Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 19

Read Later
आत्मसन्मान 19


अनघा आणि स्वरा दोघी आत गेल्याबरोबर त्यांनी समोर पाहिले, तर बरेच जण जमले होते आणि समोर एक मोठा केक होता. आजूबाजूला थोडे फार फुगे होते. ते पाहून स्वराला वाटले की, तिचा वाढदिवस आहे म्हणून तिथे सेलिब्रेशन करत आहेत हे पाहून तिला प्रचंड राग आला आणि ती रागाच्या भरात निघून जावू लागली.

"स्वरा, कुठे जात आहेस? थांब बघू, नेमके काय आहे ते तरी पाहू? तू अशी लगेच जावू नकोस." अनघा ने स्वराला थांबवले.

"मला माहित आहे, इथे काय चालू आहे ते? आणि या सगळ्यांमध्ये तू सुद्धा सामील आहेस हे सुद्धा मला माहित आहे." स्वरा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"अगं स्वरा, पण ऐक ना यात काय बिघडलं? मित्रांनी मिळून जर तुझा बर्थडे सेलिब्रेट केला तर कुठे चुकलं? तू अशी राग राग करत जाऊ नकोस, थोडं ऐकून घे आणि हो यात माझा..." अनघाचे हे बोलणे स्वरा ऐकून न घेताच बोलू लागली.

"मला तुझं काहीच ऐकायचं नाही. इतकी वर्षे तू मला ओळखतेस आणि तुला इतकंही माहीत नसावं. तू हे मुद्दाम करत आहेस. मला चिडवण्यासाठी... तू माझी मैत्रीण आहेस ना! मग तुला माझ्या आयुष्यात काय झाले आहे हे माहित आहे? तरी तू असे का केलेस?" स्वरा

"स्वरा हे सगळे पृथ्वीने केले आहे. त्याला तुझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता. या कॉलेजमध्ये दरवर्षी प्रत्येकाचाच वाढदिवस साजरा केला जातो. तसा तुझा देखील करत आहेत. पण तू अर्थाचा अनर्थ करत आहेस प्लीज ऐकून घे अशी रागावू नकोस." अनघा समजावण्याचा प्रयत्न करत होती पण स्वरा काही केल्या ऐकूनच घेत नव्हती.

"अगं मी रागावणार नाही तर काय करू? आजच्या दिवसाच्या माझ्या काही भावना आहेत. मी माझ्या अगदी जवळची व्यक्ती गमावली आहे. अगं माझे बाबा या दिवशी गेले आहेत. त्यांना विसरून मी माझा आनंद कसा साजरा करू? बाबांचे अस्तित्व काय असते? हे सर्वात जास्त मला माहित आहे. माझ्या आयुष्यातील हा हळवा कोपरा नाहीसा झाला आहे आणि त्या दिवसात मी सेलिब्रेशन करू! इतकी पण मी निर्दयी नाही ग! माझ्या बाबांसाठी अजूनही माझा जीव तुटतो. त्यांच्या नसण्याची उणीव अजूनही मला भासते. जरी मी दाखवत नसले आणि माझ्या आईने मला कधीही कमतरता भासू दिली नसली तरीसुद्धा ती उणीव, ती पोकळी कधीच भरून निघणार नाही ग. किमान आजच्या दिवशी तरी. हे सगळं तुला माहित आहे तरी सुद्धा तू यामध्ये सामील झालीस याचंच मला आश्चर्य वाटतं." स्वराने अनघाला स्पष्टीकरण दिले.

"स्वरा अग तसं काही नाही ग! मला यातलं काहीच माहित नाही. पण या सर्वांना कसे समजले? तुला सांगू तुझ्या बाबांबद्दल पृथ्वीला काही माहित नाही. त्याने मुद्दाम केलं नाही ग! तू ऐकून तरी घे." अनघा तरी सुध्दा तिला मनवण्याचा प्रयत्न करत होती.

हे अनघाचे बोलणे ऐकताच स्वरा अगदी तावातावाने पृथ्वी जवळ गेली आणि त्याच्या गालावर एक जोरात मारली.

"काय समजतोस तू स्वतःला? तुझ्याशी मैत्री काय केले तर तू माझ्यावर अधिकार गाजवायला लागलास!" स्वरा

"अगं स्वर ऐकून तरी घे. तू आत्ता रागात आहेस काय झाले? ते एकदा तरी सांग." पृथ्वी आश्चर्याने म्हणाला

"हा केक कोणासाठी आणलास? इथे कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेस? खर खर उत्तर दे मला." स्वरा चिडक्या सुरात म्हणाली.

"अग आज तुझा वाढदिवस आहे ना! म्हणून तुझ्यासाठीच आणले. तुला सरप्राईज द्यायचं होतं. आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींचा वाढदिवस असाच साजरा करतो. आता तू देखील मैत्रीण आहेस म्हटल्यावर तुझा वाढदिवस साजरा करावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती म्हणून हा सगळा घाट घातला. पण या सगळ्याचा तुला आनंद होण्यापेक्षा तू चिडली आहेस. का काय झालं? काही कारण आहे का?" पृथ्वी आश्चर्याने स्वराला विचारतो.

"अच्छा म्हणजे अनघाने वाढदिवस आहे हे सांगितलं. पण मी वाढदिवस साजरा करत नाही हे सांगितले नाही आणि तुला देखील हा अधिकार कोणी दिला नाही. एका गोष्टीने विचारण्याची तसदी सुद्धा तू घेतला नाहीस. मला हे अजिबात आवडलेलं नाही."स्वरा नाराजीने म्हणाली.

"पण यामध्ये अनघाचा काहीच संबंध नाही. तिला सुद्धा हे सरप्राईज माहित नव्हतं. माझ्या एकट्याने मी हे प्लॅन केलेले आहे. तू उगीच तिला मधे घेऊ नकोस." पृथ्वी

"तुला कोणी दिला रे हा अधिकार! मित्र तर आपण आत्ताच बनलो होतो. मग पुढे पुढे करून वाढदिवस साजरा करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आजच्या दिवशीच महत्त्व फक्त मलाच माहीत. या दिवसात मी खूप काही गमावलेले आहे. अगदी माझं आयुष्य पण.... याची कल्पना तुला कशी रे असणार? मित्र म्हणून घेतोस मग एखाद्या मैत्रिणीबद्दल इतकी देखील माहिती असू नये? काय उपयोग अशा मैत्रीचा? एकमेकांचे भाव, एकमेकांचे बंध जपले गेले तरच मैत्री छान फुलते, खुलते आणि शेवटपर्यंत टिकते. पण तू तर तुझा स्वार्थच बघायला गेलास. माझं सेलिब्रेशन करण्याआधी थोडीतरी माझ्याविषयी माहिती गोळा करायची ना! तुझं हे आजचं वागणं मला अजिबात आवडलेले नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिला नाही." असे म्हणून तावातावाने स्वरा निघून गेली.

वाढदिवसासाठी बागेत जमलेल्या लोकांपैकी बरेच जण निघून गेले. आता आपले काय चुकले? असा विचार करत पृथ्वी तिथेच उभा होता. बराच वेळ झाला तरी तो तिथेच उभा होता. स्वरा मात्र वर्गात जाऊन बसली. पण तिथे तिचे मन कासाविस होऊ लागले. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळू लागल्या. पण तिने ते दाखवले नाही. स्वराच्या पाठोपाठ अनघा देखील आली. ती स्वराला समजावून सांगू लागली.

"स्वरा, पृथ्वी ची काहीच चूक नाही ग! त्याला काहीच माहित नव्हते. तू त्याला मारायला नको होतीस. तो बिचारा तुझ्यासाठी इतकं करतो आणि तू सर्वांसमोर त्याला.... हे चुकीचे आहे. तू त्याची माफी मागायला हवी." अनघा

"अनु, मला या विषयावर आता काहीच बोलायचे नाही. तू इथून जा बघू." स्वरा चे हे बोलणे ऐकून अनघा लगेच निघून गेली.

अनघा बाहेर जाऊन एका बाकावर बसली. "अशी काय ही स्वरा? इतकं राग कुणी करतं का?" असा विचार करत बसली होती. तिला एकटीलाच पाहून पृथ्वी तिच्या जवळ जाऊन बसला.

"हे, काय झालं? अशी का बसली आहेस?"

"काही नाही रे, सहजच." अनघा

"मला सांग. माझं काही चुकलं का? मी तर फक्त वाढदिवस साजरा करत होतो, प्रपोज तर नाही ना केले. मग ही इतकी का चिडली?" पृथ्वी

"अरे, ही परिस्थितीच वेगळी होती. आजच्या दिवशी म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिचे बाबा देवाघरी गेले. तेव्हा स्वरा एक वर्षाची होती. पण कळायला लागल्यापासून ती वाढदिवस साजरा करत नाही. इतक्या वर्षांनी आज हे सगळं म्हणजे...... तू समजू शकतोस ना!" अनघा

"ओह! साॅरी, मला यातील काहीच माहित नव्हते. मी नेहमीप्रमाणे सगळ्यांचे वाढदिवस साजरा करतो तसे करायला गेलो पण अर्थाचा अनर्थ घडला. यात खरंच माझी चूक आहे." पृथ्वी समजूतदार पणे म्हणाला.

"हं खरंय, ती खूप हळवी आहे. लगेच रडायला लागते. पण ती बाबांच्या बाबतीत जास्तच हळवी आहे." अनघा

"पण जास्त कडक आहे.. डेंजर आहे." पृथ्वी दबकतच म्हणाला.

"डेंजर.." म्हणून अनघा हसू लागली "नाही रे, पण प्रेमळ आहे."

"हो असेल, पण मला मारलं ना तिने! ते ही सर्वांसमोर." पृथ्वी थोडासा रागातच म्हणाला

"तिच्या पण काही भावना आहेत रे, तिच्या मनाविरुद्ध काही घडलं की ती अशी वागते. पण कितीही काहीही झाले तरी आत्मसन्मानाने जगणे सोडत नाही. तिचा आत्मसन्मान हाच खरा दागिणा आहे. कष्टाची मीठ भाकरी खाऊन राहिल पण कुठे हात पसरणार नाही की कुणाला दाखवणार नाही. कमीपणा घेणे तर तिच्या रक्तातच नाही. धडाडीची आणि जिद्दी आहे. जे ठामपणे ठरवते ते करूनच दाखवते." अनघा स्वराचे कौतुक करत होती. तिला जणू तिची मैत्रीण असल्याचा अभिमान ओसंडून वाहत होता.

"हे सगळं मी बघितलंय.. फ्रेशर्स पार्टीच्या वेळी.. अगदी चांगलंच ओळखलय मी तिला." पृथ्वी "काही का असेना, पण गोड आहे." पृथ्वी नकळत बोलून गेला.

"अच्छा, गोड काय?" अनघा त्याला चिडवू लागली.

"म्हणजे तसे नाही ग. सहजच आपलं." पृथ्वी

"असू दे रे, पहिली वेळ आहे, असे होणारच." अनघा परत चिडवू लागली. ते ऐकून पृथ्वी गालातच हसला.

स्वरा काॅलेज सुटल्यावर घरी आली. तिने नेहमीप्रमाणे दिवसभरात जे काही घडले ते आईला सांगितले. ते ऐकून सुमन थोडी शांत झाली.

"काय ग आई? काय झालं? तू अशी शांत का झालीस?" स्वरा

"काही नाही ग, तू दिलेल्या उत्तराबद्दल मी विचार करत होते. आज तू तुझ्या बाबांबद्दल इतकी हळवी झालीस. तू त्यांना सगळे काही सांगितलेस. पण उद्यापासून याबद्दल तुला सहानुभूती मिळत जाईल त्याचे काय? आई आणि मुलगी दोघीचं राहतात म्हटल्यावर काही जण सहानुभूती तर काहींची निंदा तुला ऐकावी लागणार. आणि हो मलाही समजले ते बरे झाले म्हणजे आत्तापर्यंत मी तुझी आई आणि बाबा दोघांचेही प्रेम देत होते पण मी कुठेतरी नक्कीच कमी पडले. मी इतकं केलं पण तुझ्या बाबाची सर मला आली नाही हे जाणवले. आज तू दाखवून दिलेस की तू तुझ्या बाबांच्या बाबतीत कमजोर आहेस म्हणजे लोकं तुला चांगली वागणूक देतील आणि तुझा आत्मसन्मान लगेच गळून पडेल. यामुळे मी शांत झाले." सुमन

"अगं आई, तसे नाही ग मला म्हणायचे. मी फक्त वाढदिवस करण्यासाठी म्हणत होते ग." स्वरा सुमनला समजावून सांगत होती.
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..