Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 10

Read Later
आत्मसन्मान 10


सुमन आणि आकाश ने ठरवल्याप्रमाणे आकाश त्याच्या आई-बाबांकडे गेला. त्याला पाहून त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले. इतक्या दिवसांनी आपल्या लेकाला पाहतोय म्हणून तिला भरून आले. ती त्याच्याशी बोलायला येणार इतक्यात आकाशच्या बाबांनी तिची वाट अडवली आणि "थांब तू कशाला बोलायला चालली आहेस? आपल्याला एकच मुलगा आहे." असे म्हणून बाबांनी तिला बोलू दिले नाही. तेव्हा आईला सुमनचा खूप राग आला. तिनेच आकाशची आणि त्यांची ताटातूट केली आहे असे त्या म्हणत होत्या. बाबा सुध्दा त्याच्या बरोबर बोलले नाहीत. आकाशनेही तो बाप होणार आहे हे त्यांना सांगितले आणि तो तडक तिथून बाहेर पडला.

आकाश घरी आल्यानंतर सुमनने विचारले की काय झाले? आई-बाबांना जाऊन भेटून आलात का? काय म्हणाले ते? तेव्हा आकाश म्हणाला, "आधी जे बोलले तेच बोलले. त्यांना आता आपण नको आहोत. उगाचच आपण त्यांचा विचार करत बसलो. जाऊ दे सोड. आपला आनंदाचा क्षण आपण असे उदास होऊन चालणार नाही. आपल्या लेकरासाठी आपल्याला आनंदाने जगावे लागणार आहे. पण तुला एक सांगू आपल्याला मुलगा होवो किंवा मुलगी होवो, आपण त्याच्या मनात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीशीच लग्न लावून द्यायचे. आपला निर्णय त्याच्या वर अजिबात लादायचा नाही. आपण प्रेमविवाह केला आहे तर त्यालाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. आपलं लेकरू ज्या व्यक्तीला पसंत करेल तीच आपली पसंत असेल." आकाश थोडासा भावनिक होऊन भविष्याचा विचार करत म्हणाला. त्याच्या बोलण्याला अर्थ होता.

"किती पुढचा विचार करता तुम्ही. खर आहे आपल्या लेकराला ज्याच्याशी लग्न करायचे आहे त्याच्याशी आपण लग्न लावून देऊ. अगदी हसत करत बाकी कोणतीही शंका मनात घ्यायची नाही. फक्त ती व्यक्ती योग्य व्यक्ती असायला हवी." सुमनने तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. सुमनला नेहमीच आकाशचे बोलणे आणि विचार करण्याची पध्दत आवडे. तो किती आधुनिक विचार करतो याचा तिला अभिमान वाटे. असा नवरा शोधूनही सापडणार नाही असे ती मनातच म्हणत असे.

"योग्य व्यक्ती असणारच ग. शेवटी आपलं लेकरू आहे. आपले संस्कार त्याच्या उपयोगाला येणारच. आपण घेतला नाही का निर्णय? काय वाईट झाले?" आकाश सुमनला समजावून सांगत होता. त्यांनी संसार थाटला पण आईबाबांचे प्रेम मिळाले नाही तसे आपल्या लेकराच्या बाबतीत होऊ नये असे त्याला वाटत होते.

"हो खरं आहे. मनापासून प्रेम केलेल्या व्यक्तीशी लग्न झाले तर कोणत्याही परिस्थितीत ते दोघेही आनंदी राहू शकतात. पण मनाविरुद्ध लग्न झाले तर एकटा ही सुखी राहत नाही." सुमनने सत्य परिस्थिती सांगून आकाशच्या हो मध्ये हो मिसळला.

दुसऱ्या दिवशी सुमनचे डोहाळे जेवण करायचे होते म्हणून रात्री सगळी तयारी करून दोघेही लवकर झोपले. पण आकाशला काही केल्या झोप लागेना. त्याच्या समोर फक्त विचारांचे फेरे फिरत होते म्हणून तो उठला आणि बाहेर जाऊन बसला. त्या काळ्याकुट्ट अंधारात नक्षत्रांचे चांदणे खूप छान दिसत होते, मंद वारा सुटला होता त्याने त्याचे अंग शहारून गेले. खरंतर भविष्याचा विचार त्याच्या मनात येत होता. तो विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. बराच वेळ झाला तरी तो तसाच बसून होता. थोड्या वेळाने सुमनला जाग आली आणि तिने इकडे तिकडे पाहिले तर तिला आकाश कुठेच दिसलं नाही म्हणून ती सुद्धा उठून बाहेर गेली. तर बाहेर कट्ट्यावर आकाश एकटाच त्याच्या विचारांच्या तंद्रीत बसला होता. त्याच्या जवळ जाऊन सुमनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "एवढ्या रात्री कसला विचार करताय? झोप येत नाही का?" सुमनने विचारले.

"काही नाही ग, झोप येत नाही म्हणून थोडा बाहेर येऊन बसलोय. तू झोप जा. तू का बाहेर आलीस? चल." म्हणून आकाश सुमनचा हात धरून तिला आत घेऊन आला. मग दोघेही झोपले. आकाश सुमनच्या केसावरून हात फिरवत होता.

"आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करत होतो. आपली ही परिस्थिती अशी. आपण त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू ना! हा विचार माझ्या मनामध्ये घोळत होता." आकाशने सुमनला खरी हकीकत सांगितली. त्याला नेहमी लेकराची काळजी वाटे. तसेच त्याच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी तरतूद करावी हा विचार सतत सतावत असे.

"का नाही करणार आपण त्याच्या इच्छा पूर्ण! होईल ना मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत. आपण एकमेकांच्या सोबत असल्यामुळे काहीच अवघड जाणार नाही." असे म्हणून सुमनने आकाशला झोपायला सांगितले. "आता विचार बंद करा आणि शांत झोपा. शरीराला झोपेचे देखील गरज आहे. तुम्ही असे विचार करत अजिबात बसायची नाही. सगळं काही चांगलं होणार आहे." असे म्हणून तिने त्याला दिलासा दिला मग आकाश शांत झोपला.

अखेर दुसरा दिवस उघडला. सकाळपासूनच सगळ्यांची धावपळ सुरू होती. काकू देखील लवकरच घरात आल्या होत्या. त्यांनी सर्व काही सामान आणले होते. सगळे गोड-धोड पदार्थ आणि त्यांनी आणलेली साडी सुमनला नेसायला सांगितली. सुमन सुद्धा तिचे आवरु लागली. सारं काही आवरून झाल्यानंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा होता. इकडे लगबग सुरू असतानाच सुमन साडी नेसून आली. त्या गुलाबी रंगाच्या साडी मध्ये तिचे ते गर्भारपणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक आली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे हे रूप आकाश लांबूनच न्याहाळत होता.

काकूंनी सुमन ला बोलावले आणि झोपाळ्यावर बसवले. झोपाळा फुलांनी सुंदर सजवला होता. आजूबाजूला फुलांनी बरेच भाग सुशोभित केले होते. त्यानंतर त्यांनी तिची खणानारळाने ओटी भरली. तिच्या शेजारी आकाशला बसवले. आकाश तिकडे जाऊन बसल्यावर सुमनलाच न्याहाळत होता. "खूप सुंदर दिसत आहेस तू." असे त्याने म्हणून कौतुक देखील केले. तेव्हा सुमन गालातच लाजली. इतक्यात आकाशचे काही मित्र मैत्रिणी आले. ते आल्यानंतर नाच-गाणी करत दोघाचे व्हिडीओ देखील केले. बराच वेळ फोटो काढण्यात गेला. चंद्र, धनुष्यबाण अशा वेगवेगळ्या आकाराचे साहित्य घेऊन त्या दोघांचे फोटो काढले. सुमन आज खूपच खुश होती. अशा परिस्थितीतही आकाश माझी सगळ्या इच्छा पूर्ण करतो. मी तर काही बोललेच नव्हते तरी देखील त्याला खूप हौस आहे म्हणून इतकं सगळं केलंय. आपल्या येणाऱ्या बाळासाठी आत्ता इतकं करत आहे तर बाळ जन्माला आल्यानंतर तो किती आणि काय करेल? हे त्याचे त्यालाच माहीत असे ती मनात म्हणू लागली.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यथा योग्य अगदी व्यवस्थितपणे पार पडला. सुमन आणि आकाश दोघेही खूप आनंदात होते. दिवस खूप चांगला गेला. त्यांनी काकूंचे आभार मानले कारण काकू नसत्या तर त्यांचा हा दिवस इतका चांगला गेलाच नसता. काकूंनी देखील मायेने त्यांना आशीर्वाद दिला. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाल्यापासून आकाश आणखीनच जास्त सुमनची काळजी घेऊ लागला. पंधरा दिवसांनी तिला दवाखान्यात घेऊन जाऊ लागला. तिला खायला काय हवे काय नको ते तो स्वतः बनवू लागला. काकूंना विचारून तो या नऊ महिन्यात चांगल्याप्रकारे स्वयंपाक बनवायला शिकला. हळूहळू दिवस पुढे जात होते. तसे या सर्वांच्या मनात टेन्शन येत होते. बघता बघता नऊ महिने निघून गेले आणि आता सुमन दिवसात पडली. तिचे पोट खूप आले होते त्यामुळे तिला बसताना उठताना थोडा त्रास होत होता. तशीच ती छोटी-मोठी कामे करत होती. पण आकाश मात्र तिला काहीच काम करू देत नव्हता. सगळी कामे तो स्वतः करत होता.

दिवसात पडल्यावर सुमनला खूप त्रास होऊ लागला. कधी एकदा डिलीवरी होते असे तिला वाटू लागले.

त्या रात्री सुमन आणि आकाश दोघांनी खूप गप्पा मारल्या. भविष्याची खूप स्वप्ने पाहिली आणि झोपी गेले. मध्यरात्र झाली. सुमनला जाग आली. तिला काही समजेना. काही चैन पडेना. ती उठून इकडे तिकडे येरझार्‍या मारू लागली. तिला कळा येत होत्या. तिला भीती वाटत होती पण आता काय करावे? आकाशही दमून झोपला होता, त्याला झोप लागली होती, कुणाला उठवावे अशी तिची परिस्थिती झाली होती. आई किंवा सासू कोणी असते तरी त्यांना सांगितलं असतं. आता हक्काचा नवरा आहे पण त्याला सांगायला अवघडल्यासारखे होत आहे. सकाळपर्यंत वाट पहावी का? असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. अधेमधे बसायची आणि फेरी मारायची. तिच्या मनाला चैन पडत नव्हते. कळा थोड्या जास्त येऊ लागल्या. आता मात्र नाईलाज झाला. तिला आकाशला उठवावे लागणार होते. पण अजून पाच मिनिट जाऊ दे म्हणून ती तशीच बसून राहिली. इतक्यात आकाशला मधूनच जाग आली. शेजारी सुमन दिसेना म्हणून तो उठला आणि तिला शोधू लागला तर समोर चेहरा बारीक करून बसलेली सुमन त्याला दिसली. तो तिच्याजवळ गेला आणि काय होत आहे तुला? असे विचारले तेव्हा ती म्हणाली, मला कळा येत आहेत. बहुतेक दवाखान्यात जावे लागणार आहे. पण इतक्या रात्री कसे जायचे? म्हणून तुम्हाला उठवले नाही. सत्य परिस्थिती त्याला सांगितली. आकाश हे ऐकून थोडासा घाबरला. आता काय करावे? असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर ही पडला. रिक्षा एवढ्या रात्री मिळतील का? असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. थोडा वेळ तो तसाच थांबला.

नंतर तो धावत पळत शेजारी काकूंकडे गेला. काकू पण लवकर उठून आल्या. त्यांना देखील वाटले की सुमनचे दिवस भरत आले आहेत कधीही हाक ऐकू येईल म्हणून त्या सावध राहिल्या होत्या. आकाश ने हाक मारल्या बरोबर त्या लगेच सुमनकडे आल्या आणि तिला थोडा धीर दिला. तोपर्यंत आकाश रिक्षा मिळते का की कुणाची गाडी मिळते हे पाहण्यासाठी गेला. तिकडे सुमनच्या कळा वाढल्या, असंख्य वेदना होऊ लागल्या आणि शरीराला दरदरून घाम फुटला. शेवटी कशीबशी एक रिक्षा मिळाली ती रिक्षा घेऊन येऊन सुमन, आकाश आणि काकू असे तिघेजण रिक्षातून दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यावर लगेच ॲडमिट करून घेतले आणि तिथली प्रोसेस सुरू झाली. दवाखान्यात गेल्यावर आकाशच्या मनात धाकधूक सुरू झाली. काय होते काय माहित? असे वाटत होते. सुमनची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे त्याला थोडीशी भीती देखील वाटत होती. काकू त्याला धीर देत होत्या पण तरीही चिंता ही असणारच.

आकाश टेन्शन घेत होता. इतक्यात आतून एक नर्स आली आणि ती म्हणाली, "अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली." हे ऐकून आकाश ला खूप आनंद झाला आणि तो आनंदाने उड्या मारू लागला. त्याला जणू दिवाळीच असल्यासारखे वाटू लागले. घरात आनंदोत्सव आला असे भासले. किती तो आनंद वर्षावा!

त्याने परत प्रश्न विचारला "सुमन कशी आहे? ती ठीक आहे ना."
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..