Nov 30, 2021
ललित

आठवणीतली वारी

Read Later
आठवणीतली वारी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आठवणीतली वारी


   उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या अन् पुन्हा कॉलेज सुरू होण्याचे वेध लागले. ह्या वर्षी परीक्षा उशिरा झाल्या. साहजिकच रिझल्ट्स ही उशिरानेच लागले. एरवी शार्प 14 जून ला सुरू होणारं कॉलेज ह्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होतं.

   रडतपडत कॉलेजची तयारी सुरू केली. खरंतर कंटाळाच आला होता. सुट्टीसाठी घरी येतानाचा 8-9 तासाचा बस प्रवास अगदी सहज संपायचा. पण वापस जाताना मात्र तेच 8-9 तास खूप जड जायचे. तरी पण मनावर दगड ठेऊन निघाली स्वारी बसमधून.

   वातावरण तर अगदीच मस्त होतं. कधी ऊन तर कधी सावली तर कधी पावसाची एक सर. मध्येच हवेची थंड झुळूक.  गवताची पाती हळूहळू जमिनीतून डोकं वर काढू लागली होती . त्यामुळं जमीन मस्त हिरवी पोपटी दिसत होती. इवल्याशा गवताच्या पात्यावर छोटेसे  दवबिंदू मोत्यापेक्षाही सुंदर चमकत होते. रस्त्याच्या कडेला, शेतात छोटी -छोटी डबकी साचलेली. मध्येच एखादा पक्षी त्या पाण्यात मस्त आपले पंख पसरवून खेळत होता.  आकाशातही मस्त ढगांची गर्दी जमलेली, त्यात एखादा पावसाचा काळा ढग उगीचच भाव खाऊन जातोय असं वाटत होतं. गुलमोहर पण  दिमाखात उभा. आता त्याची केशरी फुलं हळूहळू झडत होती अन हिरवी पालवी फुटत होती.  खालून हिरवीगार पान अन वर  केशरी लाल फुलं. खरच गुलमोहराच हे रूप, पूर्ण केशरी लाल गुलमोहरापेक्षा जास्त आकर्षित करणार वाटतं मला.

   बाजूच्या सीटवर एक छोटी मुलगी रडत होती. 

"आई, मला नाही जायचं ग शाळेत, इथेच राहू ना आजीच्या घरी. मला राहायचं होतं अजून. पण तूच नाही राहू दिलं."

" अगं, आजीला वारीला जायचंय ना. ती वारीहून आली आपण जाऊ वापस आजीकडे."

"ए आई, वारीला कुठून जातात गं? अन् कुठे जातात? आज्जीच का जाते ? आपण का नाही जात गं?"

 तिच्या अन् तिच्या आईच्या वारीच्या गप्पा  ऐकण्यात मी कधी माझ्या बालपणात जाऊन पोहोचले मलाही नाही कळलं.खरच किती गोड असतं ना बालपण. 

   जून महिना लागला की शाळेपेक्षाही आतुरतेने वाट पाहायचो ती पालखीची. श्री संत गजानन महाराज यांची शेगावहून पंढरपूरकडे निघालेली पालखी अंबाजोगाईहून जायची. शेगावहून पालखी निघाली की वर्तमानपत्रामध्ये तिचा मार्ग अन् दिवस छापून यायचे. अंबाजोगाईला ती पालखी मुक्कामी असायची. योगेश्वरी देवीच्या देवळामागेच आमची शाळा होती. दुपारी पालखी देवळाजवळ आली की टाळ, मृदुंग, भजनांच्या आवाजांनी सगळा आसमंत दुमदुमून जायचा. कधी शाळा सुटते, कधी घरी जाऊन आईला सांगते अस व्हायचं. दुसऱ्या दिवशी पंढरपूर कडे जायला पालखी निघाली की आमच्या घरासमोरून जायची.

   सकाळपासूनच आम्ही नारळ, फुलं, आरतीचं ताट घेऊन तयारीत असायचो. आई एरवी आम्हाला कधीच झाडाची फुलं तोडू द्यायची नाही. घरच्या देवघरात ती एकच फुल वाहायची. "फुलं झाडावरच शोभून दिसतात आणि ती जास्त काळ तिथंच टिकतात, देवाला मनोभावाने एक फुल जरी वाहिलं तरी चालत" असं तिचं मत असायचं. पण गजानन महाराजांची पालखी येणार म्हटलं की ती तोडू द्यायची सगळी फुलं. "शेगावला जाऊन आपल्या झाडाची फुलं आपण अर्पण करू शकत नाही, पण प्रत्यक्षात महाराज आपल्या दारासमोरून जाणार म्हटल्यावर का नाही फुल वाहायची आपण?"

   आम्ही पण मग आनंदानी फुलं तोडून ठेवायचो. कॉलोनीतल्या चाफ्याची फुलं सुद्धा तोडून घ्यायचो. दूरवरून केशरी पताका दिसायला लागली अन टाळ, मृदुंगाचा आवाज आला की आम्ही पळत जाऊन रस्त्यावर उभं राहायचो. सगळ्यात समोर गजराज, त्यामागे पांढरा शुभ्र सदरा पायजामा घातलेले, हातात उंच केशरी पताका घेतलेले वारकरी, चोपदार मग गजानन महाराजांची पालखी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे, आणि नंतर रंगीबेरंगी साड्या, लुगडी नेसलेल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या स्त्रियांची रांग असायची. सगळे वारकरी एका लयबद्ध चालीत चालायचे. दुरून पाहिलं तर एखाद्या नदीप्रमाणेच भासायचे. कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा जाणवायचा नाही.

   पालखीतलं श्रीमुख एकदम प्रसन्न!

                       रूप पाहतां लोचनीं ।

                       सुख जालें वो साजणी ॥

  अभंगाची ओळ आपसूकच ओठांवर यायची. परडीतली फुलं ही श्री चरणांवर विसावली की अजूनच प्रसन्न वाटायची.

   पालखी निघाली की वाटायचं आपणही जावं सोबत. दूरपर्यंत, नजर जाईल तिथपर्यंत पालखीकडे बघत हा सोहळा मनात साठवून ठेवायचा छंद दरवर्षीचाच पण त्यातही प्रत्येक वेळी नवीनच समाधान मिळायचं, नवीनच आनंद मिळायचा.

    पुढे शिक्षणासाठी घरापासून दूर आल्यावर आई फोनवरच सांगायची पालखी येऊन गेली की. मग तिथेच डोळे बंद करून लहानपणापासून डोळ्यात साठवलेला सोहळा अनुभवायचा. आपसूकच हात जोडले जायचे. 

    

   ड्रायव्हरनी अचानक बस थांबवली. आणि मी पण माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले.तेवढ्यात दुरून टाळांचा आवाज आला.रस्त्यानी केशरी पताका जाताना दिसू लागल्या अन सोबत जय जय राम कृष्ण हरी चा जयघोष. ही तर पालखी. गजानन महाराजांची. शेगाववरून पंढरपूरला निघालेली. 

   बसमध्ये पाहिलं तर कोणीच नाही . सगळे सहप्रवासी उतरून पालखीच्या दर्शनासाठी गेलेले. मी मात्र तिथुनच खिडकीतून सगळं डोळ्यात साठवून घेत होते अगदी आधाशासारखं.

                                       

                                            © डॉ किमया मुळावकर

फोटो- गुगलवरून साभार

( कथा कशी वाटली नक्की सांगा. तुमचा अभिप्राय हीच लेखनासाठीची ऊर्जा आहे. चुकभुल माफ असावी. Share करायची असल्यास लेखिकेच्या नावासहित share करू शकता.)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न