अथांग.. भाग ७

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - ७

ती रिसप्शनिस्ट बोलू लागली. तिने केदार आणि इंडियन एम्बेसी ऑफिसर यांची मीटिंग ठरवली. बऱ्याच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ऑफिसर आशिष दुबे यांची भेट झाली. केदार आणि युसूफ आत गेले. समोर साधारण चाळीशी-पंचेचाळीशीचे मध्यमवयीन गृहस्थ खुर्चीत बसले होते. केसात रुपेरी कडा डोकावत असल्यातरी चेहऱ्यावर एक अनोखं तेज झळकत होतं. केदार आणि युसूफ आत जाताच त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. मोबाईलमधलं व्हॉइस रेकॉडिंग सुरू केलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“मिस्टर केदार, मी इंडियन एम्बेसी ऑफिसर या नात्याने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून जे घडलं ते सगळं खरं खरं सांगा.”

“साहेब, माझं नाव केदार परांजपे. आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी सान्वी परांजपे दोन दिवसापूर्वी इथे कुवेतमध्ये आलो. रजाक शेख यांनी आम्हाला त्यांच्या घरी दावतसाठी आमंत्रित केलं म्हणून आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यानंतर माझी बायको बेपत्ता आहे. मला चांगलंच ठाऊक आहे त्या शेखने माझ्या बायकोला लपवून ठेवलंय. प्लिज साहेब, काहीतरी करा. माझ्या बायकोला परत मिळवून द्या. पोलिसांना त्यांच्या घरी तपासासाठी पाठवा. तुम्ही तसं पत्र दिलंत तरच ते तपासाला सुरुवात करतील.”

केदार हात जोडून विनवणी करत होता. ते पाहून ऑफिसर आशिष केदारचं सांत्वन करत म्हणाले,

“प्लिज, तुम्ही आधी शांत व्हा. मी तुम्हाला तसं पत्र देतो ते पत्र पाहून इथले स्थानिक पोलीस लगेच तपासाला सुरुवात करतील पण त्याआधी मला सांगा तुम्ही इथे कशासाठी आला होतात?”

“नोकरीसाठी. इथल्या एका मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून माझी निवड झाली आहे.“

“कोणत्या कंपनीत?“

आशिषने हा प्रश्न विचारताच केदारने त्याचं नवीन कंपनीने दिलेलं ऑफर लेटर त्यांना दाखवलं. केदारच्या हातातलं लेटर घेत आशिष यांनी त्यांच्या असिस्टंटला आवाज दिला.

“जावेद, ये इनका ऑफर लेटर है। चेक करके कंपनीके डिटेल्स पता लगाओ। जल्दी, डोन्ट वेस्ट टाईम।”

जावेदने होकारार्थी मान डोलावली आणि ऑफर लेटर घेऊन तो केबिन बाहेर निघून गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर जावेद पुन्हा आत केबिनमध्ये आला आणि त्याने आशिष यांच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकून आशिष यांचा चेहरा अजूनच गंभीर झाला. त्यांनी खुणेनेच जावेदला बाहेर जायला सांगितलं तसं तो तिथून निघून गेला. आशिषने बोलायला सुरुवात केली.

“मिस्टर केदार, तुम्ही ज्या कंपनीचं ऑफर लेटर दाखवत आहात अशी कोणतीची कंपनी कुवेत मध्येच काय पूर्ण सौदी अरेबिया देशातही नाही. गेली दोन तास आमचा ऑफिसर इंटरनेटवर या कंपनीचे डिटेल्स शोधतोय पण त्याला काहीच सापडत नाहीये. त्याने लेटरवर नमूद केलेल्या लँडलाईन नंबरवर कॉल करून पाहिला. नंबर वापरात नाही असं येतंय. याचाच अर्थ तुम्हाला फसवण्यात आलं आहे.”

केदार अवाक झाला.

“हे कसं शक्य आहे? अहो सर, मी स्वतः ऑनलाईन मुलाखत दिली होती. मी स्वतः फोनवर त्यांच्याशी बोललोय. शिवाय रजाक शेखही त्यांच्याशी बोलले होते. त्यानंतर कंपनीमधून मला पुन्हा कॉल आला होता. रजाक शेख जनाबांची ओळख आधीच सांगितली असती तर इतक्या फॉर्मॅलिटीज केल्याच नसत्या. डायरेक्ट अपॉइंटमेंट केली असती असं सुद्धा मला सांगण्यात आलं होतं. काहीतरी गल्लत होतेय. अशी कशी एका रात्रीत कंपनी गायब झाली?“

केदार पूर्णपणे घाबरून गेला होता. त्याची ती अवस्था पाहून आशिष उठून उभे राहिले आणि म्हणाले,

“मिस्टर केदार, ही केस दिसते तितकी साधी नाही. सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित होत्या. तुम्हाला त्या प्लॅनमध्ये बरोबर अडकवलं आहे. याच्या मुळापर्यंत जावं लागेल पण ज्या नावाचा उल्लेख तुम्ही करत आहात ती इथली खुप प्रतिष्ठीत व्यक्ती आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्याआधी आपल्याला स्पेशल फोर्सकडून परमिशन मिळवावी लागेल.”

आशिष बोलत असतानाच त्यांनी कोणाला तरी कॉल केला आणि भेटण्याची वेळ मागून घेतली. भारतात कॉल करून केदारचं वेरिफिकेशन करून घेतलं. त्याचा पासपोर्ट व्हिजा चेक करण्यात आलं. केदार खरं सांगत होता हे आशिषच्या ध्यानात आलं आणि त्यांनी त्याला पूर्ण मदत करायचं ठरवलं. त्यांनी पटापट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून स्पेशल तपासणीची परवानगी मिळवली आणि केदारच्या हातात पत्र ठेवत ते म्हणाले,

“तुम्ही हे पत्र घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला जा. ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. मिस्टर केदार ही केस हाय प्रोफाईल असल्याने केस स्पेशल फोर्स ऑफिसर्सकडे जाईल.”

केदारने मान डोलावली आणि ते पत्र हातात घेतलं. आशिष दुबे यांचे आभार मानून तो आणि युसूफ तिथून बाहेर पडले. स्थानिक पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी ते पत्र तेथे सादर केलं. पोलिसांना तक्रार लिहून घेणं भाग पडलं. केदारला हायसं वाटलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

🎭 Series Post

View all