Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 13

Read Later
आत्मसन्मान 13


सुमनने नव्याने कामाला सुरुवात केली. काकूंच्या मदतीने तिच्याकडे आता बरेचसे कपडे येऊ लागले. ब्लाउज आणि ड्रेस शिलाई चे काम तिला आता व्यवस्थित जमू लागले. हळूहळू ती डिझाइन्स वगैरे पण करू लागली. त्यामुळे तिला हळूहळू पैसे मिळत गेले. मिळणाऱ्या पैशातून सुमन थोडीशी बचत करू लागली आणि आता तिचे व्यवस्थित काम चालू झाले.

हळू हळू दिवस सरकत होते. आकाश शिवाय जगण्याची आता त्या दोघी थोडीशी सवय झाली होती. पण त्याच्या आठवणी मनातून कशा जाणार? त्याची आठवणी त्या दोघींना येत होती. स्वरा कशी मोठी होईल तसा तिला विसर पडत होता. पण सुमनचे काय? सुमनच्या मनातून त्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत. ती स्वरासाठी जगत होती आणि आकाश च्या आठवणींनी जगण्याचे बळ मिळत गेले.

सुमने स्वराला शाळेत घातले. तिला दप्तर, पाटी, पेन्सिल, वही, पाण्याची बाटली अशा वस्तू सुद्धा तिने खरेदी केल्या. स्वरा हे सगळे पाहून खूप आनंदित झाली. सुमन तिला शाळेत सोडायला जायची तसेच आणायलाही जायची. त्या दोघींचे आता सुरळीत चालू होते. सुमन दिवसभर कपडे शिवायची आणि संध्याकाळपासून चा वेळ स्वरा सोबत खेळायची. ती स्वराला वेळ देत होती कारण तिला आई आणि बाबा दोघेही बनून तिला घडवायचे होते. जे दोघांचेही काम होते ते तिला एकटीने पार पाडायचे होते. हे अजिबात शक्य नव्हते पण तिला ते शक्य करून दाखवायचे होते. मुलीसाठी तिला बाबा होणे गरजेचे होते.

स्वराने जेव्हा पहिले पाऊल शाळेत टाकले तेव्हा सुमन ला आकाश च्या आठवणीने खूप वाईट वाटत होते. आज जर आकाश असता तर त्याला किती आनंद झाला असता. माझी मुलगी शाळेत जात आहे, तिचा पहिला दिवस त्याने मनात कोरला असता. तिच्यासाठी अगदी हौसेने सगळं सामान खरेदी केला असता आणि मुलीला शाळेत तो स्वतः घेऊन गेला असता. एक बाप म्हणून त्याने कधीच कुठलीच कसलीच कमतरता भासू दिली नसती. आता ती सगळी जबाबदारी मलाच पार पाडावी लागणार आहे.

सुमन तिची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत होती. स्वरा लहान गट, मोठा गट करत हळू हळू मोठी होत होती. शाळेतून हायस्कूलमध्ये गेली. तिला डॉक्टर बनवायचे स्वप्न होते आकाशने तसे बोलूनही दाखवले होते, त्यामुळे तिच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी सुमन वर होती. तिने येणाऱ्या पैशातून थोडी थोडी बचत करून तिच्या शिक्षणासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवली होती.

सगळे दुःख पाठीशी टाकून सुमन वाट मिळेल तशी पुढे पुढे चालत होती. कधी पायात काटे बोचत होते, तर कधी खडे टोचत होते. पण अडखळत अडखळत ती वाट चालत होती, तिच्या लेकीला घडवत होती, आपले अस्तित्व निर्माण करत होती. आत्मसन्मानाने जगण्याचा तिचा अट्टाहास पूर्ण करत होती.

खरे दिव्य तर तेव्हा जाणवले जेव्हा बाजूच्या लोकांच्या कार्यक्रमाला किंवा इतर कोणत्याही प्रसंगी तिची अवहेलना केली जात होती. ती एक विधवा म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करत होती पण हा समाज तिला पुढे येऊ दिला तर ती प्रगती करणार ना! प्रत्येक स्त्रीने कितीही ठरवले तरी हा समाज तिला कधीच प्रगतीपथावर येऊ देणार नाही. सुमनने स्वतःमध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण ती कुठे जाऊ लागली की शेजारपाजारचे लोक तिलाच बघत असत. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेली की पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या. एखादी नवीन साडी नेसली तरी बायकांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या असायच्या. यामुळे तिला समाजात वावरताना एक प्रकारचे खच्चीकरण होत होते.

हळूहळू स्वरा मोठी होत चालली होती. बघता बघता शाळेतून ती कॉलेजमध्ये कधी गेली हे सुमनला कळलेच नाही. माझी मुलगी मोठी झाली हे तिला जाणवलेच नाही. चिमुकल्या पायांनी घरभर तुरूतुरू पळणारी मुलगी आता कॉलेजला जाऊ लागली आणि आकाशने तिला डॉक्टर बनवण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे सुमनने स्वराला सायन्स ला ऍडमिशन करून दिले. स्वरा नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागली.

मेडिकल चे ॲडमिशन घेण्यासाठी स्वरा कॉलेजमध्ये गेली. नवीन नवीन कॉलेज असल्यामुळे तिला त्यातील काहीच माहिती नव्हते. पण तिच्यासोबत तिची मैत्रीण अनघा ही असल्यामुळे तिला कशाचीच गरज भासली नाही. त्या दोघींनी चौकशी करून ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी असलेल्या रांगेत जाऊन उभ्या राहिल्या.

लाईन बरीच मोठी असल्यामुळे बराच वेळ झाला तरी त्यांचा नंबर येत नव्हता. शेवटी कसाबसा त्यांचा नंबर आला आणि मधूनच एक मुलगा स्वराच्या पुढे येऊ लागला ते पाहून स्वराला खूप राग आला.

"ए हिरो, एवढी मोठी लाईन आहे इथे. आम्ही लाईनमध्ये उभे रहायला काय वेडे आहोत का? लाईन मध्ये उभा रहा." असे स्वरांने ठणकावून सांगितले. स्वरा अगदी तिच्या बाबांच्या वळणावर गेली होती. जे काही असेल ते रोख ठोक बोलायची. मनात काही ठेवायची नाही. आधीच लाईनीत उभे राहून तिचा जीव मेटाकुटीला आला होता आणि त्यात हा मुलगा मधेच आला म्हटल्यावर तिला थोडा राग आला आणि त्या रागाच्या भरात तिने त्याला ठणकावले.

"हॅलो मॅडम, मी काही ॲडमिशनसाठी आलेलो नाही. मी इथे तुमचा सीनियर आहे. माझे या सरांकडे काम आहे म्हणून आलो आहे." असे म्हणून तो मुलगा डायरेक्ट आत गेला आणि तो ॲडमिशन घेणाऱ्या व्यक्तीशी बोलू लागला. सगळे रांगेतच उभे होते. आता स्वराचा नंबर आला आणि तिने तिचे सगळे डॉक्युमेंट त्या व्यक्तीला दिले. तेव्हा तो मुलगा तिथेच होता. त्याने सगळे डॉक्युमेंट पाहिले आणि स्कॉलर आहे असे तो म्हणाला. ॲडमिशन करून परत जाईपर्यंत तो मुलगा तिथेच होता ते पाहून स्वरा मनात "काय गरज आहे मधूनच यायची, खूप एटीट्यूड आहे याला." असे ती म्हणाली. तिने कसेबसे ॲडमिशन करून घेतले.

"स्वरा झालं का एडमिशन? कॉलेज कधी पासून सुरू आहे? सगळी माहिती व्यवस्थित घेऊन आलीस ना." सुमन स्वराला घरी आल्याबरोबर प्रश्नांवर प्रश्न विचारते.

"हो गं आई, सगळी माहिती घेऊन आले." स्वरा थोडीशी वैतागून म्हणाली

"काय झालं बाळा? काही घडलंय का?" तिची आई परत विचारते

"आई, जेवढं मोठं कॉलेज असतं ना तितकंच तिथे गोंधळ असतो. या कॉलेजमधील मुलं शिकण्यासाठी येतात कि टवाळक्या करण्यासाठी हेच कळत नाही. आपण डॉक्टर होणार आहोत याचेही त्यांना भान असू नये. टवाळक्या करत कट्ट्यावर बसणारे हे शोभतं का यांना?" स्वरा

"स्वरा हे कॉलेज लाईफ आहे, एन्जॉय तर करणारच ना आणि डॉक्टर झाल्यानंतर शिस्तीने जगायचंच आहे मग आता बिनधास्त राहिलं तर कुठे बिघडलं? त्यांना काही मन नसतं का?" असे म्हणून सुमनने स्वराची समजूत काढली.

थोड्या दिवसांनी स्वराचे कॉलेज सुरू झाले. आज कॉलेजचा पहिला दिवस होता. स्वरा नेहमीप्रमाणे आवरली होती. तिने पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिची बॅग तिने घेतली त्यामध्ये पेन, वही, पेन्सिल सगळे सामान घेतले. सुमनने स्वराला पाण्याची बाटली, डबा दिला. ते घेऊन स्वरा आणि अनघा कॉलेजला जाणार होत्या. पण तिच्या मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती. ती खूप धीटाची होती त्यामुळे नवीन कॉलेज कसे काय आहे? हे जाणण्यासाठी उत्सुक देखील होती. शिवाय तिच्या सोबतीला अनघा देखील होती, त्यामुळे तिला कशाचेच टेन्शन घेण्याची गरज नव्हती. सगळे आवरून देवाला नमस्कार करून तिने नंतर तिच्या आईला नमस्कार केला. आज तिच्या आई-बाबांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होत होती. ते स्वप्न पूर्ण करण्यात स्वरा प्रयत्नशील होती. स्वरा कॉलेजला जाताना समनने तिच्या हातावर दही साखर ठेवले. तेव्हा तिला आकाश ची आठवण झाली. आकाश देखील पहिल्याच दिवशी ऑफिसला जाताना त्याच्या हातामध्ये आपण दही साखर दिले होते. त्या दिवसाची तिला आठवण झाली आणि तिचे डोळे भरून आले. तेव्हा स्वराने तिला मिठी मारली.

"आई, तुला सांगितलं ना मी, डोळ्यातून अजिबात पाणी काढायचं नाही. बाबांना काय वाटेल? त्यांना हे अजिबात आवडणार नाही. बघ तुझे डोळे कसे भरलेत." स्वरा असे म्हणताच सुमनने लगेच डोळे पुसले.

"आता एक छोटीशी स्माईल दे बघू." असे म्हणताच सुमन हलकीशी हसली.

"किती ग माझी गोड आई." स्वराने परत एकदा सुमनला मिठी मारली. इतक्यात बाहेरून अनघाची हाक ऐकू आली.

"जा. आली बघ अनघा. आता लवकर जा नाहीतर उशीर होईल." सुमन म्हणाली "आणि हो बसमधून शिस्तीत जा. गर्दी खूप असते." सुमन काळजीने म्हणाली.

"हो ग आई, आम्ही जाऊ. तू पण काही काळजी करू नकोस. कॉलेज सुटले की लगेच घरी येऊ आम्ही." असे म्हणतच त्या दोघी बस स्टॉप कडे वळल्या. तिथे जाऊन बसची वाट पाहू लागल्या. थोड्या वेळाने एक बस आली आणि त्यामध्ये दोघीजणी बसून कॉलेजला गेल्या. अगदी काॅलेज समोरच बस स्टाॅप असल्याने त्या उतरून लगेच कॉलेजमध्ये गेल्या.

कॉलेजमध्ये गेल्यावर ग्राउंड वर तिला जे चित्र दिसले ते पाहून ती चकित झाली. त्या कॉलेजमध्ये इंजीनियरिंग डिपार्टमेंट सुद्धा होते आणि संपूर्ण कॉलेजवर त्यांचेच वर्चस्व होते. कारण इंजीनियरिंग डिपार्टमेंट मुळेच कॉलेजचे अस्तित्व टिकून होते.

स्वरा आणि अनघा बराच वेळ तिथेच उभ्या राहिल्या. एकतर नवीन काॅलेज त्यात ओळखीचे कोणीच नाही. त्या दोघीच एकमेकींना सोबत होत्या. आता वर्गात जायचे असेल तर या दिव्याला सामोरे जावे लागणार.. असा प्रश्न त्या दोघींच्या मनात चालू होता.

"स्वरा, आता काय करायचं ग? हे सगळं काय आहे?" अनघा

"अनु, मलाही काहीच कळेना ग. हे सगळं डोक्याबाहेर आहे. मला आत जायला भीती वाटत आहे." स्वरा

"मलाही." अनघा

"पण जावं तर लागणारच ना. हे आपलं काॅलेज आहे आणि आपल्याला आत जायलाच हवे." स्वरा

"स्वरा, तू पुढे चल, मी तुझ्या पाठीमागून येते." अनघा

"अगं, एवढं घाबरायला काय झालंय? ती पण माणसंच आहेत ना! चल बघू काय करतात?" स्वरा धाडसाने पुढे गेली आणि तिच्या पाठोपाठ अनघा गेली.

त्या दोघी गेल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. सगळे त्या दोघींकडेच पाहू लागले.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..