आत्मसन्मान 20

Marathi story


"अगं आई, तसे काही नाही ग, तुला दुखावण्याचा माझा मुळीच हेतूू नाही. पण ही वेळ हा दिवस तोच होता ना! मला सारखं सारखं तेच डोळ्यासमोर येतं म्हणून, नाही तर तू माझी जगातली बेस्ट आई आहेस. मला कधीच बाबांची आठवण येऊ दिली नाहीस. तू माझ्यासाठी खूप काही केली आहेस ग, तुझे हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि याची परतफेड कितीही जन्म घेतले तरी होऊ शकणार नाही. किती यातना, किती ते कष्ट सोसले आहेस तू माझ्यासाठी. लोकांची काय म्हणतील याची कोणतीच काळजी केली नाहीस. लोक वाटेल ते बोलत होते पण तू एक मार्गाने चालत राहिलीस आणि माझे संगोपन केलेस, किंबहुना मलाच जास्त महत्त्व दिलेस. मग मी अशी कशी ग तुला दुखवणार?" स्वरा अगदी काकुळतीला येऊन म्हणत होती.

"मला अजिबात महत्व ओढून घ्यायचे नाही, तुझे बाबा खरंच खूप चांगले होते आणि त्यांची तुला आठवणीने कमतरता भासते. हे अगदी सहाजिकच आहे, पण असे आपले दुःख चव्हाट्यावर कधीच आणू नये. चार-चौघात दुःखाचे प्रदर्शन कधीच करू नये, त्यामुळे काय होते तर समोरच्याचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. काहीजण सहानुभूती दाखवतात तर काहीजण मस्करी करतात. आपल्या पायातील काटे होण्यासाठी सुद्धा सज्ज असतात, त्यामुळे प्रत्येक पाऊल हे जपून टाकावे लागते. तुला अजूनही या जगाची ओळख नाही, पण आपले दुःख हे या चार भिंतीच्या आत असावे, बाहेर जगात चालताना कायम ताठ मानेने चालायचे म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला आत्मसन्मानाने वागवेल. आपणच रडत कुढत मुळमुळीत राहिलो तर समोरची व्यक्ती आपल्याकडे कधीच आत्मसन्मानाने वागवणार नाही. त्यामुळे प्रत्येक पाउल टाकताना थोडंसं जपूनच टाकावं लागतं." सुमन स्वराला समजावून सांगत होती.

"हो आई तू पावला पावलाला मला जी शिकवण देतेस ती नेहमीच माझ्या आयुष्यात मला उपयोगी पडते. या वेळेची ही शिकवण सुद्धा अशीच मला उपयोगी पडेल. पण आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा मी माझ्या भावनांना जास्त आहारी गेले. परिस्थितीविषयी मला तडजोड करता आलेच नाही. माझ्या सगळ्या भावना बाहेर पडल्या आणि अहंकार, राग अगदी उफाळून आला आणि त्या भरातच मी माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली. थोडं शांत डोक्याने विचार करायला हवे होते. ती परिस्थिती समजायला हवी होती, हाताळता यायला हवी होती. पण मला ते जमले नाही. यापुढे असे कधीच होणार नाही आई." स्वरा ने सत्य परिस्थिती सांगितली. खरंच भावनेच्या भरात माणूस जे काही मनात येईल ते करतो, तसा वागतो. पण तसे न करता शांतपणे ती परिस्थिती हाताळता यायला हवी.

"माझी बाळ गुणाची आहे. मला नक्की खात्री आहे की तू प्रत्येक परिस्थिती अगदी तुझ्या परीने व्यवस्थित हँडल करशील. आपण परिस्थिती च्या आहारी जायचं नाही तर परिस्थिती आपल्या परीने हँडल करायचं." सुमन

"हो आई, तू असल्यावर मला काहीच टेन्शन नाही. पावलोपावली तुझी शिकवण मला नक्कीच उपयोगी पडेल. भविष्यात याचा नक्कीच उपयोग होईल." स्वरा

माय-लेकीचे सगळे बोलणे झाल्यानंतर स्वरा आत मध्ये गेली आणि तिने मोबाइल उघडले तर त्यामध्ये पृथ्वीचे बरेच मेसेजेस आणि कॉल्स आले होते. ते पाहून तिने डोक्याला हात लावला.

"मी उगीचच त्याच्यावरती हात उगारला. माझं चुकलंच. मी पुढचा मागचा कोणताही न विचार करता जे मनात येईल तेच केले, पण आता हा सॉरी म्हणतोय तर याला माफ करावं की नको हा प्रश्न आला? पण हा सॉरी का म्हणतोय? नक्कीच अनघाने काहीतरी सांगितलं असणार आहे. पण बिचारा खूप चांगला मुलगा आहे. त्याला माफ करूया का?" स्वराचा स्वतःशीच संवाद सुरू झाला. पृथ्वीला मारल्याबद्दल तिला वाईट वाटत होते. पण आता ती पुढाकार घेणार नव्हती. त्याच्याशी सलगी करण्यापेक्षा आपण स्वतंत्र असलेले कधीही चांगलेच असे तिला वाटत होते. पृथ्वी सोबत आपण असलो की आणखी बरेच प्रॉब्लेम येतील त्यापेक्षा आता बोलत नाही तेच योग्य होईल असा तिने मनाशी निर्धार केला होता.

बरेच दिवस झाले, पृथ्वी आणि स्वरा एकमेकांशी बोलत नव्हते. पृथ्वी ने बऱ्याच वेळा पुढाकार घेतला त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण स्वरा त्याच्याशी काहीच बोलली नाही कारण तिला या सगळ्यांमध्ये गुंतायचे नव्हते. तिला डॉक्टर बनायचे होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर ठिकाणी गुंतून चालणार नव्हते.

आता कॉलेजचे स्नेहसंमेलन जवळ आले होते, सगळे जण त्याच्या तयारीत गुंतून गेले होते. इंजिनिअरिंग आणि मेडिकल चे स्नेहसंमेलन यावर्षी एकाच वेळी करण्याचे ठरले होते. पृथ्वीचे हे शेवटचे वर्ष होते, त्यामुळे स्नेहसंमेलनात ते सगळेजण कंपल्सरी भाग घेणार होते. स्वरा ला या मध्ये इंटरेस्ट नव्हता. तिला नाटक करायला आवडायचे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने नाटक करायची, पण पुढच्या वर्षी पाहू म्हणून तिने कशातच भाग घेतला नाही.

कॉलेज तर्फे स्नेहसंमेलना मध्ये अँकरिंग करण्यासाठी पृथ्वीची निवड झाली, पण मुलींमधून कोण घ्यायचं? याचा विचार सुरू होता. शेवटी सर्वांच्या मतानुसार घेण्याचे ठरले. स्वरा मिस फ्रेशर्स झाल्यापासून तिला बरेच जण कॉलेजमध्ये ओळखत होते आणि तिच्याशी बर्‍याच जणांची मैत्री देखील होती, त्यामुळे तिचे बोलणे, वागणे चांगले असल्यामुळे कॉलेजने तिला अँकरिंग करण्यासाठी घ्यायचे ठरवले. ही गोष्ट जेव्हा स्वराला समजली तेव्हा तिने नकारच दिला. पण नंतर सगळ्यांनी समजावून सांगितल्यावर ती कशीबशी तयार झाली.

स्नेहसंमेलनासाठी अजून पंधरा दिवसांचा अवधी होता. तो पर्यंत प्रत्येक गाण्यानंतर अँकरिंग करण्यासाठी स्वरा आणि पृथ्वी ला आमंत्रित केले होते, परंतु या सर्वांची तयारी देखील त्यांना करावे लागणार होते. एकमेकांचे बोलणे, एकमेकांशी करावयाचे संभाषण हे मिळते जुळते होण्यासाठी त्यांना एक प्रकारचे स्क्रिप्ट लिहावे लागणार होते, पण स्वराच्या सोबतीला पृथ्वी असल्याचे स्वराला माहीत नव्हते. ती तयार झाली होती पण पृथ्वी सोबत आहे हे समजल्यानंतर तिने परत नकार दिला. तेव्हा कॉलेजने तिला अँकरिंग करण्यास सक्त ताकीद दिले होते त्यामुळे तिचा नाईलाज झाला.

त्याच्यासोबत बोलायचे नाही असे ठरवले होते पण आता त्याच्यासोबत अँकरिंग करायचे म्हटल्यावर स्क्रिप्ट तर सोबत लिहावे लागणार, आता कसे करायचे? इतके दिवस हा बोलत होता तर मी त्याला साधा भावही दिला नाही. पण आता मला बोलावेच लागणार. कसे करायचे? असे एक ना अनेक प्रश्नांनी स्वराच्या डोक्यामध्ये गोंधळ घातला होता. इतक्यात पाठीमागून तिला "हॅलो" असा आवाज आला, तिने वळून पाहिले तर तो पृथ्वी होता, ते पाहून ती खजील झाली.

"हॅलो, काय म्हणतोस?" स्वरा थोडीशी अडखळत म्हणाली.

"अगं, ते स्क्रिप्ट लिहायचं आहे ना! मला सरांनी सांगितलंय" पृथ्वी

"हो हो. लिहायचं आहे. पण काहीतरी छान लिहूया." स्वरा

"छान! नको नको भन्नाट झालं पाहिजे. यावर्षी आमची शेवटची बॅच आहे, सर्वांच्या लक्षात रहायला पाहिजे. असं काहीतरी करूया." पृथ्वी

"हो नक्कीच काहीतरी छान करूया. जे आजपर्यंत कधीच झालं नाही आणि होणारही नाही. स्क्रिप्ट मध्ये आपण चारोळी, कविता आणि वेगवेगळे विषय निवडून ज्या प्रकारचे डान्स असतील त्या प्रकारच्या स्क्रिप्ट तयार करू जेणेकरून सर्वांना आवडेल." स्वरा तिला काय वाटतेय ते सांगू लागली.

"हो आणि मधून मधून आपण थोडसं नाटकी वागू, म्हणजे इतरांचे मनोरंजन देखील होईल." पृथ्वी. अशाप्रकारे त्या दोघांनी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली.

मी याच्याशी कितीही कसेही वागले तरी हा माझ्याशी बोलायला आला. खरंच हा एकदा बोलला होता की एखाद्याशी मैत्री केली की मी सोडत नाही. तो शब्द तंतोतंत पाळला आणि मी मात्र मैत्रीला....... खरंच मैत्री म्हणजे हेच असते का? पण दोन्ही कडून ते फुलायला हवे ना! पण मी या मैत्रीसाठी काहीच केले नाही. मी खूप चुकीचे वागले आहे पृथ्वीला असे चारचौघांच्यात मारायला नको होते. त्याची माफी मागायला हवी, आता लगेच नको त्यापेक्षा आपण स्नेहसंमेलनात काहीतरी करूया जेणेकरून सर्वांच्या समोर मारले तर त्यांच्या समोरच माफी मागायला हवी.. असे स्वरा मनात म्हणत होती.

"हॅलो मॅडम, काय विचार करताय? स्क्रिप्ट लिहायला घ्यायचं ना!" पृथ्वीचे हे बोलणे ऐकून स्वरा भानावर आली.

पंधरा दिवसात स्नेहसंमेलनाची तयारी करता करता त्या दोघांचे ही खूप छान सूत जुळले. आधी त्यांची मैत्री होतीच पण ती आता खूप छान प्रकारे फुलली. फुलाच्या वेलीला फुलांचा सुवास दरवळावावा तशी त्यांची मैत्री सुगंधी फुला प्रमाणे बहरत गेली. आधी फक्त मैत्री होतीच आता त्या मैत्रीचे बंध जुळले. एकमेकांना त्यांनी समजून घेतले. त्या पंधरा दिवसात बऱ्याच भेटी झाल्यामुळे एकमेकांचा स्वभाव, गुण, दुर्गुण सारं काही त्यांना समजले.

पृथ्वीला स्वरा आवडत होतीच आता हळूहळू तिच्या मनानेही तसा कल घेतला होता. त्याचा स्वभाव, त्याचे गुण, त्याचे वागणे, मुलींना सन्मानाने वागवणारा असा अगदी माझ्या बाबांच्या सारखाच आहे. अशी भावना तिच्या मनामध्ये येत होती.

सहवासाने प्रेम फुलते, बहरते, प्रेमाची भावना निर्माण होते. सहवास हेच खरे प्रेमाचे औषध आहे. प्रेमाला एकमेकां प्रति विश्वास हे असायला हवे लागते. पण सहवास हा सगळ्यात मोठा गुण आहे की ज्याने प्रेमभावना निर्माण होते.

प्रेम म्हणजे आकर्षण याच्या पलीकडे ते दोघे होते. ते दोघे इतके समजदार होते की आकर्षण किंवा दिसणे यावर न भाळता एकमेकांचे गुण दोष समजून घेवून प्रेमभावना व्यक्त करणे त्यांना जास्त योग्य वाटले.

स्वरा हळूहळू पृथ्वीच्या प्रेमात पडत होती. पृथ्वी हा एक समजदार मुलगा. त्याला मुलींच्या प्रती खूप आदर होता. स्वरा म्हणजे अगदी तडफदार, कडक, शिस्तीची तर पृथ्वी शांत, संयमी, समजदार अशी ही दोन वेगवेगळ्या स्वभावाची आता एक होण्याच्या मार्गावर होते.

पृथ्वी आणि स्वरा एक होतील का? त्यांचे लग्न होईल का? पृथ्वी च्या घरचे तयार होतील का?

क्रमशः

🎭 Series Post

View all