
न पुसता येणाऱ्या "आठवणी"
" स्वस्ती श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धीदं....."
आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीच्या लग्नाच्या मंगलाष्टक बाहेर सुरू झाल्या तेव्हा सुधा, वधू माई आत खोलीत बसून ऐकत होती...
क्षणात तिच्या नजरेसमोर स्पृहाचे बालपण तरळले. अनेक आठवणी उसळी मारू लागल्या. आज कित्ती महत्वाचा दिवस तिच्या लेकीच्या आयुष्यातला, पण तो पहायला आज स्पृहाचे बाबा, ते ह्या सगळ्यात कुठे नव्हते.
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत ती अनेक वर्ष मागे गेली सुधाला तिच्या लग्नाच्या मंगलाष्टका आठवू लागल्या. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट....
पारंपारिक कांदे पोहे पद्धतीने, मोठ्या थोरांच्या साक्षीने थाटामाटात सुधा आणि सुरेशचा विवाह झाला. सुरेशला एक मनमिळाऊ, सोज्वळ, गृहिणी अशी पत्नी हवी होती आणि सुधा अगदी त्याच्या अपेक्षांना योग्य अशीच एका साधारण कुटुंबातली मुलगी.
सुधासाठी नवरा,सासू सासरे, तिचं स्वयंपाक घर म्हणजे जणू सारं विश्व. लग्नानंतर, सुरेश सुधाला वेळ देत असे, बाहेर फिरायला न्हेत, कधी कामासाठी जेव्हा तो दोन दिवस परगावी जात, तेव्हा सुधाला देखील घेऊन जाई.
एका छोट्या गावातून आलेली, साधी मुलगी सुधा. तिची लहान स्वप्नं, छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधू पाहणारी,सुरेशच्या प्रेमात आकंठ बुडाली. अजून काय हवं एखाद्या पत्नीला. प्रेमळ साथ देणारा नवरा, कौतुक करणारे सासू सासरे, स्वतःचे राज्य असलेले घर. तिने स्वप्नात देखील पाहिलं नवत असा, दृष्ट लग्ण्याजोगा तिचा संसार सुरू होता.
वर्षाच्या आत मातृत्वाची चाहूल लागली आणि गोंडस स्पृहाचा जन्म झाला. सुधा आपल्या विश्वात रमून गेली. तिला आपल्या चार भिंतीन पलीकडील जगाचा विसर पडला.
घर, नवरा, बाळ, सासू सासरे ह्यातून तिला स्वतः साठी देखील वेळ नसे.सुरेश त्याच्या ऑफिस आणि तिथल्या बढत्या ह्यात रमू लागला. कामा निम्मित त्याचे परगावी तसचं परदेशात दौरे वाढू लागले.
वर्ष सरली, स्पृहा मोठी होऊ लागली. घरात आई आजी आजोबा, असंच लहानग्या स्पृहाचे जग. कारण तिचे बाबा महिन्यातले काहीच दिवस घरी असायचे. सुरेश आता त्याच्या कंपनीचे परदेशातील ऑफिसचा मुख्य ऑफिसर म्हणून काम पाहत. त्यामुळे महिन्यातील मोजके दिवस भारतात, घरी येत असे.
गेली कित्येक वर्ष सुधा एकटी सगळं घर सांभाळत होती. वृद्धापकाळाने सुधाच्या सासऱ्यांना देवज्ञा झाली. त्यांनतर स्पृहा, सासू बाई आणि सुधा हे त्रिकुट आपल्या घरट्यात सुखात होते. तिघी एकमेकिंचा घट्ट आधार, सुखात आनंदात तिघीच आणि दुःखात देखील त्या तिघीच खंबीरपणे एकमेकींच्या पाठीशी उभ्या होत्या.
सुरेश, सपृहाचे बाबा हयात असून देखील नसल्या सारखेच होते. दहा वर्षांपूर्वी सगळे गुंतलेले धागे सुधाने कापले. सुरेश बरोबर असलेले सगळे संबंध तोडले. नकोच तो गुंता अन् नकोच ती नाती. पण नातं संपवलं म्हणून आठवणी कधी पुसता येतात का? त्या कायमच असतात, तश्याच आत, खोल मनाच्या तळाशी.
निव्वळ दिखावा, घरातून लग्नासाठी दबाव आणि मुख्य म्हणजे आई वडिलांची म्हातारपणाची सोबत म्हणून एक बायको घरात असावी ह्याच हेतूने सुरेशने, सुधाशी लग्नं केले होते. सुरेश कामा निमित्त जास्तीत जास्त वेळ घरा बाहेर राहतोय असंच भाबड्या सुधाला वाटतं असे. पण सगळच खोटं होतं, त्यांचं नातं, तिचं जणू काही अस्तित्वच नवत. सुरेश साठी सुधा म्हणजे एक आई वडिलांसाठी सोबत आणि फक्तं घर सांभाळणारी होती!
सुरेशचे विवाह बाह्य संबंध आहेत, हे जेव्हा सुधाला कळले तेव्हा सुधा पूर्णपणे कोलमडली. घर सोडून माहेरी निघून गेली. तिचं अस्तित्व तिचा संसार, तिचं इतक्या वर्षांचं जग फसव होत! का आणि कशी ह्या पुढे ती त्या खोट्या संसारात, त्या लग्नं बंधनात अडकून राहणार?
सत्य इतकं भयानक होतं पण त्यावेळेस तिच्या सासूबाईंनी कणखर भूमिका घेतली.आपला लेक, सुरेश हाच सुधाचा गुन्हेगार असून त्यांनी सुरेशला त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले आणि लेकी समान सुनेला कायमचं जवळ केलं.मुलगा असून आई वडिलांना त्याने कधी प्रेमाने विचारले नाही, की त्यांची दुखणी खुपणी काढली नाहीत. सुधानी, सुरेशच्या अनुपस्थितीत कायम कर्तव्य दक्ष राहून सासू सासरे आणि घर सांभाळले.
सुधाचा गमावलेला आत्मविश्वास, तिचं अस्तित्व, तिच्यातली स्त्री शक्तीची जाणीव, आई रुपी सासूबाईंनी पुन्हा तिच्यात जागृत केली. सुधाच्या पाठीमागे आजही त्या खंबीरपणे उभ्या आहेत.एकटीने लेकीला मोठी केली, छान शिकवलं आणि आज ....आज तिची लाडकी लेक स्पृहा, लग्नं करून जाणार.....
"सुधाताई, आपल्या स्पृहाच लग्नं लागलं, तुम्हाला बाहेर बोलावलं आहे.... " अनु, सुधाची भावजय सांगत आली.
अनुच्या हाकेने सुधा खाडकन भानावर आली ...
तो भूतकाळ, त्यातील न पुसता येणाऱ्या आठवणी आजही तिची पाठ सोडत नाहीत.पाणावलेले डोळे पुसत सुधा बाहेर लग्नं मंडपात वधू वरास आशीर्वाद द्यायला खोली बाहेर निघाली....
©तेजल मनिष ताम्हणे