Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 21

Read Later
आत्मसन्मान 21


स्वरा आणि पृथ्वीचे चांगलेच सूर जुळले होते. या दोघांची मैत्री आता खुलत चालली होती. स्क्रिप्ट लिहिताना त्या दोघांचे कधी कधी मतभेद होत होते, तर कधी एक मत होई. हसत खेळत त्यांचे सुरू होते. एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस जात नव्हता. सगळीकडे स्नेहसंमेलनाचे वातावरण असल्यामुळे कोणीच वर्गात बसत नव्हते. पृथ्वी आणि स्वरा सुद्धा त्याच कामात बिझी होते.

अखेर स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. सगळे जण तयारी करून कॉलेजमध्ये आले होते. बराच वेळ झाला होता, पण स्वरा अजून आली नव्हती. सुरुवात तर त्यांच्या अँकरिंग ने होणार होती. थोड्याच अवधीत कार्यक्रमाला सुरूवात होणार होती. प्रमुख पाहुणे आले होते. सगळी काही तयारी झाली होती पण काही केल्या स्वरा आली नव्हती. तिला फोन केला तर तिचा फोनही लागत नव्हता. आता पृथ्वीला थोडी भीती वाटू लागली. "आता कोणाला तयार करावे? ही मुलगी अशी कशी? काही कारण असेल तर सांगायचे ना! इतका वेळ कुणी करतं का? वेळ होणार असेल तर मी गेलो असतो ना आणायला. पण काही सांगायचंच नाही. सगळा गोंधळ करून टाकते ही, माझी पंचाईत झाली आता. त्यात फोनही लागत नाही. अवघड आहे." असे तो बडबडत इकडे तिकडे येरझार्‍या मारू लागला

येरझाऱ्या मारता मारता त्याचे सगळे लक्ष हे दरवाजापाशी होते. कोणी ही आले तरी स्वरा आली का? म्हणून एकदम तो स्तब्ध होई पण स्वरा काही आलीच नाही. आता पाहुण्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तरीही स्वरा चा पत्ता नाही हे पाहून पृथ्वी चिडला.

हिला कोणत्याच गोष्टीचे गांभीर्य नाही, आज काय आहे? आणि ही किती उशीर करत आहे? आधी सांगितले असते तर मी काहीतरी योजना केली असते ना! आता ऐन वेळी काय करायचे! मी एकटा सगळं कसं अँकरिंग करू? ऐनवेळी तिच्या जागेवर कोणाला घ्यावे तर पाठांतर चा प्रश्न आणि पुन्हा कसे काय बोलायचे? हे परत समजावून सांगावे लागणार या विचारात तो तिला आणण्यासाठी म्हणून जाणारच इतक्यात समोर स्वरा दत्त म्हणून उभी राहिली.

स्वराला पाहून पृथ्वी जो आतापर्यंत चिडला होता त्याचा तो सगळा राग निघून गेला. तो एकटक स्वरा कडे पाहत उभा राहिला. स्वराने लव्हेंडर कलर ची साडी नेसली होती, कानामध्ये मोठे झुमके घातले होते आणि केस पूर्ण मोकळे सोडले होते. एका हातामध्ये एक बांगडी घातली होती आणि एका हातात घड्याळ घातले होते. गळ्यामध्ये अगदी छोटासा नेकलेस होता. स्वरा अगदी सिम्पल पण सुंदर दिसत होती. तिच्या या रुपाकडे पाहून पृथ्वी भाळला होता. स्वर्गातील अप्सराच आपल्यासमोर उभी आहे असे त्याला क्षणभर वाटले. तो एकटक तिच्याकडे पाहत असताना स्वरा लाजेने लाल झाली आणि शरमेने मान खाली घातली. तिला काय रिऍक्ट करावे? हे समजेना. पृथ्वी असे एकटक पाहताना तिला अवघडल्यासारखे वाटले.

"सॉरी मला खूप उशीर झाला ना! पण काय करू? बसच आली नाही आणि रिक्षाही मिळेना. शेवटी कशीबशी एक रिक्षा मिळाली ती पकडून आले." असे धाडसाने स्वराने बोलायला सुरुवात केली. तिचे हे शब्द कानावर पडताच पृथ्वी भानावर आला. त्याच्या तोंडावाटे शब्द फुटेना. तिचे ते सौंदर्य पाहून तो शांतच बसला. तिचे अप्रतिम सौंदर्य तो पाहतच बसला.

"नाही.." असा नकळत शब्द त्याच्या तोंडावाटे बाहेर पडला. इतका वेळ बडबड करणारा, तिची आतुरतेने वाट पाहणारा पृथ्वी सहजच उशीर झाला नाही असे म्हणाला. ते पाहून त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. थोड्या वेळापूर्वी चा पृथ्वी आणि आत्ताचा पृथ्वी यात खूप फरक त्याला जाणवला. ज्या स्वराची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. ती आता आली आहे पण तिच्या समोर तर त्याची बोलतीच बंद झाली होती.

अखेर कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोघांनीही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरुवात केली. गणरायाच्या स्तुतिस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बघता बघता कार्यक्रम रंगात आला. अँकरिंग मध्ये हे दोघेही थोडे नाटकी बोलण्यासाठी प्रयत्न करत होते. कार्यक्रम मध्यावर आला होता. सर्वांचे मनोरंजन खूप छान पद्धतीने सुरू झाले होते. सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमात दंग होऊन गेले होते, मजा मस्ती करत होते. आता पुढच्या गाण्यासाठी दोघेही स्टेजवर अँकरिंग साठी आले. पृथ्वी आधीच येऊन उभा होता. तो काही बोलणार इतक्यात तिकडून हातामध्ये फुगा घेवून स्वरा बोलत बोलत येत होती.

जीवनाच्या अथांग महासागरातून प्रवास करताना काही जणांशी मैत्री होते, बंध जुळतात आणि ते मैत्रीचे बंध फुलत जातात. फुलत जाणाऱ्या त्या मैत्रीतून एक सुगंध दरवळतो, त्या सुगंधाने आजूबाजूचा परिसर सुवासित होते.
मैत्री ही धबधब्यातून पडणाऱ्या स्वच्छ पाण्यासारखी असते, नुकताच पाऊस पडून गेलेल्या निरभ्र आकाशासमान असते, ऊन पावसाच्या खेळात पडणाऱ्या इंद्रधनुसमान आयुष्यात रंगाची उधळण करते. अंधारमय जीवनात काजव्यासम प्रकाश देऊन जीवन उजळून टाकते ती मैत्री.

मैत्री एक विसाव्याचे ठिकाण. जिथे मन थोडा वेळ का होईना विसावा घेत. मनातील भावना व्यक्त करतं, अगदी हक्काने. मैत्री म्हणजे एक धागा. कितीही दूर गेलो तरी बांधून ठेवणारा.

अशी ही निरपेक्ष मैत्री तू जपत आहेस. मैत्रीबद्दल तुझ्या मनात कोणताच भेदभाव नाही आणि मी मात्र प्रत्येक वेळी तुझे मन दुखावत आले. पण इथून पुढे असे अजिबात होणार नाही. मैत्रीसाठी जरी काही चुकले तर तू कानउघडणी करायची. त्या दिवशी माझे चुकले मी तुझे काहीच ऐकून घेतले नाही. तर मला माफ कर सॉरी...." असे म्हणून स्वरा त्याच्या हातात फुगा देते. पृथ्वीला यावर काय बोलावे तेच कळेना? हे तर स्क्रिप्ट मध्ये नव्हते. त्यामुळे काय बोलावे? असे वाटून तो तसाच स्तब्ध उभा राहिला. इतक्यात टाळ्यांचा कडकडाट त्याच्या कानावर आल्यावर तो भानावर आला.

पृथ्वीने स्वराच्या हातातील तो फुगा घेतला आणि तिला जणू माफ केल्याचे त्याने कृतीतून दर्शवले. तसे त्याच्या मनात काहीच नव्हते. जर असते तर तो स्वतःहून तिच्याशी बोललाच नसता. त्या दिवसाच्या तिच्या मनात काही भावना आहेत, तिच्या काही आठवणी आहेत हे त्याने समजून घेतले त्यामुळे स्वराला देखील बरे वाटले. मित्र असावा तर असा, कधीच कोणाला न दुखावता समोरच्याच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारा. असाच पृथ्वी आहे याची तिला खात्री पटली आणि एकदा मैत्रीचा हात पुढे केला की कधीच हात न सोडणारा असा हा मित्र मला कायमस्वरूपी माझ्यासोबत असायला हवा असे तिला वाटले.

स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. जिकडे तिकडे फक्त स्वरा आणि पृथ्वीचे कौतुक होत होते. त्या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती आणि त्या दोघांनी मिळून अँकरिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केले होते. अख्या कॉलेज भर फक्त त्या जोडीची चर्चा होती. त्यांच्या दिसण्या बोलण्यापासून ते त्यांनी केलेल्या प्रत्येक अँकरिंग मधील शब्दा शब्दांची चर्चा होत होती. त्यातच भरीस भर म्हणून स्वराने सर्वांसमोर पृथ्वीची माफी मागितली तो क्षण म्हणजे त्या स्नेहसंमेलनाचा केंद्र बिंदू.... त्या दोघांची फक्त मैत्री होती पण कॉलेजमधील बऱ्याच जणांनी त्या दोघांची जोडी तयार केली भावी पती पत्नी म्हणून काहीजण संबोधले. पृथ्वी श्रीमंत घराण्यातला होता, त्यामुळे वडिलांच्या नावामुळे त्याची बरीचशी ख्याती होती, त्यात कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यापासून त्याच्या बोलण्याने सगळेजण त्याच्या जवळ येत होते. तो गोड आणि चांगले बोलत होता. तो बोलायला लागला की कधी साखरेला मुंग्या चिकटल्या प्रमाणे त्याच्या आजूबाजूला लोक गोळा व्हायचे. त्याचे बोलणे ऐकत बसायचे असाच होता पृथ्वी..

स्वरा देखील गोड आणि लाघवी होती. दिसायला सुंदर होती, समजदार होती पण थोडीशी कडक शिस्तीची असल्यामुळे तिच्यापासून सगळे दोन हात लांब होते, पण पृथ्वीची मैत्रीण म्हटल्यावर तिच्याशी येता जाता सगळे बोलायचे. ती आतून मऊ मायाळू असली तरी बाहेरून थोडीशी कडक होती. तिला वावगे काही खपत नव्हते. थोडीशी जरी चूक दिसली तरी ती तोंडावर बोलून दाखवायची. मनात एक आणि बाहेर एक अशी ती अजिबात नव्हती. जे काही असेल ते समोरा समोर अशा तिच्या स्वभावामुळेच पृथ्वीला ती आवडली होती.

आता त्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये होत होते. ते सर्वांपासून काही लपून राहिले नाही. कारण मुंग्या प्रमाणे लोक त्यांच्या भोवती होते त्यामुळे त्यांच्या स्वभावातील हा बदल त्यांना लगेच समजून आला. लग्ना विषयीच्या दोघांच्या कल्पना सेमच होत्या, त्या दोघांचेही म्हणणे एकमेकांना न सांगताच समजत होते त्यामुळे त्यात कोणताही वाद झाला नाही.

स्नेहसंमेलन तर पार पडले आता वार्षिक परीक्षा सुरू होणार होत्या, पण त्या आधी निरोप समारंभाचा कार्यक्रम बाकी होता. पृथ्वी चे शेवटचे वर्ष असल्याने त्याच्या बॅचची ही शेवटची परीक्षा होती. शेवटचे वर्ष म्हणून सगळे जण प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने भाग घेत होते. आता काॅलेज सोडताना त्यांना खूप वाईट वाटत होते. त्यांच्या सोबतच स्वरालाही खूप वाईट वाटत होते. आपल्या काळजाचा तुकडाच कोठेतरी जात आहे असे तिला वाटू लागले. ती कोणाशीच काही बोलली नाही, तिला काही बोलावेसेच वाटले नाही.

निरोप समारंभाचा कार्यक्रम ज्युनियर चे विद्यार्थी करणार होते. त्यामध्ये स्वराला देखील घेतले होते. सगळे मॅनेजमेंटची जबाबदारी स्वरावर होती. पण आता ती एकटी होती. इतर वेळी तिच्यासोबत पृथ्वी होता. हसत खेळत खूप छान काम होई, पण आता एकटीला कंटाळा यायचा. तशीच ती तिचे काम पूर्ण करायचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात आले की आपण पृथ्वी ला प्रपोज करावे पण दुसरे मन काही केल्या तयारच होईना. त्याच्या मनात मी नसेन तर... अशा विचारांच्या गर्तेत ती होती.

पृथ्वी चे काही वेगळे नव्हते. त्याला सुध्दा काॅलेज सोडून जायचे म्हणजे नको होते. सगळा मित्र परिवार सोडून जायचं म्हणजे तो विरह नको होता पण जावे तर लागणारच होते. प्रवाहासोबत पुढे पुढे चालायचे असते तेच तर आयुष्य असते आणि आयुष्य खूप सुंदर असते.

अखेर निरोप समारंभाचा दिवस उजाडला. दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करणारा पृथ्वी आज समोर फक्त बसला होता. आज त्याचेच काॅलेज त्याला परके वाटत होते. आपण हे सगळे सोडून जाणार म्हणून वाईट वाटत होते. स्वागत समारंभ झाला. आता पृथ्वी ला स्टेजवर चार शब्द बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते. पृथ्वी खूप शांत बसला होता. तो स्टेजवर आला.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..