अथांग.. भाग ९

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग -

“ये जनाब यहाँ? ये आप के साथ क्या कर रहे है? चले जाओ यहाँसे वरना हम..”

रजाक चिडून म्हणाला.

“शेखसाहब, हम तहकीकात करने आप के यहाँ आये है। इन्होने कंप्लेंट कियी है की, उनकी बीवी यहाँसे गायब हुई है। हमारे पास आपके खिलाफ सर्च वॉरंट है। प्लिज सहयोग किजीये।”

“वॉरंट, वो भी हमारे खिलाफ? इतनी हिमत? देखिये जनाब, ये साहब क्यूँ झूठ बोल रहे है हमे पता नही। पर हम जो कह रहे है वही सच है। ये जनाब उस दिन अकेलेही आये थें।”

“ठीक है, लेकिन एक बार उनके दिलकी भी तसल्ली कर लेते है। हम आपका जनानखाना और नोकरोंके कमरे देखना चाहते है।”

असं म्हणून त्याने लेडी काँस्टेबलला खुणावलं. आता मात्र रजाकचा नाईलाज झाला. त्याने आत जाण्याची परवानगी दिली.

“चलीये हम लेकर जाते है।”

असं म्हणून तो त्या दिशेने वळला. केदार, इब्राहिम आणि ती स्त्री पोलीस रजाकच्या मागोमाग जनानखान्याकडे निघाले. पॅलेसच्या मागच्या बाजूने आत जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता होता. ते दोघे पुढे जात होते. चौकातून वर जाताना बिनकठड्यांचे धाब्यापर्यंत जाणारे बिनदारांचे जीने होते आणि काही जीने सजवलेल्या लहानश्या बंददारांचे होते. खोलीतूनच ये जा करता येत होती. वरच्या मजल्याच्या खोल्यांच्या खिडक्यांना महागड्या रंगीत काचा होत्या. प्रत्येक खिडकीला बाहेरून नक्षीदार जाळीचं लाकडी खोक्याचं अवगुंठन होतं. अंधुकसा सोनेरी लाल रंगाचा प्रकाश पसरला होता.

“हमीदा, ओ हमीदा.”

रजाकचा आवाज ऐकून एक स्त्री वरच्या सजवलेल्या जिन्याने बाहेर येत खाली आली. तिने हिजाब घातला होता. तिने त्यांना सलाम केला.

“ये हमारी बीवी है, हमीदा। ये हमे जनानखाना दिखायेगी।”

केदार विचार करू लागला.

“ही नक्की याची बायकोच असेल का? असेल कदाचित, कारण ती दार असलेल्या बंद खोलीतून बाहेर आलीय.”

रजाकने हमीदाकडे पाहत म्हणाला,

“हमीदा, हम जनानखानेमे आना चाहते है और कनिजोका कमराभी देखना चाहते है।”

हमीदाने होकारार्थी मान डोलावली आणि ती सर्वांना जनानखान्यात घेऊन आली. जनानखान्यात बायका बेहिजाब बसल्या होत्या. बाहेर पुरुष मंडळी आलेली बघताच त्यांची एकच धांदल उडाली. इब्राहिम आणि ती पोलीस स्त्री यांनी जनानखान्याची कसून झडती घेतली. केदारला सर्वांचे बेपर्दा चेहरे दाखवले. ते जनानखान्यातून बाहेर आले. तोपर्यंत इतर पोलिसांनी संपूर्ण बंगला पिंजून काढला होता पण संपूर्ण बंगल्यात सान्वी कुठेच दिसत नव्हती. केदारला खूप आश्चर्य वाटत होतं.

“अशी कशी गायब झाली? माझ्यासोबत ती इथे आली होती मग गेली कुठे? जमिनीत गेली की हवेत विरून गेली? शेखला पोलीस तपासाची खबर लागली तर नसेल म्हणून त्याने सान्वीला इथून दुसरीकडे हलवले असेल?”

सान्वीचा निरागस हसरा चेहरा केदारच्या डोळ्यासमोर आला आणि तो कळवळून म्हणाला,

“सर, मेरी बीवी यहाँ आयी थी। इन्होनेही उसे गायब किया है। आप उनके कनिजोको पूछिये। उनमेसे ही कोई उसे अंदर लेकर गयी थी।”

त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी इब्राहिमने शेखला सर्व नोकरांना बाहेर बोलवायला सांगितलं. थोड्याच वेळात सर्वजण नोकरचाकर बाहेर येऊन उभे राहिले. केदार सर्वांकडे बारकाईने पाहत होता. अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर पडली. त्याला पाहताच केदार इब्राहिमकडे पाहून मोठ्याने ओरडला,

“अरे, हा तर तोच ड्राईव्हर! हाच गाडी घेऊन आमच्याकडे आला होता. सर, ये वही ड्राईव्हर है, जिसने हमे हमारे घरसे गाडीमें बिठाकर यहाँ लेकर आया था। हम दोनो इनके साथ आये थें।”

इब्राहिमने ड्राईव्हरकडे पाहिलं तसा तो बोलू लागला,

“जनाब, ये साहब बोल रहे ये सच है; मै खुद उन्हे लेनेके लिए उनके घर गया था।”

त्याचं वाक्य ऐकून केदारला हायसं वाटलं.

“लेकिन वो अकेले यहाँ आये थें। उनके साथ और कोई दुसरा था ही नही।”

ड्राईव्हरच्या या वाक्यासरशी केदारच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद क्षणार्धात मावळला. त्याच्यावर खेकसत तो म्हणाला,

“ये क्या कह रहे हो? आपने मेरी बीवीके लिए हिजाब भी दिया था। आप क्यूँ झूठ बोल रहे हो?”

केदार कळवळून बोलत होता पण तो ड्राईव्हर ठामपणे केदारच्या बोलण्याला नकार देत होता. सान्वी सोबत होती हे तो मान्यच करत नव्हता. केदार विचारात पडला. काय करावं त्याला समजत नव्हतं. मग एकदम केदारला त्या कनिजची आठवण झाली; जी सान्वीला आत घेऊन गेली होती. केदारने ही गोष्ट इब्राहिला सांगितली. इब्राहिमने लेडी काँस्टेबलला कनिज लोकांचे चेहरे बेपर्दा करायला सांगितलं. केदारने मेंदूवर ताण दिला पण त्या स्त्रीचा चेहरा हिजाबने झाकलेला असल्याने त्याला तिचा चेहरा नीटसा आठवत नव्हता. केदारला त्या स्त्रीचे डोळे आणि एकंदरीत देहयष्टी आठवली. साधारपणे मुलींची उंची असावी त्यापेक्षा ती थोडी जास्त उंच होती. त्यामूळे ती त्याच्या चांगलीच लक्षात राहिली होती. तिचे डोळे निळ्या रंगाचे असल्याने ते त्या हिजाबमधूनही चमकल्यासारखे त्याला भासले होते. आताही समोर एका रांगेत उभ्या असलेल्या कनिजांमध्ये एक स्त्री सर्वांत उंच होती. त्याची नजर त्या स्त्रीवर खिळून राहिली होती. तेच तिचे निळे डोळे हिजाबमधून पुन्हा एकदा तसेच चमकले तसा तिच्याकडे बोट दाखवून तो चिडून ओरडला,

“इब्राहिम सर, हीच ती कनीज. हीच माझ्या बायकोला आत घेऊन गेली होती. सर, सान्वी इस कनिजके साथ अंदर गयी थी। मुझे अच्छी तरहसे याद है।”

इब्राहिमने तिच्याकडे पाहिलं आणि चांगलं खडसावून तिला विचारलं.

“नही जनाब, मै किसीको भी अंदर लेकर नही गयी थी। उस दिन तो मै बावर्चीखानेसे बाहरही नही निकली। ये जनाब झूठ बोल रहे है।”

तिने स्पष्टपणे सांगितलं. केदारला सर्व गोष्टींचं नवल वाटत होतं.

“अरे, हे सर्वजण असे का खोटं बोलताहेत? सगळ्यांनी मिळून कट रचलेला दिसतोय. हे सगळं शेखचंच काम असलं पाहिजे. त्यामुळे त्याला घाबरून हे सगळे खरं सांगत नाहीयेत.”

केदारला आता काय करावं समजेना. सान्वी तिथे आली होती हे सांगणारा एकही व्यक्ती, पुरावा तिथे सापडत नव्हता. केदार दावतसाठी एकटाच आला होता असंच शेख आणि त्याच्या घरातली माणसं, नोकर चाकर सांगत होते. त्यामूळे इब्राहिमसह सर्वांचाच नाईलाज झाला. सगळेजण शेखच्या बंगल्यातून हात हलवत माघारी आले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

🎭 Series Post

View all