आत्मसन्मान 11

Marathi story


सुमन ची तब्येत देखील व्यवस्थित आहे हे जेव्हा आकाशला समजले तेव्हा तो आणखीनच आनंदित झाला. त्याने आनंदाच्या भरात संपूर्ण हॉस्पिटल भर पेढे वाटले. पेढे वाढताना प्रत्येक जण त्याला विचारत होता की नवसाने मुलगा झाला का तुम्हाला? इतक्या आनंदाने पेढे वाटत आहात.

तर तो म्हणाला, "मुलगा नाही मुलगी झाली आहे मला. माझ्या घरी लक्ष्मी आली आहे." मुलीसाठी कोणी पेढे वाटतं का? परत सगळे आश्चर्याने विचारू लागले. तेव्हा मी वाटणार माझ्या मुलीसाठी पेढे, असे आनंदाने रोखठोक तो सांगत होता. हे सगळे पाहून सुमन मनात म्हणाली, "जगातला सर्वात चांगला व्यक्ती आणि चांगला बाप आहेस तू. मुलगी झाली म्हणून पेढे वाटणारा असा मौल्यवान माणूस आहेस तू. बाळा, तुला कशाचीही काळजी नाही आता. तुझा बाप तू जन्माला आल्यावर तूझं स्वागत इतक्या सुंदर पद्धतीने करतो तर तुला तो आयुष्यभर फुलासारखे जपेल आणि तिने मनोमन देवाचे आभारही मानले की प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवणारा इतका चांगला माणूस तू माझा नवरा म्हणून मला दिलास." खरोखरच किती नशीबवान होती सुमन. आकाश सारखा नवरा मिळाला म्हणजे किती मोठे भाग्य तिचे. आधी खूप कष्ट भोगले पण शेवटी सुख समोर आलेच ना!

"सुमन, आपली मुलगी किती गोड आहे ना! अगदी तुझ्यासारखीच." आकाश मुलीकडे पाहून म्हणाला.

"तुमच्यासारखीच होणार आहे. अगदी हट्टी आणि प्रेमळ." सुमन गालात हसत म्हणाली.

हाॅस्पिटलमध्ये सुमन जवळ काकू होत्या. सुमनला खूप आनंद झाला होता आणि आकाशला तर तिच्या पेक्षा जास्त आनंद झाला होता. दवाखान्यातील प्रोसेस करून आता सुमन घरी येणार होती. आकाश रिक्षाने सुमनला घरी घेऊन आला. तिने घरात पाऊल टाकले तर घराचा अगदी कायापालट झाला होता. वेगवेगळ्या रंगाची फुले आणि फुगे यांनी सगळे घर सजवले होते. मुलीचे स्वागत इतक्या सुंदर पद्धतीने आकाश करेल असे तिला स्वप्नात देखील वाटले नाही. तिला खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. खरंच एक बाप आपल्या मुलीसाठी किती करतो. त्याची तिला प्रचिती आली. असे प्रेम तिने कधीच अनुभवले नव्हते. पण लेकीसाठी तिचा पिता जे जे काही करत होता ते सारे पाहून तिचे मन भरून येत होते. ती दारापाशी उभी होती. आकाशने तिचे औक्षण करून तिला आत घेतले. आत आल्यानंतर तिने पाहिले तर पाळणा खूप छान सजवला होता. आकाश ने नवीन पाळणा आणला होता.

मुलीचे स्वागत खूप सुंदर पद्धतीने आकाशने केले. मुलीला पाळण्यात घातल्या बरोबर बाहेर फटाक्याची माळ लावली. गल्लीतील सगळे पाहत उभे होते अशा पद्धतीने अखेर मुलीचे स्वागत झाले. आता या मुलीचे नाव काय ठेवायचे? यावरून त्या दोघांची चर्चा सुरू झाली. सुमन म्हणाली, "तुम्हाला जे हवे ते नाव ठेवा. मी त्याच नावाने हाक मारेन."

आकाश म्हणाला, "आपण कोणतेही नाव ठेवलं तरी ती आपली छकुली असणार आहे." दोघांची बरीच चर्चा झाल्यावर शेवटी एक नाव फायनल झाले ते म्हणजे स्वरा...

स्वरा खूप गोड होती. तिचा तो चिवचिवाट घरभर घुमत होता. कलेकलेने चंद्र कसा खुलत जातो तशी स्वरा देखील हळूहळू मोठी होत होती. अगदी पहिल्या दिवसापासून चे तिचे सगळे क्षण आकाश मनात टिपून घेत होता. काकूंच्या मदतीने तिचे संगोपन अगदी व्यवस्थित होत होते.

स्वरा हळू हळू रांगायला लागली. तिचे ते रांगणे, तिने तो टाकलेला पहिले पाऊल हे पाहून आकाश खूप आनंदित झाला. त्याला हे सगळे अगदी नवीन-नवीन आणि कुतूहल वाटत होते. जेव्हा स्वराने पहिला शब्द उच्चारला तो बाबा असाच होता. ते ऐकून आकाशला अधिकच भरून आले. तो सारखा सारखा तिला तो शब्द उच्चारायला सांगायचा आणि आनंदी व्हायचा. स्वराला पाठीवर बसवून घेऊन तो घोडा घोडा करत तिच्याशी खेळायचा अगदी लहान मुलाप्रमाणे. कधीकधी तिला भरवायचा. भातुकलीच्या खेळात तिच्यासोबत खेळताना तो रमायचा. कधी लपंडाव तर कधी झिम्मा फुगडी सुध्दा खेळायचा. लेकीसोबत खेळताना तो तिच्याच वयाचा होऊन खेळत होता.

लेकीने कोणताही हट्ट केला की लगेच ती वस्तू तिच्या समोर हजर करायचा. तिला छोटी सायकल देखील घेऊन आला होता. त्याच्यावर बसवून तो तिला फिरवायचा. तिच्या प्रत्येक गोष्टीचे त्याला कौतुक होते. शेवटी होता ना तो तिचा बाबा. खरंच बाप कधी कुणाला कळलाच नाही. त्याची माया, त्याचे प्रेम कधी कुणाला दिसलेच नाही. पण त्याची ती वेडी माया खूप हळवी असते. वरून जरी फणसासारखा वाटत असला तरी आत मऊ गरेच असतात. कारण शेवटी बाप हा बापच असतो.

आकाश दिवसभर काम करून कितीही थकला तरी संध्याकाळी आल्यावर लेकीचा चेहरा पाहिला की त्याचे मन प्रसन्न होई. तो कितीही दमला असला तरी रात्री लेकीला गोष्ट सांगितल्याशिवाय झोपत नव्हता. लेकी सोबत तिच्याइतके होऊन तो खेळत होता. लेकीसमोर सर्व काम, दिवसभर केलेले कष्ट सगळे शून्य वाटत होते. त्याच्या अगदी काळजाचा तुकडा होती ना ती.

आज स्वराचा पहिला वाढदिवस. आपल्या लेकीला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून दोघेही खूप खूश होते. आकाशने त्याच्या पगारातून काही रक्कम गोळा करून स्वरासाठी एक सोन्याची लहानशी चेन केली होती. तिचा वाढदिवस म्हणून तिला नवीन ड्रेस आणला होता. मोठ्याने वाढदिवस साजरा करायचा म्हणून आजूबाजूच्या काही लोकांना सांगितले होते. रात्री येताना तो केक घेऊन येणार होता. सुमन ने देखील आलेल्या मुलांना खाण्यासाठी काही पदार्थ बनवले होते.

आकाश ऑफिसला चालला होता पण स्वरा काही केल्या त्याला सोडत नव्हती. तिच्या बोबड्या बोलाने ती त्याला थांबवत होती. पण ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम असल्याने आकाशला जावेच लागणार होते. कितीही मनात असले तरी त्याला थांबता येत नव्हते. मग सुमनने देखील त्याला अडवले नाही. मुलीची इच्छा मारून आपण ऑफिसला जात आहोत याचे त्याला खूप वाईट वाटले, पण काम संपवून लवकरच घरी येईन आणि येताना केक आणि भरपूर चॉकलेटस् घेऊन येईन असे त्याने तिला प्रॉमिस केले.

ऑफिसमध्ये गेल्यावर आकाश त्याच्या कामात व्यस्त झाला. खूप महत्त्वाचे काम असल्याने लक्षपूर्वक त्याला काम करावे लागणार होते. पटापट काम आवरून आपण लवकर घरी जायचे या विचाराने तो भराभर काम करू लागला. इकडे सुमन देखील तिच्या कामात कामांमध्ये व्यस्त होती. मुलांना खायला खाऊ बनवत होती. तिच्या सोबतीला काकू देखील होत्याच पण छोटा स्वराचे कशातच लक्ष लागत नव्हते. तिला तिचे आई-बाबा दोघेही हवे होते. ती एकटीच बाहुली घेऊन तिच्या सोबत खेळत होती. तिला काही कळत नसले तरी आई-बाबा सोबत असावेत एवढा एकच तिचा बालहट्ट होता.

आई-बाबांच्या प्रमाणे स्वराचे देखील त्यांच्यावर खूप प्रेम होते. बाबा येईपर्यंत स्वरा तशीच बसून होती. तिने काही सुद्धा खाल्ले नाही. आईने जबरदस्तीने थोडा भात तेवढा भरवला होता. ती कोणाशी खेळायला गेली नाही ना काही करायला गेली नाही. तशीच बाहुली सोबत बसून खेळत होती. आता संध्याकाळ होत आली तरी देखील आकाश आला नाही म्हणून ती नाराज होऊन तशीच बसली. संध्याकाळ होऊन गेली आता रात्र होत आली. सगळी मुले जमली होती. पण एक मात्र तिचा बाबा केक घेऊन येणार होता म्हणून सगळे जण त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.

आता रात्र होऊ लागली. तरी देखील आकाश चा पत्ता नाही. थोड्या वेळाने रोहन धावत-पळत अगदी धापा टाकत आला. त्याला असे पाहून सुमनला काहीच समजेना. ती लगेच उठून उभा राहिली.

"रोहन भाऊजी काय झाले? तुम्ही असे अचानक कसे काय आला?" सुमनने काळजीने त्याला विचारले.

"अहो, वहिनी आकाश." रोहन एवढेच म्हणून थांबला.

"काय झालं त्यांना? कुठे आहे ते? आज लवकर येतो म्हणाले होते आणि अजून का आले नाहीत?" सुमनला आणखीनच काळजी वाटू लागली. ती खूप घाबरली.

"अहो वहिनी आकाश चा एक्सीडेंट झाला आहे आणि तो आता हॉस्पिटल मध्ये आहे. त्याला भरपूर मार लागला आहे, रक्तही भरपूर गेले आहे. हे तुम्हाला सांगायला आलोय. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे. चला तुम्ही लवकर."

हे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला आता काय बोलावे? आणि काय करावे? हेच सुचेना. ती झटकन खालीच बसली. स्वरा देखील रडायला लागली. सुमनने स्वराला काकूंच्या जवळ सोडले आणि ती रोहन सोबत हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर एका स्ट्रेचरवर आकाश झोपलेला दिसला. बरेच रक्त गेल्यामुळे त्याला ग्लानी आली होती आणि तो बेशुद्ध अवस्थेत तसाच होता. ते पाहून सुमनच्या डोळ्यातून महापूर ओघळू लागला. ती रडायला लागली. तेव्हा रोहन कसा बसा तिची समजूत घालू लागला आणि तिला एका बाजूला बसायला सांगितले.

हॉस्पिटल मध्ये सुमन रात्रभर बसून राहिली. आकाशचे खूप रक्त गेल्यामुळे डॉक्टरांनी सर्व आशा सोडली होती. आता सारं काही परमेश्वरावरच अवलंबून आहे असे ते म्हणाले. सुमन रात्रभर देवाचे नामस्मरण करत बसली होती. नामस्मरण करताना तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

"हे परमेश्वरा, आयुष्यभर मी दुःखच भोगत आले आहे, हे तू पाहिले आहेस. तर आत्ता कुठे दुःखाची परीक्षा पूर्ण करून सुख पदरी पडलं होतं. दुःखाला मागे झटकून सुखात मी लोळत होते. हे सुख तू हिरावून घेऊ नकोस रे. हे करूनाकरा, माझ्यावर दया कर. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर. पण माझ्या आकाश ला वाचव. तसेही मी आज पर्यंत तुझ्याकडे काहीच मागितले नाही. बालपण सगळे कष्टात गेले पण एका अक्षराने सुद्धा तुला बोलले नाही. पण आता पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागत आहे, तू मला दुखवू नकोस. माझं सौभाग्य घेऊ नकोस. मला खूप कष्टाने हे सुख मिळाले आहे ते हिरावून घेऊ नकोस. माझ्याकडे नको पण छोट्या लेकराकडे बघून तरी तसे करू नकोस. त्याला भरपूर आयुष्य दे. हे शेवटचेच यापुढे मी काहीच मागणार नाही. ही माझी इच्छा पूर्ण कर." असे म्हणून सुमन रडू लागली.
क्रमशः

🎭 Series Post

View all