Login

आठवांच्या हिंदोळ्यावर.. (चित्र कविता)

आठवणींच्या हिंदोळ्यावर एकटीच झुलताना


मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने आठवणींच्या हिंदोळ्यावर कायम एकटीच मी..
तुला नाही का रे झुलावसं वाटत इतक्या रम्य सागरकिनारी या हिंदोळ्यावर कधी?

आपण सोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण अजूनही जपलाय मी माझ्या प्रत्येक श्वासात..
नाही का रे आठवत तुला धुंद करणारा तो काळ? घालवला जो मी तुझ्या बाहुपाशात..

गतकाळातील या आपल्या स्मृती, डोळ्याच्या पापण्या कधी ओलावून जातात कळतच नाही..
तू कधीतरी येऊन या बाजूच्या हिंदोळ्यावर माझ्यासोबत झोके घेशील ही आस मात्र सुटतच नाही..

चिंब भिजावे वाटते डोळ्यातल्या या अश्रूंनी जेव्हा पाझर फुटतो मनाला..
काय करू पण तेव्हा तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत व्हायला तू नसतोस ना बाजूला..

जीवन हे असेच कटू गोड आठवणींनी आपली ओंजळ भरणारे..
कधी भरभरून देणारे तर कधी रिती ओंजळ नव्याने आयुष्य उमगवणारे..

तुझे माझ्यासोबत नसणे या मनाने मान्य केले जरी आता..
अंतरंगात अजूनही जपून ठेवलाय तो सुगंध आपल्या प्रीतीचा..

तरीही आवडते मला या आठवांच्या हिंदोळ्यावर निवांत झोके घ्यायला..
नसलास तू सोबत जरी आता तरीही हृदयात साठवलेला तुझ्या प्रेमाचा बहर अजूनही अनुभवायला..