Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 17

Read Later
आत्मसन्मान 17


"स्वरा, तू नको ना असे बोलू, आमच्या प्रेमाला तुम्हा दोघांची तर संमती हवी आहे. एखाद्या वेळेस घरचे आले नाहीत तरी चालतील, पण तुम्ही दोघे हवे आहात. प्लीज, आम्हाला मदत कर. आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे आणि आम्ही लग्नही करणारच आहोत. तेव्हा तुमच्या दोघांची आम्हाला मदत हवी आहे." अनघा अगदी हक्काने स्वराला बोलत होती. स्वरा तिची एकुलती एक बालमैत्रीण. तिची सखी, सोबती, वाट चुकली तर हक्काने बोलणारी, रूसणारी, रागावणारी तिची मैत्रीण, तिची हितचिंतक. त्यामुळे तिच्या प्रत्येक निर्णयात ही सखी तिच्यासोबत हवी होती.

"पळून जाण्यासाठी मी मदत करणार नाही. एकदा आई-वडिलांना सांगण्याचा प्रयत्न तरी करा, ते दोघे काय म्हणतात ते पाहू? हवे असेल तर आम्ही तुमच्या आई-बाबांना सांगू. जर त्यांनी अति केलं तरच आम्ही तुम्हाला मदत करायचे का नाही ते ठरवू." स्वराने स्पष्टच सांगितले. तिला हे मुळीच आवडले नव्हते. तिला पुढील परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे ती असे बोलत होती.

"काय हे स्वरा, मी तुला प्रत्येक वेळी मदत केली आहे ना! मग आता तू असे का बोलत आहेस? तुला प्रेम ही संकल्पना आवडली नाही का? की आमचं प्रेमच तुला मान्य नाही." अनघा परखडपणे बोलली. स्वरा मदत करायला तयार नाही म्हटल्यावर ती थोडी चलबिचल झाली. अशा परिस्थितीत काय करावे? हे तिला सुचलेच नाही.

"प्रेम करण्यासाठी मला काहीच अडचण नाही, पण पळून जाऊन लग्न करणे हे मला अजिबात पटत नाही. पळून जाऊन लग्न केल्यानंतर काय होतं ते मी अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा कुटुंबासोबत गेलेले कधीही चांगलेच." स्वरा त्या दोघांना समजावत म्हणाली. तिच्या मनातील विचार ती स्पष्ट सांगत होती.

"मी सुद्धा स्वराच्या बोलण्याशी सहमत आहे, आपण एकदा तुमच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न करू ते हो म्हणाले तर खूपच छान होईल, नाहीतर पुढचा विचार करायला आपण मोकळे." पृथ्वी सुध्दा स्वराच्या सुरात सूर मिसळला. त्याला स्वराचे बोलणे पटले होते आणि त्यावरच तो तिच्यावर भाळला.

"नाही नाही मी तर अजिबात घरी सांगणार नाही. माझ्या घरातले प्रेम विवाह करण्यासाठी होकार देणारच नाहीत." अनघा थोडीशी घाबरतच म्हणाली. अनघाच्या कुटुंबात तिची आई आणि बाबा, अनघा आणि तिचा एक लहान भाऊ इतकेच राहत होते. अनघाचे आजी आजोबा ती लहान असतानाच देवा घरी गेले. त्यांचे चौकोनी कुटुंब असल्यामुळे अनघाला थोडीशी स्वतंत्रता होती. पण त्यांचे नातलग सगळे त्या गावात असल्यामुळे तिच्यावर खूप बंधने होती. त्यांच्या नात्यांमध्ये कोणाचेही प्रेमविवाह झाले नव्हते त्यामुळे या विवाहाला संमती मिळेल अशी कोणतीच आशा तिला नव्हती, म्हणूनच तिने पळून जाऊन लग्न करण्याला मान्यता दिली होती.

स्वराला ही गोष्ट मान्य नव्हती. पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा थोडा वेळ लागेल, पण आई वडिलांच्या संमतीने किंवा एखाद्या नातलगाच्या संमतीने लग्न केले तर पुढे सोपे जाते हे तिने तिच्या आई-बाबांच्या अनुभवावरून शिकले होते. तसे दोघेही धडाडीचे होते, पण नशिबाने त्यांना साथ दिली नव्हती, त्यामुळे त्यांचा संसार हा अर्धवटच राहिला. सुखाच्या त्या लहरी त्यांच्यापर्यंत येता येताच दूर दूर गेल्या. सुख त्यांना मिळत होते पण कशाची नजर लागली आणि ते जवळ आलेच नाही. दुःखाचा डोंगर मात्र अगदी भरभरून आला. असे दुःख कोणाच्याही बाबतीत घडू नये असे स्वराला वाटे. आज तिची मैत्रीण त्याच वाट्याने परत चालली होती, हे पाहून तिला खूप वाईट वाटत होते. ती अनघाला समजावत होती, पृथ्वी सुद्धा या सगळ्याच्या विरोधात होता. स्वराने इतके छान समजावून सांगितल्यावर तो तिच्याकडे अवाक् होऊन पाहू लागला.

"बरं, आपण नंतर बघू, चल आता उशीर झाला आहे, घरी जाऊ या." असे म्हणून स्वरा आणि अनघा घरी गेल्या. स्वरा नेहमीप्रमाणे तिच्या आईला सकाळपासून जे काही घडले ते सांगत होती आणि बोलण्याच्या ओघात अनघाने घेतलेला निर्णयही बोलून दाखवला. ते ऐकून सुमन ताडकन उठून उभा राहिली. तिला तिचे पळून गेल्यानंतर चे दिवस एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून निघून गेले. नशिबाने त्यांच्या संसाराची कशी थट्टा केली होती ते सुद्धा तिला जाणवले. ती सुन्न होऊन पाहू लागली.

"स्वरा मला अनघा शी बोलायचं आहे आणि त्या मुलाशी सुद्धा. तू कधी त्यांना घरी घेऊन येशील ते सांग. अगं त्या दोघांना समजवायला हवं असे पळून जाऊन लग्न करण्यात काहीच फायदा नाही. प्रेम आहे तर ते सर्वांच्या समोर जगासमोर करायची हिंमत हवी, धाडस हवं. आई-वडिलांना सांगण्याची हिंमत हवी आणि त्यांच्या आशीर्वादाने संसाराचा गाडा सुरळीत चालू करायला धीर हवा. तरच संसार व्यवस्थित होतो नाहीतर संसारात फक्त काटेच काटे.." सुमनचे हे बोलणे ऐकून स्वराला जाणीव झाली की आई बाबांविषयी बोलत आहे. तिला तिच्या संसाराची उणीव भासत आहे. स्वराने सुमनच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत करू लागली.

"हो आई, मी उद्याच त्या दोघांना घेऊन येईन." असे म्हणून स्वरा तिच्या कामाला गेली.

दुसऱ्या दिवशी स्वरा अनघा आणि सोहमला घरी घेऊन आली. त्यांच्यासोबत पृथ्वी देखील होता. ते तिघेही स्वरा च्या घरी आले आणि बसले. अनघाला खूप भीती वाटत होती, स्वराची आई आता काही बोलेल का? ओरडेल का? असे तिला वाटत होते. पण तरीही ती शांत बसली होती. जे काही होईल ते होईल, पण आता मागे हटायचं नाही असे त्या दोघांनी ठरवले होते. प्रेम खरे आहे तर ते शेवटपर्यंत टिकायला हवे असा त्यांचा हेतू होता. पृथ्वी जेव्हा स्वराच्या घरी आला तेव्हा त्याला समजले की स्वराचे वडील तिच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. ती आणि तिची आई अगदी हालाखीच्या परिस्थितीत इथंपर्यंत आले होते. स्वराने लहानपणापासून गरिबी पाहिली होती. तिला श्रीमंतीचा साधा मागमूसही नव्हता. तिच्या आईने इतक्या हालाखीच्या परिस्थितीतही तिला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. खरंच तिचे जेवढे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे तो मनातच म्हणाला आणि आपण मात्र इतके श्रीमंत, अगदी सोन्याचा चमचा तोंडात धरून आलेलो, पण शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूपच वेगळा आहे.

इतक्यात स्वराची आई तिथे आली, त्या तिघांना पाणी दिले आणि सोबत चहा ही दिला. त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी ती बोलू लागली, कारण त्यांच्या मनातील भीती तिला पूर्णपणे घालवायची होती. थोडा वेळ बोलून झाल्यानंतर तिने मूळ विषयाला सुरुवात केली.

"तुमच्या दोघांचे खरंच एकमेकांवर प्रेम आहे का? की उगीच टाईमपास करण्यासाठी तुम्ही प्रेम करताय. घाबरू नका मला स्वराने सगळं काही खरं खरं सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा मला खरंच सांगा." सुमन त्यांना विश्वासात घेऊन विचारत होती.

"हो काकू, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही खरंच लग्न करणार आहोत." अनघाने धाडस करून सत्य काय ते सांगितले.

"लग्न कसं करणार? पळून जाऊन" सुमन च्या अशा बोलण्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि चेहऱ्यावर कोणतेही भाव व्यक्त केले नाही.

"हे बघा, पळून जाऊन लग्न करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांना या गोष्टीची आधी कल्पना द्या. ते काय म्हणतात? ते पहा. त्यांना व्यवस्थित समजावून सांगा आणि मगच लग्न करा." सुमन त्यांना व्यवस्थित सगळे सांगत होती. तिला मनापासून वाटत होते की तिच्या जे वाट्याला आले ते इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठीच तिची धडपड चालू होती.

"पण काकू, ते काही तयार होणार नाहीत, आमच्या घरातून परवानगी मिळेल असे मला वाटत नाही." अनघाने तिची परिस्थिती सांगितली. जेणेकरून तिने घेतलेला निर्णय योग्य आहे दर्शवत होती.

"अरे, तुम्ही आजच्या जनरेशन च्या आहात ना! आजच्या युगात आई वडीलांची आणि मुलांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आता बरेच जण प्रेमविवाह करत आहेत, त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना कोणतीच अडचण असेल. आजच्या युगात प्रेमविवाह करणेच खरंतर गरजेचे आहे मी. एकमेकांना समजून-उमजून आई वडिलांच्या संमतीने लग्न झाले तर त्यात काय वाईट आहे?" सुमनने त्यांना समजावून सांगितले.

"पण हे आई-वडिलांना कोण समजावून सांगणार? आम्ही सांगितले तर आमचे काही ऐकतील असे वाटत नाही." सोहम मधेच बोलला.

"मी आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही आधी तुमच्या आई वडिलांना समजावून सांगा. जर का ते आले नाहीत किंवा त्यांना मान्य नसेल तर मी स्वतः तुमचे लग्न लावून देईन आणि तुम्ही दोघेही माझ्याकडे रहाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पण लग्न तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच करायचे. सोहम तू आधी व्यवस्थित सेटल हो आणि मग मी स्वतः तुमच्या दोघांचे लग्न लावून देईन." हे बोलताना सुमनला त्या दोघांनी त्यांचा सजवलेला संसार डोळ्यांसमोर अगदी चित्रपटासारखा सरकला. किती कष्टाने त्या दोघांनी मिळून संसार उभा केला होता. एक एक गोष्ट त्यांनी अगदी प्रेमाने जमवली होती. गोळा करून त्यांनी मोठ्या कष्टाने संसाराचा वेल रुजू केला होता.

सुमनने त्या दोघांच्या मनात विश्वास निर्माण केला होता, की मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही घाईने चुकीचा निर्णय घेऊ नका. त्या दोघांनाही सुमनचे विचार पटले. पृथ्वी सुध्दा तिच्या बोलण्याने प्रभावित झाला.

"हो काकू, आम्ही आमच्या घरी सांगण्याचा प्रयत्न नक्की करू. त्यांना सांगितल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही." अनघाने सुमनला आश्वासन दिले तेव्हा सुमनला बरे वाटले.

"जर त्यांना मान्य नसेल तर मला सांग, मी काहीतरी करेन." सुमनने देखील अनघाला आश्वासन दिले. सुमनच्या बोलण्याने त्या दोघांना आधार वाटला. कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहे हे पाहून आनंद झाला.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..