Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 12

Read Later
आत्मसन्मान 12


सुमन देवाला अगदी कळवळून प्रार्थना करत होती. हे बोलतानाही तिच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळत होते. आत डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते आणि बाहेर सुमन परमेश्वराचा धावा करत होती. ती आकाशचा जीव वाचवण्यासाठी कलियुगातील जणू सावित्रीच बनली होती.

दुसरा दिवस उजाडला सुमन तशीच प्रार्थना करीत बसली होती. रोहन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टरांचे प्रयत्न तर सुरूच होते. ती काल पासून काहीच बोलली नव्हती ना काही खाल्ली होती. तशीच बसून होती. तिच्या नजरेसमोर ती आणि आकाशने पाहिलेली सगळी स्वप्नं एका चित्रपटासारखी पुढे पुढे सरकत होती.

"वहिनी, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, असे उपाशी बसू नका. तुम्हाला अशक्तपणा येईल." रोहन सुमनला काहीतरी खाण्यासाठी विनंती करत होता.

सुमन ने फक्त मानेने नकार दिला. कारण ती नामस्मरण करत होती. आकाशला व्यवस्थित पाहिल्याशिवाय तिला काहीच खाण्याची इच्छा नव्हती. थोड्या वेळाने डॉक्टर तिथे आले. त्यांना पाहून सुमन लगेच उभा राहिली, तरीही तिच्या मुखामध्ये नामस्मरण चालू होते.

"आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्यांना वाचवू शकलो नाही. त्यांच्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आहे आणि रक्तही खूप गेले आहे. सॉरी पण आम्ही काहीच करू शकलो नाही." हे डॉक्टरांची वाक्य ऐकताच सुमन धाडकन खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली.

डॉक्टरांनी तिला तपासले आणि एक इंजेक्शन दिले. तेव्हा सुमन भानावर आली. पण तेव्हा तिची डोळ्यातील आसवं आटलेली होती. ती स्वतःच्याच विश्वात होती. तिला कशाचीच जाणीव नव्हती. तिच्या भावविश्वात ती गेली होती. तसेच ऍम्ब्युलन्स मधून सुमन, आकाश ची बॉडी आणि रोहन घरी आले. घरामध्ये कोणीच नव्हते. त्या दोघांच्या आई-बाबांना कळवले पण त्या दोघांनीही हात वर केले. कोणीच जबाबदारी घ्यायला तयार होईना. बेवारसा सारखे आकाश चे प्रेत तिथे पडले होते आणि त्याच्याजवळ सुमन बसली होती.

आकाश ची मुलगी स्वरा येऊन बाबा बाबा म्हणून उठवत होती. ते सगळे पाहून आजूबाजूचे लोक कळवळू लागले. त्यांच्याही डोळ्यावाटे अश्रू ओघळू लागले. पण सुमनला या कशाचेच भान नव्हते. आता आकाशला अग्नी कोण देणार? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला. सुमनला विचारावे तर ती एक अवाक्षरही बोलण्यास तयार नव्हती. आता काय करावे? असा मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला. इतक्यात काकू सुमन जवळ आल्या.

सुमनला हलवून हलवून जोरात हाका मारत होत्या आणि जोर जोरात रडत होत्या. "सुमन अगं काहीतरी बोल, ओरड, काहीतरी कर अशी शांत बसू नकोस ग. या तुझ्या लेकी साठी तरी तुला बोलावंच लागेल." असे म्हणताच स्वरा सुमन जवळ गेली आणि तिला हलवू लागली. लेकीच्या स्पर्शाने म्हणा किंवा लेकीच्या त्या कोमल बोलण्याने सुमन जात झोपेतून जागे झाल्याप्रमाणे भानावर आली. समोर आकाश चे प्रेत पाहून तिला गलबलून आले आणि तिने एकच जोरात मोठा हुंदका दिला आणि ती रडू लागली. तिची ती अवस्था पाहून आजूबाजूचे लोक देखील रडू लागले. पण या सुमनच्या दुःखात तिचे रक्ताचे नातलग कोणीच सहभागी झाले नव्हते.

सप्तपदीच्या साक्षीने मिळाली साथ
सोबतीने चालत होतो वाट..
काळाने असा घातला घाव
वेगळी झाली आपली वाट..

बराच वेळ सुमन रडत होती. रडून थोडा वेळ शांत बसल्यानंतर काकूंनी तिला विचारले की "सुमन आकाशला अग्नी कोण देणार? त्याच्या आई बाबांनी इकडे येण्यास नकार दिला आहे. तुझे आई-बाबा देखील इकडे येणार नाहीत. मग त्याला अग्नी कोण देऊ दे?"

सुमन ने फक्त स्वराकडे बोट करून दाखवले आणि ती परत शांत झाली.

"तू अगदीच जगावेगळे आहेस असे आकाश म्हणत होता. त्याची सत्यता आता पटली." असे काकू मनातच म्हणाल्या. आकाशचे पार्थिव शरीर घेऊन स्वराला काखेतून घेऊन सगळे स्मशानभूमीकडे गेले. तिथे स्वराने आकाश च्या पार्थिव शरीराला अग्नी दिला. इवलीशी पोर तिला जन्म आणि मृत्यू यातला काहीच फरक माहीत नव्हता, ती स्वतः तिच्या बाबाला अग्नी देत होती. पण अग्नी देत असताना ती हमसून हमसून रडत होती, माझ्या बाबांना का जाळत आहात? असे सारखे सारखे विचारत होती. तिच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे? असे प्रत्येकाच्या मनात खळबळ चालू होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तसेच भरलेल्या मनाने सगळे आपापल्या घरी परतले.

सुमन कालपासून काही जेवली नव्हती म्हणून काकूंनी तिच्यासाठी गरम गरम भात आणि वरण आणले. पण सुमन काही खाण्यास तयार होत नव्हती. स्वरा ला त्यांनी भरवले आणि सुमनला ताट करून दिले. पण सुमनने अन्नाचा एक कणही खाल्ले नाही.

"अगं सुमन, असं करू नकोस ग, खाऊन घे जरा, नाही तर अशक्तपणा येईल आणि आजारी पडशील. तुला काही झालं तर या छोट्या स्वराला कोण आहे? सांग बघू. आता तुलाच आई आणि बाबा दोन्ही बनून स्वराला सांभाळायचे आहे. निदान या छोट्याशा जिवाकडे तरी बघ." असे कळवळून काकू सांगू लागल्या.

"काकू, आता मी काय करू? किती प्रेमाने आम्ही आमचा संसार उभा केला होता? आणि त्याला बहार आणण्यासाठी आम्ही किती कष्ट केले होते? तुम्ही तर सर्व बघितलेच आहे. मग आमच्या वाट्याला इतके दुःख का आले? आमचा संसार असा अर्ध्यावर का मोडला? आकाश आमच्या दोघींना असे अर्ध्यावर सोडून का गेला असेल? त्याला आमची काळजी वाटली नसेल का? आमचे दुःख त्याला समजले नसेल का? आम्ही आता कोणाकडे बघायचे?" असे म्हणून सुमन रडू लागली. तिच्या संसाराचा असा अंत झालेला पाहून तिला खूप वाईट वाटत होते. खूप कष्टाने उभा केलेला संसार आता मोडकळीला निघाला याचे तिला दुःख होत होते. आता आधार देणारे कोणीही नव्हते आणि प्रेम करणारे तर कोणीच नव्हते. मोठ्या कष्टाने मिळालेले प्रेमही आता निघून गेले. याचे तिला खूप वाईट वाटत होते.

"सुमन, रडू नको बाळ. आलिया भोगासी असावे सादर याप्रमाणे जे आले आहे ते निमूटपणे भोगायचे. निदान या मुलीसाठी तरी तुला आता लढायला हवे, सावरायला हवे. तूच अशी गळून पडलीस तर ही छोटी मुलगी कोणाकडे बघणार, तूच सांग बघू. तिला भरपूर प्रेम दे, आई-बाबांची माया दे आणि तुम्ही बघितलेली स्वप्न तू एकटीने सत्यात उतरवून दाखव." काकूंनी अशाप्रकारे सुमनला समजावून सांगितले. तेव्हा कुठे सुमने दोन घास खाल्ले.

असेच दिवसामागून दिवस जात होते. सुमनने कितीही प्रयत्न केले तरी आकाश चा तिला विसर पडत नव्हता. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणात, प्रत्येक सेकंदाला तिला आकाशची उणीव भासत होती आणि तिच्या डोळ्यातून आसवे टिपत होती. कितीही म्हटले तरी प्रेमाचे माणूस होते ते. आयुष्यातून प्रेमच नाही गायब झाले म्हटल्यावर जगण्याला काय अर्थ? असे तिला प्रत्येक क्षणाला वाटत होते. तिने जीव द्यायचा ही प्रयत्न केला, पण छोट्या स्वरा कडे बघून ती शांत बसली. आपल्या लेकीला आता आपलाच आधार आहे आपल्या पेक्षा वाईट परिस्थिती तिच्या आयुष्यात येऊ नये म्हणून ती स्वराला जपत होती.

स्वरा ही सारखं बाबा बाबा करून घरभर फिरत होती. तेव्हा सुमन ला गलबलून येई. मग ती स्वराला आपल्या मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत असे. आपल्या लेकीला वडील नसून हे दुःख भोगावे लागणार आहे पण मी असे होऊ देणार नाही. मी माझ्या लेकीला सारं काही देईन. तिच्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण करेन. तिच्यासाठी मला जगायला हवे म्हणून सुमन मनात विचार करत होती.

बरेच दिवस ती घरात बसून असल्यामुळे घरातील सगळे राशन संपले होते. खाण्यासाठी अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. आता आपल्याला काहीतरी करायला हवं. असे घरात बसून आपले पोट भरणार नाही. निदान आपल्या लेकीसाठी तरी आपल्याला काम करावे लागणार आहे. असे ती मनात म्हणाली. दुसऱ्याच्या दारात जाऊन मागणे हे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, तिथे आपला आत्मसन्मान सगळा गळून पडतो. माणसाने कायम आत्मसन्मानाने जगावे, कणा जरी मोडला तरी आत्मसन्मान कुठल्याही परिस्थितीत गहाण ठेवला जाणार नाही. कितीही गरीब परिस्थिती आली तरी सुद्धा मी त्याला तोंड देईन. माझी मुलगी सुद्धा आत्तापासूनच अशा परिस्थितीत कसे लढायचे? ते शिकेल, पण आत्मसन्मानाने वागेल.

असे म्हणून सुमन काहीतरी काम करण्यासाठी धडपडू लागली. पण तिचे शिक्षण कमी असल्यामुळे तिला बाहेर जाऊन काही करता येत नव्हते. मग तिने काकूंचा आधार घेतला काकूंना सांगितले की काही कपडे शिवण्यासाठी असतील तर तुम्ही सांगा मी शिकवून देईन. तेवढाच आम्हाला जगण्यासाठी काही पैसा येईल त्यावर आमचे घर चालेल. काकूंनी मदत देण्यासाठी काही रक्कम तिला देऊ केली पण सुमनने ते अजिबात घेतले नाही. काकू जगेन तर ताठ मानेने जगेन असे दुसऱ्या पुढे हात पसरून अजिबात जगणार नाही. तुमची मदत नको काकू. तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जे प्रेम दिलेत ते असेच प्रेम देत. हेच आमच्यासाठी खूप आहे. रक्ताची नाती बाजूला गेली पण तुम्ही कुठल्या कोण? माझ्या मदतीसाठी धावून आलात. हे तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.

काकू मी सन्मानाने वागायचं ठरवला आहे. फक्त यामध्ये तुम्ही माझी मदत करा. मला पैशाची वगैरे कशाची अपेक्षा नाही. मला फक्त मानसिक आधाराची गरज आहे आणि मला माहित आहे की तुम्ही नक्की मदत कराल." सुमन हे बोलताना तिचा आवाज दाटून आला होता.

"अगं सुमन, असे बोलून मला परके करत आहेस का? मी नेहमीच तुझ्या सोबत असणार आहे. तू कसलीच काळजी करू नकोस. तू माझी लेकच आहेस. तू इतका जीव लावलास तर मी सुद्धा त्यासाठीच करत आहे." काकू परत म्हणाल्या, "तुला जी काही मदत हवी ती निःसंकोचपणे सांग. अजिबात लाजू नकोस. तुझ्यासोबत ही तुझी आई कायमच असेल." काकू असे म्हणताच सुमनने त्यांना मिठ्ठी मारली.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..