Login

अतिलालसा भाग-२

भेदभाव आणि अतिलालसेपोटी झालेल्या घटनेवर प्रकाश टाकणारी कथा!
#जलदलेखनस्पर्धा

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विषय:- आपली माणसं

शीर्षक :- अतिलालसा भाग-२

ठरल्याप्रमाणे ज्यांनी पैशाची जुळवणी केली होती ते आशिषला देतात. त्या आधी आशिष त्यांना एका गाळा असलेल्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. सगळी कागदपत्र दाखवतो. तेव्हाच बाकीच्यांना खात्री पटते आणि ते पैसे आणतात आणि त्याला सुपूर्त करतात.

"अरे महेंद्र, तुझी बुलेट कुठे आहे?" त्याची आई खूप दिवस झाले बुलेट दिसत नाही म्हणून विचारते.

"ती... मी... दुरुस्तीला टाकली आहे." तो अडखळत म्हणतो.

"अरे पण खूप दिवस झाले." त्याची आई त्याची नजर फेरलेली हेरत म्हणते.

"हा त्याचे पार्टस बाहेरून आणायचे आहेत. खूप महाग असतात त्यामुळे यायला वेळ लागतो. तुझी प्रश्नावली संपली असेल तर मी आता निघतो." असे म्हणत तो निघून गेला.

दुसरे वर्ष संपले आणि त्याचे काही विषय पुन्हा परीक्षा देऊन सुटले. शेवटच्या वर्षात तो दाखल झाला.

आशिष कोणाला किती मिळणार पैसे हे सांगून त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि नंतर एक मोठी कंपनी उभारणार असे त्यांना सांगत असतो. पैसे दिल्याने सर्व त्याच्या बोलण्याला खरे मानतात.

"अहो, किती महिने झाले. मी ती महेंद्रची बुलेट काही बघितली नाही. दुरुस्तीसाठी एवढा उशीर लागतो का? "  महेंद्रच्या आईचे मन अनेक शंकानी भरलेले असते म्हणून रात्री नवऱ्याजवळ ती विषय काढते.

"असेल काही. आपला मुलगा काय फसवणारा वाटतो का?" निर्मलाचे आपल्या लाडक्या मुलावर अविश्वास दाखवत बोलणे महेंद्रच्या पप्पांना बिल्कुल आवडले नव्हते.

वंशाचा दिवा नाही म्हणून महेंद्रच्या पप्पांना तो जन्माला येण्याच्या आधी सर्वजण खूप टोमणे मारायचे. देवाकडे साकडं घालून त्यांनी तिसऱ्या वेळी मुलगा व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. त्याचा जन्म झाल्यावर बारशापासून ते आतापर्यंत त्याचे जेवढे वाढदिवस झाले ते सर्व मोठ्या प्रमाणात साजरे त्यांनी केले होते. म्हणून आपल्या लेकाचा एकही शब्द ते खाली पडू देत नव्हते.

महेंद्रच्या आईला हे असे आपल्या तिन्ही मुलांमध्ये भेदभाव करणे मान्य नव्हते पण नवऱ्यापुढे तिचे काही चालत नव्हते.

खूप रात्र झाली तरी महेंद्र आला नाही म्हणून त्याची आई वाट पाहत होती. दाराची घंटी वाजली आणि दरवाजा उघडल्यावर एक उग्र वास आला. त्यामुळे आईने तोंडावर हात ठेवला.

आपला मुलगा दारू पिऊन आला हे बघून महेंद्रची आई आधी आश्चर्यचकित झाली आणि नंतर रागाने त्याला एक कानाखाली मारली.

तो त्यामुळे बाजूला पडला. नशेत धुंद असलेला त्याला तो तिथेच पडून झोपून गेला होता. हा दिवस बघण्यासाठी आपण आपल्या मुलाला वाढवले होते का? वाईट संगतीचा परिणाम त्याच्या अशा वागण्यामुळे दिसून आला.

महेंद्रची आई तिथून त्याला त्याच स्थितीत ठेवून झोपायला गेली. झोप कसली लागणार होती. मोठ्या मुलीने सांगितलेले आता तिला समजत होते. रात्रभर ती विचार करण्यात जागी राहिली आणि सकाळ होताच ती झोपून गेली.

महेंद्रचे पप्पा बाहेर आले आणि आपल्या मुलाला असे खाली झोपलेले आणि विचित्र अवस्थेत पाहून त्यांना काय समजायचे ते समजले. त्यांनी त्याला उठवले आणि अंघोळ करून झाल्यावर खोलीत बोलवले.

महेंद्रची आई थोड्यावेळाने उठली. ती त्या दोघांशी काहीच न बोलता रोजची कामे करत होती.

"महेंद्र काल कुठे होतास?" आज त्याच्या पप्पांनी खोलीत आल्यावर विचारले.

त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली मग आवाज चढवून बोलल्यावर त्याने खरे काय ते सांगितले.

"म्हणजे तू तुझी सोन्याची साखळी, हातातील अंगठी आणि बुलेट विकली?" त्यांनी नजर रोखत आपल्या मुलाला विचारले.

चहा घेऊन आतमध्ये येणाऱ्या आईने त्यांचे बोलणे ऐकून हातातील कप धक्क्याने नकळत खाली पडले.

क्रमशः

महेंद्रचे वडील अजूनही त्याला पाठीशी घालतील का?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all