आठवणीतील पाऊस

आठवणीतील पाऊस
आठवणीतील पाऊस

अजूनही आठवतो मजला तो पाऊस
ज्याने झाली सा-या गावची नासधूस,
पावसाची जेव्हा संततधार बरसली
तेव्हा कृष्णामाई नदी विसर्ग पावली.

पात्रातून बाहेर दूरवर पसरली
पाहूणी बनून घरातच घुसली,
बघा कशी ती निर्दयी झाली
जणू फटफजिती करुन गेली.

गावातील सर्वांच्या घरादाराची
बघता बघता धुळधाण झाली,
काडीकाडीनं उभारलेल्या संसाराची
क्षणार्धात तिने राखरांगोळी केली.

कुणालाही तिनं नाही सोडलं
पुढं येतं सर्व गावाला वेढलं,
महापूराच पाणी आम्हाला नडलं
आम्ही गावातून स्थलांतर केलं.

परगावच्या शाळेत बस्तान मांडलं
नदी ओसरता गावी पुन्हा प्रस्थान केलं,
घरांची पडझड अन् साचलेला चिखल
पाहून मन हेलावून कासावीस झालं.

साफसफाई करताना झाला हैराण जीव
पण देवाला त्याची वाटली नाही कीव,
कारण पावसानं पुन्हा एकदा धरला जोर
आठवड्यात दोनदा गावात आला महापूर.

जीव मुठीत धरुन पुन्हा एकदा गाव सोडलं
सावरलेल्या घरांना पुराने पुन्हा विस्कटलं,
लागोपाठ दोनदा नदीचं पाणी खवळलं
शांत जीवन जगणा-या गावलाच ढवळलं.

निसर्गापुढ कुणाचं काही नाही चाललं
घर असूनही सारं गावचं बेघर झालं,
मोडलेला संसार कसा उभा होईल?
आता सर्वांना फक्त हेच कोडं पडलं.

पावसानं एकदाच बरसायचं थांबवलं
तसं नदीचं पाणी परत पात्रात परतलं,
वाहून आलेल्या दुर्गंधीन गाव वैतागलं
पुरातील घाणीमुळं रोगराईनं पछाडलं.

आजारपणाला तोंड देत सुखस्वप्न हटलं
संसाराच्या उभारणीला आमचं जीवन झटलं,
जीवन दाता हा पाऊस जीव घेणारा वाटलं
कटू आठवणीने त्याने माझ्या हृदयी घर थाटलं.
-------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all