनेस मध्ये लक्ष घालावे लागणार आहे, आता मी माझी जबाबदारी हळूहळू तुझ्यावर सोपवणार आहे, त्यामुळे तुला ती व्यवस्थित पार पाडता आली पाहिजे. जे काही असेल ते तुझे तू पहायचे. मी आता रिटायरमेंट च्या दिशेने चाललो आहे. माझी जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे." पृथ्वी चे बाबा

"अहो तुम्ही रिटायर होणार आहात, मग मी काय आयुष्यभर असेच काम करत बसायचे? माझी पण जबाबदारी थोडी हलकी करा ना! माझ्या पण मदतीला कोणीतरी येऊ दे. थोडं इकडे पण लक्ष द्या. फक्त बिझनेस बिझनेस करू नका." पृथ्वी ची आई

"तुमची जबाबदारी आता कशी कमी करायची? आम्ही थोडीचं तुम्हाला मदत करणार आहोत शिवाय नोकर आहेतच की." पृथ्वी चे बाबा

"अहो म्हणजे मला सुनबाई हवी आहे. तिला घरात आणा म्हणजे माझी जबाबदारी आपसूकच कमी होईल. मी माझी जबाबदारी तिच्यावर टाकेन आणि निर्धास्त राहील." पृथ्वी ची आई

"अच्छा म्हणजे तुम्हाला सुनबाई ची ओढ लागली आहे तर, निकाल लागला की पृथ्वी साठी मुलगी बघायला सुरुवात करूया. पण हो मुलगी आपल्या तोलामोलाची हवी. आपल्यासारखी श्रीमंत हवी." पृथ्वी चे बाबा

"हो अगदी खानदानी सून हवी मला. खानदानी मुली काही वेगळ्याच असतात त्यांना जबाबदारी पेलता येतात." पृथ्वी ची आई

आता घरामध्ये पृथ्वीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. त्याला मुली बघायला सुरुवात देखील करण्यात येणार होते हे सगळे काही पृथ्वीच्या कानावर जातात त्याच्या डोळ्यासमोर स्वरा आली. माझ्यासाठी बायको म्हणून एकमेव मुलगी आहे ती म्हणजे स्वरा. मी स्वराला माझ्या बायकोच्या ठिकाणी पाहतो. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. पण हे सांगायचे कसे? आणि घरच्यांना सांगितल्या शिवाय तर लग्नच करता येणार नाही. अशा विचारांच्या गर्तेत पृथ्वी होता.

पण आता कॉलेजही नाही आणि भेट नाही. बरेच दिवस झाले स्वराला भेटून. एकदा तरी तिला भेटायला हवं. तिला मनातलं सांगायला हवं. तिच्या मनामध्ये नक्की काय आहे? हे विचारायला हवं. जे काही होईल ते दोघांच्याही मतानुसार आणि संमतीनेच होईल. तिच्या मनात जर मी नसेल तर मग पुढे जाऊन उपयोग तरी काय? अशी पृथ्वीच्या मनाची घालमेल सुरू होती. त्याला वाटत होते की स्वराला पृथ्वी आवडला नाही तर.. तिने नकार दिला तर.. त्यापेक्षा आधी आपण प्रपोज करू या आणि मग रीतसर लग्नाची मागणी घालू या.

स्वराच्या घरी स्वरा आणि तिची आई दोघीच राहत होत्या. त्यांची परिस्थितीही तितकीशी नव्हती. अर्थातच पृथ्वीच्या तोलामोलाचे स्थळ नव्हतेच. पृथ्वीचे आई-बाबा या स्थळाला नकार देतील की काय अशी अनामिक भिती सुद्धा पृथ्वीला वाटत होती. पण काही झाले तरी आपण स्वराशीत लग्न करायचे असा त्याने ठाम निर्धार केला होता.

पृथ्वी आता रोज ऑफिसला जात होता. त्याने बिजनेस मध्ये लक्ष घालायचे ठरवले होते. बाबांना त्रास देण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवे असे त्यांनी मनाशी ठरवले होते, त्यामुळे तो ऑफिसमध्ये लक्ष घालत होता. पृथ्वीच्या मध्ये झालेला हा बदल पाहून त्याचे आई-बाबा खूप आनंदित झाले. आपला मुलगा योग्य दिशेने जात आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.

आज पृथ्वीचा निकाल होता. त्याला डिस्टिंक्शन मिळाले होते. ऑनलाईन रिझल्ट पाहून झाल्यानंतर त्याने ही आनंदाची बातमी आई-बाबांना दिली. बाबांनी एक मोठा पेढ्यांचा बॉक्स मागवला आणि ते पेढे सर्वांना वाटले. आपल्या मुलाला इतके चांगले मार्क पडलेले पाहून त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला.

आता मुलासाठी तोलामोलाचे स्थळ पहावे म्हणून आईवडिलांनी शोधकार्यस सुरुवात केली. ते दोघेही त्यांच्या ओळखीचे पाहुणे, मित्रमंडळी यांना सांगून ठेवले होते की पृथ्वीसाठी एखादी तोलामोलाची मुलगी असेल तर पहा आणि त्यांच्या नातेवाईकांनी ते कार्य अगदी योग्य पद्धतीने बजावण्यास सुरुवात केली होती. पण या सगळ्याची पृथ्वीला काहीच कल्पना नव्हती.

एका नातेवाईकांनी त्याच्यासाठी एक खूप सुंदर स्थळ आणले. मुलगी अगदी देखणी, गोरीपान होती, शिवाय इंजिनीयर झालेली होती. अगदी मोठ्या श्रीमंत घराण्यातील ती एकुलती एक मुलगी होती. ते स्थळ पृथ्वीच्या आईबाबांना पसंत पडले आणि त्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला.

"आपण पृथ्वीला विचारून मग निर्णय सांगूया असे मला वाटते. शेवटी त्याला लग्न करायचे आहे. आपण परस्पर निर्णय घेऊन मोकळे झालो तरी शेवटी संसार हा त्या दोघांना करायचा आहे त्यामुळे लग्न हे त्याच्या संमतीने होऊ दे." पृथ्वी ची आई आग्रहाने म्हणाली

"आपल्याला मुलगी पसंत आहे मग त्यालाही पसंत पडेलच ना! त्यात विचारायचं काय आहे? आपल्या वेळी कोणी विचारलं होतं का? तरीही आपला संसार सुरळीत चालू आहे ना!" पृथ्वी चे बाबा

"हो पण आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. त्यांना लग्न करायचे आहे. त्यांच्या मतानुसार निर्णय दिला जातो, कारण संसार हा अगदी शेवट पर्यंत त्या दोघांनाच न्यायचा असतो." पृथ्वी ची आई

"तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपली पसंती तीच पृथ्वीची पसंती असणार. बघ मी तुला सांगून ठेवतो. तरीही आपण ही गोष्ट पृथ्वीच्या कानावर घालू." पृथ्वीचे बाबा

रात्री सर्वजण एकत्र जेवण करताना पृथ्वीच्या बाबांनी शेवटी विषय काढलाच...
"पृथ्वी आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे. इंजिनियर आहे, सुशिक्षित आहे, शिवाय तोलामोलाचे आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. एकदा फोटो पाहून घे. तुला नक्कीच आवडेल." हे बाबांचे बोलणे ऐकून पृथ्वीराज छातीत धस् झाले. आपण काही बोलायच्या आधीच बाबांनी मुलगी देखील ठरवून ठेवली हे पाहून त्याला वाईट वाटले. आता काय बोलावे? हे त्याला समजेना स्वरा बद्दल सांगावे तर अजून याने स्वराला विचारले नव्हते आणि इकडे होकार द्यावे तर मनामध्ये स्वरा भरली होती. आता काय करावे? हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्या समोर पडला होता. त्या विचारांच्या गर्तेत पृथ्वी होता.

पृथ्वी मी काय बोलतोय ऐकतो आहेस ना! तुला मुलगी पसंत आहे की नाही ते मला सांग म्हणजे पुढची बोलणी करायला आम्ही त्यांना आपल्या घरी बोलावून घेतो. मला आणि तुझ्या आईला तर मुलगी पसंत आहे. फक्त तुझ्या एकटाच निर्णय सांगायचा बाकी आहेस. तू फक्त होकार दे, ती मुलगी आपल्या घरची सून झालीच म्हणून समज." पृथ्वी चे बाबा

आता बाबांना काय उत्तर द्यावे? हे त्याला समजेना. तो तसाच शांत बसला. त्यातही त्याने मोबाईल काढून स्वराला फक्त हाय म्हणून मेसेज टाकला. पण स्वरा ऑनलाइन नसल्यामुळे त्याला आता काय करावे? हेच समजेना.

"पृथ्वी बोल ना, आम्हाला मुलगी पसंत आहे. अरे तिचे संस्कार खूप चांगले आहेत आणि बाबांच्या ओळखीतले स्थळ आहे त्यामुळे फार काही चौकशी करावी लागणार नाही." पृथ्वी ची आई

आईच्या या बोलण्याने पृथ्वी आणखीनच शांत झाला..

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..