अथांग भाग ८

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग.
© अनुप्रिया.

अथांग.. भाग - ८

केदार रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या घालत होता पण परिस्थितीत काहीच बदल घडत नव्हता. त्याच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत होतं. केदारची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. रजाक शेख विरुद्ध कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. त्यात केदार तिथला मूळ रहिवाशी नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे ना कोणी लक्ष देत होतं ना कोणी कारवाई करत होतं. सगळा सावळा गोंधळ सुरू होता. हळूहळू केदारजवळचे पैसे संपत आले होते. सान्वीचा काही शोध लागत नव्हता. आता घरी सगळं सांगण्याशिवाय त्याच्याजवळ कोणता पर्यायच उरला नव्हता. आणि अखेर एक दिवस त्याने युसूफसोबत बाहेर टेलिफोन बूथवरून जाऊन भारतात त्याच्या वडिलांना कॉल केला. बाबांनी ‘हॅलो’ म्हणताच त्याला हुंदका अनावर झाला आणि तो मोठ्याने रडू लागला.

“केदार, काय झालं बाळा? का रडतोयस? सगळं ठीक आहे ना? आणि सुनबाई?”

केदारच्या बाबांनी घाबरून विचारलं. युसूफ सोबत होताच. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. डोळ्यातले अश्रू आवरत तो कसाबसा म्हणाला,

“बाबा, आपली सानू हरवली. मी खुप शोधतोय तिला पण ती सापडत नाहीये. बाबा, मला काहीच समजत नाहीये.”

“काय? हरवली म्हणजे? अशी कशी हरवली? आणि ती हरवेपर्यंत तू कुठे गेला होतास?”

केदारचे बाबा चक्रावून गेले होते. सान्वी हरवली ही गोष्टच खुप भयंकर होती. केदारने रडत रडत बाबांना सगळी कर्मकहाणी सांगून टाकली. बाबांना काय बोलावं हे समजेनासं झालं. परक्या देशात, अनोळखी लोकांत त्यांचा मुलगा एकटाच लढत होता. त्यांची सान्वी एका अनोळखी देशात हरवली होती. ते बोलता बोलता मटकन खाली बसले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ते पाहून केदारची आई धावत बाहेर आली.

“अहो.. अहो काय झालं? कोणाचा फोन आहे?”

असं म्हणत आईने त्यांच्या हातातला फोन काढून घेतला आणि ती बोलू लागली.

“हॅलो, कोण बोलतंय?”

“आई, मी केदार. काय झालं? बाबा ठीक आहेत ना?”

केदारने घाबरून विचारलं.

“काय झालं? तू काय सांगितलंस त्यांना? ते का इतके घाबरलेत?”

आईचा स्वर रडवेला झाला होता.

“काही नाही आई, तू घाबरू नकोस. मी ठीक आहे. तू बाबांची काळजी घे. तसं मी शेजारच्या प्रशांतला फोन करून सांगतोच. हवं तर बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जा. आई प्लिज, काळजी घे गं. मला तुमच्याशिवाय कोणी नाही. प्लिज माझ्यासाठी तरी जपा स्वतःला.”

केदारचा स्वर कातर झाला होता. त्याने लगेच फोन ठेवून दिला. रणरणत्या उन्हातला कोरडेपणा डोळ्यातही दिसत होता. केदारने शेजारच्या प्रशांतला कॉल करून आईबाबांकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि त्याच्या अकाउंटला थोडे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. एक आठवडा उलटून गेला होता तरी पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. केदार आणि युसूफ रोज पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करत होते पण पोलीस ‘आमचा तपास चालू आहे.’ असं सांगून त्याला तिथून हाकलून लावत होते.

एक दिवस केदारला आशिष दुबे यांचा कॉल आला. त्यांनी त्याला ऑफिसला बोलवून घेतलं. केदार आणि युसूफ घाईने इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला आले. आशिष त्या दोघांची वाटच पाहत होते.

“या मिस्टर केदार, या बसा.”

आशिष यांनी त्यांना खुर्चीत बसायला सांगितलं. केदार आणि युसूफ समोर मांडलेल्या खुर्चीत बसले आणि आशिष यांनी बोलायला सुरुवात केली.

“केदार, मला कल्पना होतीच की, स्थानिक पोलिस तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाहीत. मी मागेच म्हटल्याप्रमाणे ही हाय प्रोफाईल केस आहे. त्यामुळे रजाक शेख यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला हात लावण्याची हिंमत कोणीच दाखवणार नाही. म्हणूनच या केसवर एक स्पेशल ऑफिसर काम पाहणार आहेत. ते या केसचा लवकरात लवकर छडा लावतील.”

असं म्हणून त्यांनी टेबलवरच्या इंटरकॉमवरून बाहेर रिस्पशनिस्टला कॉल केला.

“उन्हे अंदर भेज दो।”

असं म्हणून फोन ठेवला.

“मे आय कम इन सर?”

सर्वांचं लक्ष केबिनच्या दरवाज्याकडे गेलं. समोर साधारण सहा-साडे सहा फुटाचा उंच, धिप्पाड अंगावर पोलिसांचा युनिफॉर्म घातलेला माणूस उभा होता.

“कम इन मिस्टर इब्राहिम.”

आशिष यांनी त्यांना आत बोलावलं. इब्राहिम आत आला आणि त्याने आशिष यांच्या हातात हात मिळवला. आशिष यांनी बोलायला सुरुवात केली,

“मिस्टर केदार, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही केस स्पेशल फोर्सच्या ताब्यात गेली आहे. हे मिस्टर ‘इब्राहिम हबीब’ या केसचे इन्चार्ज. मी यांना तुमची केस समजावून सांगितली आहे. यापुढे तुम्ही यांच्याशी सुद्धा संपर्कात रहा. आता तुम्ही त्यांना ते विचारतील त्या प्रश्नांची खरी उत्तर देऊन त्यांना सहकार्य करा म्हणजे त्यांना तपासाची दिशा ठरवता येईल.”

आशिष यांच्या बोलण्यावर केदारने होकार दर्शवत इब्राहिमकडे पाहून नमस्कार केला. त्यानेही मान तुकवून त्याचा स्वीकार केला. थोडा वेळ बोलून ते तिघे आशिष यांच्या केबिनमधून बाहेर पडले.

आता खऱ्या अर्थाने तपासाला वेग येऊ लागला होता. इब्राहिमने केदारकडून सान्वीचा फोटो घेतला. सर्व पोलीस स्टेशनला त्याची एकेक प्रत पाठवून देऊन तपास सुरू करायला सांगितलं. त्याने केदारकडून सुरवातीपासून ते आतापर्यंत जे काही घडलं त्याची माहिती घेतली आणि त्याचदिवशी रजाक शेख यांच्या घरी तपासाचं वॉरंट काढलं. त्याने युसूफ, केदारला बोलावून घेतलं. इब्राहिमने दोन चार हवालदार आणि एका लेडी काँस्टेबलसमवेत शेखच्या बंगल्यावर अचानकपणे धाड टाकण्याचा प्लॅन बनवला जेणेकरून बेसावध शेखला सहज जाळ्यात पकडता येईल आणि सान्वीचा शोध लागेल. पण त्याचा अंदाज फोल ठरला. बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशीच सिक्युरिटीने त्यांना अडवलं. इब्राहिमने त्याला स्वतःचं आयडी दाखवल्याबरोबर लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. सिक्युरिटीने घाबरून पटकन गेट उघडलं आणि अदबीने त्या सर्वांना आतमध्ये जाण्यास सांगितलं. इब्राहिम आपल्या टीमसह आत जाताच त्याने लगेच गेटवरच्या फोनवरून आत रजाक शेखला पोलीस आल्याची बातमी दिली.

“अस्सलाम अलैकुम जनाब.”

इब्राहिमने आत येताच शेखला सलाम केला.

“वालेकुम अस्सलाम. सब खैरीयत? यहाँ कैसे आना हुआ? हमे बुला लिया होता।”

रजाक त्याच्याकडे पाहून बोलत असतानाच त्याचं लक्ष केदारकडे गेलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..