Jan 19, 2022
General

एकतरी नणंद असावी

Read Later
एकतरी नणंद असावी

#एकतरी_नणंद_असावी

शोभना व तिची जीवलग मैत्रीण सुवर्णा नदीच्या काठावर बसल्या होत्या.

सुवर्णा म्हणाली,"का गं शोभा,आज इथे का बोलवलंस?"

शोभना म्हणाली,"अगं तुला एक गुड न्यूज द्यायची होती. सुवि माझं लग्न ठरलं."

"काय सांगतेस! इतक्या फटाफट."

"अगं ऐक नं. काल माझ्या आत्याचे मिस्टर शरदला घेऊन आले आमच्याकडे. त्यांच्यासोबत शरदची आई,बहीण व बहिणीचे मिस्टरही होते. मग काय आईने  साडी नेसवली छान चापूनचोपून नि चहा,फराळ घेऊन गेले, बैठकीच्या खोलीत. तिथे साऱ्यांना डिश दिल्या,वाकून नमस्कार केला नि बसले. 

त्या शैलाताई,म्हणजे शरदची ताई नुसत्या बघत होत्या माझ्याकडे म्हणजे आपण बाजारात एखादी वस्तू विकत घ्यायला जातो आणि ती खात्री पटेपर्यंत चाचपून पहातो तशी वाटली मला त्यांची नजर. शरद मात्र बरा वाटला.  त्यांचा निरोप आला की पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात, आत्या म्हणत होती लग्न जमल्यात जमा आहे."

"मनापासून अभिनंदन तुझं,शोभा पण त्या नणंदेपासून जपूनच रहा बाई. याच नणंदा घरात काडी लावतात..सासूसुनेमधे भांडणं लावून आपण नामानिराळ्या होतात."

"काय सांगतेस काय सुवि. ए अगं मला आत्या नसल्याने नणंद या पात्राबद्दल मला जास्त काही माहित नाही."

"अगं बाई,डोक्यात जातात या नणंदा. कोणाकोणाला तर दोघी,तिघी किंवा चौघीही असतात. या सासरी आल्या की यांचा खास पाहुणचार करावा लागतो. सगळं.हातात द्यावं लागतं. सगळं करुन देखील सासूच्या मनात सुनेबद्दल द्वेष पसरवण्यात याच अग्रेसर असतात. जवळ असल्या तर रोजच येऊन बसतात आपल्या बोकांडी. मग त्यांची मुलंही भावजयीने सांभाळायची ही त्यांची अपेक्षा असते. जवळ रहात असल्या तर खुशाल मुलाला आईच्या,वहिनीच्या जीवावर सोडून आपण नोकरी करायला बाहेर पडतात."

"मला नाही गं वाटत शैलाताई एवढी खडूस असेल."

"नसली तर बरंच गं पण तू खबरदारी घे व तुझा ड्रेसबिस मागितला तर सरळ नाही म्हणून सांग. एकदा वापरायला दिलास की सतत मागेल."

"आणि हो माझ्मासाठीपण बघ गं एखादं स्थळ तुझं लग्न झालं की. आतापर्यंत सात स्थळं येऊन पाहून गेली मला. आता ते साडी नेसणं,तयार होणं,चहा देणं,त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं अगदी नकोसं वाटतं बघ."

"अगं होईल गं तुझं लग्न. लवकरच होईल बघ. माझा दिर असताना तर तुलाच भावजय करुन घेतली असती मी आणि मग दोघी मिळून कल्ला केला असता, बरोबर ना!"

शोभना व सुवर्णा मग हसतहसत घरी आल्या. दोन दिवसांत पाहुण्यांकडून होकार आला व लग्न जमले देखील. महिन्याभराच्या आत लग्न झाले नि शोभना सासरी गेली.

शोभनाच्या सासरी तिचे सासूसासरे व नवरा शरद होते. शैलाताई गावातच रहात असल्याने दिवसाआड एक तरी फेरी मारायची. शैलाताईची मुलगी छबी तीन वर्षांची होती. छबी आली की त्या घराला एक वेगळाच हुरुप येई. 

कधीमधी शैला छबीला माहेरी ठेवून तिची पोस्टातली,बँकेतली कामे करायला जाई. शोभनाच्या सासूला संधिवातामुळे छबीच्या मागे धावणे जमत नसे. उठताबसता सांधे कुरकुरत. तरीही त्या छबीचा सांभाळ अगदी मायेने करायच्या. शोभनाच्या सासूला वाटलेलं की शोभना आल्यावर त्यांना छबीच्या मागून धावावं लागणार नाही पण शोभनाला वाटे जर छबीला तिची सवय झाली तर छबीची आई रोजच छबीला इथे ठेवून जाईल म्हणून ती छबीकडे दुर्लक्ष करे.

एकदा शोभना पुढ्यात चहा घेऊन टिव्ही पहात बसली होती. नेमकी बालकनीत खेळत असलेली छबी तिथे आली नि काही कळायच्या आत तिने गरम वाफाळत्या चहात तिची इवलाली,कोवळी बोटं बुडवली.

 शोभनाचे सासरे बालकनीतून आत येतच होते. छबीने चहात बोटं बुडवलैत हे पहाताच ते भरभर आले,इतक्यात शोभनाचं ध्यान छबीकडे वळलं. तिने छबीच्या बोटांवर फुंकर मारली,बर्फ लावला,बरनॉल लावलं. तेव्हापासून छबी चहाला हा म्हणू लागली नि शैलाताईही शक्यतो छबीला स्वतःसोबत बाहेर नेऊ लागली. 

दुपारची कामं आवरली की शैला आईकडे यायची. दोघीजणी गप्पा मारत निवडणंटिपणं करायच्या तर कधी अशाच पसरायच्या. शोभनाला मात्र वाटू लागलं की त्या दोघी तिच्याचबद्दल गॉसिपिंग करताहेत. शैला 

शैलाताई शोभनालाही गप्पा मारायला बोलवायची पण शोभना काहीतरी कारण सांगून तिथून निसटायची. 

शोभना शरद आला की शरदला सांगे ,"तुझी बहीण व आई मिळून माझ्याबद्दल काहीबाही बोलत बसतात."
शरदने पहिलं तिला फटकारलं पण ती रोजच असं सांगू लागल्यावर त्याचाही विश्वास बसला तिच्या बोलण्यावर. 

एकदा शरदची मावशी खूप आजारी असल्याचा फोन आला. शरदच्या मावशीचा मुलगा परगावी रहात होता. तिचे यजमानही व्रुद्ध होते म्हणून तिला बघण्यासाठी,तिची देखभाल करण्यासाठी शरदचे आईवडील कोल्हापूरला तिच्या घरी गेले. 

जाताना त्यांनी शैलाताईला,घराकडे येतजात रहा म्हणून सांगितलं होतं. शैलाताईही आठवड्यातून एक फेरीतरी माहेरी मारायची. शोभना व शरदने जुनी वॉशिंग मशीन देऊन नवीन फुल्ली ऑटोमेटेड वॉशिंग मशीन आणली. त्याचदिवशी दुपारी शैलाताईही त्यांच्याकडे गेली. 
शरद तिला म्हणाला की जा तुझ्या आईला सांग जा आम्ही नवीन शेगडी घेतली म्हणून. तुला सवयच आहे आमचं सगळं तिला सांगायची. आईचा जासूस नं तू.

शरदचे कडवे बोल ऐकून शैलाताई जागच्याजागी थिजली. तिला तिच्या पाठच्या भावाकडून अशा कडवट शब्दांची अपेक्षाच नव्हती.  कसंबसं दोन मिनटं तिथे बसून शैलाताई तिच्या घरी आली. 

आता ती माहेरी जायचं टाळू लागली. आई मात्र फोन करुन सांगायची,जरा एक फेरी मारुन ये म्हणून. शैलाताईलाही वाटायचं जावसं पण भावाने वर्मी घातलेला घाव आठवायचा नि पाऊल माघारी फिरायचं. गावी थोडी जमिनीचं कामं असल्यामुळे शैलाच्या आईवडिलांचा दौरा लांबला. 

इकडे एकदा शरद कामावरून येताना त्याच्या गाडीला अपघात झाला. शोभनाला पोलिसांनी ही बातमी कळवली. शोभना खूप घाबरली. तिने कसंबसं  तिच्या माहेरी व सासूसासऱ्यांना कळवलं. शरदला जाम मार लागला होता. शोभनाने  मग शैलाताईला फोन लावला. शैलाताईच्या मिस्टरांनी सगळी सूत्रं हातात घेतली.

 शरद हॉस्पिटलमधून बरा होऊन येईस्तोवर शोभनाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही ना घरात काही बघावं लागलं. शैलाताई दोघांनाही मानसिक धीर देत होती.

 शोभनाला मात्र आता तिच्या वागण्याचा,तुसडेपणाचा पश्चाताप होत होता. शोभनाचे आईवडील त्यांना भेटायला आले तेव्हा शोभनाच्या आईने शैलाला जवळ घेतलं व तिला म्हणाली,"अशाच बहिणीबहिणीसारख्या रहा गं पोरींनो. एकमेकींच्या अडचणींना धावून जा व शोभनाला म्हणाली,"शोभा,तुही तुझ्या नणंदेकडून कठीण प्रसंगी कसं धीराने वागायचं,एकमेकांना कशी साथ द्यायची हे शिकून घे बेटा.  तुझं भाग्य थोर म्हणून इतकी सुस्वभावी नणंद तुला लाभली."

"खरंच गं आई, माझ्या शैलाताई खूप गोड आहेत." शोभना म्हणाली.  तिने आता ठरवलं यापुढे कधीही शैलाताईंना,त्यांच्या छबीला परकं मानणार नाही.

नमस्कार मंडळी,

नणंद,हे पात्र खरंच लाघवी असतं. आपल्या नवऱ्याची आपल्याइतकीच काळजी करणारी, त्याच्या आईनंतर कोण स्त्री असेल तर ती त्याची बहीण.

 प्रसंगी बोलेल,फटकारेल पण मनाने वाईट नसते. काही अपवाद असतात पण त्यामुळे पुर्वग्हदूषित नजरेने सगळ्याच नणंदांकडे पाहिलं जातं व नात्यात कडूपणा येतो. तोंडावर बोलणारे सगळेच वाईट नसतात व नणंदांनाही त्यांच्या आईचे कान भरणे हे एकमेव काम नसते. खरंतर आपल्या घरची कामं आवरून वेळात वेळ काढून त्या आपल्या आईशी हितगुज करायला येतात तेव्हा वहिनीनेही त्या मायलेकींच्या गप्पांत सामील व्हावं.

थोडक्यात काय तर..

एकतरी नणंद असावी
रुसवाफुगवा करणारी
वहिनीवर माया करणारी

एकतरी नणंद असावी
सासू रागे भरल्यास
वहिनीला पाठीशी घेणारी

एकतरी नणंद असावी
भावाचे हुडपण सांगणारी
हक्काने माहेरा येणारी

एकतरी नणंद असावी
मायेची देवघेव करणारी
आस्थेने खाऊ घालणारी

एकतरी नणंद असावी
भाचरांचे लाड करणारी
हक्काची मैत्रीण असावी

एकतरी नणंद असावी
नवरा रागे भरल्यास
त्याचे कान धरणारी

एकतरी नणंद असावी
माझ्या आईबाबांकडे बघ
डोळ्यांतूनच सांगणारी

एकतरी नणंद असावी
गौराई जशी येणारी
माहेर डोळ्यात साठवून जाणारी

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now