आठवणींचा पसारा

Its the blog abt our cherished memories ♥️

चला जरा कपाट आवरू म्हणून काढून बसले सगळं...खूप आवडतं मला हे काम त्यात कपड्यांचं असेल तर अजूनच....

कधी नवे अगदी lable न काढलेला ड्रेस सापडतो, तर कधी खूप महिन्यात न घातलेला कुर्ता, तर कधी कोणी भेट म्हणून दिलेलं टॉप जे घालायचं राहून गेलं असतं....

कपाटातून सगळा पसारा काढल्यावर एक एक आठवणी येतात मनात, मन कधी खुश होतं तर कधी जरा खट्टू होतं. कधी असं वाटतं का कशाला काढला आपण हा पसारा तर कधी वाटतं अहाहा, या आठवणीच तर आपला ठेवा.

आज तर कपाट आवरताना बाबांनी 2009च्या दिवाळीत मला दिलेला ड्रेस सापडला. त्यांनी दिलेली शेवटचं gift म्हणजे मीच जाऊन आणला होता तो , सुंदर निळा रंग आणि पारशी एम्ब्रॉयडरी !त्यांना फार कंटाळा असायचा खरेदीचा, तुम्हाला मी पैसे देतो तुम्ही तुमचंआणा, आम्हालाही ते पथ्यावरच पडायचं कारण एका दुकानात नाही आवडला तर गाव हिंडायला आम्ही मोकळ्या  !....डोळे पाणावले.... तेवढ्यात मुली आल्या, अगं कित्ती खराब झालाय हा ड्रेस नको ठेवूस परत हा कपाटात !!!

मी म्हंटलं नाही  हा ड्रेस मी कधीच देणार नाही. माझं ते निग्रहाचं बोलणं बघून त्या काही न बोलता निघून गेल्या. अर्थात त्यांना त्या मागचं बॅकग्राऊंड काहीच माहिती नव्हतं. आणि त्याक्षणी मी सांगितलं असतं तर गंगा जमुना सुरु झाल्या असत्या !!so मीही नाही सांगितलं काही !!

पण या आठवणीच आपल्याला गुंतवून ठेवतात. प्रत्येक वस्तूशी निगडित काही न काही आठवणी असतातच आपल्या !वस्तू जरी निर्जीव असली तरी या आठवणी तिला सजीव बनवतात आणि आपल्या मनात कायमचं घर देतात.आपण काही वेळेला मी प्रॅक्टिकल आहे वैगेरे बोलतो पण असं शक्यच नसतं.... प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम आठवणींचा गोतावळा असतॊ. आणि तो तसा ठेवायला आपल्यालाही आवडतो.

आठवणींचा हा पसारा आवरायला वेळ लागतो खूप.... कपाट तर आवरल्या गेलं माझं पण या मनाला कसं आणू रुळावर? हे तर दूर भरकटत निघालं ते निघालंच !!पसारा हा कपड्यांचा,  पण आठवणी अनेक असतात त्या आपल्याला नविन उमेद, नविन दिशा, नवं सगळं देऊन जातात !!म्हणून आठवणी तयार करा, आठवणी जगा ❣️❣️