आत्मसन्मान 16

Marathi story


"आम्ही फक्त त्या नवीन व्यक्तीच्या अंगात कोण कोणते कलागुण आहेत? त्याचा शोध घेतो आणि त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल माहिती देऊन त्या त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतो, म्हणून हा सगळा आटापिटा. याच्यामध्ये आमचा कोणताच स्वार्थ नाही. आम्ही हे फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठीच करतो. त्यांच्या हे सगळे फायद्याचंच आहे." पृथ्वी सगळे स्पष्टीकरण देतो.

"मग तू मला गाणं का म्हणायला सांगितलास? मला वाटलं ते सगळं रॅगिंग होतं, म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल तिरस्कार वाढला. नाहीतर मी कशाला इतकं बोलले असते." स्वराने स्पष्टिकरण दिले.

"तुला वाटलं मी रॅगिंग साठी सांगितलंय. तर तसे नाही कारण मला खात्री होती की तुला गाणं नक्कीच म्हणता येत असेल आणि फ्रेशर्स पार्टीच्या वेळी प्रत्यक्ष पाहिलंय. तू खूप छान गाणं म्हणतेस. त्यामध्येच करिअर करायचं होतं ना? डॉक्टर कशाला होत आहेस, गाण्यांमध्ये खूप संधी आहे? आपली आवड जपायची. हवं तर मी तुझ्या घरी सांगतो." पृथ्वी

"माझ्या बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावे आणि माझी सुद्धा अगदी लहानपणापासूनची इच्छा होती. त्यामुळे मी डॉक्टर शिकत आहे. बाकी गाणं माझा एक छंद आहे. अधून मधून म्हणते आणि इतकं छान म्हणते हे मला अजिबात माहीत नव्हतं. ते फ्रेशर्स पार्टीच्या वेळेसच समजले." स्वरा

"ओके." म्हणून पृथ्वी तेथून जाऊ लागला, तेव्हा स्वराने त्याला हाक मारली आणि फ्रेंण्ड्स म्हणून हात पुढे केला.

मैत्री करण्याची घाई खूप आहे तुला. पण मी एखाद्याला मित्र मानलं तर त्याचा हात कधीच सोडत नाही आणि समोरचा जसा आहे तसाच हवा असा माझा अट्टाहास असतो. तेव्हा तू विचार करून मैत्रीचा हात पुढे कर.

"माझाही तसाच अनुभव आहे म्हणून कदाचित एकच माझी मैत्रीण आहे अजून पर्यंत, बाकी कोणी मैत्रीण झालेच नाही. एकच मैत्रीण असावी पण जीवाभावाची असावी हे माझे मत आहे. मी तुझ्याशी मैत्री केली तर कधीच बदलणार नाही." स्वराने तिची बाजू स्पष्ट सांगितली. तेव्हा पृथ्वी तिच्याशी मैत्री करण्यास तयार झाला. त्या दिवसापासून त्यांची मैत्री खुलत गेली.

स्वरा नेहमीप्रमाणे लेक्चरला जाऊन बसली. पण तिचे लेक्चर मध्ये लक्ष लागेना, तिच्या मनात सारखे आपण किती चुकलो? आपण तसे बोलायला नको होतो, असे वाटून वाईट वाटू लागले. आपण वर्गात बसलो आहोत याचे देखील तिला भान नव्हते. नंतर कॉलेज सुटल्यावर ती तशीच घरी गेली. जाताना ही बस मध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे तिला बसमध्ये चढायला भीती वाटत होती. इतक्यात पाठीमागून पृथ्वी आला.

"तू बस मध्ये चढत का नाहीस? चल चढ लवकर." असे तो म्हणाला. त्याच्याकडे पाहून स्वराने एक छोटीशी स्माईल दिली आणि ती लगेचच बस मध्ये चढली.

तिला आता बरे वाटले आपल्या ओळखीचे कोणी तरी आहे याचे समाधान वाटले आणि ती नेहमीप्रमाणे स्टॉप वरून घरी गेली. नंतर तिने आईला सकाळपासून जे काही घडले ते सर्व सांगितले. तेव्हापासून सुमनला स्वराची खूप काळजी वाटू लागली. जर अशी मुले आजूबाजूला असतील तर जगणे देखील मुश्कील होऊन जाईल. त्यापेक्षा मुलींनी आत्मनिर्भर बनायला हवे. परिस्थितीला तोंड देण्याचे बळ मिळायला हवे. माझी स्वरा इतकी धीटा ची पण आज तिला अशा परिस्थितीला सामोरे जाता आले नाही तर बाकीच्या मुलींची काय हाल होत असतील? असा विचार सुमनच्या मनात येऊन गेला.

"स्वरा, तू घाबरून न जाता अशा परिस्थितीला धीराने तोंड देण्यास शिक. असे किती दिवस कोण तुझे संरक्षण करण्यासाठी येणार? एखाद्या दिवशी कोणीच नसेल तर तुझे तुलाच संरक्षण करावे लागणार आहे ना! मग कशाला कुबड्यांची गरज आहे? ताठ मानेने चालायचे आणि स्वतःचे रक्षण स्वतः च करायला समर्थ राहायचे." सुमनने स्वराला धैर्याने जगण्याची प्रेरणा दिली. तिला सत्य परिस्थिती समजावून सांगितली आणि धैर्याने जगण्याचे बळ दिले.

"हो आई, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे ग, पण त्यावेळी मला काहीच सुचले नाही. त्यात बस मध्ये इतकी गर्दी होती त्यामुळे मी घाबरून गेले ग. पण इथून पुढे मी नक्की लक्षात ठेवेन. मी अजिबात घाबरणार नाही तर धीटाने परिस्थितीला सामोरे जाईन." स्वरा

"आजचं ठीक आहे, पण इथून पुढे तू लक्षात ठेव परिस्थितीसमोर स्वतः हतबल होऊन चालणार नाही. परिस्थितीशी दोन हात करून लढायलाच हवे, तरच स्त्री चार दिवस ताठ मानेने जगू शकेल. नाहीतर तिचे जगणे मुश्किल होऊन जाईल. स्वतःचे रक्षण स्वतःला करता आलेच पाहिजे." सुमन लेकीला स्वरक्षणाचे धडे देत होती.

"हो आई, मी नक्कीच लक्षात ठेवीन. तुझे संस्कार तर आहेतच माझ्यावरती, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी स्वरक्षण करण्याचा प्रयत्न करेन." स्वरा

दुसऱ्या दिवशी स्वरा आणि अनघा दोघी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेल्या. दोघीही लेक्चरला बसल्या. पण थोड्या वेळाने अनघा कुठे गायब झाली? हे स्वराला कळलेच नाही. तिने इकडे तिकडे बराच वेळ शोध घेतला. तरी अनघा कुठे दिसलीच नाही? संपूर्ण कॉलेजभर तिला शोधून झाले. तरीही अनघा कुठे भेटलीच नाही? आता काय करायचे? ही कुठे गेली? तिला शोधायचे कसे? असा विचार तिच्या मनात सुरू होता. तेव्हा तिला समोरच पृथ्वी दिसला. पृथ्वी जवळ गेली आणि पृथ्वीला म्हणाली,

"अरे पृथ्वी, ऐक ना. अनघा कुठेच दिसत नाही? मी मगासपासून तिला शोधत आहे. संपूर्ण कॉलेज भर शोधून झाले. तरीदेखील ती कुठेच दिसेना? कुठे गेली असेल? तुला दिसली का?" स्वरा

"मला कुठे दिसली नाही. कदाचित घरी गेली असेल ती, तू काळजी करू नकोस." पृथ्वीने तिला उत्तर दिले.

"नाही रे, मला न सांगता ती घरी जाणार नाही. मी संपूर्ण कॉलेज शोधले तरी मला ती कुठे सापडली आहे? तिचा फोनही लागत नाही. मला तर तिची काळजीच वाटत आहे." स्वराने तिची अनघाविषयी असलेली काळजी पृथ्वीला सांगितली.

"चल मग मी सुद्धा तिला शोधायला येतो. आपण परत एकदा शोधू." असे म्हणून पृथ्वी आणि स्वरा दोघेजण अनघाला शोधू लागले. पण अनघा कुठेच दिसली नाही. संपूर्ण कॉलेज मध्ये परत एकदा पाहिले. कॉलेजच्या आवारात ही शोध घेतला तरी कुठे ती सापडली नाही.

एका झाडाच्या पाठीमागून त्यांना तो आवाज येत होता. पृथ्वी आणि स्वरा दोघे तिथे जाऊन पाहतात तर काय? त्या दोघांना शॉकच बसला. ते दोघेही अवाक् होऊन पाहू लागले. तिथे अनघा एका मुलासोबत होती. त्याचे नाव सोहम. तो पृथ्वीचा अगदी जवळचा मित्र होता, पण तो इथे असेल याबद्दल पृथ्वीला ही काही कल्पना नव्हती. ते दोघेही त्या दोघांकडे टकामका पाहू लागले, तेव्हा त्यांना थोडे अवघडल्यासारखे वाटले. आपण ही गोष्ट मैत्रिणी पासून लपवून ठेवली यामुळे अनघाला कसेतरीच वाटू लागले. तिने शरमेने मान खाली घातली. स्वराला या गोष्टीचा खूप राग आला. आपली एवढी बालमैत्रीण आपल्या पासून एखादी गोष्ट लपवून ठेवते, याचे तिला वाईट वाटले आणि ती निघून जावू लागली.

स्वरा जाताना अनघा तिच्या पाठोपाठ जाऊ लागली. "स्वरा, थांब. ऐक ना माझं, मी तुला सांगणारच होते." असे ती म्हणत होती. पण स्वरा काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

पाठीमागून पळत जाऊन अनघाने तिचा हात पकडला. "प्लीज, असे रुसू नकोस ग, तुझ्याशिवाय मला समजून घेणारे कोणीच नाही. तूच जर अबोला धरलास तर मी कुणाकडे पाहायचे? मी तुला सगळं सविस्तर सांगते. चल तिथे आपण बसून बोलूया."

"अजिबात नाही. तू माझा विश्वासघात केला आहेस. या सगळ्या गोष्टी कधीपासून सुरू होत्या? आणि हे मला आत्ता दिसत आहे! ते सुद्धा तू मला कुठे दिसली नाहीस म्हणून.. नाही तर हे तू लपवून ठेवली असतीस. आपण बाल मैत्रिणी होतो ना! मग ही गोष्ट तू का लपवून ठेवलीस? मला स्पष्ट सांगायचं होतं ना! यातून काहीतरी मार्ग काढलाच असतो आपण."

"स्वरा, पण मला भीती वाटत होती म्हणून मी तुला काही सांगितले नाही. चल बघू तिथे बसुया. मी तुला सविस्तर सगळं सांगते." असे म्हणून अनघा स्वराचे हात धरून तिला घेऊन त्या जागी आली. तिथे पृथ्वी आणि सोहम दोघेही होतेच. पृथ्वीला देखील या गोष्टीचे आश्चर्य वाटले तरिही तो काही न बोलता तसाच उभा होता.

"स्वरा, हा सोहम. आपण गणिताच्या क्लासला जोशी सरांकडे जात होतो ना तेथे हा राहतो. सुरूवातीला आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो, नंतर कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलेच नाही. मग आम्ही भेटू लागलो, बोलू लागलो. सगळं काही गुपचूप सुरू होतं. आता तर एकाच काॅलेजमध्ये म्हटल्यावर आम्हाला खूपच आनंद झाला. स्वरा, हे सगळं तुला सांगणारच होते ग, पण माझे धाडसच झाले नाही ग. पण मला आतून खूप चुकल्यासारखे वाटत होते. पण मी काय करू. साॅरी स्वरा. मी तुला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं पण तू माझ्या घरी सांगशील ही भीती वाटत होती ग." अनघाने स्वराला सत्य परिस्थिती सांगितली.

"मग आता पुढे काय निर्णय घेतलाय? हे खरे प्रेम आहे की फक्त टाईमपास.. खरंतर मला टाईमपास हा प्रकार अजिबात आवडत नाही. पण तरीही तुमचा निर्णय मला ऐकायचा आहे. सोहम तू अनघाला मधूनच सोडून देणार आहेस की तिच्याशी लग्न करणार आहेस?" स्वरा अगदी रोखठोक बोलत होती. तिला ना कुणाची भीती ना कशाचा धाक होता, तिच्या या बोलण्याने पृथ्वी तिच्यावर प्रभावीत झाला. ही प्रॅक्टिकल विचार करणारी मुलगी आहे हे त्याला जाणवले.

तेव्हा सोहम म्हणाला, "नाही आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत. आमचे एकमेकांचे मनापासून प्रेम आहे. आम्ही टाईमपास अजिबात करत नाही."

"घरी सांगणार आहात की नाही. न सांगताच लग्न करणार आहात! मला वाटतं आई-बाबांच्या संमतीने तुम्ही लग्न करावे." स्वरा तिचा निर्णय सांगून मोकळी झाली.

"आमच्या घरच्यांची संमती मिळेल असे वाटत नाही, त्यामुळे शक्यतो आम्ही न सांगताच लग्न करणार आहोत आणि तेही लवकरच." सोहम

"मला हे अजिबात आवडले नाही. मी तुमच्या या दोघांच्या निर्णयाशी सहमत नाही. लग्न करायचे असेल तर आई-वडिलांच्या संमतीनेच करायला पाहिजे. नाहीतर त्या लग्नाला काहीच अर्थ नाही, मी तुमच्या या निर्णयात सहभागी होऊ शकत नाही." स्वराने तिचा निर्णय सांगितला आणि तो निर्णय पृथ्वी ला आवडला. त्याचा स्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.
क्रमशः

🎭 Series Post

View all