आत्मसन्मान 18

Marathi story


सोहम आणि अनघाने त्यांच्या आई-वडिलांना सांगितले, ते सांगताना दोघांच्या मनामध्ये एक प्रकारची धडधड चालू होती, पण घरी तर सांगावे लागणारच होते, म्हणून त्या दोघांनी सांगण्याचा प्रयत्न केला. अनघाच्या घरातून या लग्नाला संमती मिळाली.

"तू पळून न जाता आम्हाला सांगण्याचे धैर्य केलेस हेच आमच्यासाठी खूप आहे. आमची तुमच्या लग्नाला परवानगी आहे." तसे म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. पण सोहमच्या घरचे थोडे होय नाही करत होते, सोहमने व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर त्याच्या घरचे देखील या लग्नासाठी तयार झाले. पण त्यांच्या दोघांच्याही घरच्यांचे मत होते की, "शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही व्यवस्थित सेटल झाल्यावर मगच लग्न करायला पाहिजे." त्यामुळे लगेचच लग्न न करता शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहू लागले.

आता घरातूनच परवानगी मिळाली आहे म्हटल्यावर दोघेही खूप खुश झाले. आधी ते दोघे लपून-छपून भेटत होते, आता त्यांचे प्रेम जगासमोर आले होते, त्यामुळे त्यांना कुणाची आणि कसलीच भीती नव्हती. ते सर्वांसमोर एकमेकांना भेटायचे, बोलायचे. याआधी झाडाच्या पाठीमागे किंवा बागेत जाऊन बोलणं व्हायचं, पण आता कॉलेजमध्ये देखील ते बिनधास्त बोलू लागले. तर या सगळ्याचे श्रेय जाते ते सुमनला, कारण तिच्या सांगण्याने त्या दोघांनी धाडस करून त्यांच्या घरी सांगितले होते.

अनघा आणि सोहम यांच्या भेटी सोबतच स्वरा आणि पृथ्वी हे देखील त्यांच्यात मिसळू लागले. त्या चौघांचा एक छान ग्रुप बनला होता. ते एकमेकांचे मित्र असल्यामुळे नेहमी भेटत राहिले. एक दिवस पिक्चर ला जाण्याचा त्यांचा प्लॅन ठरला. त्या दोघांनी स्वरा आणि पृथ्वी ला सोबत घेऊन जायचे ठरवले. पृथ्वी तयार झाला पण स्वरा काही केल्या तयारच होईना.

"स्वरा, चल ना यार. तू पण ना खूप भाव खातेस." अनघा स्वराला समजावत म्हणाली.

"अनु, तुमच्या दोघांच्या मधे माझे काय काम ग. उगीच कबाब में हड्डी. तुम्ही जा ना दोघे. मस्त एॅन्जाॅय करा." स्वरा

"मला तू पण हवी आहेस. तू नसशील तर मी पण जाणार नाही." अनघा थोडीशी रूसवा आणत म्हणाली.

"वेडाबाई, हे तुमचे एकमेकांना समजून घेण्याचे दिवस आहेत. तुम्ही दोघे एकमेकांच्या सोबत वेळ घालवा, समजून घ्या. मी आले तर तुम्हाला अवघडल्यासारखे वाटणार, म्हणून म्हणते तुम्ही दोघे जा." स्वरा

"अजिबात नाही. आम्हाला तू पण हवी आहेस. तू नक्की यायचं." अनघा काहीच ऐकायला तयार नाही हे पाहून शेवटी स्वरा तयार झाली.

शेवटी कसंबसं स्वरा तयार झाली. त्या दोघांच्या विनंतीला मान देवून ती पिक्चर ला जाण्यासाठी तयार झाली. पण त्या दोघांच्या मध्ये आपले काय काम? ही एकच गोष्ट तिला खटकत होती. नाही म्हटले तरी ते मानायला तयार नव्हते आता जाऊन चुपचाप पिक्चर बघून यायचे एवढेच तिने ठरवले होते. ठरल्याप्रमाणे स्वरा त्या जागेवर आली. सोहम आणि अनघा पण वेळेतच आले.

"चला आता जाऊ या." असे स्वरा म्हणाली पण सोहम आणि अनघा निघायला तयारच नव्हते. ते बहुधा कोणाची तरी वाट पाहत होते. यातील स्वराला काहीच माहीत नव्हते.

ती म्हणाली, "कोणी येणार आहे का? कोणाची वाट पाहत आहात?" इतक्यात पृथ्वी आला. मग तिला समजले की तो सुद्धा पिक्चर बघायला येणार आहे. स्वराला उगीचच आपण तयार झालो असे वाटू लागले.

"सॉरी सॉरी मला थोडा उशीर झाला, तुम्ही केव्हा येऊन थांबला? मला खूप उशीर झाला का?" पृथ्वी येतच म्हणाला

"नाही नाही तसा उशीर नाही झाला. आम्ही थोडसं लवकर येऊन थांबलो होतो." सोहम म्हणाला

"चला मग निघूया का?" असे पृथ्वी म्हणाला

"कसे जायचे? रिक्षाने जायचे आहे ना, की एखादा कॅब बोलवून घेऊया." स्वराने प्रश्न केला.

"अगं, कशाला? आपण गाडी वरून जाऊ ना! तसेही आपण एवढेच जाणार आहोत, मग रिक्षा आणि कॅब कशासाठी?" अनघा

"अगं कसं जाणार आहोत आपण? तुझं आपलं काहीतरीच. मी रिक्षाने येते, तुम्ही जा मग." स्वरा

"असं काय करतेस स्वरा, पृथ्वी ची गाडी आहे ना! त्याच्या पाठीमागे तू बस ना. मी सोहम च्या गाडीवर बसते, म्हणजे निवांत जाऊ आपण. काहीच अडचण होणार नाही. तू पण ना एवढ्याच किती करतेस!" अनघाचे हे बोलणे ऐकून स्वराने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ती वैतागून गेली.

एक म्हणजे तिला पिक्चर ला जायचे नव्हते, त्यात आता पृथ्वीच्या गाडीवरून जायचे म्हणजे आणखीनच वैताग. तिला हे सर्व काही नको होते पण नाईलाजाने जावे लागत होते.

सगळे चल म्हणून फोर्स करताना स्वरा कशीबशी पृथ्वीच्या पाठिमागे बसली. स्वरा बसल्याबरोबर पृथ्वी ला धडधडू लागले, कारण पहिल्यांदाच कोणती तरी मुलगी त्याच्या बाईकवर पाठीमागे बसली होती. त्याच्या आवडीची ती बाइक होती आणि नेहमी तो एकटाच ती बाईक चालवत होता. पण आज पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या पाठीमागे बसले होते. ती सुद्धा एक मुलगी.

स्वराची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती, ती देखील पाठीमागे बसताच शहारून गेली होती. तिची देखील ही पहिलीच वेळ होती, एखाद्या मुलाच्या पाठीमागे ती पहिल्यांदाच बसली होती. नेहमी कोठेतरी जायचे झाले की ती बस किंवा रिक्षाने जात होती. पण एका मुलाच्या बाईकवर बसण्याची ही पहिलीच वेळ. तिला अवघडल्यासारखे वाटले, ती अंग चोरून पाठीमागे बसली होती.

ते सगळे थिएटरकडे गेले. सोहमने आधीच तिकीट काढून ठेवल्यामुळे तिथे जाऊन त्यांना बराच वेळ थांबावे लागले नाही. ते चौघेजण आत मध्ये जाऊन बसले. सोहम आणि अनघा जवळ जवळ बसले, तर पृथ्वी आणि स्वरा शेजारी शेजारी बसले. सोहमने दोन पॉपकॉर्न घेतले होते. एक तो आणि अनघा तर दुसरा पृथ्वी आणि स्वरा यांच्यात घेतला. अनघा आणि सोहम दोघे लव बर्ड्स असल्यामुळे त्यांच्यात काहीही खपून जात होते, पण स्वराला मात्र अवघडल्यासारखे झाले होते. एकच पॉपकॉर्न दोघांनी मिळून खायचे म्हणजे तिला थोडे कठीण झाले होते. ती बराच वेळ शांत होती म्हणून थोड्या वेळाने पृथ्वीने पॉपकॉर्न तिच्यासमोर केले. तेव्हा तिने खायला सुरुवात केली. पिक्चर बघता बघता पॉपकॉर्न घेताना कधी कधी एकमेकांच्या हाताचा स्पर्श होई तेव्हा स्वरा शहारून जाई.

पृथ्वी सोबत तिची आधीची ओळख असली आणि तो आता जरी तिचा मित्र असला तरी त्यांचा एकमेकांशी इतका परिचय नव्हता. ते दोघे मनमोकळेपणाने कधीच बोलले नव्हते, ते एकमेकांशी कधीच भेटले नव्हते, त्यामुळे स्वराला थोडा अवघडल्यासारखे वाटत होते. पृथ्वीचे देखील तसेच झाले होते. इतर वेळी तो कितीही बोलणारा, धडाडीचा असला तरी सुद्धा स्वरा सोबत तो थोडासा अवघडल्यासारखा होता. कसे बोलावे आणि कसे वागावे? हेच त्याला समजतच नव्हते. त्यात हे अचानक घडल्यामुळे तर काहीच सुचेना. पण त्या दिवसापासून त्यांची खरी मैत्री झाली. त्यादिवशी ते दोघे बराच वेळ एकत्र असल्यामुळे की काय त्या दोघांमध्ये एक प्रकारचे मैत्रीभाव तयार झाले होते.

एकमेकांना वेळ दिल्यामुळे की काय कोण जाणे पण त्यांच्यात एक खूप छान मैत्री निर्माण झाली. त्यांचा तो दिवस खूप छान गेला.

स्वरा चा आज वाढदिवस होता. तसे कळायला लागल्यापासून तिने स्वतःचा वाढदिवस साजरा करणे बंद केले होते, कारण तिच्या वडिलांचा तिच्या वाढदिवसा दिवशी मृत्यू झाला होता. ती कधीही न भरून निघणारी पोकळी तिला तिच्या आयुष्यात पावलोपावली जाणवत होती. त्यामुळे तिने तो क्षण कधीच जगायचा नाही असे ठरवले होते. ती साधे औक्षण देखील करून घेत नसे, त्यामुळे तिच्या शेजारी पाजारी आणि मित्र-मैत्रिणींना देखील वाढदिवस कधी असतो हे माहीत नसायचे. एकटी अनघा सोडली तर बाकी कोणालाच याचा थांगपत्ताही लागायचा नाही.

दरवर्षीप्रमाणे ती नेहमीप्रमाणे उठली, तिचे सगळे आवरून तिने बाबांच्या फोटोला नमस्कार केला. आईला नमस्कार केला आणि नेहमीच्या रूटीनला ती लागली. खरं तर उठल्या उठल्या बाबांच्या आठवणीने तिच्या डोळ्यातील आसवं गळून गेली होती. बाबाची कमतरता तिला जाणवत होती पण आईच्या समोर जर हे अश्रू आले तर ती देखील रडायला लागेल तिला देखील या गोष्टीचे वाईट वाटेल, म्हणून स्वरा आईसमोर नेहमी हसत उभे राहायची. त्या दिवशी देखील तिने तसेच केले आणि ती नेहमी प्रमाणे कॉलेजमध्ये गेली.

नेहमीप्रमाणे अनघा आणि स्वरा दोघी कॉलेजमध्ये गेल्या कॉलेजमध्ये गेल्याबरोबर एक मुलगी हातामध्ये गुलाबाचे फूल घेऊन स्वराच्या समोर आली आणि तिने ते फूल आणि एक चिठ्ठी स्वराच्या हातामध्ये दिले. स्वरा ने चिट्ठी उघडून पाहताच त्यामध्ये एक स्मायली चिन्ह होते आणि पुढे येण्याची खूण होती. ते पाहून तिला आश्चर्य वाटले, हे काय नवीनच चालू आहे असे वाटू लागले आणि त्यानुसार स्वरा आणि अनघा दोघी थोड्या पुढे गेल्या. तिथे दुसरी मुलगी हातामध्ये गुलाब फूल घेऊन उभी होती. स्वराला पाहताच त्या मुलीने देखील फूल आणि चिट्ठी स्वराच्या हातामध्ये दिली. परत स्वराने ती चिट्ठी उघडून पाहिले, तर कॉलेजच्या शेजारील बागेकडे जाणारा रस्ता दाखवला होता. त्यानुसार त्या दोघी तिकडे वळल्या. बागेच्या गेटपाशी एक मुलगी परत हातामध्ये गुलाबाचे फूल घेऊन उभी होती. स्वरा तिथे गेल्याबरोबर त्या मुलीने फूल आणि चिठ्ठी तिच्या हातात देऊन ती निघून गेली. स्वराने परत ती चिठ्ठी उघडली तर त्याच्यामध्ये वेलकम असे लिहिले होते. ती चिठ्ठी पाहून दोघींनी एकमेकींकडे पाहिले. आत जावे की नको करत शेवटी त्या दोघी आत मध्ये गेल्या आणि स्वराने आत पाहिले तर तिची तळपायाची आग मस्तकाला गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all