आत्मसन्मान 14

Marathi story


"ए मुली तू इथे समोर ये." असा आवाज स्वराच्या कानावर पडला आणि तिने पाहिले तर ऍडमिशन च्या दिवशी जो मुलगा होता तोच तिला बोलवत होता. पण स्वराला नक्की समजले नाही की हा कोणाला बोलवत आहे? ती मी असे म्हणाली.

"हो हो तूच, पिंक कलर ड्रेस इकडे ये." असे म्हणून तो मुलगा त्याच्या मित्रांसोबत काहीतरी कुजबुज लागला. ते पाहून स्वराला मनातून प्रचंड भीती वाटली. पण तिने चेहऱ्यावर अजिबात दाखवून दिले नाही. ती हळूहळू चालत पुढे गेली.

"काय काम आहे?" स्वराने धीटाने त्या मुलाला विचारले. तेव्हा तेथे असलेली आजूबाजूची मुले जोर-जोरात हसू लागली. ते पाहून स्वरा च्या पोटात गोळाच आला. हे आणि काय घडत आहे? मेडिकल डिपार्टमेंटल खूप चांगला आहे असे ऐकायला मिळाले होते. मग ही इंजीनियरिंग डिपार्टमेंटची मुले असतील का? स्वराच्या मनात विचार चक्र सुरु झाले.

"एखादं गाणं म्हणून दाखव आम्हाला आणि हो छान रोमॅण्टिक असू दे गाणं." तोच मुलगा परत म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून तिला घामच फुटला. इथे रॅगिंग होत आहे. अरे बापरे! मी या कचाट्यात अडकले तर... स्वरा मनातच म्हणाली.

"आवर लवकर. अजून बाकीच्यांचे डेमो घ्यायचे आहेत." असे तो मुलगा परत म्हणाला. आता काय करावे? हे स्वराला कळेनाच या सर्वांसमोर गाणे म्हणायचे. माझा आवाज चांगला नाही हे ठणकावून सांगायचे का? तेच करायला लागणार आहे. नाहीतर ते काहीही शिक्षा देतील. स्वराच्या मनात असे वेगवेगळे संवाद चालू होते.

लगेच ती पुढे सरसावली आणि धीटाने म्हणाली "मला गाणं म्हणणं जमणार नाही आणि मी ह्या तुमच्या रॅगिंगला बळी पडणार नाही. कळलं. जर तुमचं असंच चाललं तर मी प्रिन्सिपल सरांकडे तुमची तक्रार घेऊन जाईन." स्वराने असे त्या मुलांना ठणकावले. यावर तो मुलगा जागेवरून उठला आणि स्वरा कडे येऊ लागला. ते पाहून स्वराला खूप भीती वाटू लागली. पाठीमागून अनघाने येऊन स्वराचा हात पकडला आणि चल स्वरा असे म्हणाली.

स्वरा जाणारच इतक्यात तो मुलगा अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि गप्प गाणं म्हणायचं असे म्हणाला. हे ऐकून स्वराला त्याचा खूप राग आला आणि ती हात उचलणार इतक्यात अनघाने तिला अडवले. कारण त्या मुलांच्या नादी लागणे हे स्वराला परवडणारे नव्हते. पुढे जाऊन काहीही होऊ शकते. हे तिने जाणले आणि तिने स्वराला थांबवले.

त्या दोघी तेथून निघाल्या घाबरट घाबरट पोरी असे ती मुले म्हणू लागले. स्वरा थांबणार होती पण अनघाने तिला ओढत नेले. पुढे जाऊन स्वराने अनघाचा हात झटकला आणि

"थांब, मला का थांबवलीस? मी त्याच्या कानाखाली दिले असते ना! मग कळलं असतं असं मुलींशी कस वागायचं आणि नवीन लोकांचा रॅगिंग कस करायचं? हे संस्कार का या मुलांचे? हे उद्याचे खरे नागरिक आहेत. यांनी असे केले तर पुढे जाऊन देशाचं काय होईल? याचा थोडा तरी विचार करायचा. यांच्या आई-बाबांना आहे समजलं तर त्यांना चालेल का? त्यांना कशाचं भानच नाही दिसली नवीन पोरं की रॅगिंग सुरू." स्वरा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"स्वरा, तू चल बघू. त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही. श्रीमंत घरची पोरं आहेत ही, टाईमपास म्हणून हे चालतंच असतं. प्रत्येक कॉलेजमध्ये हे असं चालूच असतं. तू जास्त मनावर घेऊ नकोस आणि तू कोणताही पळपुटेपणा केला नाहीस. मी पुढचा विचार करूनच तुला थांबवलं. चल आता आपण जाऊन लेक्चरला बसू. यांच्या नादी लागले की आपलं शिक्षणच बाद होऊन जाईल." अनघा स्वराला समजावत होती.

दोघी जणी जाऊन वर्गात बसल्या. पहिलाच दिवस असल्याने फक्त इंट्रोडक्शन आणि पुस्तक परिचय तेवढे जाणून झाले. सगळे लेक्चर संपत आले होते. आता कॉलेज सुटणार होती इतक्यात सूचना आली की उद्या आपल्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी काही खास कार्यक्रम सिनियर लोकांनी आयोजित केलेला आहे. तेव्हा उद्या लेक्चर होणार नाही. इथे फ्रेशस पार्टीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज् होणार आहेत. तुमचा परिचय होणार आहे आणि एक छोटासा कार्यक्रम होणार आहे. ही सूचना ऐकून सर्वांच्या मनात एक धडकीच भरली. कारण सकाळीच रॅगिंगचा प्रकार पाहिला होता हा त्यातलाच एक प्रकार आहे की काय? असे वाटू लागले. पण दुसऱ्या क्षणाला फ्रेशर्स पार्टी म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी काही तरी खास असेल असे वाटू लागले. त्यामुळे सगळेजण आनंदाने घरी गेले.

स्वरा घरी आली. पहिलाच दिवस असल्यामुळे जाण्या येण्याची दगदग झाली होती. बसमधून गर्दीतून जायचे आणि यायचे हे एक दिव्य होते. स्वराने आज कॉलेजमध्ये काय काय झाले? ते सगळे सुमनला सविस्तर सांगायला सुरुवात केली. तिची ही लहानपणापासूनची सवय दिवसभरात काय काय घडले? ते संध्याकाळी आई पुढे आली की आईला सगळे सांगायचे. तेवढाच बोलण्यात दोघींचाही वेळ निघून जायचा. सुमन ला देखील स्वराच्या गमती जमती ऐकून खूप छान वाटे.

दुसऱ्या दिवशी स्वरा आणि अनघा कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे गेल्या. आज फ्रेशर्स पार्टी होती त्यामुळे एका मोठ्या हॉलमध्ये सगळे नवीन जुने विद्यार्थी बसले होते. मेडिकल आणि इंजिनिअरिंग चे एकत्रीत असल्यामुळे खूप मोठा हाॅल ठरविण्यात आला होता.

तशी मुलांची डिमांड होती की सगळे एकत्र असले की खूप मज्जा येईल. थोड्या थोड्या मुलांना घेऊन पार्टी करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे कमिटीने तसा निर्णय घेतला होता.

सगळे जण फ्रेशर्स पार्टीसाठी जमले होते. स्वराला आणि अनघाला देखील खूप उत्सुकता होती की काय होईल? हाॅल मध्ये सगळेजण बसतानाच सुरुवातीला नवीन विद्यार्थी आणि पाठीमागे सीनियर स्टुडंट बसले होते. नवीन विद्यार्थ्यांचा गेम सुरु झाला. बाॅल पासिंग... ज्याच्या हातामध्ये बाॅल येईल त्याने एखादी ऍक्टिव्हिटीज करून दाखवायची. असे करत करत एकेक राऊंड होत गेले आणि शेवटी अगदी थोडे दहा-पंधरा विद्यार्थी शिल्लक राहिले त्यामध्ये स्वरा सुद्धा होती.

आता त्या पंधरा विद्यार्थ्यांना दुसरी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सांगितले. एखाद्या विषयावर चार पाच मिनिटे कंटिन्यू बोलायचे. भाषा कोणतीही चालेल.. या ऍक्टिव्हिटीज मध्ये पाच विद्यार्थी निवडले गेले. त्यामध्ये सुद्धा स्वरा होती अनघाला खूप आनंद झाला. आपली मैत्रीण पहिल्या पाच मध्ये गेली आणि स्वरा सुद्धा खूप खूश होती.

आता शेवटचा राउंड. यामध्ये फायनल दोन नंबर काढण्यात येणार होते. सुरुवातीला जो मुलगा स्वराला भेटला होता, तोच मुलगा या सगळ्याची अरेंजमेंट करण्यामध्ये होता. पहिल्या दोन राऊंड बाकीच्या विद्यार्थ्यांनी घेतले आणि आता या शेवटच्या राऊंड साठी त्या मुलाला अनाउन्समेंट करायला सांगितले. तिसरा राऊंड काय असेल? याची सर्वांना उत्सुकता होतीच. स्वरा देखील कुतुहलाने पाहत होती, की तिसरा राऊंड काय असेल? आणि त्यामध्ये देखील तिला विजय हा मिळवायचाच होता. कारण लहानपणापासून अगदी प्रत्येक गोष्टींमध्ये ती नंबर मिळवत होती. शाळेमध्ये तर स्कॉलर होतीच शिवाय इतर अँक्टीव्हीटीज मध्ये सुद्धा तिचा नंबर येत होता.

तो मुलगा मुद्दाम होऊन स्वरा चा नंबर येऊ नये या विचाराने काहीतरी द्यावे असा तो विचार करत होता. थोड्या वेळाने त्याने लगेच अनाउन्समेंट केली. या पाच जणांनी प्रत्येकाने एखादं गाणं म्हणून दाखवायचं. खरं तर हे स्वरासाठी चॅलेंजिंग होतं. मागे तिला म्हणायला सांगितलं होतं पण ती म्हणाली नाही. आता त्याच गोष्टीचा बदला म्हणून या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्या मुलाने मुद्दामून हे सांगितले आहे हे तिला तिने जाणले.

एका पाठोपाठ एक असे चारही स्पर्धकांनी गाणे म्हटले. स्वरा चा नंबर आला. स्वरा माईक घेऊन उभारली. आता हिला गाणं काही म्हणता येणार नाही अशा आवेगाने तो मुलगा गालातच हसला. इतक्यात...

हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कभी कभी है धून जिंदगी
हर पल यहाॅ जी भर जिओ
जो है समा कल हो ना हो....

हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कभी कभी है धून जिंदगी
हर पल यहाॅ जी भर जिओ
जो है समा कल हो ना हो....

स्वराचे हे गाणे ऐकून तो मुलगा अवाक् होऊन बघतच राहिला. सगळे आश्चर्याने पाहू लागले. कुणालाच अपेक्षा नव्हती की स्वरा इतकी छान गाणं म्हणेल. सगळे वातावरण अगदी शांत झाले. त्या हाॅलमध्ये शांतता पसरली. स्वराचे गाणे संपून बराच वेळ झाला तरी कोणीच काही बोलेना. स्वराला अवघडल्यासारखे वाटू लागले. ती सुद्धा स्टेजवर तशीच उभी राहिली. मग एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो मुलगा भानावर आला. स्वराला खूप आनंद झाला.

आता फायनल राऊंडसाठी स्वरा आणि एक मुलगा असे दोघे होते. स्वराची चिकाटी पाहून सगळे तिला सपोर्ट करत होते. आता या फायनल राऊंडसाठी एका विषयावर बोलायचे होते. हा विषय अगदी नेहमीचा होता. यावर हलकं फुलकं भावनिक भाष्य करायचे होते. तो विषय होता बाबा...

त्या मुलाने बाबा या विषयावर बरीच माहिती सांगितली. आता स्वराचा नंबर होता. बाबा तिच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.. खरंतर तिला बाबाविषयी खूप बोलावसं वाटत होते पण तिच्या तोंडातून एक शब्दही फुटेना. ती तशीच बाबा बाबा म्हणत होती आणि तिचे डोळे पाणावले होते.

"स्वरा, तू बोलू शकतेस." अनघाने आवाज दिल्यावर स्वरा भानावर आली. तिने डोळे पुसले आणि ती बोलू लागली.

बाबा दिसायला काटेरी फणसासारखे असले तरी आतून मऊ गरे असतात तसे मऊच असतात. ते कडक शिस्तीचे असले तरी मुलांवर प्रेम करणारेच असतात.
पीकाची किंमत शेतकरी, मुलाची किंमत मूल होऊ न शकणारे पालकांना, पैशाची किंमत गरजवंताला जशी असते तशीच बापाची किंमत वडील नसलेल्या मुलालाच असते.
खरंच हा बाप जिवंतपणी कुणालाच कळला नाही. बाप कधी कळलाच नाही.
ठेच लागली की आठवते आई, बाप कधी दिसत नाही, का कुणास ठाऊक, बाप कुणा कळत नाही.
सगळ्यात जास्त बापाला त्रास होतो ते मुलगी सासरी जाताना. बाप कधी दाखवत नाही पण त्याच्या मनात खूप वेदना होतात. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात सोपवताना खूप वाईट वाटते, मुलगी सुखात राहिलं ना असे सतत वाटत राहते. पण कधी दाखवत नाही. असे हे बाबा त्यांचा आदर करा.

क्रमशः

🎭 Series Post

View all