Login

आत्मभान-आकाशी झेप घे

आत्मभान -आकाशी झेप घे

आकाशी झेप घे


सुजित ऑफिस मधून घरी आला. " कां गं श्वेता अर्णव दिसत नाही आहे." सुजित ने आपली पत्नी श्वेताला विचारले. अरे तो समोरच्या गार्डनमध्ये खेळायला गेला आहे. श्वेता म्हणाली. सुजित ने हात पाय धुतले. चहा घेतला. तेवढ्यात श्वेता त्याला म्हणाली, सुजित मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.


अग बोल नां काय म्हणतेस?

अरे सुजित, आपला अर्णव आता पाच वर्षाचा झाला. मला वाटतं आता आपल्याला दुसरा चान्स घ्यायला हरकत नाही. आणि हो, या वर्षी सासूबाई सुद्धा सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या येतील आपल्याकडे राहायला. तशी आपल्याला आता त्यांची गरज आहेच. श्वेता सुजितशी बोलत होती.

..

अगं, तू म्हणतेस ते बरोबर आहे श्वेता. पण आईलाही थोडी विश्रांती हवी ना! मला समजायला लागल्यापासून मी तिला पाहत आहे. आम्ही तीन भावंड, आजी- आजोबा या सर्वांचे करून आई शाळेत जायची. पण कधीच तिने कोणत्याच गोष्टीचा त्रागा केला नाही. घरी सर्वांचे करून, शिक्षिकेची नोकरी सांभाळून ती थकून जायची. मी सर्वात मोठा. शिक्षणासाठी मला दुसऱ्या शहरात राहावं लागलं. पुढे नोकरी. त्यानंतर लग्न.


सुजित श्वेताजवळ मन मोकळं करीत होता. आमचे आई बाबा आमचे दैवत आहेत.खूप केलं त्यांनी आमच्यासाठी. त्यांची धावपळ, त्यांचे कष्ट आम्ही पाहिले आहेत. आज मी चांगल्या नोकरीवर आहे. गलेलठ्ठ पगार आहे. एखादी मेड ठेवू. पण आता आईला थोडा निवांतपणा उपभोगू दे. तरीपण मी आईला विचारून बघतो.


असे म्हणत सुजित ने आईला फोन लावला. व मालतीबाईंशी चर्चा  केली. मालतीबाईंनी त्या दोघांना "तुम्ही दोघेही इथेच या. आपण सविस्तर बोलू." असे सांगून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सुजित व श्वेता आपल्या गावी आई-बाबांकडे आले. आई मालतीबाईंना खूप आनंद झाला. पण जेव्हा सुजित ने त्यांचा दोघांचा विचार बोलून दाखविला, तेव्हा मात्र मालतीबाईंनी अगदी स्पष्ट सांगितले.


सुजित, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण तुला माहीतच आहे, माझी सारी स्वप्ने, साऱ्या इच्छा या कामाच्या रगाड्यात विरूनच गेल्या रे. मला आता थोडा मोकळा श्वास घेऊ दे. तुझ्या घरी सर्व सुख सोयी आहेत. मला कशाची कमतरता तू भासू देणार नाहीस हेही मला माहित आहे. पण तो सोन्याचा पिंजरा आहे रे. मी त्यात अडकून जाईल.


मला आता यापुढे माझे राहिलेले छंद, माझ्या आवडीनिवडी पूर्ण करायच्या आहेत. अधून मधून मी तुझ्याकडे येत राहील. पण मला तू त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त करू नकोस. मालतीबाई  बोलतच होत्या. आणि सुजित व श्वेता भारावल्यागत ऐकत होते. तेवढ्यात सुमंतराव सुद्धा आले. त्यांनी सुद्धा सुजितला तेच सांगितले.


अरे सुजित मुळातच तुझ्या आईचा स्वभाव शांत. खूप सोसलयं रे तिनं. आता तिला थोडा निवांतपणा मिळू दे. सुजित, माझ्या आईच्या वयाच्या स्त्रियांची गोष्ट ऐक. तेव्हा स्त्रियांना नोकरी वगैरे प्रकार नव्हता. स्वतःच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या. मग मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, की मुलींची, सुनांची बाळंतपण. त्याही नंतर नातवंड मोठी झाली, की ती जर दुसरीकडे शिकायला गेली असेल तर त्यांच्या बरोबर आजीची रवानगी. त्यांच्याजवळ राहायला.


अरे त्या स्त्रियांना काय भावना नव्हत्या काय? त्यांनाही वाटत नसेल कां? सुख उपभोगावं. पण मन मारून म्हणा , गोतावळ्याच्या प्रेमापोटी म्हणा किंवा एक जबाबदारी म्हणून त्या या सर्व गोष्टी करायच्या. एक प्रकारे परावलंबी जीवन. आणि सुजित ही काही दंतकथा नाही तर "याची देही, याची डोळा "पाहिलेले हे अनुभवाचे बोल आहेत.


सुजित, तू जे म्हणतोस ते करणे आमचे कर्तव्य आहे. हेही मला माहित आहे. पण बेटा आज तू म्हणतोस. उद्या दुसऱ्या मुलगा म्हणेल. परवा तिसरा मुलगा म्हणेल. मग काय तुझ्या आईने हेच करत राहावं काय? मग तिने जगावं केव्हा? खरंच ग.दि. माडगूळकरांनी म्हटल्याप्रमाणे "पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष नां कुणाचा.


आई-बाबांचे म्हणणे दोघांनाही पटले. काळजी घ्या. म्हणत श्वेता आणि सुजित ने आई-बाबांचा निरोप घेतला. खरंच नोकरी करणाऱ्या स्त्रीची दुहेरी कसरत तिलाच माहित. मुळातच स्त्री सहनशील असते असे म्हणतात ते काही खोटे नाही. एवढे वर्ष नोकरी करून, मुलांना ासू-सासर्‍यांना सांभाळून ती जेव्हा सेवानिवृत्त होते तेव्हा मुलांनीही आपल्या आईकडून फारशा अपेक्षा करू नयेत असं मला वाटतं. पण चित्र वेगळेच दिसते.


मुलांना वाटतं आपल्या आई-वडिलांनी आपल्या येथे येऊन राहावं. मुलांचा सांभाळ करावा. कारण दोघेही नोकरी करणारे असतात. एका दृष्टीने त्यांचेही बरोबर आहे पण परत दुसरी जबाबदारी घेणं हे सेवानिवृत्त आईसाठी तिच्या  सहनशक्ती पलीकडचे असते. पण माये पोटी, नातवंडांच्या प्रेमापोटी ती बिचारी स्वतःला पूर्णपणे वाहून घेते. मग तिने मोकळा श्वास घ्यावा केव्हा ? हा प्रश्न निश्चितच अनुत्तरीत आहे.


म्हणून मुलांनी सुद्धा समंजसपणा  घेऊन आपल्या आईची व्यथा समजून घेतली पाहिजे. मायेच्या पिंजऱ्यातून मोकळं करून आकाशात झेप घेण्यासाठी म्हणजेच जबाबदारीच्या काळात राहून गेलेल्या जसे पर्यटन, मित्र-मैत्रिणींमध्ये रमणे, लेखनासारखा छंद जोपासणे. यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे.


आज स्त्रियांना बऱ्याच अंशी आत्मभान आलेलं आहे. स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून ती स्वतःला सावरते आहे. म्हणूनच तिला मोकळा श्वास हवा आहे.

जगदीश खेबुडकर यांचे गीत खरोखरच मनाचा ठाव घेतं.

      आकाशी झेप घे रे पाखरा...

      सोडी सोन्याचा पिंजरा.

धन्यवाद.

सौ.रेखा देशमुख.