Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 15

Read Later
आत्मसन्मान 15
स्वराने सगळे राऊंड पार केले. तिच्या बरोबरीला एक मुलगा देखील होता. आता त्या दोघांच्यात एक नंबर काढायचा होता. मिस्टर फ्रेशर्स किंवा मिस फ्रेशर्स काढणार होते. त्यांचा कॉलेजतर्फे सत्कार केला जाणार होता. परिक्षक दोघांचेही रेकॉर्ड चेक करू लागले. स्वरा अनघाच्या जवळ येऊन बसली. अनघाला खूप आनंद झाला होता.

"स्वरा, आता तूच जिंकणार बघ. माझी खात्री आहे तूच मिस फ्रेशर्स होणार." अनघा

स्वरा म्हणाली, "काहीही होऊ दे, पण शेवटच्या राउंड पर्यंत जाऊन पोहोचले हे महत्त्वाचं."

"गाणं पण किती छान म्हणालीस! मला वाटल आता ही काही म्हणणार नाही, या राऊंड मधून ही बाहेर निघेल, पण किती मस्त ग! छान गाणं म्हटलेस." अनघा आनंद व्यक्त करत म्हणाली

"अगं ते आपलं सहजच. मलाही माहित नव्हतं मी इतकी छान गाणं म्हणू शकेन. आता त्या मुलाची बरोबर जिरली. मला गाणं म्हणायला सांगतो काय? आता एक म्हणून दाखवले की गाणं माझ्या आवडीचं. बोलतीच बंद झालक त्याची." स्वरा

"खरंच यार ग्रेट आहेस तू. प्रत्येक गोष्ट जिद्दीने करतेस म्हणून आज टॉपर आहेस." अनघा स्वराचे कौतुक करत होती.

"तसं काही नाही ग. मी आपलं प्रयत्न करते बाकीचे काय होईल ते होईल?" स्वरा

"हा तुझा स्वभाव मला आवडतो म्हणून तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस." अनघा

"बघू आता निकाल काय लागतोय ते?" स्वरा मोठ्या आशेने म्हणाली

"मला वाटतं तूच जिंकणार. माझा असा विश्वास आहे तुझ्यावर." अनघा तिचा निर्णय सांगून मोकळी होते.

शेवटी सगळ्या गोष्टी पाहून निकाल जाहीर करण्यासाठी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना तिथे बोलवण्यात आले. प्रिन्सिपल सर आल्यानंतर त्यांच्या हातात रिझल्ट चा कागद दिला. तो कागद घेऊन प्रिन्सिपल सर दोन मिनिटं त्या विषयाला अनुसरून बोलले आणि म्हणाले, "तुमचा हा खेळ घेऊन झालेला आहे, तर आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग येत जातील तुम्ही त्यात आपले शंभर टक्के देण्याचे प्रयत्न करा. शेवटी सगळे नशिबावर अवलंबून आहे. आजच्या या खेळामध्ये मिस्टर फ्रेशर्स किंवा मिस फ्रेशर्स यांची निवड होणार आहे. तर मी त्यांचे कौतुक करतो. या वर्षीचे फ्रेशर्स आहेत मिस स्वरा.... हे ऐकून हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

स्वरा चा नंबर आला म्हणून स्वरा आणि अनघा दोघीही खूप खूश होत्या. स्वरा च्या डोक्यावर मिस फ्रेशर्स चा मुकूट चढवण्यात आला आणि तिला बक्षीसही देण्यात आले. तेव्हा तिने त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला, तेव्हा तो मुलगा गालातच हसत होता आणि बाकी हॉलभर टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रम संपल्यानंतर थोडा वेळ थांबून त्या दोघी घरी जायला निघाल्या. इतक्यात गेटपाशी ती सगळी मुले जमलेली त्यांना दिसली.

"या मुलांना टवाळक्या करण्याशिवाय दुसरे काहीच काम नाही का? ऊठसूट नुसता दुसऱ्याची टिंगल करायची किंवा रॅगिंग करायचे. याशिवाय काहीच येत नाही का? श्रीमंत घरची पोरं अशीच." स्वरा मुद्दामून त्या मुलाला उद्देशून म्हणाली.

"सगळी एका पेक्षा एक आहेत. स्वरा तो मुलगा पृथ्वीराज पाटील मोठ्या उद्योगपतींचा म्हणजेच अमरसिंह पाटील यांचा मुलगा आहे. भरपूर इस्टेट आहे. शिक्षण पूर्ण करायचं म्हणून कॉलेजमध्ये येत असेल. त्यांना कशाचं काय पडलंय?" अनघा सुद्धा स्वराच्या बोलण्यात री ओढत होती.

"पण बाकीचे शिकायला येतात ना गं, त्यांना तरी शिकू द्यायचं. त्यांचे संरक्षण करायचे की उगीचच टिंगल काढत फिरायचं." स्वरा त्याला ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाली.

"आपण काय बोलणार? ज्याचा त्याचा प्रश्न. आपण कॉलेज मध्ये यायचं, अभ्यास करायचं, लेक्चर अटेंड करायचे आणि घरी जायचं." अनघा

"ते तर करतोस ग, पण यांचा आपल्याला त्रास होतो त्याचं काय?" स्वरा

"दुर्लक्ष करायचं." अनघा

"तरीही त्रास होतोच ना. आपण प्रिन्सिपल सरांनाच तक्रार केली पाहिजे म्हणजे कसे सगळे व्यवस्थित होईल." स्वरा

"नको ग. उगीच यांच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आपण घरी जाऊ चल." अनघा

"हो ग. चल. नाहीतर उशीर होईल." असे म्हणून दोघी घरी गेल्या.

घरी येऊन स्वराने आईला सगळी हकीकत सांगितली. सुमनलाही खूप आनंद झाला. "जिद्दी आहे स्वरा जे काही मनात आले ते मिळवतेच." असे ती मनात म्हणाली "अगदी बाबाच्या वळणावर गेली आहे स्वरा." सुमनला आकाशची आठवण आली.

दुसरा दिवस उजाडला. आज अनघा कॉलेजला येणार नव्हती. स्वराला काॅलेजला एकटीलाच जावे लागणार होते. बस मध्ये किती गर्दी असते? त्यापेक्षा न गेलेलंच बरं. असे तिला वाटू लागले. एकटी जायचं म्हणजे तिच्या अंगावर काटाच आला. तिलाही जावेसे वाटत नव्हते पण जावे तर लागणारच होते. घरी बसून काय करायचं? हा प्रश्न समोर होताच. काॅलेजला गेले की तेवढेच नोट्स मिळतात असे तिला वाटले म्हणून ती कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली.

तिचे सगळे आवरून स्वरा बसस्टॉपकडे जायला निघाली. बस स्टॉप वर गेल्यावर बराच वेळ झाला तरी बस काही येईना. एक बस आली त्यामध्ये प्रचंड गर्दी होती.

तरीही स्वरा त्या बस मध्ये चढली. कारण त्यानंतर ची बस किती वाजता येईल? हे तिला माहीत नव्हते आणि नंतरच्या बसने गेले की कॉलेजला उशीर होईल असे म्हणून ती त्या बसमध्ये चढली. गर्दी भरपूर असल्यामुळे अगदी जागा करत परत की आतपर्यंत मधोमध जाऊन उभी राहिली. त्या बसमध्ये मुलांचीच गर्दी जास्त असल्यामुळे स्वराला अवघडल्यासारखे वाटले. तिच्या आजूबाजूला सगळी मुलेच होती. त्यातली बरीच टवाळकी मुले असल्यामुळे स्वरा थोडी घाबरली. त्यात बस मध्ये कोणीच ओळखीचे नव्हते, इकडे तिकडे बघायला ही येत नव्हते इतकी प्रचंड गर्दी त्या बस मध्ये होती.

आजूबाजूची मुले तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. कोणी हाताला टच करत होते, तर कोणी पाठीला हे पाहून आपण किती मोठ्या संकटात आहोत हे तिला जाणवले. कोणाला मदत मागावी तरी कशी? हा प्रश्न तिच्या समोर पडला. तेवढ्यात त्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला "काय भारी आइटम आहे?"

हे शब्द ऐकून स्वराच्या छातीत धडकीच भरली. आज अनु आली नाही तर मला या सगळ्या दिव्यांना सामोरे जावे लागत आहे. एखाद्या मुलीची जीवन असेच आहे का? कुणीही तिची चेष्टा अवहेलना करायची आणि तिच्या मनाच्या चिंधड्या चिंधड्या करून सोडायच्या. मुलगी म्हणजे यांना चीज, वस्तू वाटते की काय? या ठिकाणी त्यांची बहीण असती तरीही असेच वागले असते का ते? असे विचार तिच्या मनात येऊ लागले. त्या मुलांचे सगळे बोलणे ऐकून स्वराला संताप येत होता. तरीही ती तशीच शांत बसली कारण ती मुले घोळका करून तिच्या बाजूने होती. त्यातून तिला बाहेर पडता येत नव्हते आणि बसमध्ये ओरडले तर आम्ही काहीच केले नाही म्हणून ही मुले हात वर करून उभे राहतील आणि आपलेच बोल खोटे ठरेल. या भीतीने ती तशीच उभी राहिली. जर इतके मोठे संकट आले कि मग आपण ओरडायचे आणि बस थांबवायला सांगायचे असे तिने मनात ठाम ठरवले. पण तरीही तिच्या मनात थोडी भीती होतीच.

त्यातला एकटा मुलगा "अरे इतक्या लांब का उभा आहेस? जवळ रहा की उभा." असे म्हणाला. हे बोललेले शब्द स्वराच्या कानावर आले आणि ती प्रचंड घाबरली. आता काही होईल का? की आपण ओरडूया असे ती मनात ठरवत होती. पण तिच्या मदतीला येणार तरी कोण? बस मध्ये सगळे अनोळखीच आणि त्यात मुलांची संख्याही जास्त होती. आपण एकटीने ओरडून आपल्या मदतीला कोणी येईल का? असा प्रश्न तिच्या मनात घोळत होता.

आजूबाजूचे स्पर्श तिला बोचत होते. इतक्यात ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला.
"अरे सेजल, तू किती दिवसांनी भेटतेस आणि कॉलेजला चालली आहेस का? अगं मी तुझी किती वाट पाहिली? तू तर काही आलीच नाहीस. आपले दोन वर्षांपासूनचे प्रेम पण तू एका क्षणात कशी काय विसरलीस? मला वाटले की तुझे लग्न झाले आहे की काय? अगं चल तिथे मी बसलोय आपण दोघे जण जाऊन बसू." असे म्हणून तो मुलगा स्वराचा हात धरुन तिला त्याच्या जागेवर नेऊन बसवतो. तिथे बसल्या नंतर स्वरा त्या मुलाकडे पाहते, तर तो मुलगा पहिल्या दिवशी रॅगिंगच्या वेळी तिला गाणे म्हणायला सांगतो तोच होता. त्याला पाहून स्वराला खूप आश्चर्य वाटले.

बस कॉलेज च्या दारात येईपर्यंत स्वरा त्या मुलाकडे पाहत होती. याच्याबद्दल किती गैरसमज केला होता? पण हा मुलगा खूप चांगला आहे, आज माझ्या मदतीला धावून आला. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावर त्याचा अर्थ लावू नये. ही व्यक्ती मनातून खूप चांगलीच असते की वाईट. मी उगीचच त्याला काही वाट्टेल ते बोलले. असे एक ना अनेक गोष्टींनी स्वराला आपलीच चूक दिसत होती. ती तशीच शांत बसून होती. बस कॉलेज समोर येऊन थांबल्यावर सगळेजण बसमधून उतरले. स्वरा उतरल्यानंतर पळत जाऊन त्या मुलाजवळ जाते.

"हॅलो मी स्वरा. थँक्यु सो मच. आज तू मला मदत केलीस." स्वरा

"ऑलवेज वेलकम. प्रत्येक व्यक्ती तितक्या वाईट प्रवृत्तीची नसते. ही एकच गोष्ट मनात ठेवून घे." असे म्हणून तो मुलगा परत निघून चालला.

"अरे सॉरी यार, मला तेव्हा माहित नव्हतं. हे रॅगिंग वगैरे माझ्यासाठी खूप नवीन होतं ना! म्हणून मी तसा तर्क लावला पण सॉरी." स्वरा थोडीशी दबकतच म्हणाली

"ओके" म्हणून तो मुलगा परत जाऊ लागला आणि स्वरा त्याच्या पाठीमागे पाठीमागे जात होती.

"तुझं नाव काय? सांगितलं नाहीस." स्वरा

"पृथ्वी.. पृथ्वीराज पाटील." तो मुलगा

"फ्रेण्डस्" असे म्हणून स्वराने हात पुढे केला.

"टवाळक्या मुलाशी मैत्री करायला आवडेल तुला? आम्ही काय टवाळकी पोरं फक्त दंगा मस्ती करणार. श्रीमंताघरची पोरं आम्ही." पृथ्वी नाराजीच्या सुरात म्हणाला

"आता काय लाजवतोस का मला? साॅरी म्हणाले ना मी." स्वरा

"लाजवत नाही. फॅक्ट सांगतोय." पृथ्वी

"बस कर ना आता. मी समजू शकले नाही. ते रॅगिंग मुळे माझा तसा समज झाला. पण आज मला समजलं ना." स्वरा तिचा मुद्दा पटवून देत होती.

"रॅगिंग इतकंच दिसतं सर्वांना. पण त्यामागील हेतू कुणालाच दिसत नाही. फक्त त्या एकाच गोष्टीवरून जज केलं जातं." पृथ्वी

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..